खंड ४ - अध्याय १३
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । दशरथ विनवी वसिष्ठाप्रत । फाल्गुन चतुर्थीचे व्रत । शुक्ल पक्षांतर्गत जें असत । त्याचें महत्त्व सांगावें ॥१॥
वसिष्ठ तेव्हां संक्षेपे सांगत । फाल्गुन वरदा चतुर्थीचा महिमा पुनीत । माळव्यात भारक नाम नगर ख्यात । सर्व शोभायुक्त होतें तें ॥२॥
सर्वधर्मज्ञ लोक निवसत त्यांत । हेमांगद राजा राज्य करित । त्यानें जिंकिलें जग समस्त । शस्त्रास्त्रज्ञ तो विचक्षण ॥३॥
अन्य राजे त्यास मानिती । प्रधान आज्ञा पाळिती । त्याचे पुत्र तेजयुक्त अती । नृप द्विजदेवअतिथिप्रिय ॥४॥
ऐसी कांही वर्षे जात । परी नंतर पोटशूळें नृप संत्रस्त । जणूं शस्त्र खुपसिलें उदरांत । ऐसी पीडा त्यास वाटे ॥५॥
नाना यत्न शूलनाशार्थ करिती । मंत्र औषधी आणिती । तीर्थाटनें कित्तेक सेविती । पूजिती देवदेवता अनेक ॥६॥
ब्राह्मण वेदपारंगत । त्याच्यासाठीं देवांस प्रार्थित । परी उदराशूळ वाढला बहुत । संत्रस्त जाहला तो नृपति ॥७॥
विषादी पिऊन देहत्याग करावा । पीडेतून आराम लाभावा । ऐसा विचार मनांत तेव्हां । अकस्मात आले पर्वतमुनी ॥८॥
ते महायोगी अवचित येत । राजा त्यांची वंदन करित । जरी उदर पीडेनें दुःखसंतप्त । ब्राह्मणांद्वारा पूजा करी ॥९॥
शूलपीडेचें करुन नियमन । हेमागंद म्हणे विनम्र मन । धन्य माझे माता पिता जन्म । धन्य कुळ दारा पुत्र ॥१०॥
आपुल्या अंध्रियुगाचें झालें दर्शन । धन्य झालों मी पावन । ऐसें बोलोनिया वचन । धरणी वरी पडला पीडेनें ॥११॥
दारुण दुःखें तो आक्रंदत । तें पाहून पर्वत विस्मित । सचिवांसी तो विचारित । काय होतसे नृपासी ॥१२॥
कोणत्या उग्रदुःखें हा पीडित । सांगा सारें मजप्रत । तेव्हां ते त्यास सांगत । उदरपीडेची समग्र कथा ॥१३॥
त्यांचें निवेदन ऐकून । पर्वतें लाविलें तें ध्यान । अंतर्ज्ञानें नृपपाप जाणून । समस्तांसी म्हणतसे ॥१४॥
राजा तुझ्या राज्यांत । दारुण पाप असे घडत । त्यायोगें उदरशूळें तूं पीडित । असह्य वेदना भोगतोसी ॥१५॥
तुझ्या राज्यांत चतुर्थी व्रत । झाले असे बिनष्ट विस्मृत । त्या दोषामुळे प्रजेसहित । दुःखभोग हा ओढवला ॥१६॥
पर्वताचें वचन ऐकून । राजा म्हणे हात जोडून । कोणतें हें व्रत महान । कोणी केलें पूर्वी तें? ॥१७॥
कोणाचें करिती त्यांत पूजन । तें सर्व सांगा मज लागुन । तेव्हां गणेश्वरव्रत महान । पर्वत सांगे हेमांगदासी ॥१८॥
सर्व सिद्धिकर तें व्रत । चार पुरुषार्थाचा लाभ घडवित । चतुर्थी व्रत माहात्म्य समस्त । विस्तारें तें वर्णन केलें ॥१९॥
तें ऐकून राजा विचारित । कैसा हा गणाधीश असत । त्याचें स्वरुप कैसें असत । सांगा सारें योगिराजा ॥२०॥
जाणून मीं मनोभावें भजेन । त्या देवदेवासी पूजीन । तेव्हां गणेशाचें चरित्र प्रसन्न । पूर्ववृत्त सांगे तया ॥२१॥
पर्वत सांगती मी ऐकलें । निदाघापासून हें चरित्र भलें । तें तुज सांगेन जें झालें । पावन सुखद सर्वांसी ॥२२॥
एकदा मीं तप आचरित । नाना यत्नपर अविरत । माझ्या तेजें सर्वही व्याप्त । जाहलें विश्व त्या समयीं ॥२३॥
इंद्र झाला प्रक्षुभित । कामदेवा अप्सरांसहित । मज मोहविण्या पाठवित । तपांत विघ्न करण्यासी ॥२४॥
परी मज समीप तो येत । तेव्हां माझ्या तेजें संतप्त । दाहभयें पळून जात । सैनिकांसह समस्त ॥२५॥
नंतर मी तपोनिष्ठ होत । नृपा अन्तर्निष्ठ मुदित । तपाचा त्याग करित । शमदमादींत परायण ॥२६॥
नाना योगभूमींचा संचार करित । तें माझ्या महद्भाग्यें तेथ येत । निदाघ अवधूत मार्गरत । त्यास पाहून वंदन केलें ॥२७॥
विधानपूर्वक पूजा करित । नंतर तयासी म्हणत । धन्य माझी मातापिता जीवित । तुमच्या पादपद्मर्शनानें ॥२८॥
ब्रह्म भूयप्रद आपण महान । सांगावा मज शांतिप्रद पावन । ऐसा योग जेणें होईन । योगिवंद्य मी साधनानें ॥२९॥
वसिष्ठ म्हणती दशरथाप्रत । तेव्हां निदाघमुनी पर्वतास सांगत । माझें पुरातन वृत्त । ऐक आतां मनोभावें ॥३०॥
ज्या योगें मी जगीं लाभत । योगींद्र मुख्यत्व अद्भुत । तें सर्व वृत्त तुजप्रत । वर्णन करितों पर्वता ॥३१॥
मी योगप्राप्त्यर्थ प्रयत । योगभूमि परायण अत्यंत । ब्रह्मभूयकर महायोग साधित । तेणें रमलों सदानंदीं ॥३२॥
स्वानंदकांत संस्थित । तेथ आनंदरुप पाहात । द्वंद्वांनीं तें सर्वत्र व्याप्त । योगरुपी द्वंद्व होतें ॥३३॥
तेणें शांति नष्ट होत । म्हणोनि गेलों विष्णुप्रत । त्यास प्रणाम करुन विनवित । शांतिप्रद योग सांगावा ॥३४॥
जेणें मी शांत होईन । तें ऐकून विष्णु महान । म्हणे बाळा गणेशावाचून । तारक दुसरा कोणी नसे ॥३५॥
तोचि योगशांतीचा प्रदाता । त्यास जाणून आमुच्या चित्ता । लाभली शांति तत्त्वतां । आम्हां सर्व योगीजनांसी ॥३६॥
मनोवाणीमय तो गकार । मनोवाणीमय णकार । त्यांचा स्वामी गणाधीश उदार । त्यास भजावें विधानें ॥३७॥
तरीच तुज शांति लाभेल । महाभागा चिंता दूर होईल । संशय सारा फिटेल । इतुकें सांगून विष्णू थांबले ॥३८॥
महाविष्णूचें वचन ऐकून । करुनिया त्यांसी नमन । मीं झालों योगाभ्यासांत निमग्न । एकाक्षर मंत्राचा जप केला ॥३९॥
त्या मंत्रजपें संतुष्ट होत । दहा वर्षे जेव्हां पूर्ण होत । सहसा गजानन प्रकट होत । ध्यानस्थ मी तेव्हां होतोम ॥४०॥
मज म्हणाले गजानन । वांछित माग मीं पुरवीन । तेव्हां मी ध्यान सोडून । प्रणाम करुनी पूजिलें तया ॥४१॥
त्याची स्तुति सामवेदोक्त । स्तोत्ररुपें मी गात । ती ऐकून तुष्ट होत । योगशांति दिली मजलागीं ॥४२॥
नंतर तो अंतर्धान पावत । तेव्हांपासून मी प्रख्यात । गाणपत्य गणेशभक्त । तूही त्यास भज पर्वता ॥४३॥
तो गणराजा शांतिदाता । ऐसें सांगून निदाघें मज विनीता । एकाक्षरमंत्र देऊन आर्ता । विधिपूर्वक दीक्षा दिली ॥४४॥
नंतर ते होत अंतर्हित । मी विधिपूर्वक गणपा पूजित । तप करितां भक्तिभावयुक्त । दाखविलें योगमय रुप त्यानें ॥४५॥
मी त्याची स्तुति करित । भक्तिभावें तया पूजित । भक्तिभाव दुढ करुन मच्चित्तांत । स्वानंदलोकीं तो परतला ॥४६॥
ऐसें पूर्ववृत्त सांगून । हेमांगद नृपासी मंत्र देत पावन । गणेशाचा दशाक्षर अप्रतिम । नंतर अंतर्हित तो झाला ॥४७॥
राजा सर्व प्रजाजनांसहित । व्रत करी अति हर्षित । फाल्गुन शुक्ल चतुर्थी तें होत । प्रख्यात त्याच्य राज्यांत ॥४८॥
शुक्ल कृष्ण चतुर्थींचे व्रत । करावें सर्व प्रजेनें सतत । ऐसा घोष राज्यीं करवित । हेमांगद श्रद्धाभावें ॥४९॥
व्रतप्रभावें शूलव्यथाविहीन । जाहला तो राजा प्रसन्न । प्रजेची सर्व दुःखें नष्ट होऊन । समस्त सुखी जाहले ॥५०॥
पुत्रपौत्रादि संयुक्त । रोगपीडाविवर्जित । धनधान्यादींनी युक्त । सर्व नांदती मोदानें ॥५१॥
तदनंतर हेमांगद सेवित । विघ्नेशासी भक्तियुक्त । आदरें पूजी सतत । शांतिलाभ होऊनियां ॥५२॥
पुत्रास राज्य देऊन । स्त्रीसहित झाला शांत मन । गणेशाचें गन्मयत्व पाहून । अंतीं मुक्त जाहला तो ॥५३॥
भूमिवरी जे नर आचरित । चतुर्थीचें हें अद्भुत व्रत । ते स्वानंदलोकी जात । भोगून भोग विशेषयुत ॥५४॥
आता ऐक अन्य कथा या विषयांत । भाकर नगरीं विप्र वसत । तो जातिदूषण कुकर्मरत । बाल्यापासून चोरी करी ॥५५॥
परस्त्रीलंपट नित्य भोगित । पतिव्रतांसे बलात्कारें जगांत । शस्त्रधारी जात वनांत । ठार मारी नित्य प्राणी ॥५६॥
द्विजादींची हत्या करित । द्रव्यलुब्ध तो अत्यंत । ऐसा तो पापकर्मरत । एके दिनीं गेला वनांत ॥५७॥
तेथ एका वैश्या पाहत । त्यास मारण्या धावत । पळता पळता ओरडत । वैश्यपुत्र त्या वेळीं ॥५८॥
त्याची ओरड ऐकून । मार्गस्थ चार प्रवासी येऊन । त्या चोर द्विजासी पकडून । राजदूतांकडे नेती ॥५९॥
ते राजदूत त्यास मारिती फार । मार मारुन केला जर्जर । राजास दाखविती तो चोर । कोणासी दया अल्प नसे ॥६०॥
त्या चोराची जात न ज्ञात । म्हणोनी द्विजासी ताडित । कारावासांत टाकित । तदनंतर आली फाल्गुन चतुर्थी ॥६१॥
तेव्हां बंधनागारांत । निराहार तो नराधम असत । पंचमी दिनीं जाहला मृत । गणेशदूत नेती तया ॥६२॥
गाणपत्य त्यास नेत । व्रत पुण्यप्रभावें स्वानंदपुरात । तेथ विघ्नेश्वरा पाहून होत । ब्रह्मभूत तो द्विज ॥६३॥
ऐसेचि नानाविध जन । ब्रह्मभूत झाले एक मन । त्याचें चरित्र करण्या वर्णन । अशक्य असे सर्वथा ॥६४॥
फाल्गुन वरदा चतुर्थी चरित । हें जो भावें ऐकत । अथवा वाचील श्रद्धायुक्त । विघ्नेश पुरवी सर्वकाम त्याचे ॥६५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते फाल्गुनशुक्लचतुर्थीचरित्रवर्णनं नाम त्रयोदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP