मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ४३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल कथा पुढें सांगती । लोभासुरासी होत शांति । निजनाथासी देवर्षि नमिती । गजाननासी हर्षादरें ॥१॥
गजाननासी विधानें पुजून । सुरर्षी करिती अभिवादन । सर्वही ते हात जोडून । स्तुतिस्तोत्र ऐसें गाती ॥२॥
विदेहरुपासी भवबंहरासी । सदा स्वनिष्ठासी स्वसुखप्रदासी । सांख्यासी अमेयासी । मुनींद्रवंद्याची आम्ही भजतों ॥३॥
विधिबोधहीनासी सुबुद्धि दासी । बुद्धिधरासी प्रशांतासी । विकालहीनासी गजाननासी । भक्तियुक्त आम्ही भजतों ॥४॥
सकलांच्या अंतगताची । अमेय रुपासी हृदयस्थितासी । भ्रमनाशकासी अनादिमध्यांतासी । अपाररुपा आम्ही भजतो ॥५॥
जगत्प्रमाणासी जगदीशासी । अगत्यासी आद्यासी । जगदादिहीनासी अनात्मा मोहप्रदासी । भक्तियुक्त आम्हां भजतों ॥६॥
पुराणांसी गजाननासी । जो न भूमिरुप जलप्रकाश त्यासी । न तेजस्थितासी समीरस्थासी । पंचविभूतिहीना आम्ही भजतों ॥७॥
न आकाशगतासी । न विश्वगामी तेजासासी । न प्राज्ञासी समष्टिव्यष्टिस्थितासी । व्यष्टिस्थितासी आम्हीं भजतों ॥८॥
न अनंतगासी गुणविहीनासी । परमार्थभूतासी गजाननासी । गुणेशासी बिंदुसंस्थासी । भक्तियुक्त आम्हीं भजतों ॥९॥
जो न देही बोधमय । जो न ढुंढि हीनसंयोग अभय । तत्स्थ ऐसें वर्णिती ज्यास श्रुतिवाङमय । त्या गजानना आम्हीं भजतों ॥१०॥
जो अनागत तैसा गत । गणेशाचा तदाकार कैसा उक्त । तथापि सर्व प्रभदेहसंस्थ विलासत । आम्हीं भजतों त्या गजानना ॥११॥
जरी नाथा तूं न कांहीं केलेंस । तरी हे सर्व विश्व कैसें विलसत । म्हणोनि तुझें महिमान वाटत । अचिंत्य देवा गजानना ॥१२॥
सुसिद्धिदासी भक्तजन देवासी ॥ कामिजनां सौख्यदात्यासी । निष्काम भक्ती भवबंधहासी । गजानना त्या आम्हीं भजतों ॥१३॥
सुरेंद्रसेव्यासी असुरवंद्यासी । समान भावें विराजणारासी । अनंतहासी मूषकध्वजासी । त्या ग्जानना आम्हीं भजतों ॥१४॥
सदा सुखानंदमय जलांत । समुद्रीं इक्षुरसांत राहत । द्वंद्व पिऊन निवसत । त्या गजाबना आम्हीं भजतों ॥१५॥
चार पदार्थ विविध प्रकाशयुत । ते ज्याचे चार हस्त । अनाथांचा नाथ महोदर शोभत । त्या गजानना आम्हीं भजतों ॥१६॥
महामूषकारुढासी । अकलाच्या कालासी । विदेहयोग लभ्यासी । अमायीसी भजतों आम्हीं ॥१७॥
मायिक मोहदासीं रविस्वरुपासी । तैसें रविभासहीनासी । हरिस्वरुपासी हरि बोधहीनासी । गजानना त्या आम्हीं भजतों ॥१८॥
शिवस्वरुपासी शिवभासनाशासी । महेश्वरीस्थितासी सुशक्तिहीनासी । प्रभूसी परेशासी परवंद्यासी । भक्ति युक्त आम्हीं भजतों ॥१९॥
अचालकासी चालकबीजभूतासी । गजाननासी श्रेष्ठासी । शिवादिदेववंद्यासी । खग नरलतावृक्षवंद्या ॥२०॥
पशूंसी जो वंदनीय । चराचरासी पूजनीय । लोकविहीन सर्वथैव । त्या गजानना आम्हीं भजतों ॥२१॥
मन वचन हीनत्वें संस्थितासी । निवृत्तिमायासी अजासी । अव्ययासी पुरात स्थितासी । त्या देवगजानना आम्हीं भजतों ॥२२॥
गणपाच्या स्तवनें धन्य जगांत । आम्हीं वंदनें पूजनें सांप्रत । गणेशरुप केलें गजाननें त्वां सतत । ऐशा तुला भजतों आम्हीं ॥२३॥
पुराणें वेद शिवविष्णु आदि देव । शुकादि मुनि सर्वथैव । गणपति स्तवनीं विकुंठभाव । तेथ आम्हीं काय स्तवावें ॥२४॥
तथापि भक्तियुक्त आम्हीं भजतों । त्या प्रभूचे स्तवन करितों । मुद्‌गल सांगती देवगण वंदितो । त्या गजाननासी ऐसें स्तवून ॥२५॥
त्यासी सर्वही स्तविती । पुनःपुनः त्यास नमिती । त्यांस उठवूनी वरती । गजानन रय वचन बोले ॥२६॥
ऋषिगणांसहित देवहो वर । मागा जो असेल इच्छित सत्वर । तुमच्या हया स्तोत्रें तुष्ट फार । देईन सारें वांछित ॥२७॥
गजाननाचें ऐकून वचन । हर्षित झाले सुरर्षि जन । भक्तिभावें म्हणती विनीत मन । साश्रु नेत्र ते दक्षा प्रजापते ॥२८॥
देवर्षि म्हणती स्वामी गजानना । जरी पुरविणार मनःकामना । तरी दृढ भक्ति तुझी आमुच्या मना । देई लोभहीन अखंड ॥२९॥
लोभासुरासी तूं शमविलें । तेव्हांचि जग हें सुखें भरले । आतां यज्ञकर्मपर भले । द्वितादिक होतील ॥३०॥
ते धराभलावरी लाभतील । आपापलें स्थान निर्मल । स्वधर्मीं रत होऊन करतील । यशासांग स्वकर्मे ॥३१॥
याहून अधिक काय मागावें । परी आमुचें विनवणें ऐकावें । जेव्हां जेव्हां स्मरण करावें । तेव्हां तेव्हां प्रकट व्हा ॥३२॥
जें संकट येई आम्हांवर । तें आपण करावें दूर । ऐसें बोलून भक्तिभावपर । प्रणाम करिती गजाननासी ॥३३॥
भक्ताधीन गजानन । तेव्हां म्हणे तयांस प्रसन्न । तुमच्या या स्तोत्राचें महिमान । जगीं सर्वत्र पसरेल ॥३४॥
पुत्रपौत्रप्रद धनधान्य । सर्व संपत्कर सुखप्रद । पठनें श्रवणें मोदद । जनांसी हें स्तोत्र होवो ॥३५॥
मारण उच्चाटनादि नष्ट होतील । स्तोत्र वाचितां हें अमल । कोणाचें अशुभ कृत्य न बाधेल । विप्रेंद्रांनो निःसंशय ॥३६॥
संग्रामांत जय मिळेल । यात्रा सुखकर होईल । शत्रूंचे उच्चाटन होईल । भक्तिभावें हें वाचितां ॥३७॥
कारागृहांत जो असेल । त्याचे बंध तुटतील । असाध्यही साध्य होईल । या स्तोत्रप्रभावानें ॥३८॥
एकवीस दिवस वेळा वांचितां । सर्व सिद्धिलाभ तत्त्वतां । धमार्थकाममोक्षलाभ समस्तां । मिळून ब्रह्मपद प्राप्त होय ॥३९॥
हें स्तोत्र माझी भक्ति । वाढवील जगीं निश्चिती । ऐसें बोलून अंतर्हान पावती । गणाधीश त्या समयीं ॥४०॥
देव ऋषिगण समस्त । गजाननाच्या अदर्शनें खिन्न होत । गणेशाची मूर्ति ते स्थापित । नैऋतकोणीं सुखप्रदा ॥४१॥
तेथ देवमुनी भक्ति युक्त । सदैव निवास करित । अंशरुपें स्वाश्रमांत । परत गेले तदनंतर ॥४२॥
त्या समयानंतर होत । मानव पुनरपि धार्मिक समस्त । यथायोग्य हर्षित । ऐसा प्रभाव गणेशाचा ॥४३॥
हें गजाननाचें चरित । पापनाशक उदात्त । भुक्तिमुक्तिप्रद असत । ब्रह्मप्रद दक्ष प्रजापते ॥४४॥
जो हें वाचील अथवा ऐकेल । श्रद्धापूर्वक सर्वकाळ । त्यास इच्छित फळ लाभेल । ब्रह्मभूत तो होय अन्तीं ॥४५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते देवमुनिकृतस्तुतिवर्णनं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP