खंड ४ - अध्याय १८
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । दशरथाच्या मनांत । श्रावण वरदा कथेचे औत्सुक्त असत । म्हणोनि तो प्रार्थना करित । वसिष्ठांची पुनरपि ॥१॥
सांगावी कथा ती मजप्रत । वसिष्ठ तेव्हां त्यास सांगत । अंगदेशीं एक नगर असत । श्रीमत्शततार नांवाचें ॥२॥
तेथ अश्वसेन नाम नृपती । राज्य करी धर्मनीती । दानशूर ऐसी ख्यात । होती त्या जनवल्लभाची ॥३॥
देवप्रिय अतिथीस भजत । अति पराक्रमी तो व्रतयुक्त । शस्त्रास्त्रांनी पृथ्वी जिंकित । सार्वभौमत्व तयाचें ॥४॥
समस्त राजे वश करुन । करभार मिळवी अमित धन । ऐसें त्याचें बल गहन । परी एकद नवल घडलें ॥५॥
एके दिनीं अकस्मात । राजा झाला ज्वरपीडित । अतिदाहक ज्वर असत । निद्रा रात्रीं न येई तया ॥६॥
नाना उपाय त्यानें केले । परी ते सर्व व्यर्थ झाले । सदैव तापानें कष्टलें । शरीर त्या भूपतीचें ॥७॥
ऐसे उमटले एक संवत्सर । ज्वरपीडा चालली दुर्धर । भूप झाला अस्थिपंजर । दुःखयुक्त तो विलाप करी ॥८॥
विष घेऊन देहपात । करण्यास झाला उद्युक्त । तेव्हां त्याच्याकडे अकस्मात । आला देवलयोगीं दैवें ॥९॥
त्यास पाहून प्रणाम करित । बांधवांसहित पूजित । अन्नादीनीं करी तृप्त । नंतर म्हणे अश्वसेन ॥१०॥
धन्य माझा जन्म कर्म । धन्य मातापिता दान । धन्य सर्वही अन्य दर्शन । आपुले योगिराजा होतां ॥११॥
मी ज्वरें पीडित अनिवार । विषप्राशना झालों आतुर । इतुक्यामाजीं आगमन शुभकर । योगिसत्तमा झालें तुमचें ॥१२॥
आपुल्या दर्शमात्रें मी मुक्त । आत्महत्येचें पाप न मजप्रत । म्हणोनि विष प्राशितों त्वरित । जातों आता स्वधामासी ॥१३॥
ऐसें बोलून रडे करुण । तेव्हां देवल मुनीचें द्रवलें मन । भावगंभीर तो म्हणे वचन । सत्शास्त्रार्थ कोविद ॥१४॥
महीपते तुझ्या राज्यांत । चतुर्थीचें नष्ट झालें व्रत । त्या पापें तूं रोगयुक्त । ज्वर पीडित झालासी ॥१५॥
जरी करिसी विषपान । तरी होईल देह पतन । अंतीं नरकांत गमन । होईल तुझें प्रजानाथा ॥१६॥
चार पदार्थप्रद पूर्ण व्रत । सर्वादी जें संमत । ऐसें चतुर्थीचें व्रत । न करितां कर्मे निष्फळ ॥१७॥
तूं केलेंस जें असंख्यात । पुण्यकर्म या जगांत । तें सारें झालें फलरहित । चतुर्थी व्रताच्या अभावानें ॥१८॥
तदनंतर चतुर्थीचें महिमान । कथा रोचक एक सांगून । निवेदितां अश्वसेन । चकित झाला मानसीं ॥१९॥
म्हणे व्रतमाहात्म्य हें परमाद्भुत । ऐकतां कुतुहल चित्तांत । गणेशाचें महिमान पुनीत । आणखी सांगा मजप्रती ॥२०॥
देवल म्हणती नृपाप्रत । गणेश्वराचें माहात्म्य अद्भुत । अवर्णनीय तें असत । उपाधियुत अल्प सांगतों ॥२१॥
माझे पिता असित । त्यांच्या मुखांतून जें निःसृत । तें मी ऐकिलें पुनीत । सर्वसिद्धिकर योगयुक्त ॥२२॥
ब्रह्मप्रकाशक पूर्ण पावन । तें मी तुजसी सांगेन । पूर्वीं मीं तप केलें महान । अनेक वर्षे निष्ठेनें ॥२३॥
तेव्हा जैगीषव्य नाम येत । महायोगी शैव मजप्रत । मी त्यांचा सत्कार करित । पूजन करुनी स्तविला तें ॥२४॥
माझ्या आश्रमांत न बोलला । कांहींच तो योगी भला । त्याचें चिन्ह पाहून मनाला । बोध माझ्या जाहला ॥२५॥
अकर्मकारक तो असत । देहरक्षण तत्पर जगांत । ध्यानादि शून्यभावें वसत । भ्रष्ट तैसा शांति योगहीन ॥२६॥
ऐश्या त्या योग्यास घरीं सोडून । मीं गेलों समुद्रतळीं तत्क्षण । माझें चित्तविचार जाणून । तोही आला समुद्रजलांत ॥२७॥
तो कोणत्या मार्गे आला । आकाशीं मज न दिसला । ऐसा विस्मय मज वाटला । पुढे ऐक काय झालें ॥२८॥
त्यास सोडून समुद्रजळांत । मीं अवचित गेलों स्वर्गमंडळांत । तेथही जैगीषव्य मज भेटत । देवही पूजा करिती त्यांची ॥२९॥
ऐशा नानाविध मार्गें स्वर्गांत । विविध परींच्या मी जात । तेथही महायोगी तो येत । पुढें अंतर्धान तो पावला ॥३०॥
ते पाहून सिद्धसंघाप्रत । मी औत्सुक्यें विचारित । तेव्हां ते मज सांगत । ब्रह्मलोकांतही गति याची ॥३१॥
तें ऐकतां खेदयुक्त । मी परतलों आश्रमांत । तेथ गृहांमध्ये स्थित । पाहिला मीं तो महायश ॥३२॥
त्या पुजून वंदित । योगपरायणा त्या प्रार्थित । तारावें आतां मजप्रत । कुशिष्या हया संसारीं ॥३३॥
मी छलनयुक्त असत । दयानिधे तुम्ही कृपावंत । होऊन उद्धरा मज त्वरित । प्रार्थना ऐकून तो म्हणे ॥३४॥
जैगीषव्य मज सांगत । हिंसात्मक कर्म नसे उचित । प्रयत्न सारा सोडून त्वरित । शमदमांनी युक्त व्हावें ॥३५॥
मीं ब्रह्म हें जाणून । करावें आयासरहित मन । ज्याच्या आज्ञावश जग महान । त्यास भजावें सर्वभावें ॥३६॥
ऐसें करितां योगी होशील । संशय सारा फिटेल । वचन ऐसें निर्मल । बोलून अंतर्धान पावला तें ॥३७॥
मी हिंसा सोडून तेथ वसत । सोडिलीं यज्ञकर्में समस्त । तें जाणून पितर रडत । स्वर्गामाजीं समस्त ॥३८॥
अहो देवलें काय केलें । यज्ञ कर्म उपेक्षिलें । आम्हां निराधार केलें । कोण पोशील आम्हां आतां ॥३९॥
आता श्राद्धकर्म थांबलें । आमुचें अन्नपाणी खुंटलें । पितरांचे त्या दर्शन झालें । दया उपजली मस चित्तांत ॥४०॥
कर्म करण्या झालों उद्युक्त । पितरांसी पाहूनी तें दुःखित । मी पाहिलें तेव्हा अद्भुत । रडूं लागल्या वृक्षवेली ॥४१॥
अहो देवलाची क्रूरता । आम्हांसी अभय देऊन आतां । पुनरपि छेदील पितरांकरितां । निर्लज्ज हा दुर्मती ॥४२॥
यज्ञकर्मांत आम्हां दहन । करील हा क्रूर मन । तें ऐकता खिन्नत वाटून । धर्मसंकटीं पडलों मी ॥४३॥
विचार करुन तदनंतर । जाहलों शमदमपर । सर्वांसी अभयव्रतपर । योगसेवेनें कर्म केलें ॥४४॥
क्रमें सहज योगांत । ब्रह्मांत मी झालों संस्थित । तेथ स्वाधीनता होतां प्राप्त । पुनरपि झालों शांतिहीन ॥४५॥
पितरांप्रत जाऊन । योगींद्र ज्यांचे करिती स्तवन । ऐश्या असितासी प्रणाम करुन । सनातन ब्रह्म विचारिलें ॥४६॥
योगशांतिप्रद ब्रह्म सांगत । पूर्ण तें तो योगी मजप्रत । पुत्रा संयोगापासून उद्भत । स्वसंवेद्यात्मकापासून ॥४७॥
तें चतुर्विध समुत्पन्न । समाधिद सारें सांगून । अयोगांत संयोग महान । पाहती योगीजन केव्हां ॥४८॥
संयोग अयोगाचा योग । तोच शांतिप्रद योग । गणराज तो स्वरुप पारग । त्यास भज तूं नित्य आदरें ॥४९॥
योगिराज त्याचें वर्णन करिती । शांतिद ऐसें जगती । योगस्वरुप तोच जगतीं । संयोगात ‘ग’काराख्य ॥५०॥
अयोगरुपीं णकार असत । त्यांच्या गणाधीश ज्ञात । ऐसा जाणावा विबुधीं विश्वांत । आसितें ऐसा बोध केला ॥५१॥
नंतर एकाक्षर मंत्र मज देत । गाणपत्य माझा पिता मुदित । त्यास प्रणाम करुन परत जात । स्वाश्रमांत मी तेव्हां ॥५२॥
गणेशाचें ध्यान करित । तयासी सदैव पूजित । तयाचा जप सदोदित । माझ्या मुखे चालविला ॥५३॥
नंतर स्वल्प काळें लाभत । मानसीं मी शांति अद्भुत । योगिवंद्य जाहलों जगांत । तथापि गणपा पूजितसें ॥५४॥
ऐसें एक संवत्सर जात । गणेश तेव्हां प्रकटत । भक्तवत्सल त्यास मी स्तवित । हृष्टचित्तें पुजून ॥५५॥
नंतर मज गाणपत्य करुन । पितृतुल्य महोदर स्वानंदघन । स्वानंदलोकीं गेला परतून । ब्रह्मपति प्रभू जगाचा ॥५६॥
ऐसें सांगून पूर्व चरित । देवल अश्वसेन नृपाप्रत । गणेशदशाक्षर मंत्र देत । अंतर्धान नंतर पावला ॥५७॥
देवल स्वाश्रमांत जात । अश्वसेन तो मंत्र जपत । राजशार्दूल गणेशभजनांत । भक्तिपूर्वक लीन झाला ॥५८॥
तेथ प्रथम श्रावण वरदा येत । चतुर्थी ती परमपुनीत । त्या चतुर्थीचें व्रत । केलें नृप प्रजेसहित ॥५९॥
उपोषण करुन दिवसभर । केला गणेशभक्तीचा गौरव उदार । पंचमीस पारणा करी नृपवर । ज्वर त्याचा नष्ट झाला ॥६०॥
सर्व दाह शमला । प्रजेत आनंद जाहला । रोगादीहीन जाहला । प्रजाजनही समस्त ॥६१॥
तेव्हां तो हें विख्यात । महीपृष्ठीं व्रत करित । शुक्लकृष्ण चतुर्थीचें पुनीत । आरोग्यादी प्राप्त झालें ॥६२॥
व्रताच्या पुण्ये प्राप्त । पुत्रपौत्रादीं धन समस्त । वृद्धत्वीं राज्य पुत्राप्रत । अर्पून राजा जात वनीं ॥६३॥
शांतिपरायण वनांत । सस्त्रीक तो तें निवसत । गणनायकासी भजत । अंतीं गेला स्वानंद लोकीं ॥६४॥
ब्रह्मभूत झाला नृपती । प्रजाजनांची तीच स्थिती । ऐसी व्रताची या महती । सर्वसिद्धिप्रद हें सदा ॥६५॥
ऐसीच असे अन्य कथा ख्यात । गुर्जर देशीं क्षत्रिय वसत । पापकर्म करी अत्यंत । अंतीं दुर्बल तो झाला ॥६६॥
बाल्यापासून पाप कर्मांत । दुष्टात्मा तो होता रत । स्त्रीमांसमदिरासक्त । पशूंची जनांची हत्या करी ॥६७॥
स्वगुरुस मारुन मंदमती । त्याचें द्रव्य हरुन जगतीं । पापाची जोडिली संगती । एकदा ताप त्यास आला ॥६८॥
क्षत्रियाधम तो ज्वरपीडित । देहाची शुद्ध हरपत । अत्यंत व्याकुल तो होत । उपवास घडला त्या दिनीं ॥६९॥
दैवयोगें ती श्रावण वरदा असत । चतुर्थी तें उपोषण घडत । अन्नजल कांहीं न घेत । दुसर्या दिवशीं ज्वर उतरला ॥७०॥
पंचमी ती तिथी होती । त्या दिनीं उपवासाची समाप्ती । किंचित अन्नभक्षणें अवचिती । घडली त्या पाप्याची ॥७१॥
रोगहीन तो होत । पुनरपि परी पाप करित । कालांतरे निधन पावत । गणेशदूत तें आले ॥७२॥
त्यांनी त्यास ब्रह्मलोकांत । आदरें नेलें त्वरित । अंतीं तो होत ब्रह्मभूत । ऐसा प्रभाव हया व्रताचा ॥७३॥
अज्ञानाने व्रत घडलें । तरीही तें तारक झालें । स्वानंदाप्रत गमन झालें । दुष्ट पापी त्या क्षत्रियाचें ॥७४॥
तरी ज्ञानी जे व्रत करिती । त्यांची काय वर्णावी महती । ऐसी नाना जन जगतीं । चतुर्थीव्रतें पावन झाले ॥७५॥
हें सारें वर्णनातीत । परी तुज कथिलें किंचित । श्रावणचतुर्थी महिमान ऐकत । वाचित अथवा जो नर ॥७६॥
तो नर इहलोकीं लाभेल । सर्व सुखें भोग अमल । अंतीं स्वानंदलोकीं सफल । होईल हयांत न संशय ॥७७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते श्रावणशुक्लचतुर्थीव्रतकंथन नामाष्टादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP