खंड ४ - अध्याय २०
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । दशरथ म्हणे वसिष्ठांप्रत । वरदामाहात्म्य ऐकलें पुनीत । कृतकृत्यता त्यायोगें वाटत । यांत संशय कांहीं नसे ॥१॥
यासम अन्य नसे व्रत । सर्वासह अत्यंत । धन्य ते पुरुष भक्तियुक्त । चतुर्थीव्रत जे करिती ॥२॥
आता संकष्टीचें महिमान । सांगा मज विस्तारें करु । माझी तृप्ति न होय ऐकून । अमृतासम या कथा ॥३॥
मुव्गल दक्षासी सांगती । ऐसी प्रार्थना ऐकून ती । वसिष्ठ दशरथास म्हणती । प्रजानाथा ऐक आतां ॥४॥
तुझ्या मनिचा भाव जाणून । जाहलों मनीं प्रसन्न । तूं मज गमसी पुण्यवान । गणेशभक्ती तुझ्या मनीं ॥५॥
अल्प पुण्य असता न उपजत । गणेश कथेंत भक्ति मनांत । तरी श्रवणानंददायक कथा पुनीत । महाभागा ऐक आतां ॥६॥
कृष्णचतुर्थी विषयी वृत्तान्त । सांगेन तुज पुरातन साद्यंत । महापुण्यप्रद जो वाचितां लाभत । श्रवणानेंही महापुण्य ॥७॥
सहस्त्राख्य नम पुरांत । शूरसेन राजा राज्य करित । सभेमाजीं संगीत । सदैव त्याच्या निनादे ॥८॥
एकदा संगीतसभा चालत । तें अकस्मात विमान पडत । जें ज्वलन प्रभायुक्त अत्यंत । तें पाहता चकित सारे ॥९॥
विमानाचा वृत्तान्त । जाणून घेण्या दूत पाठवित । तेव्हा जो नगरप्रांतात । नगरजनांसमवेत गेला ॥१०॥
दूताकडून वर्तमान । कळता राजा उत्सुक मन । प्रजेसहित तेथ जाऊन । आश्चर्य पाहता जाहला ॥११॥
तेथ देवयुक्त इंद्रास पाहत । मनीं जाहला विस्मित । त्यास घाली दंडवत । साष्टाग तेव्हां भूवरी ॥१२॥
पुनरपि उठोनि वरती । हात जोडून म्हणे तयाप्रती । शूरसेन राजा प्रसन्नमती । म्हणे धन्य माझें जीवन ॥१३॥
धन्य दान मातापिता । धन्य नगरादिक आतां । कृतकृत्य झालों तत्त्वतां । देवेंद्रा तुझ्या दर्शनानें ॥१४॥
देवेंद्रा कोठे जाण्या निर्गमन । केलेंत सांगा घेऊन विमान । परी आता मग हें भूतलीं पडून । विघ्न कैसें ओढवलें? ॥१५॥
कोणत्या पुण्याईनें अज्ञात । परी देवांसह तुझें दर्शन घडत । तरी आता आज्ञा द्यावे सांप्रत । काय करुं मी आपुलें कार्य ॥१६॥
देवना यका प्रयत्न करावा । विमान उडविण्या पुनरपि बरवा । कोणत्या पापानें घडावा । अपघात ऐसा न समजे ॥१७॥
ऐसें वचन विनीत ऐकून । इंद्र सांगे राजास तत्क्षण । कैवर्तक नाम महापापी असून । त्यानें विघ्नेश पूजिला ॥१८॥
मुद्गलानें त्यास उपदेश केला । नाममंत्राचा भला । सहस्त्रवर्षांनंतर तयाला । वर मिळाला आज ॥१९॥
ब्राह्मणोत्तम होऊन । भ्रूमध्यातून सोंड फुटून । भ्रुशुंडी नामें ख्यात महान । गणेशभक्त तो जाहला ॥२०॥
त्याचें दर्शन घेता नुरत । पुनर्जन्म या जगांत । दर्शनार्थ त्याच्या जाऊन परत । चाललों होतों स्वर्गांत ॥२१॥
परी येथ तुझ्या राज्यांत । एक कुष्ठरोगी वैश्य असत । त्याची दृष्टी पडता अकस्मात । विमान माझें कोसळलें ॥२२॥
तुझ्या दूताचें हें दुष्कर्म । तरी आता ऐक वर्म । संकष्टी कृष्णापक्षगा परम । तिचे पुण्य मज देई ॥२३॥
जरी हें पुण्य मिळेल । तरीच विमान हें चालेल । अन्यथा पुरुषार्थ सर्व होईल । विमान उडविण्या असमर्थ ॥२४॥
तितुक्यामाजी तेथ येत । विमान दुसरे अकस्मात । गणेशाचा दूत असत । त्यामाजी विराजमान ॥२५॥
त्याच नगरांत चांडाळी होती । पापी आंधळी कुष्ठरोगयुत ती । अंगावरी तिच्या फिरती । रोगकृमी अनिवार ॥२६॥
पूरंक्तानें माखली होतीस । सर्वांगास दुर्गंध अती । भिक्षा मागून चालवीत जगतीं । उदरनिर्वाह आपुला ॥२७॥
पौषमासीं कृष्ण तृतीयेत । रात्र थोडी उरली असत । तेव्हां मद्यपान करुन निजत । चांडाळीण ती निर्भय ॥२८॥
मद्यपान योगें निद्रित । चतुर्थी तिथीस रात्रीं उठत । चंद्रोदय होता अकस्मात । क्षुधा तिला लागली ॥२९॥
रात्रें भिक्षेस जात । दयाळू कोणी तिज अन्न देत । तें ती खाई बुभुक्षित । पंचमीस ती मृत झाली ॥३०॥
त्या पापी चांडाळीस घडलें । संकष्टींचे व्रत जें भलें । केवळ अजाणता परी झालें । पुण्यकारक तारक ॥३१॥
म्हणोनी तें दुसरें विमान । आलें होतें तत्क्षण । त्या चांडाळणीस बैसवून । स्वानंदलोकीं परतलें ॥३२॥
तेव्हां तिच्या अंगावरुन । वारा जो वाहला पावन । त्याचा स्पर्श इंद्रविमानास होऊन । विमान उडाले देवेंद्राचे ॥३३॥
व्रतकर्त्याच्या शरीरास । वायूचा होता स्पर्श । तो पावन होऊन विमानास । चालना अद्भुत मिळाली ॥३४॥
तें पाहून झालें देव विस्मित । मुनिगण समस्त । ज्ञान दृष्टीनें पाहून नृपाप्रत । व्रत तेव्हां ते प्रशंसिती ॥३५॥
देवांसह इंद्र परतत । जेव्हां स्वर्गलोकांत । तेव्हां राजा स्वनगरांत जात । आश्चर्य बहु वाटलें ॥३६॥
मग वसिष्ठास बोलावित । विनयानें प्रणाम करित । तें मीं उपदेशिलें विधियुक्त । यथान्याय अंगारकयुत ॥३७॥
माघकृष्ण चतुर्थी व्रत । तें तो श्रद्धेनें आचरित । पंचमीस गणेशासी पूजित । संकष्टीव्रत पूर्ण झालें ॥३८॥
तेव्हां एक विमान येत । गणेशदूत त्यांत असत । शूरसेनाच्या नगरांत । नृपाप्रती ते दूत गेले ॥३९॥
म्हणती व्रतप्रभावें तूं भक्त । चल आता गणेश्वराप्रत । तुज नेण्यासी आलों त्वरित । तें ऐकून शूरसेन म्हणे ॥४०॥
जन्मापासून आजपर्यंत । नगरजनांसह जें भुक्त । शुभाशुभ फळ तें त्वरित । सोडून कैसा येऊं मी? ॥४१॥
माझ्या नगरजनांस सोडून । कैसा पाहूं गजानन । माझ्यावरी त्यांची भक्ति महान । म्हणोनि ऐसें सांगतों ॥४२॥
तेव्हां गणराजाचे दूत । म्हणती त्या शूरसेनाप्रत । घेऊनी नगरजनां समस्त । विघ्ननायकाकडे चलावें ॥४३॥
यथाविधि व्रताचा हा प्रभाव । यथाशास्त्र व्रताचा महिमा अभिनव । म्हणोनि विश्वाचा उभार सर्व । पुण्याईनें हया होतो ॥४४॥
तेव्हां राजा अति हर्षित । चतुर्वणजनां सहित । आरुढला त्या विमानांत । गणेशदूत विमान चालविती ॥४५॥
परी ते विमान न हाले । तेव्हां ध्यानयुक्त झालें । दिव्य दृष्टीनें त्यांना दिसलें । कारण त्या विघ्नाचें ॥४६॥
त्या नगरजनांत । होता तो कुष्ठी वैश्य पापयुक्त । दृष्टीपातें इंद्र विमानाप्रत । संकट त्याच्या ओढवलें ॥४७॥
त्या गणेशदूतां प्रणाम करुन । राजेंद्र बोले तें वचन कोणतें पाप केलें महान । यानें त्यास कय प्रायश्चित्त? ॥४८॥
तें मी प्रायश्चित करीन । परी यास सह नेईन । तेव्हां गणनाथदूत कथन । करिती त्याचें पूर्ववृत्त ॥४९॥
राजा हा वैश्य पूर्वजन्मांत । होता वाडव बुधनामा पापयुक्त । याची माता पतिव्रता अत्यंत । शाकिनी नामें प्रसिद्ध ॥५०॥
याचा पिता दूर्व नाम असत । तपस्वी वेद पारंगत । या बुधाची पत्नी पुनीत । पतिव्रता सावित्री ॥५१॥
यानें यौवनांत त्यागिली । आपुली पत्नी चांगली । परस्त्रीची लालसा धरली । विषयलंपटही तो झाला ॥५२॥
एकदां गौडपुरींत । एक वेश्या पाहिली रुपयुक्त । तिज पाहून विस्मित । अत्यंत तो जाहला ॥५३॥
तिचा संग निरंतर । देऊन करी धन अपार । घरातलें पात्रभूषण समग्र । तिजसाठीं खर्चिलें ॥५४॥
तदनंतर परगृहांत । चोरी करी अविरत । मद्य पिऊन रमत । सदैव त्या वेश्येसह ॥५५॥
एके दिवशीं बुध पापी न परतत । आपुल्या गृहासी तें चिन्तित । त्याचा पिता दूर्व करित । शोध त्याचा मुनिसत्तम ॥५६॥
परी कोणी जन न सांगत । त्याचा ठाव तयाप्रत । त्या दुर्विनीत पुत्राचें चरित । क्रोध भीतियुक्त ते ॥५७॥
घरोघरीं पिता तो शोधित । परी जेव्हां पुत्र न मिळत । तेव्हां रात्रीं स्वगृहीं परतत । विचारी आपुल्या वनितेसी ॥५८॥
ती म्हणे स्वामी सुत । ना आला अद्यापि गृहाप्रत । एकमेव पुत्र त्यांचा असत । त्याच्या स्नेहें विद्ध झाला ॥५९॥
रात्रीं पुनरपि शोध करित । मार्गस्थ लोकां विचारित । पाहिला का माझा सुत । बुध कोणी सांगाहो ॥६०॥
ऐसें नाना जनां विचारित । परी कोणी कांहीं न सांगत । अंतीं भीम नाम अंत्यज भेटत । त्यानें सत्य कथियेलें ॥६१॥
तपस्व्या मुनिसत्तमा । काय सांगू मी तुज तपोधामा । तुझा पुत्र बुधनामा । वेशयगृहीं राहतो ॥६२॥
तो मद्यपि जातिदूषण । काय विचारिसी त्याची खूण । त्याचें वर्तने अति दारुण । नीतिबाह्य सर्वथा ॥६३॥
ऐकून ही वार्ता अवचित । मुनिपुंगव झाला विस्मित । गेला स्वतः त्या वेश्यागृहांत । स्वपुत्रास तेथ पाहे ॥६४॥
त्यास पाहून मदोन्मत्त । पिता म्हणे हे हें काय अघटित । मद्यपी तूं वेश्यासक्त । दूषण आमुच्या कुळासी ॥६५॥
पुन्नाम नरकापासुन । जो वाचवी तो पुत्र महान । तूं नरकप्रद नादान । माझा पुत्र कां झालास? ॥६६॥
आतां हा देह सोड । करी यममंदिराची जोड । ऐसें पित्याचें वचन तो जड । ऐकता क्रुद्ध जाहला ॥६७॥
पित्यास लाथेनें अनिवार । मारिलें त्यानें फार । मर्मस्थानीं लागतां मार । वृद्ध पिता तो निवर्तला ॥६८॥
त्या मृत पित्याचें शरीर । फेकुनि दिधलें वेश्यागृहा बाहेर । दुसर्या दिवशीं प्रभातीं सत्वर । बुध गेला तो स्वगृहासी ॥६९॥
पुत्र परतला हें पाहून । जननी विचारी स्नेहयुक्त मन । बाळा कोठें होतास रे खिन्न । तुजविण माझें जीवन ॥७०॥
आतां आलास परतून । माझ्या चैत्तास समाधान । तुझा शोध करण्या उन्मन । पिता तुझा बाहेर गेला ॥७१॥
तो अद्यापि न परतला । त्याचा शोध करी पहिला । नंतर येई स्नान करण्याला । बाळा जाई सत्वर ॥७२॥
मातेचें वचन ऐकून । पुत्र न बोले सत्य जाणून । ती सांगे पुनः पुन्हा विनवून । तेव्हां संतापला तो पापी ॥७३॥
मातेच्या मस्तकावर प्रहार । करी तो निर्दय क्रूर । तेव्हां मस्तक फुटून सत्वर । माताही मृत्यु पावली ॥७४॥
तिचें प्रेत बाहेर फेकित । नंतर पुनरपि वेश्येकडे जात । अंतरीं परम हर्षित । मातापित्यांच्या निधनानें ॥७५॥
ग्रामजन प्रेतें पाहती । ते ब्राह्मण ब्राह्मणीचें मग दहन करिती । जाणुनी दुर्वमुनीची महती । राजानें पुत्रास न दंडिलें ॥७६॥
दुसरे दिनीं तो पापी परतत । बुध नामा स्वगृहांत । त्याची धर्मपत्नी सावित्री म्हणत । स्वामी हें काय घोर केलें ? ॥७७॥
वधिलें आपण जनक जननीस । मज सोडूनी रत वेश्येस । मी धर्मप्रिय सुंदरी सविशेश । तरी कां जाता वेश्येकडे? ॥७८॥
चार योनींत नरदेह सुदुर्लभ । त्यातहीं ब्राह्मण्य परम दुर्लभ । ज्ञानकर्मादिसंयुक्ताचा लाभ । परम पुण्यें होत असे ॥७९॥
परी नाथा आपण अघटित । कुकर्म केलें अत्यंत । आपुल्या संगें कोणती गते । माझीही होईल तें न कळें ॥८०॥
ऐसें ऐकता पत्नीचें वचन । दुष्टात्मा तो संतापून । हातांतली काठी मार मारुन । जर्जर करी स्वपत्नीसी ॥८१॥
सावित्री त्या योगें क्षीण होत । स्वर्गवासी झाली त्वरित । ऐशापरी पत्नीवधाचें लागत । पातक त्या दुष्टासी ॥८२॥
नंतर कांहीं काल जात । तेव्हां एकदां बुध प्रवेशत । आपुल्या गुरुच्या घरांत । गुरुपत्नी होती एकाकिनी ॥८३॥
तिला पाहून तो दुर्मती । जाहला काम विह्रल चित्तीं । तिज पकडून भोगी दुर्मती । ऐशीं दारुण पापें केलीं ॥८४॥
नंतर तो मरण पावत । तेव्हां जात नरकांत । नानाविध दुःखें भोगित । यमपुरींत तो पापी ॥८५॥
तदनंतर हा वैश्य कुळांत । कुष्ठ समन्वित पीडा भोगित । अद्यापि पापाचरण करित । दारुण नानाविध हा नीच ॥८६॥
द्रव्यलोभें जात वनांत । द्विजादींचे हनन करित । सतीस दूषवी सतत । वनांत एकाकिनी भेटतां ॥८७॥
शूरसेना म्हणोन यास वगळून । चलावें गजानन लोकीं प्रसन्न । याचा स्पर्श होतां तत्क्षण । सचैल स्नान करावें ॥८८॥
दूतांचे वचन ऐकून । अनुकंपा नृपास वाटून । त्यास करुनिया वंदन । म्हणे यानें बहु पाप केलें ॥८९॥
हयाच्या पापांची गणना नसत । प्रायश्चित्तही त्यास नसत । तरी मीं काय करावें सांप्रत । गणांनो तें मजा सांगा ॥९०॥
सर्व पापांचें प्रायश्चित्त । असेल तरी महाअद्भुत । तरी तें कृपा करुन मजप्रत । सांगा आपण स्नेहवश ॥९१॥
तें मी करीन मरणपर्यंत । तें ऐकून गाणपत्य सांगत । अंतरीं तें हर्षभरित । गजानन हा जप करी ॥९२॥
‘गजानन’ नावाचा जप हयास । ऐकवितां सतत विशेष । चार वेदांचें सार असत । ब्रह्ममुखांतून हें उमटलें ॥९३॥
संगीत सुयोगमय हे नाम । जपावें तूं गजानन अनुपम । त्यांचें वचन ऐकून मनोरम । वैश्यकर्णीं जप तो करी ॥९४॥
सतत गजानन नांव ऐकत । वैश्य जाहला पापविमुक्त । कुष्ठहीन तेजस्वी अत्यंत । सुवर्णासम कांति झाली ॥९५॥
तो वैश्य हर्षभरित । समस्त जन तें आनंदित । त्या सर्वांसमवेत । विमानीं नृप बैसला ॥९६॥
स्वानंदलोकीं विमान जात । तेथ गणपास पाहत । ते सर्वंही ब्रह्मभूत । जाहल थोर गाणपत्य ॥९७॥
ऐश्यापरी ब्रह्मभूत । राजेंद्रा तो पुण्ययुक्त । काय वर्णूं मी वृत्तान्त । प्रभाव अवर्णनीय हया व्रताचा ॥९८॥
चतुर्विध हें जगांत । संकष्ट ऐसें संमत । तें सोडून ब्रह्मभूत । व्रत पुण्यानें नर होई ॥९९॥
ऐसें ह माघचतुर्थीचें महिमान । संकष्टीचें ऐकतां प्रसन्न । वाचितां वा ऐकतां जन । सर्वार्थ लाभून मुक्त होती ॥१००॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराण चतुर्थे खंडे गजाननचरिते माघकृष्णचतुर्थीमाहात्म्यवर्णन नाम विंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP