खंड ४ - अध्याय ३३
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । दशरथ विनवी वसिष्ठाप्रत । शमीमूलीं राहून करित । मुनिसत्तमा जी संकष्टी पुनीत । तिचें माहात्म्य मज सांगा ॥१॥
इतिहास पुरातन तदनंतर । वसिष्ठ सांगती सर्वसिद्धिकर । श्रवणें पठणें मुक्तिकर । दशरथ नृपासी त्या समयीं ॥२॥
पांचाल देशांत अत्रिगोत्रोत्पन्न । होता एक ब्राह्मण पावन । पूर्वकर्माच्या विपाकेंकरुन । कोड उठलें शरीरीं त्याच्या ॥३॥
नानाक्षतें पडलीं । पूय शोणित वाहून उबग आलो । कीटकांची गर्दी झाली । अंगाभोवतीं तयाच्या ॥४॥
त्यास पाहून ऐसा त्रस्त । पिता त्याचा परम दुःखित । अत्रिऋषीस शरण जात । उपाय विचारी तयासी ॥५॥
त्यानेंही सांगितला उपाय । शमीमूली राहून भक्तिमय । संकष्टी चतुर्थी करता जाय । पाप समग्रही विलयासी ॥६॥
तदनंतर स्वसुतास नेत । शमीमूलीं व्रताचरणास । दाव्यानें बांधून त्यास । चन्द्रोदयापर्यंत ठेविलें ॥७॥
सूर्योदयापासून बंदिस्त । तो कुष्ठरोगी तेथ राहत । चन्द्रोदयापर्यंत । कांहीं न त्यानें भक्षण केलें ॥८॥
नंतर पिता त्या अगणित । व्रत पूर्ण होतां आपुल्या गृहाप्रत । तेव्हां तो जाहला नेत्रयुक्त । रोग सारा नष्ट झाला ॥९॥
कुष्ट्ताहीन रुप पावला । विगतज्वर तो जाहला । कोडव्याधीतून मुक्तता त्याला । सर्वांग सुंदर जाहलें ॥१०॥
तें पाहून आश्चर्यचकित । तेथ जाहले विप्र समस्त । तदनंतर गणेशासी भजत । सातत्यानें आदरेम तो ॥११॥
अंतीं शांतिलाभ होत । तो जाहला ब्रह्मभूत । ऐशा परी शमीमूलांत । संकष्टी व्रत करितां पुण्य ॥१२॥
अंती ब्रह्मभूत होत । असाध्य सारे साध्य होत । अन्यही एक वृत्तान्त । महीपाला याविषयीं ॥१३॥
तो आता ऐक सिद्धिकर । नगरी पापी एक चोर । घर फोडोन सत्वर । धन हरण्या उद्युक्त एके दिनीं ॥१४॥
धन घेऊन तो बाहर पडत । तेव्हां जन त्यासी पाहत । कोलाहल करिती जो ऐकत । राजदूत त्या वेळीं ॥१५॥
शस्त्र घेऊन हातात । धावलें ते महाबलवंत । चित्तीं क्रोध दाटला बहुत । विद्ध करिती शस्त्रांनी ॥१६॥
त्या चोराचें अंग छिन्न । जाहलें तेव्हां तो उन्मन । त्यास नेती दूत पकडून । बांधून ठेविती शमीमुळाशी ॥१७॥
नंतर राजासी निवेदिती । ती संकष्टी चतुर्थी होती । त्या दिवशीं त्या चोराची स्थिति । निराहारत्वें व्याकुळ ॥१८॥
पंचमी तिथी उजाडत । तेव्हां सर्व क्षतें भरुन निघत । चोर जाहला शोभायुक्त । राजदूत तें पाहती ॥१९॥
राजासी ते निवेदिती । आश्चर्य घडलें म्हणती । राजा येऊन त्याच्यापुढतीं । जाहला विनम्र प्रणाम करुन ॥२०॥
एवढ्यांत विमान एक उतरत । गणेशगण बाहेर पडत । शुंडादंडे विराजित । तेही त्यासी प्रणाम करिती ॥२१॥
त्या पापी चोरास नेण्यास । उत्सुक ते होते विशेष । महासेन नृप विचारी तयास । यानें काय पुण्य केलें ॥२२॥
गणपति दूतांनो सांगा मजसी । करुणा युक्त हृदयें वृत्तांताशी । आम्हींही करुं त्या व्रतासी । पुण्यपावन जें एवढे ॥२३॥
गणेशदूत तेव्हां सांगती । कृष्णपक्षीं संकष्टी होती । त्या दिनीं शमीमूळीं वसती । घडली त्यास अनायासे ॥२४॥
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत । निराहार जो ऐसा राहत । विघ्नेशाचा जप करित । व्रत सारें यथाविधि ॥२५॥
नंतर ब्राह्मणांस देऊन भोजन । स्वयं करी जो भक्षण । रात्रीं करी जागरण । पंचमीस पूजन पुनः करी ॥२६॥
तो गणराजाचा भक्त । पावेल सारें ईप्सित । संशय यात अल्पही नसत । अंतीं जात स्वानंदलोकी ॥२७॥
तेथ होऊन ब्रह्मभूत । मुक्त होय तो गणेश भक्त । ऐसें सांगून गणेशदूत । त्या चोरासी घेऊन जाती ॥२८॥
विघ्नेश्वराचें होतां दर्शन । चोर जाहला पावन । ब्रह्मभूतत्व पाऊन । धन्य जाहला तो जगीं ॥२९॥
नंतर राजा महाभाग आसक्त । जाहला गणेशभजनांत । शमीमूळीं राहत । संकष्टीचतुर्थीचेम दिवशीं ॥३०॥
त्यायोगें राजा गति लाभत । व्रतपुण्यें त्रैलोक्यांत । ब्रह्मादींच्या सभेंत । जाऊन बैसत स्वेच्छेनें ॥३१॥
पुनरपि स्वनगरांत परतत । चंपावती नामें ती ख्यात । ऐसा सर्वगामी होऊन शोभत । राजमंडळीं तो नृप ॥३२॥
अंतीं सर्व जनांसहित । राजा गेला विघ्नराजाप्रत । होऊनिया ब्रह्मभूत । ऐसें माहात्म्य या संकष्टीचें ॥३३॥
शमीमूल संकष्टीचें महिमान । कथिलें तुज पावन । जो ऐकेल वा वाचील प्रतिदिन । ईप्सित सारें तो लाभेल ॥३४॥
ऐसा गणराजाचा प्रसाद लाभत । नाना जन झाले पुनीत । वंध्यादि दोष विलया जात । त्यांची गणना अशक्य वाटे ॥३५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते शमीमूलचतुर्थीव्रताचरणवर्णनं नाम त्रयस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP