खंड ४ - अध्याय ४
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । मुद्गल म्हणती दक्षासी । आतां पुरातन संवाद सांगेन तुजसी । ज्यांत दशरथ राजासी । वसिष्ठांनी उपदेश केला ॥१॥
तो ऐकतां चतुर्थीचें महिमान । दशरथासी समजलें प्रसन्न । ब्रह्म पुत्रा तूही होशिल पावन । चतुर्थी माहात्म्य तें ऐकता ॥२॥
महायश दशरथास नव्हतें संतान । वंध्यादोषानें मन त्याचें खिन्न । वसिष्ठांसी शरण जाऊन । प्रणाम करुनी विचारी तया ॥३॥
महामुने पुत्रप्राप्ती होण्यासी । उपाय सांगावा मजसी । आपल्या विनम्र शिष्यासी । तारावें या भवसागरीं ॥४॥
तें ऐकून वसिष्ठ सांगत । दशरथा, नृपोत्तमा स्वीकारी व्रत । कुलदेव गणेशाचे तूं भक्तियुक्त । तेणें मनोरथ सफल होईल ॥५॥
वसिष्ठाचें वचन ऐकून । पुन्हा त्यासी प्रणाम करुन । दशरथ विचारी विनयसंपन्न । कोणतें हें व्रत सांगा ॥६॥
गणेशाचें हें व्रत । पूर्वी कोणी केलें जगांत । त्यापासून सिद्धि काय मिळत । कोणत्या वेळीं हें करावें? ॥७॥
कोणता पूजन विधि असत । तें सर्व विस्तारें सांगा मजप्रत । मी आपुल्या वचनांकित । करीन आज्ञेनुसार तुमच्या ॥८॥
वसिष्ठ तेव्हां दशरथासी म्हणती । धन्य धन्य तुझी मती । गणेश व्रतावरी तुझी भक्ती । दाखविलीस यायोगें ॥९॥
चतुर्थी तिथी प्रिय अत्यंत । नृपोत्तमा गणनाथाप्रत । शुक्ल कृष्ण नामें जगांत । सर्वसिद्धिप्रद सर्वदा ॥१०॥
चंद्राचा उदय होत । तेव्हां जी कृष्णा चतुर्थी येत । ती संकटहारिणी विख्यात । चतुर्विध फलप्रद ॥११॥
चतुर्विध हें जग समस्त । तेथ संकटें तैशीच येत । परी तीं सर्व दूर होऊन भोगित । इहलोकीं अखिल भोग ॥१२॥
जरी चंद्रोदयी चतुर्थी न लागत । तरी प्रदोष व्यापिनी ग्राहय होत । सर्व संकटांपासून मुक्त । हे व्रत करिता भक्त होय ॥१३॥
जरी उभय दिनीं चतुर्थी असत । तरी चंद्र संयुक्त आचरावी उपवासयुक्त । स्वेच्छाविहारें करिती भक्त । ऐसा क्रम कथिला असे ॥१४॥
तृतीयेस प्रदोष असत । त्या रात्रीं चंद्रोदया चतुर्थी येत । तरी तीच ग्राहय सदा होत । अन्य दिवस सोडोनिया ॥१५॥
शुक्ल कृष्ण चतुर्थीत । शुक्ला वरदा नामें ख्यात । व्रतकारी जनासी लाभत । संचित असंचित सर्व लाभ ॥१६॥
धर्म अर्थ काम मोक्ष हे चार । पुरुषार्थ प्राप्त करी नर । गणेशासी प्रीतिकर । म्हणोनि ही वरदा चतुर्थी ॥१७॥
मध्याहनव्यापिनी ग्राह्य होत । शुक्ल चतुर्थी ऐसा संकेत । उभयत्र जेव्हां लाभत । तेव्हां प्रहर भानुगा उपासावी ॥१८॥
एक प्रहरानंतर होत । जरी तृतीया सूर्य संयुत । तरी पूर्वा असो परा वा उभयतांत । व्रतसंमत चतुर्थी ती मान्य असे ॥१९॥
जो असे चतुर्थी व्रतहीन । त्याची अन्य समस्त व्रतें फलहीन । म्हणोनि निष्ठा ठेवून । चतुर्थी व्रत आचरावें ॥२०॥
हें व्रत महाभागा आचरिलें । ब्रह्मदेवानें पूर्वी भलें । या व्रताच्या प्रभावे निर्मिलें । सकळ जग विधात्यानें ॥२१॥
ऐसें हें उत्तम व्रत । विष्णु शंकरही आचरित । त्यायोगें स्थिति संहार करित । अनुक्रमें ते दोघे ॥२२॥
शुक मुख्य कश्यपादि मुनीश्वर । ऐसे योगीजन उदार । चतुर्थीचे हें व्रत पवित्र । स्वकार्यसिद्धिस्तव करिती ॥२३॥
इहलोकीं अखिल भोग भोगून । अंतीं स्वानंदलोकी करिती गमन । अन्य ऐसे पुरुषार्थ साधन । चतुर्थीसम जगांत नसे ॥२४॥
वर्णाश्रमसंस्थित अन्य नारी नर बहुत । जे चतुर्थीचें व्रत आचरित । ते ते सर्व ब्रह्मभूत । होऊन पावले स्वानंदपुरासी ॥२५॥
ऐसे हें व्रत भावसंयुक्त । दशरथा करी तूम एकचित्त । तरी पुत्रलाभ होऊन निश्चित । स्वानंदलोकी जाशील ॥२६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते दशरथव्रतोपदेशो नाम चतुर्थोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP