खंड ६ - अध्याय १६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ गणेशाय नमः ॥ भ्रुशुंडी नंतर देवांप्रत । गर्भालययात्रेचें महत्त्व सांगत । देवेश तें भाग्यवंत । ऐकती परम उत्कंठेनें ॥१॥
पूर्वी मुर्ख विप्र वंगदेशी वसत । विष्णुदत्त नामें ख्यात । पशुतुल्य स्वभाव त्याचा असत । मातापिता त्याचे बहु दुःखी ॥२॥
ते कश्यपास भेटत । त्यास सांगती सर्व वृत्तान्त । गर्भागाराचा महिमा अद्‍भुत । सांगितला त्यानें तयासी ॥३॥
पूर्वद्वाराचा महिमा ऐकून । स्वगृहासी जाती । परतून । पुत्रास घेऊन करिती गमन । पुनरपि मयूरेशक्षेत्रांत ॥४॥
पुत्रासह पूर्वद्वार यात्रा करित । परम आदरें भक्तियुक्त । त्यायोगें त्यास महाविद्या लाभत । ज्ञानयुक्त तो झाला ॥५॥
तेव्हां हर्षयुक्त चित्त । मातापिता त्या पुत्रासह परतत । पुत्राच्या ज्ञानप्रभावें विस्मित । परतलीं आपुल्या आश्रमीं ॥६॥
तदनंतर ते सर्व भजत । बुद्धियु त देवा गणेशासी सतत । अंतीं कैलासलोकीं जात । भोगिती विविध भोग तेथें ॥७॥
गणपाच्या भजनें जन्मत । पुनरपि तो मयूरक्षेत्रांत । ब्राह्मणकुळांत पुनीत । भक्तिभावें भजती विघ्नेश्वरा ॥८॥
अंतीं स्वानंदलोकीं जाती । ते सर्व ब्रह्मभूत होती । ऐसे नाना जन पावती सिद्धि मयूरक्षेत्रांत ॥९॥
गर्भागाराची पूर्वद्वार यात्रा करून । असंख्य पावले सिद्धि महान । त्यांचें करावया वर्णन । शब्द अपुरे महादेवांनो ॥१०॥
गर्भागाराच्या दक्षिणद्वारयात्रेचें महिमान । सांगतों आतां ऐका एकमन । काश्मीर देशांत एक शूद्रजन । पापकर्मे बहुत करी ॥११॥
देवालय पाहता भंजन करित । देवमूर्तीचें तो दुष्टचित्त । कोणा वैश्यास द्र्व्ययुक्त पाहत । तरी पाठलाग करी त्याचा ॥१२॥
खड्‍ग घेऊन हातांत । तो शूद्र मागोमाग जात । तो वैश्यही प्रयत्नरत । सहप्रवाश्यांसी गाठितसे ॥१३॥
त्या सार्थजनांसहित । तो पोचला मयूरक्षेत्रांत । शूद्रही तेथ त्वरित जात । भाग्यगौरवें देवांनो ॥१४॥
त्या वैश्यास मारण्या उद्यत । तो शूद्रही त्यांचा मागोवा घेत । वैश्य भावसमन्वित । करीत होता द्वारयात्रा ॥१५॥
परी तो शूर यात्राही । वाट पाहे लक्ष लाऊन । दुसर्‍या दिवशीं सर्व वणिग्जन । दक्षिणद्वारयात्रा करिती ॥१६॥
शूद्र त्यांच्या मागून जात । गर्भागारस्थित देवांस सारे पूजित । तेथ तेथ बसून राहत । पुनरपि गेला स्वस्थाना ॥१७॥
गणेशासीनकळत पूजून । तो पापात्मा झाला पुण्यवान । विचार करी मानसीं उद्‍विग्न । अहो पापें मी केलीं बहू ॥१८॥
तीं मज आतां पीडतील । माझें जीवन दुःखी होईल । माझें शरीर होता दुर्बल । कोण साहाय्य मज करील ॥१९॥
मी देवालयांत जाऊन । फोडिल्या देवमूर्ती मदोन्मत्त । होऊन । जे जन पूजिती भावें करून । त्यांस किती मीं गांजलें ॥२०॥
ऐसा विचार करून । त्या वैश्यास सोडून । काश्मीरीं जात परतून । सर्वदेवांस भजे भक्तीनें ॥२१॥
अंतीं कैलासलोकीं जात । गणेशास भजे भक्तियुक्त । मयूरक्षेत्रीं पुनः जन्मत । वैश्यकुळीं तो शूद्र ॥२२॥
पुनरपि देवांस भजत । क्षेत्रसंन्यास मागें जात । गणेशास प्रेमानें पूजित । अंतीं झाला त्यांत लीन ॥२३॥
ऐसे नानाविध जन लाभले । सिद्धि बहुविध या क्षेत्रीं भले । त्यांचेण वर्णन अशक्य झालें । शब्दातीत तें असे ॥२४॥
आतां गर्भागाराचें पश्चिमद्वार । त्याचें माहात्म्य अति थोर । विदर्भांत क्षत्रिय एक उदार । परी दैवें जाहला राज्यहीन ॥२५॥
सुदास सर्व शास्त्र पारंगत । परी जाहला बहु पीडित । वनीं जाऊन तो राहत । शोकयुक्त मानसानें ॥२६॥
तेथ देवर्षि नारद येत । परमार्थवेत्ता त्यास नृप पूजित । तो योगी त्यास म्हणत । ऐकून वृत्तान्त समग्र ॥२७॥
राजा तूं जा मयूरक्षेत्रांत । तेथ होशील सिद्धियुक्त । गर्भागाराची पश्चिमयात्रा पुनीत । राजेंद्रा तूं करावी ॥२८॥
त्या द्वारस्थित सिद्धिस पूजून । पूर्ववत महाराजपद लाभून । सुखें राहशील प्रसन्न । ऐसें सांगून नारद जाती ॥२९॥
विघ्नेशाचें गुणगान गात । नारद जाती स्वच्छंदें स्वर्गांत । राजा त्यांचा उपदेश पाळित । जैसें सांगितलें तैंसे करी ॥३०॥
गर्भागाराची पश्चिमद्वारयात्रा करित । तो राजेंद्र विधियुक्त । अंतीं तेथेंच निवास करित । मुक्त जाहला पुण्ययोगे ॥३१॥
कौण्डिण्यनगरीं राजा असत । सुबाहूनामें शूलग्रस्त । मृत्युसम पीडा दारुण भोगित । स्वप्न रात्रीं पडलें तया ॥३२॥
एक महा भीम पुरुष दिसत । तो त्यास ताडन करी अत्यंत । त्यायोगें विव्हल भयसंयुत । मूर्छित तो जाहला ॥३३॥
पुनः जेव्हां सावध होत । तैं तो भीषण पुरुष त्यास म्हणत । सुदामास राज्य देई त्वरित । विदर्भदेशाचें नृपाळा ॥३४॥
अन्यथा तूं मरशील । कुळासहित नष्ट होशील । यांत संशया ना स्थळ । जा आता या क्षेत्रांतून ॥३५॥
तदनंतर तो पुरुष न दिसत । राजाचें स्वप्नही भंगत । नृपाची शूळपीडा दूर होत । सुदासाकडे तो गेला ॥३६॥
त्यास प्रणाम करित । विदर्भ देशाचें राज्य अर्पित । वैर सोडून स्वराज्यांत । देवांनो तो परत गेला ॥३७॥
राजा सिद्धियुत सतत । गणनायकासी भजत । अंतीं जात कैलासांत । कामना राहिली मनांत ॥३८॥
त्या योगें मयूरक्षेत्रांत । जन्मला ब्राह्मणसुकुळांत । गणेशास नित्य भजत । अंतीं गेला स्वानंद लोकी ॥३९॥
ब्रह्मभूत तो होत । गणेश अद्वैत अनुभवित । क्षेत्राचा ऐसा प्रभाव ख्यात । नानाजन सिद्धि लाभले ॥४०॥
आतां उत्तरद्वारयात्रेचें महिमान । सांगतों ऐका लक्ष देऊन । पांचाल देशांत वैश्य उन्मन । विषयलंपट एक होता ॥४१॥
द्र्व्ययुक्त तो न जाणत । काळ कैसा आपुला जात । स्त्री मांस मदिरासक्त । नित्य राही तो वैश्य ॥४२॥
एकदा परचक्र येत । तेव्हां देश सोडून वैश्य पळत । सहकुटुंब तो अकल्पित । दंडकारण्यीं गेला रहावया ॥४३॥
तेथ मार्गयात्रा करित । तैं पोचल मयू रक्षेत्रांत । त्या दिवशीं होते करित । पश्चिमद्वारयात्रा कांहीं जन ॥४४॥
दुसर्‍या दिवशी लज्जायुक्त । उत्तरद्वारयात्रा करित । अन्य जनांसह तो विनत । गणेशास पूजितसे ॥४५॥
तदनंतर गर्भागारांत जात । चौसष्ट योगिनींस पूजित । होऊनि यापरी क्लान्त । पुनरपि गणेशासमीप गेला ॥४६॥
त्यास पूजून यथेष्ट जात । विषयप्रिय तैं बुद्धि विपरीत । त्या वैश्याच्या चित्तांत । निर्माण होऊनी विचार करी ॥४७॥
मी विषययुक्त होऊन । केलें भयावह कर्म म्हणून । मरणोत्तर कोणती गती दारूण । होईल माझी कळेनां ॥४८॥
या क्षेत्राचें माहात्म्य अद्‍भुत । परिवर्तन झालें मम चित्तांत । दुष्ट बुद्धि नष्ट झाली त्वरित । योगिनीच्या दर्शनानें ॥४९॥
त्यांच्या दर्शनें शुद्धचित्त । नर होतो योगप्रिय क्षणांत । तें शास्त्रवचन अनुभवित । आज मी सौभाग्यप्रभावानें ॥५०॥
तदनंतर योगिनींच्या समवेत । ऐशा ढुंढीस स्वधर्मंस्थित । तो वैश्य भजे सतत । विषयांचि करी निंदा ॥५१॥
अंतीं कैलासलोकीं जात । तेथ महाभोग तो भोगित । गणेशकामना धरित । पुनः जन्मला भूतलावरी ॥५२॥
मयूरक्षेत्रीं क्षत्रियकुळांत । जन्मून क्षेत्रसंन्या भावयुक्त । विघ्नेशासी तो भजें सतत । अंतीं ब्रह्मभूत तो झाला ॥५३॥
पूर्व संस्कारभावें योग सिद्ध होत । गणेशअद्वैत त्यास प्राप्त । ऐसें नाना जन लाभत । उत्तमोत्तम सिद्धि सदा ॥५४॥
त्याचें वर्णण अशक्य असत । आतां संपूर्ण यात्रेचें सांगत । गर्भागाराश्रित माहात्म्य तुम्हांप्रत । ऐका एकाग्र मनानें ॥५५॥
आत्रेय ब्राह्मण पूर्वीं वर्तत । मूर्ख एक अत्यंत । मातापिता मरतां होत । अनाथ तो भटके भूतली ॥५६॥
विषयांत विशेषें रमत । देवही तो दैववशें जात । मयुरक्षेत्रीं तेव्हां उपस्थित । कोणी द्विज यात्रेसी ॥५७॥
त्यास घेऊन तो ब्राह्मण करित । गर्भागार यात्रा पुनीत । त्याच्या संर्गे तो आत्रेंय करित । दुष्टबुद्धी ती यात्रा ॥५८॥
जैसे अन्य ब्राह्मण । तैसा तो झाला विद्यानिधि सुजाण । पूर्वद्वारयात्रा करून । दक्षिणयात्रेसी तो गेला ॥५९॥
मार्गांत पडला परी करित । द्वारयात्रा श्रद्धायुत । प्रमोदादीस पाहत । निःस्पृह झाला विषयांत ॥६०॥
पश्चिमद्वारीं सिद्धि पाहून । भाग्ययुक्त हो होऊन । योगिनीस पाहतां मन । पुण्यशील त्याचें झालें ॥६१॥
ऐसी यात्रा करित । नंतर स्वगृहीं परतत । तदनंतर द्विजास नमून जात । स्वदेशास तो आत्रेय ॥६२॥
त्यास विद्वत्तापूर्ण पाहात । तैं मित्र झालें विस्मित । त्याचा विवाह लावून देत । सुहज्जन प्रेमानें ॥६३॥
तो गृहस्थाश्रम स्वीकारित । परी गणेशास सदा चिंतित । गर्भागारयात्रा करित । भजे गणेश्वरा अनन्यमनें ॥६४॥
अंतीं कैलासास जात । तेथ भोग भोगी अनंत । पुनरपि जन्मे मयूर क्षेत्रांत । गणेशास भजे भक्तीनें ॥६५॥
अंतीं स्वानंदलोकीं जात । ब्रह्मभूत त होत । ऐसे असंख्य जन सिद्धि लाभत । गर्भागारयात्रा करोनी ॥६६॥
जो नर हें गर्भागार महिमान । ऐकतो वा वाचितो एकमन । विघ्नेश त्याचे इच्छितकाम प्रसन्न । पूर्ण करी सर्वदा ॥६७॥
ओमित श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते गर्भागारयात्रामाहात्म्यवर्णनं नाम षोडशोऽध्यायः । समाप्तः । श्रीगजाननार्पनमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP