खंड ६ - अध्याय १३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ देव तदनंतर विचारित । या गणेशक्षेत्राप्रत । मयूर ऐसें नाव लाभत । कां तें जाणण्या कुतूहल ॥१॥
भ्रुशुंडी म्हणे तयांप्रत । पूर्व कल्पीं तुम्हीं आराधिला भावयुक्त । विघ्नेश तो वरप्रद तेथ येत । मोरावरी बैसोनि ॥२॥
त्याचे होते दहा हात । दहा आयुधें त्यांत विराजत । लंबोदर गजमुख प्रसन्नचित्त । महेश्वरांनो ऐसें स्वरूप ॥३॥
त्या तुम्हांस त्या समयीं म्हणत । मागा वर मनेप्सित । ते सर्वही देईन त्वरित । भक्तिस्तोत्रांनीं मीं संतुष्ट ॥४॥
गणाध्यक्षास नमून । अमर तुम्हीं बोललात वचन । पूर्वीं तुमचें मूषक वाहन । आता मयूरध्वज तुम्हीं ॥५॥
मयूरावर आरूढ होऊन । आलासि तूं गजानन । या क्षेत्रांत मयूरवाहन । ऐसा दिसलास गणनायका ॥६॥
म्हणोनि मयूर जन्माख्यक्षेत्रजात । मयूर नामें होवो ख्यात । तुझ्या प्रसादे या जगीं सतत । गजानना विघ्नेश्वरा ॥७॥
मयूरक्षेत्रनाथ तूं असत । मयूरेश नावेंही प्रख्यात । भक्तांवरी अनुग्रहासक्त । तथास्तु म्हणे गजानन ॥८॥
तदनंतर अंतर्धान पावत । तुम्ही झाला स्वकार्यरत । ऐसें कारण असे ज्ञात । क्षेत्राच्या या नांवामागें ॥९॥
दुसरेंही एक स्पष्टीकरण । ऐका आतां लक्ष देऊन । चित्राकारा महामाया नित्य नूतन । अनंत खेळही करितसे ॥१०॥
त्या महामायेसी नाम । मय़ूरा ऐसें अभिराम । तिचा पति तो मनोरम । ऐसें रहस्य जाणावें ॥११॥
चतुर्ब्रह्ममय क्षेत्र ख्यात । मायारूप हें मयूरक पुनीत । मयूरेश तेथ विहार करित । सदां सर्वदा प्रेमानें ॥१२॥
देव विचारिती भ्रुशुंडी प्रत । चतुर्भुत गणाध्यक्ष असत । तो मयूरक्षेत्रांत । दशभुज कैस जाहला ॥१३॥
तें योगिश्रेष्ठा सांगावें । तदनंतर भ्रुशुंडी बोले भक्तिभावें । स्वानंदमय हे गणेशक्षेत्र बरवें । येथ आश्चर्यकर कांही नसे ॥१४॥
एकाक्षर ध्यान प्रथम करावें । सर्वादी या क्षेत्रांत बरवें । सात कोटी गणेगमंत्र आघवे । सर्वही प्रतिकल्पीं या क्षेत्रांत ॥१५॥
अनंतरूपें गणेश घेत । लोकांच्या हितार्थ तो झटत । तीं सर्व रूपें संभवत । या मयूरक्षेत्रांत ॥१६॥
मयूर क्षेत्रांत राहून । गणेश भक्तांकारणें महान । नाना क्षेत्रांचे भाव दाखवून । सदैव क्रीडा करीतसे ॥१७॥
म्हणून सर्व गणेशरूपें संस्थित । मूलभूत या मयूरक्षेत्रांत । चतुर्भुज तैसाचि दशभुज ज्ञात । म्हणोनि हा गजानन ॥१८॥
आदिशक्ती म्हणे अन्य शक्तीप्रत । भ्रुशुंडित वचन ऐकून हर्षित । सुरेश्वर ते त्यास प्रणाम करित । भक्तिपूर्ण मान वाकवून ॥१९॥
ब्रह्मादि देव त्यास प्रार्थित । दंडकारण्या प्रदेशांत । महात्म्या गणेशाचें क्षेत्र संस्थापित । प्रमुख तें कोणत्या कारणानें ॥२०॥
भ्रुशुंडी म्हणे देवांप्रत । आपापल्या कर्मानुसार होत प्राप्त । शुभाशुभ दंड सतत । प्राणिमात्रांस सर्वत्र ॥२१॥
दंडांचा पूर्ण नाश करित । त्यायोगें दंडकारण्य ख्यात । सर्वशास्त्रीं ऐसा असत । महिमा याचा वर्णिला ॥२२॥
ब्रह्मभूतपद पर । अदंडवाचक तें सर्वत्र । दंडक आरण्यक नाम थोर । विशेषें रूढ जाहले ॥२३॥
दंडकारण्यांत देव वसत । ब्रह्मभुतमय तो उदात्त । अदंडय जनांस हितावह असत । गणेश देव तो सदा ॥२४॥
अदंडी योगीद्रांत । शुख मुख्यादि ख्यात । योगेश ब्रह्मनाथ वसत । तेथ साक्षात गजानन ॥२५॥
पूर्वी घडला इतिहास । सांगतों सुरेश्वरांनो सुरस । ब्रह्मा निर्मी अरण्य मुख्यें खास । कार्यसिद्धिस्तव त्यावेळीं ॥२६॥
त्या अरण्यांत गणेशलालस । दंडकारण्य विशेष । नमन करून ब्रह्मदेवास । कर जोडून म्हणे तया ॥२७॥
ब्रह्मभूयप्रदा देवास भजेन । पितामहा मी एकमन । तदर्थ मंत्रराज देऊन । मज कृतार्थ करावें ॥२८॥
ब्रह्मा तेव्हां त्यास सांगत । गणेशासी भज भक्तियुक्त । समूह ब्रह्मवाचक ज्ञात । त्यांचा पूर्ण प्रभु असे ॥२९॥
त्याचें असे स्वानंदनगर । सिद्धिबुद्धि ह्या प्रिया फार । लक्ष लाभ हे सुत सुंदर । बाहन उंदिर तयाचें ॥३०॥
गजाननमय देह असत । नररूपें तो विलसत । त्याच्यामुळें सर्व ब्रह्ममय वर्तत । म्हणोनि ब्रह्मणस्पति हें नाव ॥३१॥
ऐसें बोलून दंडकारण्याप्रत । दिला एकाक्षर मंत्र पुनीत । पितामहास वंदून स्वीकारित । दंडकारण्य तो मंत्रराज ॥३२॥
तदनंतर तें दंडकारण्य आचरित । दिव्य सहस्त्रवर्षें एकचित्त । तप उग्र त्यानें प्राप्त । गणेशक परम ज्ञान त्यासी ॥३३॥
तदनंतर त्याच्या परमभक्तिनें तोषित । प्रसन्न झाला एकदंत । गणराज भक्तवत्सल प्रकटत । म्हणे मनवांछित वर माग ॥३४॥
त्यास पाहून दंडकारण्य स्तवित । पूज्यासी तें कर जोडित । भक्तितभावें स्तोत्र गात । विघ्नराजाचे त्या वेळीं ॥३५॥
गजवक्त्रासी गणेशासी । महोदरासी ब्रह्मपालासी । विघ्नेशासी हेरंबासी । कंजपाणीसी नमन असो ॥३६॥
चतुर्बाहुधरसी ब्रह्मासी । पाशाकुंश धारकासी । परेशासी अनादिसी । सर्वादिरूपा नमन तुला ॥३७॥
ज्येष्ठांतील ज्येष्ठासी । स्वानंदवासीसी मूषकध्वजासी । सिद्धिबुद्धिवरासी । सिद्धिबुद्धिप्रदात्या तुज नमन ॥३८॥
मूषकवाहनासी गणेशासी । परात्म्यासी मयूरेशासी । नानामाया प्रचालकासी । नायका तुज नमन असो ॥३९॥
विनायकासी नायकविशेषासी । नायकत्व प्रदात्यासी । ज्याचा नायक नसे त्यासी । विघ्नेशा तुज नमन असे ॥४०॥
महाविघ्नधारकासी । सर्वदात्यासी पददात्यासी । हंत्यासी विघ्नेशासी । अमेयशक्तीस तुज नमन ॥४१॥
सर्वपूज्या तुझें स्तवन । गणाधीशा करण्यास कोण । समर्थ असे योगाकररूप शोभन । वरदान देण्या आलास ॥४२॥
तरी माझ्या नावाचें जगांत । सार्थक करी तूं सतत । माझ्या देही वास करी सर्व काळांत । गजानन विघ्नेशा ॥४३॥
ब्रह्मप्रकाशिनी भक्ति । देई आम्हांस तूं प्रसन्नमती । त्यानें कुतकृत्यता अन्तीं । वाटावी मज गजानना ॥४४॥
ऐसें बोलून वंदित । गणेशासि भक्तियुक्त । तेव्हां गजानन त्यास म्हणत । तुझें हें स्तोत्र प्रिय मजला ॥४५॥
महारण्या हें स्तोत्र जगांत । भक्तिमुक्तिप्रद सतत । तुझें सर्वही ईप्सित । सफल होईल निःसंशय ॥४६॥
मलाच सर्वभावें भजशील । तुझ्यांत माझें रूप प्रकटेल । नाना अवतार योगें विमल । धन्य दंडकारण्या तूं ॥४७॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावले तैं गजानन । देवसत्तमही गणेशक्षेत्र शोभन । म्हणोनी दंडकारण्य हें ॥४८॥
त्याच्या सेवेप्रत जात । सकळ देव त्या अरण्यांत । त्यांची क्षेत्रं तेथ असत । त्यांत भजती गणनायकासी ॥४९॥
सर्व अरण्यदेशांत । गणेश असे राहत । परी दंडकारण्यांत । विशेष अवतार झाले त्याचे ॥५०॥
सर्व दंडकारण्यक । गणेशक्षेत्र हें पावक । त्यांत मयूरक्षेत्र एक । विशेष स्वानंद बाचक ॥५१॥
तें ऐकून ब्रह्मादिक म्हणत । त्या भ्रुशुंडी योग्याप्रत । धन्य आपण योग्यांत । सर्व संश्य दूर झाला ॥५२॥
आपुल्या मुखकमलांतून । ऐकता गणेशकथा पावन । अमृतपानें जैसें मन । तृप्त होय संपूर्ण ॥५३॥
आतां कृपा करून । द्वारयात्रेचें विधान । या क्षेत्राचें त्रिविध संपूर्ण । इतिहासासह सांगावें ॥५४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खण्डे विघ्नराजचरिते मयूरेशनामदंडकारण्यवरप्रदानवर्णनं नाम त्रयोदशोध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP