मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय २९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दशरथ म्हणे वसिष्ठाप्रंत । कार्तिक कृष्णपक्षांत । जी संकष्टी चतुर्थी येत । तिचे माहात्म्य मज सांगावें ॥१॥
तेव्हां इतिहास पुरातन । वसिष्ठ दशरथाची करिती कथन । महाराष्ट्रांत कर्दम नाम बलवान । महातेजस्वी एक नृप ॥२॥
तो वेदवेदार्थ जाणत । स्वधर्मी होता रत । लोकांचें संगोपन करित । पुत्रापरी आपुल्या ॥३॥
षष्ठांश घेऊन कारभार । चतुरंग सेना राखिली अपार । वैभवं जैसा दुसरा कुबेर । शस्त्रास्त्रांत परायण ॥४॥
स्वबळें अन्य नृपांस । वश केलें विशेष । पृथ्वी सर्वही वश तयास । कारभार देती अन्य नृप ॥५॥
सामंत सारे आज्ञांकित । पुण्यवंत तो धर्मरत । नाना दानपरायण असत । देव विप्र अतिथिप्रिय ॥६॥
आपुल्या पत्नीसंगे रत । अनेक तीर्थाटनें परवीराचें क्रन्दन करित । नाना गुणयुक्त तो ॥७॥
परी त्यास क्षयरोग झाला । दारुण पीडा होत तयाला । अस्थिपंजर मात्र राहिला । शोकग्रस्त अत्यंत ॥८॥
नाना उपाय करित । परी रोगमुक्त  होत । तीर्थयात्रा बहुविध करित । तथापि पीडा न शमली ॥९॥
अनेक देवतांचे अर्चन । केलें त्यानें एकनिष्ठ मन । तरी रोग अनिवार्य वाढून । दुःखित झाला मानसीं ॥१०॥
विप्रांकरवी देवतांचें पूजन । त्यानें केलें जरी श्रद्धा ठेवून । तरी रोग अधिकचि वाढवून । राजा संत्रस्त जाहला ॥११॥
नंतर राज्याचा त्याग करुन । प्रधानांवरी राज्य सोपवून । सस्त्रीक वनीं जाऊन । इकडे तिकडे भटकत होता ॥१२॥
सैरावैरा वनांत फिरत । शांतिधर तो वैराग्यायुक्त । तेव्हां मंकणक विप्रा पाहत । योगिसत्तमा श्रेष्ठांस ॥१३॥
त्यास साष्टांग नमन करित । करुनस्वरें तो रडत । मुनिमुख्य तो दया येऊन तयाप्रत । म्हणे राजा ऐक वचन ॥१४॥
जाणलें मीं महाभागा वृत्त । तूं कां झालास रोगपीडित । ज्या पापास्तव हें तूं भोगित । त्याचें स्वरुप सांगतों ॥१५॥
तुझ्या राज्यां चतुर्थीचें व्रत । मुख्य तें झालें लुप्त । त्यायोगें पापसंयुक्त । होऊन तूं जाशील नरकांत ॥१६॥
राजा सर्व कार्यांत प्रथम । करावें तें व्रत उत्तम । सर्वसिद्धि फलप्रद मनोरम । तें न करिता सारें निष्फल ॥१७॥
म्हणोनी तू नानाधर्म परायण । झालास चतुःपदार्थ विहीन । व्रत ना केलेंस हें कारण । नृपाधमा ऐक महिमा ॥१८॥
तेव्हां कर्दमराजा म्हणत । धन्य माझा जन्म वाटत । तुमच्या पद्मरंध्राचें दर्शन घडत । व्रतमाहात्म्य ऐकिलें ॥१९॥
तरी आतां गणेशस्वरुप सांगावें । दयानिधे मज बरवें । त्या सर्वदेवाधिदेवा भक्तिभावें । भजेन मी निरंतर ॥२०॥
मंकणक म्हणे मजप्रती । गणेशवर्णन अशक्य जगतीं । परी उपाधि संयुक्त तुजप्रती । सांगतो कांहीं कर्दमा ॥२१॥
पूर्वीं मीं पानें खाऊन । तप केलें महान । ऐसा बहुत काल जातां एकदिन । हातांत काटा मोडला ॥२२॥
तेव्हां त्या जखमेतून । पत्ररस वाहे पावन । तें अद्‌भुत पाहून । नाचलों मी आनंदानें ॥२३॥
अहो माझ्या देहांत । रक्ताचा रस होत । पत्रभक्षणें हें घडत । तपश्चर्याप्रभावें माझ्या ॥२४॥
नंतर माझ्या नृत्यानें कंपित । चराचर भयभीत । देव सारे झणीं जात । शंकरासी भेटावया ॥२५॥
शंकर सर्व देवांसमवेत । तेथ आला जेथ मी नाचत । म्हणे प्रमें मजप्रत । महाभागा कौतुक कोणतें? ॥२६॥
ऐसें बोलून थांबवित । रसप्रवाह भस्मरुपांत परिवर्तित । करुन अंतर्धान होण्या इच्छित । शंकर तो महायोगी ॥२७॥
तें पाहून विस्मित । रसाचें भस्मस्वरुप क्षणांत । नाच थांबवून प्रणाम करित । भक्तिभावें मीं स्तविलें ॥२८॥
तदनंतर शंकर अंतर्धान । पावतां मी राजेंद्रा थक्क मन । निश्चय केला एक महान । शंकराहून श्रेष्ठ न अन्य ॥२९॥
त्याच्यासम कर्म करण्यास । शक्य नसे कवणास । माझ्या तपाच्या रसास । भस्मरुप केलें ब्रह्माकारें ॥३०॥
हें जाणून विष्णुभजन सोडून । महेशाच्या भजनीं मन । लाविलें मी तप सोडून । योगयुक्त क्रमें झालों ॥३१॥
शमांत होऊन रत । जडादी योगभूमींचा त्याग करित । सहज स्वभावीं मोहवर्जित । तेव्हां प्रतिष्ठित मी झालों ॥३२॥
पृथ्वीवरी इतस्ततः फिरत । सहज ब्रह्म मी पाहत । मोहहीन जें अद्‌भुत । योगधारक मी शिवभक्त ॥३३॥
परी सहज ब्रह्म स्वाधीन । शांतिद ब्रह्मीं न योग्य वाटून । ब्रह्मांत भ्रांत होऊन । सूर्यास शरण मीं गेलों ॥३४॥
प्रणाम करुन स्वैरमागें स्तवित । प्रसन्न तो मज वर देत । तेव्हां मी सूर्यास प्रार्थित । शांतिप्रद ब्रह्म सांगावें ॥३५॥
सहज जें मोहहीन । जरी ब्रह्म स्वाधीन । नसे शांतिदायक म्हणून । उपदेश मजसी करावा ॥३६॥
तदनंतर भक्तिप्रसन्न । सूर्य सांगे मज वचन । गणेशासी भज तूं श्रद्धा ठेवून । तरीच शांति मिळेल तुला ॥३७॥
शक्ति असत्‍ असत । सूर्य सत्‍ वर्तत । विष्णुदेव सम जगांत । शंकर सहज स्थित जाणावा ॥३८॥
त्याच्या योगें गणेश्वर । चारांच्या संयोगें स्वानंदकर । अयोगें पाचांच्या हीन खरोखर । मारायरहित तो असे ॥३९॥
संयोगांत मायायुक्त । योगांत माया विवर्जित । त्यांच्या संयोगअयोगें असत । शांतिप्रद तो ब्रह्मनायक ॥४०॥
चित्त आहे मोहयुक्त । त्याचा त्याग करुन योगांत । शांतिप्रद या मार्गांत । चिंतामणीस तूं भजावें ॥४१॥
ऐसें करितां योगिवंद्य होशील । सांगून ऐसें वचन अमल । षडक्षरमंत्र मज दिला विमल । विधिपूर्वक तयानें ॥४२॥
त्याचा स्वीकार करुन । विनम्रभावें त्यास वंदून । आपुल्या आश्रमांत परतून । मंत्रपारायण मी झालों ॥४३॥
ऐसें करिता अनुष्ठान । माझ्यासमोर प्रकटून । मज दिलें प्रत्यक्ष दर्शन । गणेशदेवानें प्रेमभरें ॥४४॥
त्याचें विधिपूर्वक पूजन । केलें मी वंदनपूर्वक मनन । नानाविद्य स्तुति करुन । तोषविलें मीं गणेशसी ॥४५॥
दृढ भक्ति चित्तांत । तेव्हां तो माझ्या स्थापित । अन्तर्धान नंतर होत । तेव्हांपासून मी गाणपत्य ॥४६॥
भजतों आदरें गणेशाप्रत । स्वच्छंदे मी जगांत । ऐसें सांगून कर्दमाप्रत । षडक्षर मंत्र दे विधिपूर्वक ॥४७॥
मंकणक मुनि अंतर्धान । पावतां राजा हर्षयुक्त मन । आपुल्या घरासी परतून । मंत्र जपूं लागला ॥४८॥
तदनंतर कार्तिकमास येत । शुक्लकृष्ण चतुर्थीचें व्रत । करी नृप तो विधियुक्त । तेणें रोगमुक्त जाहला ॥४९॥
प्रजाजनांकरवी करवी । म्हणे व्रताची महती जाणावी । हया व्रताची थोरवी । अर्पूर्व असे असामान्य ॥५०॥
जगीं व्रत केलें प्रख्यात । तो राजर्षी रोगमुक्त। गणनायकासी भजत । वंध्यत्वहीन प्रजाजन झाले ॥५१॥
सारे प्रजाजन गणेशासी भजत । राजा वृद्धत्व पुढे पावत । सस्त्रीक तेव्हां जात वनांत । पुत्रास राज्य देऊन ॥५२॥
तेथ राहून वनांत । विघ्नेश्वरासी भजे अविरत । अंतीं स्वानंद लोकांत । ब्रह्मभूत तो जाहला ॥५३॥
प्रजाजनही क्रमें होत । ब्रह्मभूत जे भूमिलोकांत । ऐसें हें व्रतमाहात्म्य अद्‌भुत । कथिलें तुज नृपोत्तमा ॥५४॥
ऐसेंच एक अन्य वृत्त । चांडाळ कोणी पापरत । हिंसा करी अविरत । ब्राह्मणांसी मारी अन्यांसहित ॥५५॥
परस्त्रीस वनीं पाहात । तरी बलात्कारें तिज भोगित । ऐसीं पापें नानाविध करित । दुर्मती तो सर्वदा ॥५६॥
परी एकदा कार्तिक मासांत । कृष्ण चतुर्थीचा दिन असत । त्या दिनीं तो पापी अविनीत । भटकत होता वनांत ॥५७॥
तेव्हां त्यांस पाप चावला । विषप्रभावें व्यथित झाला । भयभीत तो मूर्च्छित पडला । चंद्रोदयीं जाग त्यांस आली ॥५८॥
त्या समयीं अन्न वस्त्र मिळत । तेंचि भक्षिलें होऊन मुदित । परी गरळाच्या प्रभावें पडत । बेशुद्ध होऊन भूवरी तो ॥५९॥
पंचमी दिनीं तो मरत । परी व्रत घडलें नकळत । म्हणोनी होऊन ब्रह्मभूत । मुक्त झाला तो महापापी ॥६०॥
ऐशाचि परी अन्य जन । व्रतप्रभावें होऊन पावन । स्वानंदवासी होऊन । ब्रह्मभूत जाहले ॥६१॥
ऐसें हें कार्तिक संकष्टीचें महिमान । कथिलें तुज पावन । हें ऐकता वा वाचितां जन । इप्सित सारें लाभतील ॥६२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते कार्तिक कृष्णचतुर्थीमाहात्म्यवर्णनं नाम एकोनत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP