मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ४८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल कथा पुढें सांगती । एकदा नारदयोगी सिंदूरास भेटती । त्यांचें आतिथ्य अतिप्रीति । केलें तया सिंदूरानें ॥१॥
तेव्हां नारद त्यास सांगती । कैलासीं उत्सव चाले सांप्रति । शंकरासी पुत्रप्राप्ती । गणेश संतुष्ट त्यावरी ॥२॥
सिद्धिबुद्धिपति साक्षात । अवतरला असे तो बलवंत । देवांनी त्यास प्रार्थिलें सांप्रत । याचिलें रक्षण तुझ्यापासून ॥३॥
तो तुझें हनन करणार । हें निश्चित भविष्य अशुभकर । म्हणोनि तूं यत्नपर । आतां राही सिंदूरा ॥४॥
हें तुज सांगण्या येथवर । आलों मी मानदा मज दुःख फार । ऐसें सांगून महायोगी सत्वर । स्वच्छंदे गमन तेथून करी ॥५॥
नारदांण्चे ऐकून वचन । भयभीत जाहला सिंदूर उद्विग्न । तत्क्षणीं प्रधानाचें आगमन । योगायोगें जाहलें ॥६॥
त्याच्यासह करुन विचार । दैत्येंद्र देवांसी मारण्या अधीर । गेला चालून तो अनिवार । देवांची दैना जाहली तें ॥७॥
इंद्रादि देव पळून जाती । ब्रह्मदेवास ते भेटती । भयभीत सार शरण असती । सिंदूरही तेथ पातला ॥८॥
मानदा तो कोपसंयुक्त । पाहता विधिहि भयभीत । हंसावरी बसून पलायन करि त। सर्व देवांसमवेत ॥९॥
ते सर्व वैकुंठात जाऊन । विष्णूस करिती वंदन । समग्र वृत्तान्त सांगून । सावध करिती तयासी ॥१०॥
तेवढयांत तो दैत्य जात । मागोमार्ग वैकुंठांत । म्हणोनि सर्व देवांसहित । विष्णूने कैलासीं गमन केलें ॥११॥
तेथही तो दैत्य जात । देवांसह गणेश्वरा शिव प्रार्थित । दैत्यनाशार्थ तो देत । वरदा तेव्हा संरक्षणाचें ॥१२॥
सिंदूरास सामोरा जात । परशुधारक गजानन त्वरित । मूषकावरी तो आरुढ  होत । प्रतापवंत विश्वप्रभू ॥१३॥
त्यास पाहून समरोद्यत । सिंदूर कोपें संतप्त । म्हणे तेव्हां त्यास मदोन्मत्त । परम दुर्जय तो असुर ॥१४॥
अरे गजानना रणभूमींत । वृथां कां तूं आलास देवप्रेरित । बालभावें मूर्खता करित । मज न जाणसी पूर्णत्वें ॥१५॥
माझ्या श्वासें मेरुमंडार । पर्वत सारे हालती उग्र । माझ्या तळहाताचा प्रहार । होतां ब्रह्मांड फुटेल ॥१६॥
त्याचे शतधा खंड होतील । शिवादिक देव भयभीत प्रबल । त्यांना पाहूनही गणाधीशा तूं बल । दाखविण्या आलास का ॥१७॥
तूं बालरुपें आलास । म्हणोनि तुज मी न मारीन उदास । ज्यांनी तुज पाठविलें त्या देवादींस । ठार करीन निःसंशय ॥१८॥
अरे मीं क्रोधसंतप्त । जरी कोणांस आलिंगन देत । तरी भस्मसात्‍ होत । माझ्यापुढें तूं अतिक्षुद्र ॥१९॥
काय तूं माझ्यासवें लढणार । तूं वाटतोस लहान पोर । ऐकून ऐसे उद्वत उद्‍गार । गणाधीस हंसू लागला ॥२०॥
दैत्याची फुशारकी ऐकत । लोकपीडका सिंदुरा तें म्हणत । दैत्याधमा सांप्रत । माझा प्रभाव न जाणसी तूं ॥२१॥
मी स्वानंदनिवासी ब्रह्मभूत । पूर्णाचेम पूर्णरुप असत । ऐसें बोलून धारण करित । विराट रुप गजानन ॥२२॥
हातांनी त्यास मर्दून । मस्तकीं सिंदूर चर्चून । सिंदूरधारक तें होऊन । ब्रह्मदेवाचें रक्षण केलें ॥२३॥
गजानन तो भक्तिभावित । भक्तेश सिंदुर चर्चित । त्यास पाहून देव हर्षभरित । स्तवन करिती पुजोनियां ॥२४॥
भवितनम्र ते स्तवित । सिंदूरवधानें भयमुक्त । गजाननासी पूर्णासी वंदित । सांख्य रुपमयास ते ॥२५॥
विदेहानें सर्वत्र संस्थितासी । अमेयासी हेरंबासी । परशुधारकासी मूषकवाहनासी । विघ्नेशासे नमन असो ॥२६॥
अनंतविभवासी परेशासी । पररुपीसी गुहाग्रजासी । देवासी शिवपुत्रासी । पार्वतीनंदनासी नमो नमः ॥२७॥
देवांच्या पालकासी सर्वांस पूज्य देहासी । गणेशासी स्वानंदवासीसी । शिवकुलदैवता नमन असो ॥२८॥
विष्णु आदिकांच्या कुलदेवासी । योगाकारासी ब्रह्मेशासी । सर्वां योगशांति दात्यासी । ब्रह्मभूयप्रदा नमन तुला ॥२९॥
सिद्धिबुद्धिपतीसी । सिद्धिबुद्धि प्रदायकासी । मायीसी मायिकां मोहदासी । लंबोदरा नमन तुला ॥३०॥
सर्वोदरगतासी अमायीसी । मायेच्या आधारासी । विघ्नपा वंदन असो तुजसी । पुनः पुनः नमस्कार ॥३१॥
गज हें सर्वांचें बीजरुप असत । तें तुझें चिन्ह वर्तत । योगीजन जे तुज जाणत । होत तवरुपीं अभेद त्यांचा ॥३२॥
म्हणोनि तूं गजवक्त्र । किती गावें तुझें स्तोत्र । वेदादिकही कुंठित सर्वत्र । शंकरादी देवही ॥३३॥
गजाननासी प्रणाम करिती । ऐसी करुनियां स्तुति । शिवादींस तो गणपति । भक्तिभावें तुष्ट म्हणे ॥३४॥
आपण रचिलें हें स्तोत्र उत्तम । पाठका वाचकाचें पुरवील काम । ब्रह्मभूयप्रदायक सर्वोत्तम । इच्छित वर मागावा ॥३५॥
देवेशांनो मी प्रसन्न । तुमच्या स्तोत्रें मुदित होऊन । देईन सकल गृहीं वसती । सर्वदा करी विघ्ननाशना ॥३६॥
शिवादिक देव म्हणती । जरी प्रसन्न तूं गजानना आम्हांप्रती । वरदा शंभूच्या गृही वसती । सर्वदा करी विघ्ननाशना ॥३७॥
तुज पाहून प्रतिदिन । आम्हीं निरंतर विघ्नहीन । प्रत्यक्ष योगरुपा प्रतिदिनी पाहून । सार्थक आमुच्या जन्माचें ॥३८॥
मुद्‌गल म्हणती दक्षाप्रत । तें वरदान ऐकून सांगत । गजानन ते सुरेश्वरांप्रत । पुरवीन तुमचे मनोरथ ॥३९॥
ऐसें म्हणून शिवलोकाजवळ । कल्पिला गणेशें स्वलोक निर्मळ । दहा योजनें त्याचा विस्तार सबल । प्रमुख गणही तेथ नेमिले ॥४०॥
कुमुद मोदकादी गणांची नियुक्ति । करोनिया गणपति । करी स्वर्गलोकांत वसती । तेव्हांपासून गणनायका ॥४१॥
गणेशलोक तो प्रख्यात । भुक्तिमुक्तिप्रदायक अद्‌भुत । सकामभक्त त्या लोकीं जात । पुनरपि जन्मती पृथ्वीवरी ॥४२॥
निष्काम भक्त परी जात । जें गणेशलोकीं शाश्वत । अंतीं गणेश देहांत । लीन होती सर्वहि ते ॥४३॥
ऐसें हें कथिलें सार । गजाननाचें चरित्र अपार । ब्रह्मेश होऊन शिवपुत्र । जगतासी तोषविती ॥४४॥
जो नर भक्तीनें वाचित । अथवा हें चरित्र ऐकत । त्यास नाना सुखें लाभत । प्रजानाथा दक्ष प्रजापते ॥४५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते सिंदूरवधे नामाष्टचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP