खंड ६ - अध्याय ९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ देव भ्रुशुंडीस प्रार्थित । विघ्नेश्वर क्षेत्रीं द्वारधारक जे वर्तत । त्या देवपांचा पूजनमार्ग आम्हांप्रत । सांगा आतां उद्‍बोधक ॥१॥
भ्रुशुंडि तेव्हां त्यांस सांगत । गणेश वसतो क्षेत्रमध्यांत । चतुर्बाहुधर शुंडादंडयुत । सर्वदायक जो श्रेष्ठ प्रभु ॥२॥
मोठें पोट विशाल तीन नयन । वैसलासे घालून स्वस्तिकासन । पाशांकुशधारक तो महान । अभयमुद्रा विराजित ॥३॥
नाभीवर शेष रुळत । भूषण वस्त्रादींनीं भग्नदंत सुशोभित । नाग यज्ञोपवीतयुक्त । ऐसा शूर्पकर्ण विराजतो ॥४॥
त्याच्या वामांगीं सिद्धि वसत । सर्वप्रदा जी ख्यात । द्विभुज माया चवर्‍या ढाळित । विघ्नेश्वराच्या देहावरी ॥५॥
दक्षिणांगीं बुद्धि द्विहस्त । ज्ञानरूपिणी ती शोभिवंत । सुंगध वस्तु लेपन करण्या स्थित । सेवनोत्सुक सर्वदा ॥६॥
त्याच्या समोर मूषक असत । प्रमोद आमोदकादी गण पृष्ठभागी वर्तत । वैदिक मार्गें नमः पूर्वंक भजत । पौराणिक वा मार्गानें ॥७॥
सर्वसिद्धिद गणेसा पूजून । तदनंतर पूर्व दिशेस जाऊन । द्वारस्थित गणनाथांचें पूजन । शक्ति परिवारासिह्त करावें ॥८॥
द्विभुज गणनाथ तेथ असत । वामभागीं जगन्मयी मांजारी द्विभुजा वर्तत । त्यांचें पूजन भक्तियुक्त । करावें सदा साधकानें ॥९॥
तेथ करावयाचें ध्यान । सांगतों आतां प्रसन्न । एकाहाती कमळ असून । दुस‍र्यानें प्रियस आलिंगिलें ॥१०॥
त्याचे गाल मदस्त्रावयुक्त । त्यावरी भ्रमर घोंघावत । सदा आनंदमय गणनायक पुनीत । देवांनी त्याचें चिंतन करावें ॥११॥
द्विभुज शक्तीचें करावें चिंतन । डाव्या हातीं तिच्या कमळ शोभन । उजव्यानें जी आलिंगी प्रियास प्रसन्न । ह्रदयों साधकानें ऐसें घ्यावें ॥१२॥
ती भक्तांचें अभीष्ट पुरवित । सदा आनंदानें युक्त । संसारदुःखांचा नाश करित । माया जी भक्तिकारिणी ॥१३॥
देव विचारितो भ्रुशुंडीप्रत । मांजारिका देवी वर्णिली सांप्रत । ती गणपतीची प्रिया ख्यांत । तिचें स्वरूपज्ञान सांगावें ॥१४॥
भ्रुशुंडी तेव्हां त्यांना सांगत । जार शब्द व्यभिचारपर प्रख्यात । सर्व जारभावांत । नाना अर्थकरी ती जारिणी ॥१५॥
त्यांत पुरुषरूप स्थित । आत्मा सदा एकटा जगांत । त्यास जारादिक नसत । भ्रांतिभावात्मक कदापि ॥१६॥
तथापि देहसंस्थ त्यास मोहित । माया त्या आत्म्यास सतत । देवेंद्रांनो द्वंद्वभावांत । तदाकार ओत झाला ॥१७॥
आत्म्याचा जारभाव दाखवित । निरंतर त्यास मोहवून खेळत । ती उत्तम शक्ति मांजारी ज्ञात । मां प्रति जारदर्शिनि ती ॥१८॥
तिच्यासह गणप क्रीडत । द्वंड्वविहारस्थ सतत । त्यांचे मानसपुत्र ख्यात । लक्ष्मीनारायण द्वारस्थित ॥१९॥
या धर्मप्रदायकांचें पूजन । यथाविधि करावें प्रसन्न । त्यानें धर्माची संप्राप्ति साधक जनां । शाश्वत रूपें लाभतसे ॥२०॥
तेथ जो यात्राविधि असत । सर्वदायक विख्यात । तो सांगतो तैसा करित । त्यासी सिद्धिलाभ होईल ॥२१॥
भाद्रपदमासीं शुक्लपक्षांत । प्रारंभ करून द्वारयात्रा युक्त । प्रातःस्नान करून महानदींत । गणेशासी पूजावें ॥२२॥
तदनंतर स्नान करून । द्वारदेवीचें करावें पूजन । पुनरपि स्नान आचरून । गणेशासी स्वतः पूजावें ॥२३॥
उपोषण करून रहावें । या वेळीं नियमस्थ स्वभावें । गणेशस्मरणादिक करावें । द्वितीयेस दक्षिणद्वार पूजन ॥२४॥
तेथ द्विभुज गणेश दारांत । माया ही द्विभुज वर्णित । त्या दोघांचें ध्यान पूर्ववत । करावें सदा साधकानें ॥२५॥
त्याची विरजा नामशक्ति । तिची ज्ञानकर ऐसी महती । सांगतो सुखप्रद तुम्हांप्रती । त्रिविध रजोरूप मलिन ॥२६॥
तेथ जें मोहविहीन । तें विरज ब्रह्म ख्यातनाम । गणेश संयुता देवी प्रसन्न । तन्मयी विरजा प्रख्यात ॥२७॥
त्या दोघांचे मानसिक पुत्र । पार्वती शंकर विख्यात । त्यांची पूजा करावी सतत । सर्वभावें नरानें ॥२८॥
त्यायोगें सर्वार्थसिद्धि लाभत । यांत संशय कांहीं नसत । तृतीयेस पश्चिमद्वारदेवता पूजित । विधियुक्त उपोषण करावें ॥२९॥
देवी गणेश्वर तेथ स्थित । ध्यानात्मक एकचित्त । आश्रया नामशक्ति असत । सर्वाश्रयधरा ती ॥३०॥
त्यांचे मानसिक पुत्र ख्यात । रतिकाम सौदर्ययुक्त । त्यांची पूजा जो करित । त्यास सर्व इष्टकाम लाभे ॥३१॥
तदनंतर चतुर्थी तिथीस । त्यानें जावें उत्तर दिशेस । तेथ पूजावें द्वार शक्तीस । महादेवांनो भक्तिभावें ॥३२॥
देवीगणेश्वराचें येथ ध्यान । पूर्ववत्‍ करावें प्रसन्न । त्यांचे मानसिक पुत्र म्हणून । महीवराहक प्रख्यात ॥३३॥
त्यांची पूजा पूर्ववत । नियमानुसार करावी पुनीत । तेणें नरा मुक्ति लाभत । यात्रामात्रें हें जाणावें ॥३४॥
चतुर्थीस गणनाथाचें पूजन । विधिपूर्वक करावें विनीतमन । माध्यान्हकाळीं उपोषण । देवांनो तेथ करावें ॥३५॥
रात्रीं जागरण करावें । पंचमीस पारणें आचरावें । ऐसें ब्राह्मणांसह करितां पावें । चतुर्विध फल नरासी ॥३६॥
ऐशाच रीती माघमासांत । शुक्लपक्षीं द्वारयात्रा आचरित । जेष्ठमासीं तैशीच रीत । वर्षांतून तीनदा ही यात्रा ॥३७॥
अथवा प्रत्येक महिन्यांत । शुक्लपक्षीं द्वारयात्राव्रत । करितां सर्वार्थ सिद्धि लाभत । तया नरासी निःसंशय ॥३८॥
अथवा गणराजाच्या यात्रेस येत । या काळीं नर भक्तियुक्त । त्या वेळीं द्वारयात्रा व्रत । आचरावें महेश्वरांनो ॥३९॥
त्या वेळीं मासपक्ष तिथि नियम । नसे सांगितला परम । चार दिवस यात्रा करिता मनोरम । विधानपूर्वक फल अधिक ॥४०॥
दुसरा एक द्वारयात्रा विधि असत । तो सांगतों तुम्हांप्रत । देहसामर्थे जे युक्त । त्यांना चतुर्विध फल लाभेल ॥४१॥
शुक्ल चतुर्थीच्या दिनीं । द्वारयात्रा समग्र आचरोनी । सूर्योदयापासून प्रारंभोनी । करावी सूर्यास्तापर्यंत ॥४२॥
चारही द्वारांची यात्रा करून । थोडा दिवस असतां पूजन । गणनाथाचें विधियुक्त मनन । भक्तिपूर्वक करावें ॥४३॥
अथवा यात्रेस जो येत । तरी स्वेच्छया एका दिवसांत । त्याच दिनीं चार द्वारयात्रा करित । तरी तेंही चालेल ॥४४॥
जे वृद्ध अथवा रोगयुक्त । त्यांना हा नियम नसत । त्यांनीं तैसी मुलांनी या क्षेत्रांत । द्वारयात्रा करावी ॥४५॥
अथवा ब्राह्मणद्वारें यात्रा करावी । यजमानानें स्वयें वाहनस्थ होऊन बरवी । शक्तिअनुसार प्रमाण करावी । पूजावें द्वारसंयुक्त ॥४६॥
ऐसें गणेशाचें विधियुक्त । द्वारपूजन करितां नरास लाभत । चतुर्विध पुरुषार्थ जगांत । धर्म अर्थ काम मोक्ष ॥४७॥
त्यास जी मृत्युसमयीं मति । तदनुसार न मिळें गति । न भूमि आदि विकार होती । नीच उच्च न तयास ॥४८॥
देवांनो हें द्वाराचें महिमान । ऐकेल जो नरोत्तम । तो संस्कारयोगें पावन । भुक्तिमुक्ति परा लाभे ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते मयूरेशद्वारयात्राविधिवर्णनं नाम नवमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP