खंड ६ - अध्याय ५
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ अन्य शक्ति आदिशक्तीस म्हणत । कामासुराचा प्रभाव अद्भुत । शस्त्रहीन क्रांतीनें जिंकित । चराचर सर्व वरप्रभावें जो ॥१॥
ऐसा महादैत्य न ऐकला । तुझ्या तोंडून पूर्वी संदर्भ न आला । त्याचा नाश कैसा ओढवला । तें सांप्रत सांग आम्हां ॥२॥
आदिशक्ति त्यांस सांगत । महाकालीमुख्य देवतांनो सांप्रत । गणनाथ त्या दुर्जयास जिंकित । ऐका वृत्तांत समग्र त्याचा ॥३॥
एकदा कामासुर स्वसभेंत । बैसला होता आनंदांत । तेव्हां दैत्यवीर त्यास म्हणत । जोडूनी ओंजळ करांची ॥४॥
अहो महाराज निश्चित । कृतकृत्य आपण एक जगांत । परी हितावह वचन तुज सांगत । आम्ही तें सांप्रत ऐकावें ॥५॥
चराचर जिंकून दैत्येश करित । पूर्वीही राज्य विश्वांत । परी कपटभावें त्यास मारित । कालांतरानें देवमुनी ॥६॥
काटा आला मार्गांत । तो फेकिला आपण दूर सतत । परी तो जाळून भस्मसात । करिता पुनरपि भय नसे ॥७॥
म्हणोनी आम्ही प्रार्थना करित । देव जे शंभुमुख्य गुप्त । राहती गिरिकंदरांत । त्यास शोधून मारावें ॥८॥
शत्रूंचा करावा निःपात । त्यायोगे भविष्यकाळांत । निष्कंटक राज्य होईल सतत । दूरदर्शित्व ठरेल हें ॥९॥
वेद सांगती देव अमर । शस्त्रास्त्रांनीं ते न मरणार । म्हणोति शत्रूंच्या नाशकर । उपाय एक ऐकावा ॥१०॥
यज्ञकर्मांचा होता नाश । मरतील अमर निःशेष । कर्मीं जें अन्न देवेश । मिळे त्यावर देव राहती ॥११॥
ऐसें वेदांत असे वचन । कर्मान्नासी देवता मान । म्हणून करितां कर्मखंडन । निष्कंटक होऊं आपण सारे ॥१२॥
त्यांचें ते ऐकून वचन । कामासुर हर्षित होऊन । आपला विचार अति शोभन । ऐसें त्यांना प्रशंसितसे ॥१३॥
आतां सर्व दैत्यांनी प्रयत्न । करून करा कर्मखंडन । महाबळी तुम्ही जाऊन । माझ्या आज्ञेचें पालन करा ॥१४॥
त्याची आज्ञा शिरसावंद्य मानून । दानवमुख्य मनीं आनंदून । पृथ्वीवरी गेले निश्चय करून । कर्मखंडन ते करिती ॥१५॥
ब्राह्मणांदीसी ताडन करिती । वर्णाश्रमांतून भ्रष्ट करिती । दानव दुर्जय दुष्टमति । सर्वत्र करिती दुराचार ॥१६॥
कामासुराच्या प्रतिमा करून । सर्वत्र त्या करिती स्थापन । प्रतिनगरीत गावात आऊन । पूजा त्या मूतींची करिती ॥१७॥
तेव्हां सर्वजण हाहारव करिती । वर्णाश्रमपालनीं असमर्थ असती । स्नानादिकही न करिती । ऐत्यांच्या भयाने सर्वत्र ॥१८॥
न स्वाहा न स्वधा देत । वषट्कार कोठें न ऐकूं येत । वर्णाश्रमविहीन होत । ब्राह्मणादी पृथ्वीवरी ॥१९॥
कांही मुनि वनांत जाऊन । स्वधर्माचें करिती पालन । असुरांसी अज्ञात राहून । विगतज्वर ते होती ॥२०॥
तेव्हां महादेवादि उपोषणपर । शोकसंविग्न व्यग्र । भयविव्हल होऊन सर्व अमर । विचार करिती गुहेंत ॥२१॥
कमासुराचा नाश व्हावा । यास्तव काय उपाय करावा । हें न सुचतसे देवां । अतिदुःखित ते झाले ॥२२॥
तैं तेथे योगींद्र मुद्गल येत । परमार्थवेत्ता तो ज्ञात । त्यास पाहून हर्षित । देव सारे वंदिती त्या ॥२३॥
शंभुविष्णुअ मुख्यादि । भृगु आदिक योगींद्र । पूजिती त्यासी भक्तिपर । सुखासीन तो जाहला ॥२४॥
हा जोडून शिव विनवित । चिंतामग्न तो विनययुक्त । धन्य आम्ही झालीं समस्त । महायोग्या तुझ्या दर्शनानें ॥२५॥
गाणपत्य तूं सर्वपूज्य पावन । आमच्या आदिकाळी महान । गुरु भ्रुशुंडी उपदेशून । ज्ञानयुक्त आम्हां करी ॥२६॥
तुं त्या भ्रुशुंडीचा गुरु प्रख्यात । तुझ्यासम कोणी नसत । शिष्यशिष्यां आम्हां सांप्रत । तारून नेई महाप्रभो ॥२७॥
गाणपत्याग्रणी तू जगांत । आमची विपनावस्था तुज ज्ञात । जरी तूं न रक्षिसी तरी मृत । आम्हीं सर्व देव होणार ॥२८॥
यज्ञादिकर्मांचें होऊन खंडन । आम्ही झालो अन्नहीन । कामासुरें दुष्टें जिंकून । स्थानभ्रष्ट केलें आम्हां ॥२९॥
ज्यास असे जन्मस्थितिमरण । त्यांच्या हस्ते कामासुरा न मरण । ऐसें त्यास असे वरदान । म्हणोनि उपाय सांगा योगींद्रसुख्या ॥३०॥
आपण जो उपाय सांगाल । तो आचरूं त्वारेनें सबल । चराचर रक्षण्या या वेळ । करावें मार्गदर्शन आम्हां ॥३१॥
ज्ञानोपदेश करून । अज्ञानाचा नाश प्रसन्न । करिशी तरी हिंसा न होऊन । साहाय्य होई आम्हांसी ॥३२॥
ऐसें त्यांचें ऐकून वचन । मुद्गलास दया येऊन । गणनाथास स्मरून । तेव्हां म्हणे तो शंकरासी ॥३३॥
शंभो विष्णु देवाधिकहो वचन । सांगतों हितावह पावन । ज्यानें कामासुराचा नाश होऊन । सुख लाभेल सर्वांसी ॥३४॥
तूं ईश्वर साक्षात् अससी । गणेशाच्या अंशरूप तुजसी । मी काय सांगू विद्यानाथासी । मानद तुझें दर्शन शुभ ॥३५॥
तुझ्या दर्शंनमात्रें जगांत । लोक कृतकृत्य होतात । तूं ईश यांत संदेह नसत । मीं काय सांगावें उपदेशपर ॥३६॥
तरी मी कांहीं सांगेन । आज्ञेनें तुझ्या पालन करीन । गणेशाचें सर्वबावें करावें ध्यान । भजन सर्व देवतांनी ॥३७॥
तो गणेशदेव स्वानंदस्थ असत । जन्मस्थितिमृत्युहीन सतत । निःसंशय तो क्षणार्धांत । मारील त्या महाअसुरासी ॥३८॥
पूर्वीं शंभो तुम्हांसी । तैसीच अन्य देवांसी । सिद्धि लाभली विप्रांसी । तैसीच लाभेल गणेशकृपेनें ॥३९॥
भूस्वानंद गजानन । महाभागा आराधावा सविधान । मयूरेश तो पावन । सर्व सिद्धिप्रद सर्वदा ॥४०॥
एकाक्षर मंत्रें तप उत्तम । आचरावें एकमन । तरी स्वल्पकामांत विघ्नेश प्रसन्न । होईल यांत न संशय ॥४१॥
ऐसें बोलून मुद्गल जात । प्रणाम करून शंकराप्रत । स्वच्छंदें गणेशायोगरत । आपुल्या आश्रमीं परतून ॥४२॥
तेव्हां तो उपाय ऐकून । देव ब्राह्मण झाले प्रसन्न । हर्षयुक्त मनें तत्क्षण । दंडकारण्यांत गेले ॥४३॥
तेथ मयुरेश विराजत । त्याची आराधना करण्या जात । एकाक्षर मंत्रें एकचित्त । ते सर्वही उत्कंठेनें ॥४४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणें षष्ठें खंडे विकटचरिते मुद्गलदेवसमागमो नाम पंचमोध्यायः समाप्तः
। श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP