मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ५१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल तदनंतर सांगती । विघ्नदैत्याच्या गुप्त स्थानाची माहिती । अन्य कोणास नव्हती । परी गणनाथें तें जाणिलें ॥१॥
त्या काळाच्या आश्रमांत । गणनाथ त्या समयीं जात । गुप्तरुप घेऊन त्वरित । अंकुश करीं घेऊनियां ॥२॥
तें पाहून परम आश्चर्यविस्मित । देव सारें मनीं हर्षित्त । तेव्हां तो महाकाळ घेत । अग्नीचें रुप तत्काळ ॥३॥
आपुलें रुप दडवून । गणेशाचा करी अपमान । अग्निरुप त्रैलोक्य व्यापून । सर्वत्र तेजतत्त्व भारलें ॥४॥
विघ्नासुरावरी क्रुद्ध होत । गजानन संहारक वायुरुप घेत । तदनंतर काळ होत । आकाशतत्त्वीं विलीन ॥५॥
वायुस्थ गणनाथा आकर्षित । दारुण तो विघ्नासुर अकस्मात । आकाशस्थ महाकाला जाणून ओढित । प्रभू गजानन सत्वरीं ॥६॥
अहंकारधारक देव ओपित । प्रलयाकडे त्या दैत्या अवचित । तेव्हां विघ्नासुर घेत । महतत्त्वाचा आश्रय ॥७॥
गजानन क्रुद्ध होऊन घेत । प्रधानाचें रुप समयोचित । महत्तत्त्वयुक्त विघ्नास ओढित । प्रभावें तें आपुल्या ॥८॥
नंतर तो तो विघ्नासुर सोडित । महत्तत्त्व क्षणांत । गुणेशाचा आश्रय घेत । प्रधानस्थ गणेशा ताडन करी ॥९॥
काळ तो परमदुर्जय अविनीत । गणेशासे ऐसें पीडित । तेव्हां गजानन साक्षात्‍ बिंदूत । ब्रह्मस्थित जाहला ॥१०॥
चतुष्पादमयी शक्ति टाकित । काळाचा करण्या अंत । गुणेशाहुन वरती नसत । म्हणोनि काळ खंडित विक्रम ॥११॥
चतुष्पाद माया पाहून । काळ झाला भयभीत मन । महाघोट ती शक्ति हरण । करी कालच्या गर्वांचें ॥१२॥
शेवटीं गणराजास शरण जात । काल पराजय स्वीकरित । महाविघ्नास समीप पाहत । विस्मित झाले देवमुनी ॥१३॥
गणपाचा जयजयकारा करिती । त्याचें गुण सारे गाती । विघ्नासुर गजाननास भावभक्ति । प्रणाम करुनी पूजी तें ॥१४॥
त्याच्या दर्शनें बोध होत । कृतांजलि तो स्तवन करित । गणनाथा तुज मी नमन । गजाननरुपा तुज वंदन ॥१५॥
योगासी योगनाथासी । योग्यांसी योगदात्यासी । अनाकारासी साकाररुपासी । नानाभेदविहीना नमन ॥१६॥
भेदपतींसी विघ्नेशासी । परेशासी काळभीती हर्त्यासी हेरंबासी परात्परासी । अनावीसी नमो नमः ॥१७॥
अनाथासी सर्वांत आदिमूर्तीसी । भक्तेशासी स्वानंदवासीसी । भक्त वांछितप्रदासी । मूषकध्वजासी माझें नमन ॥१८॥
मूषकावरी आरुढावरी । ढुंढिराजासी आद्यंतहीनासी । आदिमध्यांतस्वरुपासी । गजवक्त्रा तुज माझें नमन ॥१९॥
सर्व पूज्यासी सिद्धिबुद्धि स्वरुपासी । सिद्धिबुद्धि प्रदात्यासी । सिद्धिबुद्धिपतीसी । महोदरा तुज नमन असो ॥२०॥
अएयामायातिमूर्तीसी । सदा सुशांतिप्रदासी । पूर्णपतीसी मन वाचाहीनासी । तेजयुक्तासी माझें नमन ॥२१॥
मनवाचा युक्त कालासी । नकळत घडल्या दोषां क्षमा कर्त्यासी । वंदन करी मीं तुजसी । रक्ष मजला भक्तियुक्तासी ॥२२॥
दयाब्धे श्रेष्ठ वर देई मजसी । आता तुझें रुप उमजले मजसी । योगाकारमय तूं अससी । म्हणोनि मजला तूं जिंकिलें ॥२३॥
तुझ्याविना कोण समर्थ असत । काळावर मिळवण्या प्रभुत्व जगांत । मी धन्य मज मानित । तव पादपद्माच्या दर्शनानें ॥२४॥
ऐसी स्तुति महाविघ्न करित । गजाननासी आदरें नमित । त्यास वरती उठवून म्हणत । ऐसें वचन सर्वसार ॥२५॥
महकाळा तूं रचिलेलें स्तोत्र सर्वप्रद । वाचिता ऐकतां सुखद । काळाचें भय दूर होय विशद । जें इच्छिलें तें लाभे ॥२६॥
माझें हें स्तोत्र मज आवडतें । वाचितां महायोग लाभ घडविल ते । तुज मारण्या क्रोधयुक्त चित्तें । आलों होतों निःसंशय ॥२७॥
परी आता तूं शरणागत । म्हणोनि तुज मी न मारित । माग जें असेल इच्छित । महाकाळ तेव्हां म्हणे ॥२८॥
तुझी सुदृढ भक्ति देई । तुझ्या समीप मन नेई । दास म्हणोनी रक्षी नित्यही । कार्य माझें सांग ब्रह्मेशा ॥२९॥
तें मी करीन सुयंत्रित । साधें स्थान तैसें भक्ष्य मजप्रत । सांग मजला हें समस्त । तुझ्या नामीं माझे नाम प्रथम ॥३०॥
सर्वसिद्धिकर पूर्णयोगप्रद । होवो माझेही नाम सुखद । तेव्हां गणराज बोलले विशद । त्या उत्तम भक्तासी ॥३१॥
त्याचें निर्विकल्प मन जाणून । भक्त प्रपालक बोले वचन । माझी अचल भक्ति मनीं ठसून । निष्पाप तूम होशील ॥३२॥
जें जें तूं इच्छीसी । तें तें लाभेल तुजसी । माझा गण होऊन राहसी । बळसंयुत तूं सदा ॥३३॥
महाविघ्न स्वरुपें नानाविघ्न गणयुक्त । विघ्नराज नामें मी ख्यात । होईन जगतीं निश्चित । तेणें तुझें नांव ये प्रथम ॥३४॥
जेथ माझें कार्यरंभे न पूजन । तें कर्म तूं खावें निर्भय मन । सुरेंद्राकांसीही भ्रष्ट करुन । जरी ते मजला विसरती ॥३५॥
शिवविष्णु प्रमुख देव । अन्य मुनिप्रमुख सर्व । मानवादी शेषादि नागराज अपूर्व । नानाजंतू मैत्रेयी ॥३६॥
हे जरी होतील अहंकार मत्त । तरी असुरा त्यांना भक्ष्य तूं कर निश्चित । भ्रष्ट तयाप्रत । पीडा देई स्वच्छदें ॥३७॥
माझी भक्ति जे करित । ते त्वां रक्षावे विशेष युत । त्यांच्या निर्विघ्नतेस्तव सतत । त्यांच्या पुढें तूं रहा ॥३८॥
ऐसें बोलून अंतर्धान । नंतर पावले गजानन । विघ्नासुर विघ्नासहित शांत होऊन । आनंदित जाहला ॥३९॥
देव मुनिजन स्वस्थानीं परतत । पत्नीसह पार्श्व पडे मूर्च्छित । त्या उभयतांच्या हृदयांत । प्रकटले गणाधीश ॥४०॥
त्यांसी म्हणे तें अभय वचन । मीं चिंतामणिरुप हृदयीं विराजमान । पहा तुमच्या हृदयीं प्रसन्न । सदैव वसती हें जाणा ॥४१॥
मूर्तीएं करुन पूजन । हृदयांत करता ध्यान । नित्य संतोष पावाल युक्तमन । यांत संशय मुळीं नसे ॥४२॥
जेव्हां माझें स्मरण कराल । मातापित्यानो महाकार्यात सबळ । मजला तुम्ही पहाल । योगशांति लाभे तुम्हां ॥४३॥
ऐसें बोलून अंतर्धान । गणेश पावला तें प्रसन्न । त्यांच्या हृदयांत विराजमान । तेव्हां तीं दोघें उत्साहित ॥४४॥
मूर्ति स्थापून निरंतर पूजन । करिती ऐसें प्रेमे महान । गणराजाचें कथिलें पावन । चरित्र तुम्हां महान ॥४५॥
गजाननाचेच अंश अवतार होत । वरेण्यपुत्र तोच अवतरत । एका वेळीं तो गजानन घेत । अवतार सिंदूरवधासाठीं ॥४६॥
कल्पभेदानुसारें असती । नाना रुपें गजाननाची जगतीं । तीं सारें वर्णन करण्या शक्ति । कोणाचीही असेना ॥४७॥
ऐसें अनेक भेद सिद्ध । गजाननाचे असती विशद । ते कोण जाणे वर्णील वा सुखद । सांग दक्ष प्रजापते ॥४८॥
संक्षेपानें तुज निवेदिलें । पापनाशक हें चरित्र भलें । विघ्नराजाचे पराक्रम कथिले । भुक्तिमुक्ति फलप्रद ॥४९॥
ओमिति श्रीमदामन्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते विघ्नराजावतारवर्णन नामैकपंचशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP