खंड ४ - अध्याय २७
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । दशरथ विनवी वसिष्ठाप्रत । भाद्रप्द संकष्टीचें महिमान अद्भुत । आता सांगावें मजप्रत । सर्वसिद्धिप्रदायक जें ॥१॥
वसिष्ठ तेव्हां निवेदिती । द्राविडांत राजशार्दूल परमद्यूती । वीरसेन राज्यनीती । पारंगत सार्वभौम ॥२॥
अन्य राजे करभार देत । सुराज्य त्याचें प्रख्यात । धर्मशील सदा आनंदयुक्त । भक्तिभावें प्रजा पाळी ॥३॥
आपुल्या राज्यांत क्षुधार्त । कोणासही तो न ठेवित । पुत्रासम प्रजेस मानित । औरसपुत्र परी त्यास नव्हता ॥४॥
पुत्रप्राप्तीस्तव जपहोम । तीर्थक्षेत्रादी केलीं अनुपम । परी पुत्रसुख मनोरम । त्यासी न मिळालें दुर्दैवें ॥५॥
तेव्हां तो राजा अतिदुःखित । राज्य त्यागून गेला वनांत । स्त्रीसहित तेथ हिंडत । महावनीं क्षुधार्त पडे ॥६॥
सुमंतु नामा ब्राह्मण येत । समिधा जमवण्या त्या स्थळांप्रत । राजास पाहून दयायुक्त । निरीक्षिली अवस्था त्याची ॥७॥
वेदवेदांगवेत्ता साक्षात । सर्वशास्त्रांचा प्रवर्तक प्रख्यात । पुराणज्ञ महायोगी प्रतापवंत । व्यासशिष्य तो सुमंतु ॥८॥
त्यास पाहून तत्काळ उठत । प्रणाम करी वीरसेन विनीत । हात जोडून प्रार्थित । भक्तिभावें तयासी ॥९॥
धन्य माझें मातापिता । धन्य कर्म कुळ यश आता । विद्या व्रतादींची सांगता । तुमच्या अंध्रिदर्शनें जाहली ॥१०॥
राज्य सोडून मी वनांत । पुत्रलाभ होण्या चिंतित । पापी असुनी आज होत । दर्शन पूर्वपुण्यें ॥११॥
नाना यत्न मीं केले । पुत्रप्राप्तीस्तव ते विफल झाले । आतां तुझी कृपा हाच या वेळे । उपाय सुखद वाटतसे ॥१२॥
ऐसें ऐकून त्याचें वचन । वसिष्ठ सांगे कथाभाग प्रसन्न । सुमंतु मुनि संतोषून । म्हणे तूं चितां करुं नको ॥१३॥
राजेंद्रा ऐक वचन हित । कुलतारक पुत्र तुज होईल निश्चित । यांत संदेह लव नसत । पाप तुझें ऐक आता ॥१४॥
चतुर्थीचें थोर व्रत । लोप पावले तव राज्यांत । त्यामुळें पुत्रहीनता प्राप्त । नृपाधमा तुजलागीं ॥१५॥
जें सर्व कार्यांत प्रथम । सर्व व्रतांत आदी परम । चतुःपदार्थप्रद मनोरम । तें न करतां निष्फळ सारें ॥१६॥
तूं नाना पुण्यद सर्वसंमत । कर्म केलेंस जगीं अत्यंत । परी चतुर्थीव्रत । त्यक्त । म्हणोनि पुरुषार्थ मुकलासी ॥१७॥
ऐसें बोलून महिमान । चतुर्थीव्रताचेम सांगून । गणेशाचें उच्चतम ज्ञान । सर्वही त्यासी निरुपिलें ॥१८॥
वीरसेनाच्या चित्तांत । गणेश ज्ञानार्थ इच्छा असत । ती पुरवी सांगून किंचित । गणेशरुप महिमान ॥१९॥
गणेशाचें स्वरुप वर्णन । अशक्य असे सर्वथा महान । उपाधिसंयुत परी प्रसन्न । राजेंद्रा तुज सांगतों ॥२०॥
सुमंतु म्हणे वीरसेनाप्रत । माझाच ऐक पूर्व वृत्तान्त । मी तपःप्रभावें होत । समर्थ पूर्वीं भूमंडळीं ॥२१॥
अतितपें अंतर्ज्ञान उत्पन्न । तेणें विस्मित झालें मग्न । जडादिक भूमिका साधून । नाना ब्रह्मभेदातीत ॥२२॥
ऐशा क्रमें स्वानंदलोकांत । मी तपप्रभावें जात । शांतिसुखीं सक्त ब्रह्मभूत । परी भेदमय द्वंद उरलें ॥२३॥
तें पाहून जत व्यासांप्रत । शांत जो महामुनी जाणे हित । त्यास प्रणाम करुन प्रार्थित । शांतिरुप मज सांगा ॥२४॥
मी तुमचा शिष्य विनीत । तारावें आता भवार्णवांत । ऐशी प्रार्थना ऐकून हर्षित । व्यास म्हणे तयासी ॥२५॥
ऐक पुत्रा गणेशज्ञान । योगसेवेनें जें लाभतें महान । शांतीचे शांतिरुप पावन । ब्रह्मभूत सरुप ॥२६॥
स्वतःपासून ज्याचें उत्थान । अन्य उद्भवें दुसर्यापासून । त्यांच्या अभेदे होत साधन । असत स्वानंद रुपाचें ॥२७॥
तेथ जें अमृतमय असत । सद्रुप स्वस्वरुप उदात्त । त्यांच्या अभेदभावे विलसत । आनंद तो स्वानंद म्हणती ॥२८॥
तिघांनी हीन तिघांनी युक्त । ऐसें असे तें ब्रह्म अव्यक्त । चौघांच्या संयोगें ख्यात । स्वानंदब्रह्म जगांत ॥२९॥
पंचगतीहीन जें असत । तेथ सर्वांचा अयोग घडत । संयोग अयोग एकत्र होत । शांतिप्रद तो गणराज ॥३०॥
गणसमूहरुप असत । आंत बाह्यादि योगें ख्यात । अन्नआदि ब्रह्मरुप ते असत । जाणावें योगसेवेनें ॥३१॥
त्यांचा स्वामी गणेशान असत । त्यासी भजतां होशील निश्चित । ब्रह्मभूत तूं मुक्त । यांत संशय कांहीं नसे ॥३२॥
चित्त जें पंचविध तें बुद्धिवाचक । मोहस्वरुप चित्त सिद्धिरुप पावक । त्यांचा स्वामी गणाधीश एक । मायेसह खेळ करी ॥३३॥
पंचचित्तांच्या निरोधें लाभत । चित्तधारक जो उदात्त । चिंतामणि म्हणोनि ख्यात । वेदांत पुत्रका सर्वत्र ॥३४॥
चित्ताचा त्याग करुन । सन्मोह सारा सोडून । होई तो चिंतामणि महान । गणेश योगसेवेने ॥३५॥
ऐसे सांगून मज देत । एकाक्षर मंत्र प्रभू तो पुनीत । विधिपूर्वक मजप्रत । स्वीकारिला तें विनीतभावें ॥३६॥
नंतर त्यासी प्रणाम करुन । माझ्या आश्रमांत परतून । जप केला मीं श्रद्धा ठेवून । गणपतीचें ध्यान करित ॥३७॥
त्यानंतर अल्पावधींत । शांतिलाभ मज होत । तरीही गणराजाचें पूजन करित । अविरत मी भक्तीनें ॥३८॥
तेव्हां तो विघ्नराज प्रकटत । एके दिनी माझ्या पुढयांत । गणेशास प्रत्यक्ष पाहून विस्मित । मानस माझें जाहलें ॥३९॥
हर्षभरें पूजिलें त्यांस । करुनि अथर्वशीर्ष स्तुतीस । आपुली भक्ति विशेष । देऊन मज तो अदृश्य झाला ॥४०॥
तेव्हांपासून गाणपत्य मी भजत । नित्य आदरें गणेशाप्रत । तूंही पावशील जगांत । शुभ सर्वही त्यांस भजतां ॥४१॥
ऐसे सांगून त्यांस देत । षोडशाक्षर मंत्र पुनीत । विधिपूर्वक प्रख्यात । नंतर अंतर्धान पावला ॥४२॥
पत्नीसहित त्यासी नमून । स्वनगरीं त्वरित परतून । गणनायकाचें भजन । राजा करी भक्तिभावें ॥४३॥
तदनंतर प्रथम जी येत । भाद्रपद संकष्टी प्रख्यात । प्रजाजनांसह आचरित । व्रतपूर्वक वीरसेन ॥४४॥
व्रतपुण्याच्या प्रभावें होत । राजासी पुत्रप्राप्ती इच्छित । रोगरहित प्रजा समस्त । जाहली तेव्हांपासून ॥४५॥
वीरसेनाच्या राज्यांत । समस्त प्रजाजन आचरित । शुक्ल कृष्ण चतुर्थीचे व्रत । श्रद्धापूर्वक सर्वदा ॥४६॥
वृद्धापकाळीं वीरसेन अर्पित । आपुलें राज्य स्वपुत्राप्रत । पत्नीसहित वनांत जात । गणेशासि सतत भजे ॥४७॥
अंतीं गणेशलोकीं जात । ब्रह्ममय तो नृप होत । तैसेचि लोक समस्त । उद्धरुन गेले व्रतप्रभावें ॥४८॥
आणखी एक वृत्तान्त । दशरथा सांगतो तुजप्रत । भाद्रपद संकष्टीचे अद्भुत । जेणें सुस्पष्ट होईल ॥४९॥
आंध्र प्रांतात एक धीवर । पापकर्मी रत फार । सर्व हिंसक भयंकर । कलह करी सर्वदा ॥५०॥
लोकांचे द्रव्य चोरित । पांथस्थांसी तो लुटित । परस्त्रीचा मोह करित । नाना पापपरायण ॥५१॥
त्याचीं पापें होतीं अगणित । एकदां तो जात वनांत । त्या दिवशीं खावया न मिळत । काहीही त्या पाप्यासी ॥५२॥
जन समुदाय महान । वनांत आलेला पाहून । त्यांच्या भयें गृहेत लपून । बैसला तो धीवर ॥५३॥
ऐसा संपूर्ण दिवस गेला । कांहीं न मिळतां खावयाला । उपवास दिवसभरी घडला । त्या कोळ्यासी त्या दिवशीं ॥५४॥
जेव्हां जनसमुदाय परतला । तेव्हां तो कोळी विश्वासला । गुहेंतून बाहेर पडला । नंतर गेला स्वगृहास ॥५५॥
चंद्रोदय होतां सूतांसहित । भोजन करी तो धीवर क्षुधित । भाद्रपद संकष्टीं ती असत । योगायोगें त्या दिवशीं ॥५६॥
पंचमी तिथीस अकस्मात । सर्पदंशे तो मरत । गणराजाचे दूत येत । स्वानंदलोकीं त्यास नेण्या ॥५७॥
त्या धीवरास घेऊन । स्वानंदलोकीं गेले परतून । गणेशास तेथ पाहून । ब्रह्मभूत तो जाहला ॥५८॥
अजाणता घडलें व्रत । विधिहीन परी सफल होत । तरी जाणीवपूर्वक करीत । त्यांसी फळे केवढें मिळे ॥५९॥
चतुर्थीव्रताच्या प्रभावें मुक्त । जन जाहले असंख्यात । त्यांची गणना अशक्य असत । सर्वथैव या जगीं ॥६०॥
ऐसें हें भाद्रपद संकष्टीचें व्रत । त्याचें माहात्म्य अति अद्भुत । वाचका पाठकांसी लाभत । मनोवांछित सर्वही ॥६१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते भाद्रपदकृष्णचतुर्थीमाहात्म्यवर्णनं नाम सप्तविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP