मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय ६ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय ६ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत चन्द्रदर्शनदोषहरणचरितम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । दशरथ वसिष्ठासी विचारित । अंगारकयुता श्रेष्ठ कां होत । तें सांगावें स्वामी मजप्रत । संशय माझ्या मनीं असे ॥१॥वसिष्ठ तेव्हां कथा सांगती । अतिरोचक जी तयाप्रती । भरद्वाजापासून जगतीं । जन्म झाला भौमाचा ॥२॥तो मंगळ महामती आचरित । गणेशव्रत श्रद्धायुक्त । गणानां त्वा या मंत्रें पूजित । विघ्नपासी भक्तीनें ॥३॥गजानन देवासि ध्यात । रम्य तपश्चयीं तो करित । पारिनेर नगराच्या पश्चिमेत । वनांत एका राहून ॥४॥ऐसी शंभर वर्षे जात । तेव्हां गणाध्यक्ष प्रसन्न होत । वर माग महाभाग म्हणत । तेव्हां भूमिसुत पूजी तया ॥५॥भक्तिभावें करी स्तवन । नंतर भौम म्हणे वचन । मी नरदेहयुक्त सामन्यजन । अमृत ग्रह मज करावें ॥६॥तुझ्या भक्तीचें एक निलय । मंगल नामें सुखकर अभय । ऋणहर्तां धनप्रद आनंदमय । करी मजला वरदा कृपाळा ॥७॥माघकृष्ण चतुर्थीदिनी । मजला तव लाभोनी । धन्य झालों जीवनीं । म्हणोनि महापुण्यदाती तिथी होवो ॥८॥तथास्तु गणनाथ म्हणत । भौम मंगल नामें ख्यात । अभीष्ट सर्वही लाभत । अंगारकी चतुर्थी मुख्य झाली ॥९॥जेव्हां भाद्रपद शुक्ल चतुर्थी असत । तेव्हां चंद्रदर्शन कां वर्ज्य असत । त्याचा इतिहास तुजप्रत । विशेषयुक्त सांगतों आतां ॥१०॥हा इतिहास ऐकतां दोषहीन । होशील तूं नृपा महान । गणेश भजनीं निमग्न । भजशील दशरथ त्यास सर्वदा ॥११॥एकदा देवांसहित मुनिजन । निश्चय करितो मिळून । गणेशांशसमुत्पन्न । पांच देव मुख्य असती ॥१२॥ते गणेशस्वरुपाहून । कदापिही नसती भिन्न । त्यांच्या स्मरणामात्रें होत प्रसन्न । गणनायक गजानन ॥१३॥म्हणोनी मुनीश्वर पूजिती । शिवादि देवांसी जगतीं । ऐसें अन्य देवही आचरती । ज्ञानगर्वें सहर्ष ॥१४॥विष्णु मुख्यांनी प्रतिपादिलें । तें सर्व तैसेंचि भलें । मुनिगण त्या रीतीं करुन झालें । सिद्धिविहीन ॥१५॥देवगणांसह नंतर जाती । ते ब्रह्मदेवांप्रती । त्याची स्तुति करुन सांगती । वृत्तान्त सारा अद्भुत ॥१६॥तो ऐकतां ब्रह्मा सुविस्मित । चिंतातुर जाहला मनांत । विष्णू शिव अर्यमा शक्तीही होत । आश्चर्यचकित तें ऐकून ॥१७॥इतुक्या माजीं तेथ उठत । ध्वनि भयंकर तीव्र घोषयुक्त । प्रलयसूचक तो ऐकून होत । भयोद्विग्न देव शंभु मुख्य ॥१८॥नंतर महाभीम पुरुष अकस्मात । त्यांच्या पुढे प्रकटत । विकराळ त्यास पाहून मूर्च्छित । शंकरादि देव झाले ॥१९॥मुनि देवता कित्येक पळती । कोणी बेशुद्ध होती । मुहुर्तमात्रें सावध होती । ब्रह्मादिक सुर जेव्हां ॥२०॥तेव्हां पाहती पुढयांत । गणनायकासी साक्षात । अतिभयसंयुक्त त्यास स्तवित । हृदयीं ध्याऊन गजवक्त्र ॥२१॥गणनाथासीं विघ्नपतीसी । अनाथांच्या सुनाथासी । विघ्ननिवारणासी निराकारासी । हेरंबा तुज नमन असो ॥२२॥भक्तांसी सर्वदात्यासी । साक्षीसी अमेय अप्रतर्क्यासी । गजाननासी देवासी । शूर्पकर्णा तुज नमन असो ॥२३॥महोदरासी सर्वादि पूज्यासी । सर्वांदींसी महादात्यासी । सर्व पूज्यासी ढुंढिराजासी । सर्व भावस्थिता तुज नमन ॥२४॥स्वानंद निवासासी । योग शांतिमयासी । योग्यासी योगदात्यासी । योगपतीसी नमो नमः ॥२५॥सृष्टिकर्त्यासी सुपुत्रासी । सृष्टिहर्त्या गणेशासी । गुणचालकासी अनात्म्यासी । आत्म्यासी तुज नमो नमः ॥२६॥कारणप्रकाशासी ब्रह्मेशासी । सदानाथासी देवपालकासी । निवारण करी महाविघ्नासी । नमन तुजसी पुनः पुन्हां ॥२७॥हें महाविघ्न सहसा आलें । ग्रासील आम्हां भय वाटलें। जीवित्वही संशयी पडलें । तुला शरण सांप्रत ॥२८॥तुझ्या पादपद्माचे दास । गजानना आम्हीं उदास । जरी विनाश पावलों या वेळेस । तुझें यश नाथा नष्ट होय ॥२९॥आतां देवेशा रक्षण करी । तुझें हें उग्ररुप दूर करी । पाहण्या शक्ति नसे शरीरीं । विघ्नेशा रक्षण करी तूं ॥३०॥ऐसी स्तुति ते करित । तेव्हां त्यांच्यापुढें प्रकटत । उग्ररुप सोडून गणेश रुपांत । सर्वांसी आनंद तें झाला ॥३१॥ते सारे प्रणाम करिती । अत्यादरें पूजिती । शिवादिक त्यासी अर्पिती । आपापली मानसकन्या ॥३२॥ब्रह्मा सरस्वती देत । विष्णु पुष्टीसी अर्पित । शंकर योगिनी समर्पित । जगदंबिका मोहिनीस ॥३३॥भानू संजीवनी देत । सर्व प्रियंकर जो जगांत । ऐसें ते पंचदेव विघ्नेशा पूजित । मानस सुता समर्पूनी ॥३४॥दशरथा, त्या प्रणतांसी उठवून । विघ्नेश बोलें भक्तिप्रसन्न । मेघासम गंभीर स्वन । विष्णु मुख्य महेशांसी ॥३५॥शंभुमुख्य देवेंद्रांनो ऐका वचन । माझे अंश तुम्ही महान । वृथा गर्व करुन मन । दूषवूं नका आपुलें ॥३६॥चराचर हें माझ्या अंशे युक्त । कांहीं नसे माझ्या विरहित । त्या सर्वासी सिद्धि देण्या जगांत । देहधारी मी होतों ॥३७॥जरी ज्ञानानें मज न जाणत । केवळ तृणरुपीं पूजित । तरी महादेवांनो मजप्रत । ती पूजा कैसी पोहोचेल? ॥३८॥तेथही माझा तृणांत । अल्पांश जरी वर्तन । परी त्याच्या पूजेनें पूर्ण तृप्त । मी कैसाही होईन ॥३९॥आपण कलांश माझे जगांत । जे पूजिती विप्र समस्त । त्यानें गुणात्मक तृप्ती होत । केवळ कलांशरुप माझी ॥४०॥ब्रह्मांड संपूर्ण कोणी पूजित । तरीही माझी पूर्ण तृप्ति न होत । माझ्या रोमरोमांत । अनंत ब्रह्माण्डें विलसतीं ॥४१॥गजमुखादि चिन्हांनी युक्त । महेश्वर मी जगत्ब्रह्ममय वसत । योगशांतिद जगांत । त्याच्या पूजनें सुपूजा ॥४२॥जगताचें ब्रह्माचें । पूजन एकत्र करितां साचें । तेंच पूजन पूर्णत्वाचें । तीच माझी पूर्ण पूजा ॥४३॥मज त्यागून मुनिजन । सर्वांदौ करिती मोहमुग्ध मन । ज्ञानमोहांत पडून । पूजन तुम्हां पंचदेवांचें ॥४४॥आपणही मदसंयुक्त । तैसेचि झालात ज्ञानमोहित । म्हणोनी सिद्धिहीनता प्राप्त । ऐसें पुन्हा करु नका ॥४५॥पूर्वीं भक्तिसंयुत । पूजन तुम्हीं केलेंत । तें आठवून सहन करित । अपराध तुमचा या वेळीं ॥४६॥दर्शन दिधलें तुम्हांप्रत । कलांशमात्रें जरी पूर्ण तुष्ट जगांत । होतों तरी देहधारी होत । मी स्वयं कां सांगावें ॥४७॥ऐसें बोलून विराम पावत । गणाधीश तें ते प्रणाम करित । स्वदोषाची क्षमा मागत । तेव्हां काय घडलें तें ऐका ॥४८॥त्या समयीं शंकराच्या भाळीं विलसत । चंद्र होत काढून हसत । गणेशाचें रुप पाहून अविनीत । रुपगर्वे आपुल्या ॥४९॥अत्यंत मोहित होऊन । गणनायका प्रणाम करुन । म्हणें हे विचित्र गजवक्त्र कां धरलें महान । पुनःपुन्हा हंसे ऐसे म्हणत ॥५०॥तेव्हां गजानन कुपित । शशलांच्छना त्या शाप देत । जे तुज चंद्रा पाहत । ते होवोत पापी जन ॥५१॥ते सदैव विघ्नसंयुक्त । माझ्या शापानुसार होत । यांत संशय तिळ ना असत । ऐसें बोलून हो अन्तर्धांन ॥५२॥आपुल्या भार्यांसहित । गणेश ब्रह्मनायक अदृश्य होत । चंद्र नंतर मलिन पडत । शंभु आदि देव गर्वहीन ॥५३॥तेव्हांपासून ते गाणपत्य होत । ब्रह्मदेवाच्या हृदयीं संस्थित । परि वेदज्ञा अहंकृति मदयुत । ब्रह्मा तेणें पुनः पुनः ॥५४॥त्यानें सरस्वती गणेशास दिली । तिच्यासह वसती केली । ब्रह्मदेवाच्या हृदयीं भली । विघ्नपानें सर्वकाळ ॥५५॥हृदयांत गणेश राहत । तरी नंतर कैसा मोहयुक्त होत । सदा त्या गणेशासी भजत । गाणपत्य भावें भक्तीने ॥५६॥सर्वाची पोषणता निवसत । तैसीच विष्णूच्या हृदयांत । त्या सामर्थ्ये केशवासी होत । मोहजन्य गर्व सदा ॥५७॥ती विश्व पोषिणी पृष्टी देत । विष्णु जेव्हां विघ्नराजाप्रत । तिच्यासह गणेशान विराजत । विष्णूच्या हृदयीं सर्वदा ॥५८॥तोही गाणपत्य विचार निमग्न । नित्य करी गणेश भजन । हृदयांत असतां गजानन । मोह त्या कैसी होणार ॥५९॥योगानें मोहहीनत्व असत । सदा शंभूच्या हृदयांत । त्या अहंकार भावें मानित । आपणांसी शंकर श्रेष्ठ पूर्वीं ॥६०॥परी ती योगिनी जेव्हां देत । शिवप्रभु गणेशाप्रत । तेव्हां रमे तिच्यासवें हृदयांत । शंभूच्या तो सर्वदा ॥६१॥गणेश हृदयांत स्थित । म्हणोनी मोह त्या न होत । सदा गाणेशक होऊन भजत । गणनायका तो विनमर ॥६२॥वृष्टीनें दानप्रदान । करी दिवाकर तो महान । सर्वांच्या जीवनाचे धारण । ऐसें महाकर्म करी ॥६३॥अहंस्वभावें तो वर्तत । संजीवन शक्ति अन्तःकरणांत । परी ती देतां विघ्नेश्वराप्रत । तिच्यासह राहे गणाधीश ॥६४॥गणाधीश हृदयांत वसत । म्हणोनी राही गणेशभक्त । अनन्यभावें त्यास भजत । मोहास नसे संधि तेथें ॥६५॥शक्ति सर्वमोहिनी देवी हृदयांत । होती ती अहंकारकारण निश्चित । ती विघ्नेश्वरा देतां तो राहत । शक्तियुक्त देवी हृदयांत तें ॥६६॥शक्तियुक्त गणेश स्थित । जेव्हां देवीच्या हृदयांत । त्यायोगें गणेश भक्तिरत । क्रीडा करी ती देवी ॥६७॥ऐश्या रेती अहंकार निर्मुंक्त । देवेंद्र जाहले समस्त । गाणपत्यप्रिय होऊन भजत । विघ्ननायका सर्वदा ॥६८॥चिंतामणी चित्तांत राहून । प्रकृतिद्वारा क्रीडामग्न । मिथ्या अहंकारभावें बंधन । प्राप्त होतें जगतांत ॥६९॥कर्ता करविता गणेश असत । यात संशय लवमात्र नसत । हृदिस्थ सारें त्यास अर्पित । त्यानें सुखीं पंच देव ॥७०॥तें ऐकून दशरथराजा विचारित । त्या चंद्राची काय गति होत । ते सांगावें मजप्रत । मुद्गल दक्षा ती कथा सांगती ॥७१॥वसिष्ठ म्हणती नृपाप्रत । गणेशशाप संयुक्त । चंद्र तें परतला स्वगृहाप्रत । दुःख अत्यंत मानसीं त्याच्या ॥७२॥एकांतात बसून । विचार करी उन्मन । गणपतीचा देह महान । संप्रज्ञात स्वरुपमय ॥७३॥असंप्रज्ञातरुप त्याचें शिर । त्यांच्या योगें प्रकट उदार । गणेश हा भक्तानुग्रहकर । देहधारी स्वयं जगीं ॥७४॥वेदांत जें कथिलें रुप अद्भुत । परमयोगप्रद पुनीत । तें न जाणिलें मी मोहयुक्त । गजानना क्षमा करी ॥७५॥चित्तग अपराधाची क्षमा करी । मज दीनातें उद्धरी । ऐसी विज्ञप्ती चंद्र करी । विघ्नेशाच्या ध्यानीं लीन ॥७६॥गंगा तीवारावरी बैसून । तप करी तो उत्तमोत्तम । अष्टादश अक्षरमंत्र जपून । विघ्नपाचें तप करी ॥७७॥चंद्र लीन जग समस्त । दुःखपूर्ण ते होत । सूर्याच्या तेजें दग्ध रसहीन वर्तत । चराचर हें उद्विग्न ॥७८॥तेव्हां देवगण सारे भयभीत । शंभु विष्णु मुख्य तप करित । षडक्षरविधानें हृदयांत । ध्यान करिती गजाननाचें ॥७९॥भक्तियुक्त ते महेश्वर तोषविती । ऐसी शंभर वर्षे जाती । तेव्हां गणाधिप प्रकटती । चंद्रापुढतीं वरदानार्थ ॥८०॥तोवरी देवेशांचें तप होत । एक वर्षभर सतत । एकाच वेळीं उभय स्तवित । देवेश आणि चंद्र तें ॥८१॥अथर्वशीर्ष जपून तोषवित । आदरें तें ढुंढीस विनीत । संतुष्ट होऊन तें म्हणत । ब्रह्मनायक गणेश त्यांना ॥८२॥देवेशांनो मागा सत्वर । सफळ करीन मनोरथ सर्व । गणेशवचन हें ऐकून सुंदर । हात जोडती देव सारे ॥८३॥प्रणाम करुन स्तवन करिती । नम्रपणें त्यास म्हणती । जरी प्रसन्न तूं आम्हाप्रती । वरद तूम गजानन ॥८४॥चंद्रासी करी दोषमुक्त । नाथा तुज आम्हीं नमित । तेव्हां त्यासी गजानन सांगत । भक्तीनें संतुष्ट मीं तुमच्या ॥८५॥चंद्रास जो उःशाप दिला । त्यास शाप देतों या वेळा । भाद्रपद शुक्ल चतुर्थीला । न घ्यावें चंद्रदर्शन कोणी ॥८६॥त्या दिवशीं हसला मजला । त्या दोषें अपराधी झाला । म्हणोनी त्या दिनीं तयाला । पाहूं नये कोणी जगीं ॥८७॥अन्य दिनीं त्याचें दर्शन । घेतलें तरी दोषहीन जन । ऐसें वरदान देऊन । गणेश अंतर्धान पावला ॥८८॥देव जाहले अति हर्षित । चंद्रासी तें सांगण्या जात । तेथ चंद्राच्या पुढयांत । गणपति ते प्रकटला ॥८९॥त्या पाहून करी नमन । घाली साष्टांग नमस्कार प्रसन्न । विधियुक्त पूजा करुन । कृतांजली स्तवन करी ॥९०॥विघ्नपालासी गणेशासी । परमात्म्यासी ब्रह्मेशासी । स्वभक्तां ब्रह्मभूयप्रदासी । अनामयासी नमन असो ॥९१॥सर्वादिपूज्यासी शिवात्मजासी । देवासी विष्णुपुत्रासी । ब्रह्मपुत्रासी सूर्यपुत्रासी । विघ्नहारका तुज नमन ॥९२॥शक्तिपुत्रासी शेषपुत्रासी । सर्वपुत्रासी सर्वेशासी । सर्व मातृपितृरुपासी । परेशा नमन तुला असो ॥९३॥परात्परतरासी सिद्धिबुद्धिपतीसी । सिद्धिबुद्धिप्रचालकासी । हेरंबासी महेशांच्या महेशासी । परमात्म स्वरुपा तुज नमन ॥९४॥स्त्रष्ट्रयासी पालकासी संहर्त्यांसी । सर्वासी वरदात्यासी । अनादिसिद्धासी देवासी । नमो नमः पुनः पुन्हा ॥९५॥तुझ्या मायेनें मोहित । अपराधयुक्त मीं मदोन्मत्त । आतां शरण तुज विनीत । क्षमा करी माझ्यावरी ॥९६॥पूर्वीं मज पाहून हर्षयुक्त । असती देवतादी जगांत । आतां मज पाहून दोषयुक्त । भयातुर ते सारे ॥९७॥म्हणोनी मज न पाहती । पापी पापरुपी मीं जगतीं । निर्दोष करी विघ्नेशा सांप्रती । करुणालया नमन तुला ॥९८॥विघ्नवारणा तुझें दर्शंन । सर्वदा घडो मज पावन नमन । त्यानें कृतकृत्य होईन । योगिसंमंत मीं सतत ॥९९॥ऐसें बोलून भक्तियुक्त । देवा संन्निध नाचत । रोमांच अंगावरती उठत । डोळ्यांत दाटले आनंदाश्रू ॥१००॥ते पाहून ढुंढी म्हणत । तूं रचिलेलें स्तोत्र असत । माझें आवडतें जगांत । अपराध सारे क्षम्य होती ॥१०१॥सर्व सिद्धिप्रद पूर्ण होईल । नाना सुखकारक अमल । जो हें स्तोत्र वाचील । ऐकेल तया भक्तिभावें ॥१०२॥जैसा पूर्वी तूं स्थित । तैसाचि चंद्रा राहे सांप्रत । परी ज्या दिनीं उपहारसयुक्त । तो दिवस निंद्य तुजसंबंधी ॥१०३॥माझ्या ललाटीं भूषण । होई तू सेवापरायण । कृष्ण चतुर्थी व्रतांत पूजन । करितील माझे भक्त तुझें ॥१०४॥मज पूजून तारेश तुजप्रत । अर्घ्य देतील भक्त । त्यांची इच्छा पूर्ण होत । व्रत तेव्हांचि पूर्ण होय ॥१०५॥तुझी पूजा न करितां । चतुर्थी व्रताची न होय सांगता । आज द्वितीया सायंकाळ असतां । कृपा केली तुजवरी ॥१०६॥या कारणें शुक्लद्वितीया तिथी । असता मान्य तूं होय जगतीं । द्वितीयेस प्रयत्न करिती । मानव तुजला नमस्कार ॥१०७॥ऐसे जे व्रत करतील । त्यांचें महिन्या भराचे दूर होईल । दुःख भय चिंता मल । अन्यथा ना सिद्धि प्राप्ति ॥१०८॥ऐसें बोलून गजानन । चंद्र पुनीत होतां अन्तर्धान । त्यावेळीं देवेश येऊन । चंद्रास सांगती वृत्तान्त ॥१०९॥चंद्र त्यांचा सन्मान करित । आदरें तयांस पूजित । नंतर त्यांच्या समवेत । गणेशाची स्थापना करी ॥११०॥ब्राह्मणां समवेत स्थापून । करी गणेशाचें तो पूजन । गणेशाच्या भाळीं विराजमान । जाहला तेव्हां पासून चंद्र ॥१११॥भालचंद्र ऐसें नाम ख्यात । जाहलें तें जगतां त । देव ब्राह्मण पूजा करित । गणेशाची त्या समयीं ॥११२॥चंद्रास निर्दोषत्व लाभत । तदनंतर देव स्वर्गी परतत । चंद्र स्वअंशरुपें राहत । दशरथा ते स्वर्गांत ॥११३॥परी पूर्णरुपें विघ्नेशा सेवित । आदरें नित्य भक्तियुक्त । तो अत्रिसमुद्भव करित । गंगातीरावरी निवास ॥११४॥विधु भालचंद्रासी सेवित । भक्तितत्पर जगतांत । एकदा देवांनी संप्रार्थित । हरि जन्मला यादवकुळी ॥११५॥वासुदेव तो झाला । न कळत चन्द्रास पाहता झाला । भाद्रपद शुक्ल चतुर्थीला । दोषयुक्त तें होय ॥११६॥त्याचे अन्तर्ज्ञान बळ लोपलें । चित्त नरतुल्य जाहलें । विघ्नही एक उद्भवलें । तेव्हां त्याच्या जीवनांत ॥११७॥सत्राजित नाम एक नृपती । त्याची यादवांत ख्याती । राजर्षीच्यावरी त्या प्रीती । सूर्यनारायणें केली ॥११८॥सूर्याचें तप शत संवत्सर । करिता कृपा लाभत अपार । सूर्ये दिधला होऊन उदार । आपुल्या गळ्यांतील मणि त्याला ॥११९॥त्या मण्याचें नांव ख्यात । स्यमंतक हें जगांत । तें रत्न बांधीं गळ्यात । सत्राजित भक्तिभावें ॥१२०॥अष्ट भार सोनें नित्य । तो स्यमंतक मणि अद्भुत । सूर्यतेजासम शोभत । यदुनंदनाच्या गळ्यांत ॥१२१॥द्वारकेंत तो सूर्यभक्त । सत्राजित यादव निवसत । शुचिभावें पूजित । रत्न तें तो निरंतर ॥१२२॥नंतर बहु काळ जात । तेव्हां कृष्ण दोषयुक्त । त्याच्या मनीं बुद्धि उपजत । स्यमंतकर्मणि लाभार्थ ॥१२३॥एकदां सभेंत संस्थित । सत्राजितास कृष्ण म्हणत । विनयपूर्वक वचन लोभयुक्त । उग्रसेना राजा आम्हीं केलें ॥१२४॥यादवांच्या त्या राजास । यादव पूजिती सविशेष । दिग्विजयांत लब्ध राज्यास । आम्हीं दिधलें आनंदें ॥१२५॥तरी आता तूं देई मजप्रत । स्यमंतक मणि विशेषयुक्त । सुवर्ण जें मणि संभूत । तें तूं नित्य घेत जाई ॥१२६॥तो मणि शोभेसाठीं गळयांत । बांधावा तूं ऐसें विनवित । तेव्हां सत्राजित क्रोधयुत । श्रीकृष्णासी सांगतसे ॥१२७॥प्रसेनाला जो दिला । तो आता घेऊन बैसला । ऐसें बोलून परतला । सत्राजित स्वगृहासी ॥१२८॥स्वानुजास मणि देत । स्ववृत्तांत त्यास कथित । पुढें एकदा कृष्णासहित । यदुनंदन जातीं मृगयेसी ॥१२९॥तेव्हां अशुचि स्वभावें बांधित । प्रसेन तो मणि गळ्यंत । तोही त्यांच्या सर्व जात । वनांत मृगया खेळण्या ॥१३०॥अशुचित्व दोषें वनांत । सिंह त्या प्रसेनासी मारित । अश्वासहित विदारित । मणि घेऊन पळाला ॥१३१॥पुढें जांबवान त्या सिंहास । मारुन मणि नेई स्वगृहास । दाखवी आपुल्या पुत्रीस । तिजही तो आवडला ॥१३२॥तेव्हां तो महाबळी तिज म्हणत । तुझा जो भर्ता होईल भाविकालांत । त्यास हा मणि देईन निश्चित । आजपासून मणि तुझा हा ॥१३३॥सायाह्रीं सर्व यादव परतत । आपापल्या मंदिरांत । प्रसेनाविहीन त्यांस पाहत । सत्राजित तें क्रुद्ध झाला ॥१३४॥अहो कृष्णें माझा भ्राता । मारिला यांत संशय न चित्तां । मणिल्भवशें पापी तत्त्वतां । ऐसें दुष्ट आचरला ॥१३५॥पुरजन विश्वास ठेविती । उग्रसेनादि कृष्ण निर्भत्सती । तेव्हां कृष्ण दुःखित चित्तीं । ध्यान करण्या बैसला ॥१३६॥परी सामान्य जनांसमान । कुंठित झाला जनार्दन । लुप्त झालें दिव्य ज्ञान । दोषकारण न सांपडे तया ॥१३७॥नंतर तो अति दुःखित । होऊन विचार करी मनांत । अंतर्ज्ञानाचे बळ सांप्रत । कोठें गेलें कळेना ॥१३८॥मी नरतुल्य कैसा झालों । जननिंदेला पात्र बनलों । वृथा लांछनें दूषित झालों । देहत्याग करीन आतां ॥१३९॥तदनंतर जाऊन सभेंत । घेऊन यादव मुख्य जात । प्रसेनाचा शोध करण्या निश्चित । महाद्युती तो तेधवां ॥१४०॥प्रसेनाची पाउलें उमटलीं । त्यानुसार शोध सरणि आखिली । तेव्हां अश्वासहित पाहिली । मृत मूर्ती प्रसेनाची ॥१४१॥मणिहीन तो असत । सिंहें मारिला यादवसुत । ते सर्व पुढें जात । सिंहमार्गांचा घेत शोध ॥१४२॥तेथ महावनीं दिसत । सिंहही पडला होता मृत । कोणा ऋक्षानें वधिला असत । परि तो मणि न सापडला ॥१४३॥भयसंकुल ते पाहात । अस्वलाची पदचिन्हें विहित । त्यानुसार पुढती जात । यादव मुख्य ते सारे ॥१४४॥तेव्हां एका घोर गृहांत । एक अस्वल प्रवेशत । तें पाहून कृष्ण प्रवेशत । त्या गृहेमाजीं सावध ॥१४५॥अन्यांस बिलद्वारीं स्थापून । कृष्ण आंत प्रवेशून । लांच्छन दूर करण्या उद्युक्त मन । शोध घेऊं लागला ॥१४६॥योजनमात्र बिळांत जात । तेव्हां प्रकाश पाहत । एक संस्थान शोभिवंत । सुविस्तृत तेथ दिसलें ॥१४७॥पाळण्यांत त्याला दिसत । तेथ स्यमंतक मणि तो अद्भुत । तो पाहून हर्षयुक्त । हळुवारपणें पुढे गेला ॥१४८॥एक शिशु पाळण्यांत । होता तेथें निद्रिस्त । जांबवंतपुत्री अकस्मात । बाहेर आली त्या वेळीं ॥१४९॥अपरिचित पुरुषासी पाहत । तेव्हां ती भयग्रस्त । मोठयानें आक्रोश करित । ते रुदन ऐकलें जांबुवंतें ॥१५०॥श्रीकृष्णास तो पाहत । येई बाहेर त्वरित । विष्णुसह त्वेषे लढत । एकवीस दिवस युद्ध झालें ॥१५१॥यादव सारे वाट पाहून । आठव्या दिनीं गेले परतून । द्वारकेत वृत्तांत कथून । विह्रल झाले मानसीं ॥१५२॥आम्हीं सात दिवस वाट पाहिली । परी आमुची निराशा झाली । श्रीकृष्णाची स्वारी न आली । गुहेबाहेरे त्या अवधींत ॥१५३॥तो श्रीकृष्ण मृत वा जीवित । हें न कळे आम्हांप्रत । वसुदेवादि शोक त्वरित । स्त्रियांसहित दुःखानें ॥१५४॥उग्रेसेनादी सर्व रडती । दुःख झालें त्यांना अती । आता शत्रु प्रबल होती । जरासंधादि निश्चित ॥१५५॥यादवांनो आतां काय होणार । कृष्णरहित आम्हीं हरणार । शत्रूच्या हस्तें मरणार । सगळे यादव आपण ॥१५६॥ऐसा विलाप ऐकत । बलराम तेव्हां सांत्वन करित । बहुविध युक्तिवाद करित । निःश्वास सोडिती नृप सारे ॥१५७॥दुःखयुक्त भयातुर सत्राजिता निंदिती समग्र । तोही दुःखें ग्रस्त फार । भयसंकुल जाहला ॥१५८॥तिकडे जांबवान कृष्णाप्रत । घनगंभीर स्वरें म्हणत । कोण तूं वीर तेजयुक्त । युद्ध करिसी माझ्यासवें ॥१५९॥कृष्ण त्यास सांगे प्रतिवचन । मी यदुवंशी उत्पन्न । माझें नांव कृष्ण जाण । महामते तूं जांबवाना ॥१६०॥तें ऐकता खेद होऊन । जांबवान करी नमन । रामानें जें रम्य वचन । पूर्वी दिलें तें सत्य झालें ॥१६१॥तो तूं विष्णु देव आलास । मी असे तुझा दास । करुणानिधे तूं या दासास । क्षमा केली पाहिजे ॥१६२॥अज्ञानानें शक्तिगर्व होऊन । युद्ध केलें हा दोष महान । तो आता क्षम्य करुन । कृपा करी तूं मजवरी ॥१६३॥नंतर स्तुति करुन । त्यानें पूजिला कृष्ण भगवान । वृत्तान्त सारा सांगून । सांत्वन करी कृष्ण त्याचें ॥१६४॥तेव्हां जांबवान कृष्णा देत । मणि तो कन्येसहित । त्या दोघांचा स्वीकार करित । कृष्ण तेव्हां आनंदें ॥१६५॥नंतर द्वारकेंत परतत । कृष्णा पाहून हर्षयुक्त । सर्वही यादव उत्सव करित । सत्राजिता बोलाविती ॥१६६॥सर्वांच्या देखत तयाप्रत । स्यमंतक मणि परत देत । सत्राजित मानसीं निंदित । आपुल्या देहासी त्या वेळीं ॥१६७॥कृष्णाचा विरोध मीं केला । अविचारें आळ घातला । म्हणोनी घे प्रायश्चित्ताला । सत्राजित त्या समयीं ॥१६८॥सत्यभामेसहित मणि अर्पित । महात्म्या श्रीकृष्णप्रत । आणि सासरा होऊन विनवित । जावयासी तो वीर ॥१६९॥सूर्यभक्ति समन्वित । रक्षण करी मणि तूं सतत । दौहित्र तुझे घेतील भविष्यांत । अद्भुत हा महामणि ॥१७०॥त्या वेळीं वृत्तान्त ऐकत । यादव लाक्षागृहांत । कुंतीसह दग्ध अवचित । तें ऐकून यादव रडती ॥१७१॥पुरोचन हा वृत्तान्त । जेव्हां यादवांस निवेदित । तेव्हां बलरामासहित । कृष्ण गेला हस्तिनापुरीं ॥१७२॥धृतराष्ट्रादि दुःखित । शोकसंकुल रुदन करित । शतधन्वा अक्रूर कृतवर्मा संगत । क्रोधयुक्त ते सारे ॥१७३॥सत्राजितें कन्यार्थ आमंत्रित । आपण यादव वीर भूतकाळांत । आम्हांस त्यागून कृष्णाप्रत । अर्पण केली कन्या त्यानें ॥१७४॥कृष्ण पांडवांच्या शोकें आर्त । तेथेच राहिला असत । आतां तिघांनी अवचित । एक कार्य करुं या ॥१७५॥आपण तिघे सत्राजिता मारुन । मणि बळकावूं महान । ऐसा विचार करुन । रात्रीं गेला शतधन्वा ॥१७६॥सत्राजितास ठार मारुन । मणि घेतला हिरावून । तो तैलद्रोणींत टाकून । कृष्णाकडे तो गेला ॥१७७॥आपुला श्वशुर झाला हत । हें ऐकून कृष्ण कुपित । शतधन्वा तें जाणून जात । अक्रूरासमीप त्या वेळीं ॥१७८॥अक्रूर त्याचा त्याग करित । तेव्हां कृतवर्म्यासमीप जात । तोही त्याचा पक्ष न घेत । पुन्हा अक्रूरापाशी आला ॥१७९॥मणि तेथेच टाकून । भयसंकुल गेला पळून । चपल घोडीवर बसून । शतयोजन वेग जिचा ॥१८०॥शतधन्वा जाय पळून । वृत्तान्त हा जाणून । संकर्षणासह पाठलाग करुन । पकडण्या धावला रथारुढ ॥१८१॥शतयोजनें जाऊन । घोडी पडली मरुन । शतधन्वा भयभीत मन। पळू लागला पायांनी ॥१८२॥तो पायीच धावत । हें जेव्हां कृष्णास कळत । तोही रथ सोडून करित । पाठलाग तयाचा ॥१८३॥शतधन्व्यासी गाठून । चक्र फेकून त्यास मारुन । शोधिला स्यमंतक मणि उत्तम । परी त्याला तो न मिळाला ॥१८४॥म्हणून शोकसमायुक्त । बलभद्रासी तो म्हणत । शतधन्वा मणियोगें हत । माझ्या हातून अग्रजा ॥१८५॥तेव्हां रोहिणीसुत कोपयुक्त । म्हणे कृष्णासी संतप्त । महाखला तूं मिथ्या सांगत । मणि लपविला आहेस तूं ॥१८६॥अग्रजासी मणि लागेल द्यावा । हया लोभें तूं असत्याश्रय घ्यावा । हें निंद्य कृत्य केशवा । सर्वथैव मज वाटे ॥१८७॥नंतर केशव सान्त्वन करित । अग्रजाचें विनययुक्त । द्विज देव गाईंची शपथ घेत । हें चौर्यकर्म मी न केलें ॥१८८॥परी त्याचा तिरस्कार करुन । बलराम गेला निघून । राजनीतिज्ञ नृपतीस भेटण्या उन्मन । विदर्भात तो गेला ॥१८९॥नंतर अतिदुःखसंयुक्त । कृष्ण परम व्यथा भोगित । बलभद्रा स्मरुन रडत । पुनःपुन्हां आवेगानें ॥१९०॥ज्ञानदृष्टीनें पाहत । परी कृष्णास मणि न दिसत । म्हणोनि तो अति दुःखित । रडू लागला पुनःपुनः ॥१९१॥अहो माझें दिव्य ज्ञान । कुठें लुप्त झालें महान । नरतुल्य झालों देव असून । धिक्कार असो जीवनाचा ॥१९२॥रथांत बैसून द्वारकेंत । महायश तो नंतर जात । उग्रास सारे वृत्त सांगत । विस्तारपूर्वक विषादें ॥१९३॥तेव्हां यादव मुख्य त्यासी निंदिती । कृष्ण सत्राजिताची उत्तरक्रिया करिती । देशोदेशींचे नृप करिती । निंदा श्रीकृष्णदेवाची ॥१९४॥दुष्ट बुद्धीनें केलें । कृष्णानें हें नीच कर्म असलें । समर्था बलभद्रा त्यजिलें । दुर्मती त्या मणिलोभ्यानें ॥१९५॥महापापी तो असत । विश्वासपात्र न जगांत । लोक न वंदिती द्वारकेंत । श्रीकृष्णासी त्यामुळें ॥१९६॥सर्वांनी परित्यक्त दुःखित । श्रीकृष्ण व्यथा अनुभवित । जाहला क्षीण तो अत्यंत । अस्थित्वचा मात्र उरला ॥१९७॥ऐसा होता स्वसदनांत । नारद त्यास भेटण्या येत । पाहोनियां सुविस्मित । श्रीकृष्ण म्हणे तयासी ॥१९८॥मज सर्व लोकांनी त्यागिलें । म्हणोनी एकलेपण आलें । आता दुःख आश्रया आलें । घरांतच घालवितों वेळ ॥१९९॥परी परम भाग्य असत । म्हणोनि दर्शन तुझे घडत । तें ऐकून विचारित । नारद श्रीकृष्णासी प्रश्न ॥२००॥कां त्यजिलें लोकांनी तुला । सर्व वृत्तान्त सांग मजला । तेव्हां श्रीकृष्णांनी तयाला । सांगितलें घडलेलें सर्व ॥२०१॥नंतर नारद ध्यान लावित । दिव्य दृष्टीनें पाहत । देहत्यागोत्सुका कृष्णा म्हणत । ऐक कारण या दुःखाचें ॥२०२॥भाद्रपद शुक्ल चतुर्थीस पाहिला । चन्द्र तूं कृष्ण हा दोष घडला । त्या चंद्रासी शाप मिळाला । पूर्वी त्या विघ्नराजाचा ॥२०३॥त्यायोगें तुज दुःख प्राप्त । आतां देह त्याग करुं नको संतप्त । गणेशासी भज भावयुक्त । संकष्टीचें व्रत तूम करी ॥२०४॥तेणें चोरीचा आळ टळेल । अन्यथा मुक्ति न मिळेल । तो सज्ञान समर्थेस अमल । त्या विघ्नेशा शरण जाई ॥२०५॥ऐसें सांगून महायोगी जात । गणेशगान प्रेमें करित । वीणावादनीं लालस भक्त । नारद सोडून त्या स्थळा ॥२०६॥तदनंतर प्रहर्षानें युक्त । कृष्ण विघ्नेशाचें पूजन करित । आदरें ध्यान आचरित । दशरथा एकाक्षर मंत्रानें ॥२०७॥संकष्टीचें व्रत आचरित । रात्री ध्यानमग्न होत । तेव्हा गणराज प्रकटत । भक्तापुढें तो सुखप्रद ॥२०८॥कृष्णास जागें करित । ब्रह्मनायक तो गणेश उदात्त । वरती उठून नमित । श्रीकृष्ण पूजी आदरानें ॥२०९॥पुनःपुनः प्रणाम करुन । सामगायनें स्तुति करुन । स्तोत्र अष्टक संज्ञ म्हणून । आनंदानें नाचला ॥२१०॥रोमांचित कृष्णास पाहून । गणेश तेव्हां बोले वचन । हृदयवांच्छित वरदान । माग कृष्णा मी प्रसन्न ॥२११॥गणेशाचे ऐकून वचन । महायश कृष्ण खिन्नमन । भक्तियुक्त तो बोले वचन । विघ्नेशा तुझी भक्ति देई ॥२१२॥जरी तूं मजवरी तुष्ट असत । दृढ भक्ति दे मजप्रत । भाद्रपद शुक्ल चतुर्थीस चन्द्र पाहत । ते जन होवोत शापहीन ॥२१३॥मी आसन्न मरण झालो । ज्ञानवर्जित दुःख पावलों । अन्यांची कार्यवार्ता उमजलों । म्हणून प्रार्थी तुजला मी ॥२१४॥तेव्हां गणनाथ भक्तिमोहित । त्या श्रीकृष्णासी म्हणत । माझी दृढ भक्ति तुझ्या चित्तांत । अनघा सदैव राहील ॥२१५॥स्यमंतकाचें महिमान । तुला जें आलें लांच्छन । हे सर्व जो ऐकेल मन । लावून वरदान त्यास लाभेल ॥२१६॥हें जो भावबळें वाचील । मजला हृदयीं ठेवील । तो दोषहीन होईल । त्यांत संशय अन्य नसे ॥२१७॥श्रीकृष्णा तुझा दोष सरेल । आळ खोटा जाईल । यश पूर्ववत पसरेल । ऐसें माझें वरदान ॥२१८॥ऐसें सांगून गणेशान । कृष्णास भक्तिपरायण प्रसन्न । जाहला झणीं अंतर्धान । कृष्ण तेथेचि राहिला ॥२१९॥संपूर्ण जागरण करुन । पंचमीस गणेश पूजन । विशेषें देई बहुविध दान। तेणें गणेशकृपा लाभत ॥२२०॥अंतर्ज्ञान परत लाभत । अक्रूरकृत मणिचौर्य जाणत । सभेंत जाऊन अक्रूराप्रत । आवाहन तेव्हां त्यानें केलें ॥२२१॥त्यास प्रणाम करुन । महाभागास बोले हसून । शतधन्व्यानें मणि तो महान । तुझ्या घरीं टाकिला असे ॥२२२॥बलभद्रासाठी मानदा दाखव । मणि तो आम्हां अभिनव । तेव्हां अक्रूर आणी भययुक्त भाव । मणि तो सभेमध्यें तदा ॥२२३॥तें पाहून उग्रसेन मुख्य प्रशंसित । जनार्दनासी पूजित । अक्रूर विदर्भांत जात । हलधरासी मणि द्यावया ॥२२४॥त्यास मणि देऊन । सन्मानें परत आणून । जेव्हां सभेंत बसविला प्रसन्न । तेव्हां सर्वां मोद झाला ॥२२५॥महावीर तो समागत । पाहून केशव हर्षयुक्त । द्वारकानिवासी आदर करित । निर्दोषत्व पटून कृष्णाचें ॥२२६॥नानादेशनिवासी मुदित । तैसेचि राजे मित्रयुक्त । आनंदोत्सव तेव्हां मानित । आळ सरला श्रीकृष्णाचा ॥२२७॥सर्वांच्या हृदयीं संस्थित । बुद्धिनायक हा गणेश जगांत । त्याच्या कृपेनें दुर्लभ नसत । कांहींही गणेशभक्तांना ॥२२८॥म्हणोनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीस । चन्द्रदर्शन वर्ज्य करावें विशेष । परी होता दर्शनास । हें चरित्र भक्तीनें वाचावें ॥२२९॥त्यायोगें दोषविहीन होईल । अन्यथा भ्रष्टभाव नरकीं जाईल । स्यमंतक मणि चरित्र विमल । ऐकतां चन्द्रदर्शन दोषहरती ॥२३०॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराण्नोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते भाद्रपदशुक्लचतुर्थी चन्द्रदर्शन दोषहरणचरितवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP