खंड ३ - अध्याय ९
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । वसिष्ठ दशरथासी सांगत । कार्तिक शुक्ल चतुर्थीचें व्रत । जें सर्वसिद्धिप्रद पुनीत । इतिहासयुक्त महोज्ज्वल ॥१॥
सुधन्वा नामा नीतिसंयुत । राजा होता सूर्यवंशात । शस्त्रास्त्रबळें युक्त । परम द्युतिमंत धर्मशील ॥२॥
वदान्य तो साधुसंमत । सत्य वचन पंचयज्ञ असत । देव अतिथि विप्रांचा करित । सत्कार योग्य तो सर्वदा ॥३॥
त्याची भार्या रुपशालिनी । कलावती पतिव्रता पावनी । महा उदार धर्मशील मनीं । अर्धांगी शोभे सत्यार्थे ॥४॥
तो सुधन्वा नृप जिंकित । भूमंडळ हें समस्त । तेजस्वांत जो श्रेष्ठ असत । पाळी पृथ्वीतें धर्मांने ॥५॥
सामंत वश होते समस्त । सेना त्याची अगणित । कुबेरासम संपत्ति असत । कांहीं न्यून तया नव्हतें ॥६॥
ऐसें अर्धें जीवन जात । तेव्हां घडे एक विपरीत । अकस्मात नृपशरीरीं उठत । कोड भयंकर अकारण ॥७॥
त्या कोडाच्या व्रणांत । असंख्य किडे लवलवत । रक्त पूं घामानें सुटत । दुर्गंध असह्य सर्वांगासी ॥८॥
सुळावर नरा चढविती । त्यास जैशा वेदना होती । तैशापरी पीडा अती । कुष्ठरोगामुळें तया ॥९॥
औषधें नानाविध घेत । जरी तो नृप प्रयत्नयुत । नानामंत्रप्रयोग करवित । अनुष्ठानें विप्रांकरवीं ॥१०॥
वेदमंत्रांचे पुरश्चरण करवित । परी त्यापासून फळ न लाभत । म्हणोनी नाना तीर्थांत । स्नान करुनी दानें देई ॥११॥
तथापि कोड बरें न होत । राजा अधिकच पीडित । तेव्हां खिन्न होऊन म्हणत । आपुल्या मंत्र्यांसी सुधन्वा ॥१२॥
मी आतां जातों वनांत । आपण सांभाळा राज्य समस्त । मंत्री नागरिक दुःखी होत । सांत्वन त्यांचे करीतसे ॥१३॥
नंतर आपुल्या स्त्रीसहित । नृपश्रेष्ठ जात घोर वनांत । तेथ इकडे तिकडे भटकत । गणपतीसी स्मरे तेव्हां ॥१४॥
दुःखसंयुत तो चित्तांत । विघ्न टळण्या देवास प्रार्थित । तेव्हां एक आश्चर्य घडत । अकस्मात आले पुलस्य मुनी ॥१५॥
त्या मुनिशार्दूंलासी पाहत । तें नृप जाहला हर्षभरित । प्रियेसह प्रणाम करित । कर जोडून भक्तिभावें ॥१६॥
त्या मुनिनायकासी नंतर म्हणत । कोणतें पूर्व पुण्य माझें असत । म्हणोनि तुमचें दर्शन घडत । धन्य जन्म धन्य ज्ञान ॥१७॥
धन्य माझे मातापिता । तपधर्मादिक धन्य आतां । तुमच्या अंध्रियुगाचें दर्शन पावतां । धन्य सर्वही मज वाटे ॥१८॥
ऐसें जेव्हां तो म्हणत । तेव्हां पुलस्त्यमुनी त्यास विचारित । राज्य सोडून या घोर वनांत । किमर्थ भटकंसी तूं राजा ॥१९॥
नंतर एका वृक्षाच्या छायेत । स्वतः बसून त्यांसी बसवित । सुधन्वा सांगे आपुला वृत्तान्त । वंदन करुनी तयासी ॥२०॥
योगींद्र दयाळू असती । ऐसी पुराणांत ऐकली ख्याती । त्याची सत्यार्थे प्रचिती । तुज पाहून झाली मज ॥२१॥
मज दुःखित जाणून । तूं दयाघना आलास धावून । साक्षात् प्रजापति महान । ब्रह्माचा सुत पुलस्त्य ॥२२॥
सर्वज्ञ तूं महायोगी । दुःखातीसी आश्रय जगीं । तरी सांग आतां मजलागीं । काय पाप मीं केलें होते? ॥२३॥
धर्मनीतीनें राज्य केलें । सर्व जनांसी तोषविलें । परी भयानक कोड उठलें । सर्वांगावरी माझ्या कां? ॥२४॥
हयाचें न्याय्य कारण न समजत । पूर्वजन्मांचे का पाप नडत । जें सर्व सांगून मजप्रत । उपाय यावरी सांगावा ॥२५॥
सुधन्व्याचे ऐकून वचन । कोडाची पीडा ज्यास दारुण । तेव्हां करुणापूर्ण मन । पुलस्त्य त्यास सांगती ॥२६॥
वसिष्ठ दशरथासी सांगती । पुण्यप्रद ही कथा अती । पुलस्त्य सुधन्व्यासी निवेदिती । पूर्वजन्मांतील पाप न हें ॥२७॥
याच जन्मीं पाप घडलें । तें तुज न समजलें । त्या पापामुळें उठलें । कुष्ठ हें भयंकर तव अंगावरी ॥२८॥
नृपा तुझ्या राज्यांत । चतुर्थीचें व्रत नष्ट होत । गणेश्वरासी जें प्रिय असत । सर्वसिद्धिप्रदायक ॥२९॥
चार पुरुषार्थांचे साधन । म्हणोनि म्हणती वरदा महान । कार्यारंभीं होतां विस्मरण । सर्वही निष्फळ होत असे ॥३०॥
सर्व वर्ण जें करिती । त्या पापांची फलश्रुती । राजाची बाधे निश्चिती । चतुर्थीहीन सर्व प्रजा ॥३१॥
त्यायोगें तूं कुष्ठे पीडित । नराधमा तूं या जगतांत । मृत्यूनंतर नरकांत । गति तुजला मिळेल ॥३२॥
चार पुरुषार्थ नष्ट होत । यांत संदेह लव नसत । तें पुलस्त्यवचन ऐकून होत । परमदुःख सुधन्व्यासी ॥३३॥
तो महाप्राज्ञ पुलस्त्यास विनवित । कर जोडोनी विनययुक्त । तुम्हीं सांगितलें तें सत्य असत । निःसंशय सर्वतत्त्वज्ञा ॥३४॥
आता परी तें अद्भुत व्रत । मजसी सांगावें विधियुक्त । कोणाचें कैसें पूजन उक्त । कोणत्या वेळीं तें करावें? ॥३५॥
माझें कोड बरें व्हावें । मज शरीरमुख लाभावें । त्यासाठीं मीं जें करावें । प्रायश्चित तें मज सांगा ॥३६॥
व्रतलोपाचा दोष घडला । तो पाहिज परिहारिला । त्यासाठीं सांगा मजला । उपाय सविस्तर या वेळीं ॥३७॥
ऐसें सुधन्वा प्रार्थित । तेव्हां महायोगी पुलस्त्य स्मरत । गणेशासी स्वचित्तांत । नंतर सांगे हर्षभरें ॥३८॥
जो अज्ञानानें दोष घडत । तो दूर करी प्रायश्चित्त । म्हणोनी त्वरित करी हें व्रत । प्रजेसह चतुर्थीचें ॥३९॥
त्यायोगें कुष्ठविहीन । होशील सुरुप तूं महान । पश्चात्तापें पाप जळून । पुण्यशील तूं झालास ॥४०॥
नंतर तो योगी सांगत । व्रताची कथा पुनीत । ती ऐकून हर्षयुक्त । नृपति तें जाहला ॥४१॥
त्या मुनिश्रेष्ठास प्रणाम करुन । नृप म्हणे विनम्र वचन । धन्य जाहला माझा जन्म । महाव्रताची कथा ऐकली ॥४२॥
हयासम पूर्वी ज्ञान । मी न जाणलें पावन । आता गणेशाचें स्वरुप प्रसन्न । महाप्राज्ञा सांग मजला ॥४३॥
तें जाणून सर्व भाएं भजेन । देवदेवेशासी भक्तियुक्तमन । ऐसें राजाचें प्रार्थनावचन । ऐकून पुलस्त्य त्यास सांगें ॥४४॥
तो महायश सर्वं भावज्ञ सांगत । गाणपत्य ज्ञानवंत । सुधन्व्या गणेशज्ञान अद्भुत । ब्रह्मभूयमय योगाकार ॥४५॥
पूर्वीं मी योगशांति लाभण्यास । नाना योगांचे पालन विशेष । केलें यमनियमादी प्राप्त होण्यास । मनाचा विजय दमानें ॥४६॥
तथापि शांति ना मज लाभत । म्हणोनी शंकरासी शरण जात । त्यास प्रणाम करुन प्रार्थित । उत्तम योग मज सांगावा ॥४७॥
तेव्हां त्यानें जें सांगितले । मजला जें रहस्य निवेदिलें । तें ऐकतां तुजही चांगलें । फळ मिळेल साधनानें ॥४८॥
गाणपत्य तूं होशील । त्या ज्ञानें अति विमल । श्रीशिव सांगती ऐसें निर्मल । गणेशरहस्य मजला तें ॥४९॥
मनोवाणीविहीन । मनोवाणीमयही जो असून । त्या योगशांतिमयासी जा शरण । भावबळें भजन करी ॥५०॥
मनोवाणीमय जें जें असत । तें तें संप्रज्ञानापासून उद्भूत । गकाराक्षर जाण ख्यात । महामते तूं वेदांत ॥५१॥
मनोवाणी विहीन । तें असंप्रज्ञापासून । णकाराक्षर संभव असून । गण त्यांतून होतसे ॥५२॥
त्या गणाचा स्वामी असत । तो योगशांतीनें लाभत । चित्तभूमिनिरोधें सतत । विनायकासी त्या भजावें ॥५३॥
ऐसें सांगून विराम । घेतसे महादेव अनुपम । मी त्यास करी प्रणाम । नंतर गेलों वनीं एका ॥५४॥
गणेशयोगाची साधना केली । गणपति मूर्ति ध्यायिली । अष्टाक्षरे मंत्रें तोषविली । विशेषें चित्तनिग्रहभावें ॥५५॥
नंतर स्वरुप काळांतरें प्राप्त । शांति मजला स्वात्म्यांत । तथापि मंत्रराजाच्या पूजनांत । जपांत निमग्न मी होतों ॥५६॥
ऐसीं एकवीस वर्षे जात । तेव्हां तो विनायक प्रकटत । भक्तां अनुग्रहकारक जगांत । वर देण्यासी मजलागीं ॥५७॥
त्यास पाहून प्रणत । पूजिलें मीं यथोचित । कौथुम नामाष्टकें स्तवित । महाप्रभूसी त्या वेळीं ॥५८॥
गाणपत्य मज करुन । त्यानें केलें नंतर गमन । स्वानंदक पुराप्रत पावन । तेव्हांपासून भजतों मीं ॥५९॥
गणनायका भावें उपासत । ऐसें दशरथास सांगत । नंतर त्या नृपास देत । अष्टाक्षर मंत्र महायोगी ॥६०॥
पुलस्त्य तेव्हां विधिसमन्वित । राजासी ऐसा मंत्र देत । नंतर राजा स्वनगरांत । परतून गेला प्रसन्न ॥६१॥
आपुल्या सर्व प्रजाजनांस । आदेश देई तो त्या समयास । कार्तिक शुक्ल चतुर्थीस । करा भजन गणेशाचें ॥६२॥
त्या दिवशीं उपवास करुन । पंचमीस करा पारणें पावन । आपणही तें व्रत आचरुन । ब्राह्मणांसी दान अन्न देई ॥६३॥
नंतर झाला कुष्ठविहीन । जनाधिप तो महान । कामदेवासम लाभून । शोभन रुप उत्तम ॥६४॥
त्याचे सर्व जन होत । वंध्यत्वादी दोषरहित । रोग दुःखें विलया जात । हया व्रताच्या आचरणानें ॥६५॥
गणेश्वर हें महानव्रत । तो नृप करी जगीं प्रकाशित । तेव्हांपासून जन व्रत करित । शुक्ल कृष्ण कार्तिक चतुर्थी ॥६६॥
त्यायोगें आनंद पावत । विविध सुखें ते उपभोगित । नंतर सुधन्वा नृप स्थापित । स्वपुत्रासी राज्यावरी ॥६७॥
आपण निवास करी एकांतांत । गणपतीसी भजे सतत । अंतीं स्वानंदग होत । ब्रह्मभूत तदनंतर ॥६८॥
त्याचे सर्वं प्रजाजन । स्वानंदस्थ त्याच्या समान । ऐसें हें अति महान । चरित्र कथिलें तुज राजा ॥६९॥
याचा महिमा सर्वा सिद्धि देत । माहिष्मती नगरींत । चांडाळ एक निवसत । पाप ज्यानें हें अति महान ॥७०॥
कार्तिक शुक्ल चतुर्थी दिनीं जात । तो एकदा वनांत । त्याचा पाठलाग तें करित । वाघ एक भयंकर ॥७१॥
तेव्हां तो चांडाळ चढत । एका वृक्षावरी तेथ बसत । वाघ वृक्षाखालीं थांबत । प्रतीक्षा करित तयाची ॥७२॥
ऐसा संपूर्ण दिन जात । रात्रीही जागरण घडत । उपवास झाला अजाणत । त्या चांडाळस त्या तिथीला ॥७३॥
नंतर दशरथा नवल घडत । वनांतला एक महासर्प चढत । त्याच वृक्षावरी अवचित । जेथ होता तो चांडाळ ॥७४॥
त्यास पाहून भयभीत । कापूं लागला क्षुब्धचित्त । झाडावरुन खालीं पडत । व्याघ्रें पकडिलें तयासी ॥७५॥
पंचमी तिथीस त्यास भक्षित । तेव्हां तेथ विमान येत । बैसूनी त्या विमानांत । स्वानंदपुरा तो गेला ॥७६॥
अज्ञातपणीं केलें व्रत । तरी त्यास पुण्य लाभत । गणयाप्रत तो जात । योगपर ब्रह्मभूत ॥७७॥
ऐसे असंख्य जन असत । जे चतुर्वर्ग फळ लाभत । जें जे चतुर्थीव्रत । ते ते ब्रह्मभूत जाहले ॥७८॥
कार्तिकशुक्ले चतुर्थीचें महिमान । नृप तुज कथिलें शोभन । आतां पुढें काय तें ऐकण्या मन । उत्सुक असे सांग मजला ॥७९॥
हें माहात्म्य जो ऐकत । अथवा वाची भक्तियुक्त । तो सर्वार्थ सिद्धियुक्त होत । पुत्रपुत्रांसह गणप्रिय ॥८०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते कार्तिकशुक्लचतुर्थीवर्णनं नाम नवमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाजनार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP