खंड ६ - अध्याय ४१
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ आदिशक्ति कथा पुढची सांगत । एकदा सुखासीन बैसला गणांसहित । मयूरेश तैं शिवास पाहत । माया दाखवी अद्भुत तेव्हां ॥१॥
महेशाजवळीं जाऊन । घेई भालस्थित चंद्र ओढून । त्वरेनें गेला निघून । क्रीडनोत्सुक त्या वेळीं ॥२॥
मायेनें मोहित शिवादी समस्त । चंद्रापहरणाचें कारण न जाणत । त्या देवेशाचें रहस्य अज्ञात । हेतें तथा सर्वांसी ॥३॥
शिव क्रोधयुक्त अत्यंत । स्वभाळींचा चंद्र आणा म्हणत । मुनिसुत तैं विनम्रपणें सांगत । मयूरेश खेळतसे त्यासवें ॥४॥
रागावून शिव आज्ञा देत । गणेश्वरास बांधून आणावें त्वरित । मार देऊन माझ्या पुढयांत । घेऊन या शीघ्र त्यासी ॥५॥
तदनंतर ते गण जात । जेव्हां मयूरेशाच्या पुढयांत । तेव्हां निःश्वासवायूने उडवित । पालापाचोळयांसम त्यांसी ॥६॥
ते शिवासमोर येऊन पडत । त्यांचा दर्प भग्न करित । शिव तैं चिंतातुर होत । काय करावें तें समजेना ॥७॥
तेव्हां पुनरपि माया दाखवित । चंद्र शिवभाळावरी ठेवित । हें शिवासी न कळतां घडत । भ्रान्त झाले सारेजण ॥८॥
आपुल्या भालावरी चंद्र पाहून । विस्मित झालें शिवाचें मन । त्याचें आगमन निगर्मन । सतत होई ऐसें वाटे ॥९॥
ऐसें शिवास करून भ्रान्त । गणेशें दाखविली माया अद्भुत । एकदां तो जात वनांत । दैत्येंद्रास मारावया ॥१०॥
दैत्येंद्र तो व्याघ्ररूप घेत । तेव्हां गजानन सिंह होत । त्या मयूरेशास त्या रूपांत । न जाणती विप्रसुत ॥११॥
मुनिबाळ त्यास शोधिती । रानांत इतस्ततः भटकती । दर्शनोत्सुक ते चिंता करिती । झोपले शेवटीं थकूनियां ॥१२॥
श्रमानें त्यांस निद्रा येत । दक्षिणेकडे पाय त्यांचे असत । तें पाहून यम बांधित । त्या मुनिपुत्रांसी निगडांनी ॥१३॥
त्यांस बांधून स्वपुरीं नेत । यम होता कर्तव्यपूर्तिमोदांत । इकडे व्याघ्ररूप दैत्यास मारित । मयूरेश तो परतला स्वपुरासी ॥१४॥
तेथ मुनिपुत्रांसी न पाहत । तेव्हां झाला अति विस्मित । अंतर्ज्ञानानें त्यास ज्ञात । वृत्तान्त झाला मुनिपुत्रांचा ॥१५॥
मयूरेश स्वर्गलोकीं गेला । त्यानें स्वबळें यम जिंकला । त्या मुनिसुतांचा झाला । संरक्षक तो प्रेमळ ॥१६॥
सर्व मित्र करिती जयजयकार । गाती गणेश्वराचें स्तुतिस्तोत्र । ऐश्या नानाविध क्रीडा बालवीर । मयूरध्वज तेथें दाखवी ॥१७॥
पंधरा वर्षें वयाचा झाला । गणेश्वरें दैत्यगण असंख्य मारिला । तोंवरी अनेक खेळ खेळला । आपुल्या बाळमित्रांसवें ॥१८॥
तदनंतर एकदा नारदमुनी । गणेशाच्या सतत भजनीं । पूजनीं मननीं दंग होऊनी । वीणावादन करीतसे ॥१९॥
योगी नारदाचें स्वागत करिती । शंकर तयासी पूजिती । अर्घ्य पाद्य देऊन विचारिती । इतिवृत्त जगांतलें ॥२०॥
तेव्हां नारद हर्षयुक्त । शंकरास सांगे वृत्तान्त । ब्रह्मदेवें पूर्वीं केलें तप नितांत । सिद्धिबुद्धी आराधिल्या ॥२१॥
त्यांनीं त्यास दिलें वरदान । कन्या होऊन भूषवूं सदन । केलें आपुलें सत्य वचन । प्रजापतीच्या घरीं जन्मल्या ॥२२॥
आतां त्या झाल्या उपवर । दुसरा न मिळे योग्य वर । मयूरेश हाचि श्रेष्ठ थोर । उभय कन्यांसी वाटतसे ॥२३॥
तरी ब्रह्मदेवें मज पाठविलें । कन्याद्वयासाठीं याचिलें । त्याचें मागणें मान्य केलें । तरी तो होईल हर्षभरित ॥२४॥
शंकरानें तें मान्य केलें । वर्हाडी सगळे सजले । मयूरेशास घेऊन निघाले । गणांसहित सारे जण ॥२५॥
मार्गांत मयूरेशास । सिंधूचें नगर पडलें दृष्टीस । देवांसी मुक्त करण्यास । उद्युक्त तेव्हां जाहला ॥२६॥
त्या सिंधुनगरांत जाऊन महाघोर युद्ध करून । गणांसहित महा असुराशीं लढून । पराक्रम गाजविला ॥२७॥
तदनंतर परशूनें फोडित । अमृतपूर्ण नाभिस्थल त्वरित । त्यायोगें सिंधु मरून पडत । नाना दैत्येंद्रही ठार झाले ॥२८॥
त्याचा पिता चक्रपाणि । विष्णुभक्त थोर गुणी । मयूरेशास शरण येऊनी । अपिलें सारें गणेशासी ॥२९॥
गणेशभक्तिसंयुक्त । घेऊनी गेला त्यास नगरांत । आदरसन्मान करित । चक्रपाणि राजा आदरें ॥३०॥
कारावासांतून सोडवित । विष्णुमुख्य देवांसी त्वरित । देवेंद्रासहित तयांस पूजित । भक्तिभावें त्या वेळीं ॥३१॥
तेथ ब्रह्मा हर्षभरें स्मरत । आपुल्या दोन कन्यांस मनांस । सिद्धिबुद्धी तेथ प्रकटत । रूपलावण्य अतुल त्यांचें ॥३२॥
देवांस नव्हतें माहित । ब्रह्मदेवाचें ह्रदगत । ते त्या कन्या पाहून होत । कामविह्वल तत्क्षणीं ॥३३॥
देवेंद्रासी विधीसी विनविती । आम्हांसी द्या या कन्या म्हणती । ह्यांच्या समान लावण्यवती । जगांत कोठें न पाहिल्या ॥३४॥
तेव्हां ब्रह्मा म्हणे तयांप्रत । सुरेश्वरही तुमच्यांत । नसे कोणी त्यांच्या योग्य वाटत । क्षमा करा मजलागीं ॥३५॥
मयूरेश हा श्रेष्ठ वाटत । त्यास अर्पण्या कन्या इच्छित । तेव्हां ते सारे देव प्रार्थित । पितामहा पुनः विचार करावा ॥३६॥
आपुलें आपण सांगितलें मत । विचारा एकदा कन्यकांप्रत । तेव्हां ब्रह्मदेव खेदयुक्त । विचारी त्या उभयतांसी ॥३७॥
ह्या सर्व देववृंदांत । निवडा तुम्हीं वर इच्छित । तेव्हां त्या विधात्यास सांगत । ह्रद्गण आपुलें स्वच्छंदें ॥३८॥
त्या चिंतामणीकडे पाहती । सिधिबुद्धी तैंअ लाजती । हाचिअ वर पसंत चित्तीं । ऐसें सुचविती स्पष्टपणें ॥३९॥
तैं मयुरेशास सोडून । अन्य देव गेले निघून । गणेशासी सत्कारून । सुगंधी पुष्पमाळांनीं ॥४०॥
त्या मयूरेशास समर्पण करित । सिद्धिबुद्धीसी विधियुक्त । तेव्हां देवेंद्रादी त्यास नमित । अत्यंत आदरें सर्वही ॥४१॥
सिंधूच्या वधानें प्रहर्षित । देवगण पूजन त्याचें करित । स्तवन करिती भक्तियुक्त । देवर्षी तेव्हां श्रद्धेनें ॥४२॥
शिखिवाहा तुज नमन । मयूरध्वजा तुज अभिवादन । मयुरेश्वरा तुज नमन । गणेशा तुज प्रणाम असो ॥४३॥
अनाथांच्या नाथासी । अहंकाररहितांच्या पतीसी । मायाप्रचालकासी विघ्नेशासी । सर्वानंदप्रदात्यासी नमन ॥४४॥
सदा स्वानंदवासीसी । स्वधर्मरतांच्या पालकासी । अनादीसी परेशासी । दैत्यदानवमर्दनकरा नमन ॥४५॥
विधर्भस्थस्वभावां दूरकर्त्यासी । विकटासी शिवपुत्रासी । सर्वांच्या मातापित्यासी । पार्वतीनंदनासी नमन ॥४६॥
स्कंदाग्रजासी नाना अवतारधारकासी ॥ विश्वसंस्थाकरासी । काश्यपासी शेषपुत्रासी । सिंधुहंत्यासी नमन असो ॥४७॥
हेरंबासी परशुधरासी । देवेदेवेश पालकासी । ब्रह्मपतीसी योगेशासी । शांतिदात्यासीन नमन असो ॥४८॥
कृपालवासी अनंताननबाहूसी । अनंतउदरासी अनंतविभवासी । चित्तवृत्तिप्रचालकासी । सर्व हृत्स्थासी नमन असो ॥४९॥
सर्वांसी पूज्यासी सर्वादिपूज्यासी । ज्येष्ठराजासी गणांच्या पतीसी । सिद्धिबुद्धीच्या वरासी । मयूरेशा तुज नमन असो ॥५०॥
जेथ वेदादाही धरिती मौन । स्तवनीं असमर्थ योगिजन । तेथ आमुचें बुद्धिमान । किती समर्थ होणार ? ॥५१॥
म्हणोनी देवा जैसें जमलें । तैसेंचि आम्हीं स्तविलें । दयाघना नमन केलें । तुजला आम्हीं भक्तिभावें ॥५२॥
ह्या स्तवानानें तुष्ट होई । आम्हांसी रक्षी प्रत्यहीं । तुझ्या अंगातून सर्वही । उत्पन्न आम्हीं जाहलों ॥५३॥
ऐसी स्तुति करून । प्रणास करिती विनतमन । तेव्हां देव होऊन प्रसन्न । म्हणे देवेशांनो वर मागा ॥५४॥
मुनिदेवहो स्तोत्र हें उत्तम । सर्वसिद्धिप्रद मनोरम । महाभागहो सर्वदा अभिराम । मज आवडतें अत्यंत ॥५५॥
जो हें दाचील अथवा ऐकेल । अथवा वाचून दाखवील । त्यास भुक्तिमुक्ति लाभेल । गणेशभक्ति सर्वदा ॥५६॥
मयूरेशाचें ऐकून वचन । देव तैसे मुनिजन । प्रार्थिती प्रणाम करून । हर्षभरें त्या वेळीं ॥५७॥
जरी प्रसन्नभावें वर देसी । तरी अचल भक्ति दे आम्हांसी । नाथा तुझ्या स्मरणासी । सदैव करो ह्रदय आमुचें ॥५८॥
महावीर सिंधूस मारिलें । तेणें आम्हां कृतार्थं केलें । आतां स्वाधिकारपद भलें । भूषवूं तुझ्या आज्ञेनें ॥५९॥
तथाऽस्तु ऐसें बोलून । देवमुनींसी इच्छित देऊन । आपुली भक्ति दृढ करून । त्या सर्वांच्या ह्रदयांत ॥६०॥
चक्रपाणि राजा गणेश पंचायतन । पूजी नित्य एकमन । त्यायोगें स्वानंदीं निमग्न । मयूरेश सायुज्य पावला ॥६१॥
तदनंतर सर्वांसमवेत । मयूरेश मयूरनगरीं परतत । सर्व देवांसी योग्य स्थानीं स्थापित । देव मुनींसी तैं सांगे ॥६२॥
ज्यासाठीं देवांनो आलात । तें तें सर्व पुरविलें इच्छित । आतां निजलोकीं मीं जात । मुनीश्वरही निरोप द्यावा ॥६३॥
ऐसें बोलून अंतर्धान । मयूरेश पावला तत्क्षण । लीला त्याची अगाध महान । देवर्षी खेदयुक्त जाहले ॥६४॥
पार्वती शंकर मूर्च्छित पडले । तैं त्यांच्या ह्रदयांत प्रकटले । तयांसी मयूरेश म्हणाले । सावध व्हावें माते ताता ॥६५॥
मीं तुमच्या ह्रदयांत स्थित । चित्तवृत्तींसी चालना देत । माझा वियोग तुम्हांप्रत । कादापि न होईल ॥६६॥
बाहय मूर्ति स्थापून । पूजा करा भक्तियुक्तमन । भज सेवावें विशेषेंकरून । त्यानें संतोष पावाल ॥६७॥
ऐसें बोलून अंतर्धान । गणेश पावला प्रसन्न । तदनंतर ब्रह्मा करी स्थापन । द्विजहस्तें मूर्ति गणेशाची ॥६८॥
हया वेळीं सारे हर्षयुक्त । आपुल्या अंशानें अन्यत्र स्थित । स्वकर्मपरायण समस्त । आपापल्या कार्यास्तव ॥६९॥
पूर्णभावें ते राहती । मयूरेशासी सेविती । क्षेत्रवासांत ते रमती । भक्तियुद्ध सारे शक्तींनीं ॥७०॥
विकटाचा अवतार ख्यात । मयूरेश्वरनामें जगांत । भक्तांसी सर्वसिद्धी देत । परम प्रीतिप्रदायक ॥७१॥
जो हें वाचील चरित । ऐकेल वा श्रद्धायुक्त । त्यास लाभेल फळ ईप्सित । अंतीं स्वानंदाचा लाभ ॥७२॥
मयूरेशसायुज्य लाभून । ब्रह्मरूप भक्त होऊन । अवर्पनीय आनंदांत निमग्न । मुक्ति तीच परमश्रेष्ठ ॥७३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे षष्ठे खण्डे विकटचरिते मयूरेशचरितवर्णनं नामैकचत्वारिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP