मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय १५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दशरथ प्रार्थी वसिष्ठाप्रत । आतां वैशाख चतुर्थीचें व्रत । सांगावें शुभद मजप्रत  कथामृत हे अद्‌भुत ॥१॥
वसिष्ठ तेव्हां सांगती । गुर्जर देशीं भद्रक नगरी वसती । ब्रह्मप्रिय राजाची होती । सर्वशास्त्रज्ञ दानप्रिय जो देव ॥२॥
द्विज अतिर्थीचे सेवन । शस्त्रास्त्रीं करी अवगाहन । सर्व नृपांसी वश करुन । पृथ्वी मंडलाधिप झाला ॥३॥
सर्वमान्य बलसंपन्न महामती । त्याची प्रथम पत्नी जगती । रजोदर्शनमात्रें मरता करिती । दुसरी पत्नी समशील ॥४॥
तीही त्याच परी होता मृत । तिसरी चौथी पांचवीं विवाहित । परी पांचही भार्या झाल्या मृत । त्याच दोषें दशरथा ॥५॥
तो ब्रह्मप्रिय राजा दुःखार्त । भार्यामृत्यूनें खिन्नचित्त । राज्य प्रधानांवरी ठेवूनि जात । आपुल्या गुरुशी भेटण्या ॥६॥
अरण्यांत जाऊन श्वेतकेतूस भेटत । विनम्रभावें प्रणाम करित । उचित स्थानी बैसवित । गुरु कुशल विचारिती तें ॥७॥
भोजनोत्तर राजासी विचारित । आगमन कां केलें अवचित । तेव्हां राजा सर्व सांगत । वृत्तांत राण्यांच्या मृत्यूचा ॥८॥
तो ऐकून श्वेतकेतू ध्यान करित । तेव्हां त्याल कारण समजत । तो म्हणे क्रोधसंयुत । नृपाधमा महापाप्या ऐक ॥९॥
तुझ्या राज्यांत नष्ट झालें । चतुर्थीचें मुख्य व्रत भलें । म्हणोनि सर्व कर्म निष्फल झालें । अंतीं नरकीं पडशील ॥१०॥
चतुःपदार्थ दातृत्वें ख्यात । चतुर्थीचें व्रत जगांत । त्या व्रतहीनत्वें तूं वर्तत । चतुर पुरुषार्थ वर्जित ॥११॥
श्वेतकेतूचें तें कोपयुक्त वचन । ऐकून नृप लज्जित उन्मन । ब्रह्मप्रिय म्हणे हात जोडून । अज्ञानानें हें घडलें ॥१२॥
म्हणोनि क्षमा करावी । व्रत रीती मज सांगावी । कोणाची पूजा मीं करावी । हें सर्व मज सांगा ॥१३॥
गणाधीश कैसा असत । ज्याचें हें व्रत मज अद्‌भुत । त्याचें स्वरुप जाणून त्वरित । भजन पूजन करीन त्याचें ॥१४॥
श्वेतकेतू तेव्हां सांगत । राजा ऐक पूर्व वृत्तान्त । माझाच अनुभव तुज कथित । तेणें गणेशा जाणशील ॥१५॥
पूर्वी मी तपोनिष्ठ अत्यंत । उद्दालक पित्यास नमून जात । तप आचरण्या वनांत । तपश्चर्या बहुविध केली ॥१६॥
नंतर माझें तपाचें तेज पाहत । जनक म्हणे ते मोहयुक्त । महायश तो शांतिदात प्रेमयुक्त । बाळा माझें वचन ऐक ॥१७॥
पुत्रा शांतिलाभार्थ तप सोडून । मी ब्रह्म ही वृत्ति महान । मनांत तूं बिंबवी प्रसन्न । विचार करी कोण मी हा ॥१८॥
कुठून आलास कुठें जाणार । हें सांग मज समग्र । चिंत्तामणीस बाळा सुंदर । चित्तीं पहा हें ज्ञान व्हाया ॥१९॥
पित्याचें वचन ऐकून । मी म्हणे त्यास वंदून । ताता मज स्वपुत्रास द्यावें ज्ञान । शांतिप्रद हें महान ॥२०॥
चित्त शरीरीं कोठें असत । त्यांत चिंतामणि कैसा राहत । कैसें जाणावें तयाप्रत । हें सर्व सांगा मजला ॥२१॥
वसिष्ठ महायोगी कथा सांगत । दशरथ आदरेम ऐकत । उद्दालक स्वपुत्रास म्हणत । महाभागा ऐक सारें ॥२२॥
योगशांतिप्रद हें ज्ञान । लाभतां सर्व योगज्ञ होऊन । ब्रह्मभूत तूं पावन । होशील यांत न संशय ॥२३॥
चित्त पंचविध ख्यात । क्षिप्तमूढ विक्षिप्त । एकाग्र निरोध भूमिसंज्ञ असत । महामते ऐसें तें ॥२४॥
त्यांत प्रकाशकर्ता निवसत । चिंतामणि तो हृदयांत । चित्रभूमिनाश होता लाभत । योगज्ञांसी तो देव ॥२५॥
सयंबुद्धि चित्तरुप असत । चित्तभ्रांत करी उक्त । सिद्धि माया या दोन्ही वर्तत । गणेशाच्या दोन शक्ति ॥२६॥
गणेश मायांचा क्रीडा कर्ता । म्हणून सांगतो तुज आतां । गणेश मंत्रानें त्यास भजता । पुत्रा शांति तुज लाभेल ॥२७॥
ऐसे बोलून आरुणि देत । गणराजाचा मंत्र मजप्रत । एकाक्षर तो ध्यानादिसंयुत । साधना त्याची मी केली ॥२८॥
त्यायोगें शांति मज प्राप्ति । योगिवंद्य मी झालों जगांत । म्हणोनि ब्रह्मप्रिया नृपा तूं भक्तियुत । भजन करी गणनायकाचें ॥२९॥
श्वेतकेतु म्हणे विधियुक्त । जपावा बत्तीस अक्षरी मंत्र सुनीत । गणेशाचा तूं श्रद्धायुत । तेणें ब्रह्मभूत होशील ॥३०॥
तो गणेशमंत्र स्वीकारुन । संपूर्ण विधियुक्त जाणून । श्वेतकेतूस प्रणाम करुन । नृप परतला स्वनगरांत ॥३१॥
परतता वैशाखी चतुर्थी येत । प्रथम जी शुक्ल पक्षांत । ती आचरी नागरिकांसहित । हर्षयुक्त चित्तानें ॥३२॥
राज्यांत सर्वत्र घोषणा करवित । सर्वांनी करावें व्रत । शुक्ल कृष्ण चतुर्थींचें पुनीत । सर्व प्रजेनें सर्वदा ॥३३॥
स्वतः स्वस्त्रीरामायुक्त । गणनायकासी भजत । भार्येस जीवन लाभत । पुत्र प्राप्तीही जाहली ॥३४॥
पुत्र होता तरुण बलसंपन्न । राज्य त्यास देऊन । राजा निवृत्त होऊन । मंत्र जप करी अनन्यभावें ॥३५॥
पूजन मनन सतत करित । अंतीं होई ब्रह्मभूत । ना सार्थ होत । त्या थोर राजाचें ॥३६॥
त्याच्या राज्यांत समस्तजन । चतुर्थी व्रतानें होत पावन । तेही क्रमें ब्रह्मभूत होऊन । स्वानंदक पुरीं गेले ॥३७॥
उद्दालक श्वेतकेतु विख्यात । गाणपत्य म्हणोनि जगांत । महा प्रभू अवधूत । श्वेतकेतु पुढे काय करी ॥३८॥
एकदा आरुणि आश्रमांत । होता आपुल्या स्त्रियेसहित । तेथ एक द्विज येत । सर्व शास्त्रीं विशारद जो ॥३९॥
तो द्विज आरुणीच्या भार्येप्रत । कामविव्हल प्रार्थित । मैथुन सुख द्यावेंण मजप्रत । सुंदरि तूं सत्वरी ॥४०॥
तें ऐकता क्रोधयुक्त । श्वेतकेतु होता त्यांस सांगत । आरुणि आपुल्या पुत्राप्रत । बाळा क्रोध करु नको ॥४१॥
अरे पुत्रा स्त्रिया अवृत । ऐसें असे शास्त्रमत । तें ऐकून श्वेतकेतु म्हणत । रोषभरें स्वपित्यासी ॥४२॥
ऐसें जरी असत । तरी एक पतीस स्त्री कैसी वरित । म्हणोनि ब्रह्मदेवें न केलें शाश्वत । नियम ऐसें मज वाटे ॥४३॥
असमंजस हें जाणून । मी आता घालतो मर्यादा यालागुन । यापुढतीं कामविचारें जो जन । परस्त्रीशी स्पर्श करील ॥४४॥
त्यास स्त्रीहत्येचें पाप लागेल । ऐसा धर्मनियम नूतन मला । तैसेचि जी पति सोडून रत होईल । कामिनी परपुरुष्यासी ॥४५॥
ती त्या संभोगानें लाभेल । पतिहत्यासम पातक सबल । माझी गणेशभक्ति दृढ असेल । सत्वर सत्य होईल वचन हें ॥४६॥
ऐसी मर्यादा श्वेतकेतु घालित । तेव्हांपासून पतिव्रताव्रत । रुढ जाहले जगांत । विनायकाच्या प्रसादाने ॥४७॥
ऐसें हें उद्दालकाचें चरित । तूं सांगितले तुज प्रसंगोपात्त । आतां चतुर्थीचें माहात्म्य अद्‌भुत । अपूर्व आणखी ऐक नृपा ॥४८॥
कोणी एक द्विज महाराष्ट्रांत । परस्त्रीलंपट असत । त्यास्तव मद्यपान करित । चोरी करुन धन मिळवी ॥४९॥
सदा हिंसा आचरित । जाहला नाना पापांत रत । परस्त्रियांसी भोगी सतत । एकदां गेला शूद्रगेहीं ॥५०॥
कामविव्हल तो शूद्रभार्येंसहित । जाहला धन देऊन रत । शूद्र नव्हता गावांत । दूर प्रवासा तो गेला असे ॥५१॥
ऐसा कांहीं काळ जात । द्विज शूद्रपत्नीस भोगित । तिच्याच घरीं निवसत । कामांध होऊन त्या वेळीं ॥५२॥
परी जेव्हां तो शूद्र गृहीं परतत । तेव्हां जाणून वृत्तान्त । शस्त्राघातें द्विजाधर्मा मारित । क्रोधांध होऊन तत्क्षणीं ॥५३॥
त्या दिवशीं चतुर्थी असत । वैशाख शुद्ध पुनीत । शस्त्रानें विद्ध होत । द्विज तो राहिला उपाशी ॥५४॥
अन्नादि त्यास न मिळत । पंचमी तिथीस तो मरत । त्या पुण्ये स्वानंद लोकांत जात । सत्कार बहुत तेथें त्याचा ॥५५॥
ऐसा महापाप परायण । परी चतुर्थी व्रत अज्ञानें घडून । जाहला ब्रह्मभूत तो पापी ब्राह्मण । तरी ज्ञान्यांची काय कथा ॥५६॥
नाना जन करुन व्रत । जाणून अथाअ नकळत । ते सर्वही जाले ब्रह्मभूत । ऐसें वर्णनातीत हें माहात्म्य ॥५७॥
हें वैशाखी शुक्ल चतुर्थीचे व्रत आख्यान । असे अत्यंत पावन । ऐकेल वा वाचील एकमन । त्यास इप्सित सर्व लाभे ॥५८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते वैशाखशुक्लचतुर्थीमाहात्म्यवर्णनं नाम पंचदशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP