मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ३९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल कथा पुढें सांगती । विष्णुदेव दुःखित चित्तीं । वैकुंठ लोक सोडून झटिती । शंभूस शरण तें गेला ॥१॥
देवेंद्रासह कैलासी जात । शिवास नमस्कार करित । जनार्दनाची स्तुति करित । वृत्तान्त समस्त निवेदिली ॥२॥
तो ऐकून विष्णूस म्हणत । शिव सांत्वनपर वचन मुदित । नाना दृष्टिन्त देऊन करित । समाधान विष्णुप्रमुखाचें ॥३॥
शिव म्हणे विष्णो तूं जगदीश्वर । सर्वज्ञ अससी थोर । परी तपाचें पुण्य महा उग्र । त्या असुराचें हेंही सत्य ॥४॥
त्या तपाच्या पुण्यानें पराजित । झालास तूं युद्धांत । लोभासुरा मिळालें फल उदात्त । त्याच्या उग्र तपश्चर्येचें ॥५॥
तें फल भोगून मरेल । काळ येतो तो खळ । माझ्या समीप रहा तूं निश्चल । समस्त देवांसह सांप्रत ॥६॥
माझ्या भक्तीनें युक्त । तो येथ ण येईल निश्चित । ऐसें वचन ऐकून वसत । कैलासीं विष्नू देवांसह ॥७॥
इंद्रासनीं लोभासुर बैसत । त्यास दानवगण म्हणत । विप्रचित्ति आदी मोहयुक्त । लोभा महाभागा ऐक ॥८॥
देवगणांसह निवसत । विष्णु कैलासावर निश्चिंत । जरी शंकर आपुलें इष्ट दैवत । आदरणीय पूजनीय ॥९॥
परी तो शत्रूस आश्रय देत । विपक्षाचे रक्षण करित । म्हणोनि पाठवावा दूत । शंकराप्रती अविलंबे ॥१०॥
शिव जरी देवपक्ष घेईल । तरी त्यासी जिंकूं आपण सबळ । शंभूनें वर् दिला तुम्हांसी एक वेळ । हेंही सत्य नसे नृपा ॥११॥
कर्माधीन जग समस्त । कर्माचें फळ शंभु तुम्हां देत । हा उपकार अथवा शक्ति नसत । शंकराची दैत्येंद्रा ॥१२॥
म्हणोनि संदेह आपुला सोडून । शंभूचा त्याग करुन । स्वकर्माचा आश्रय घेऊन । करी क्षेम तूं आपुलें ॥१३॥
ऐसें बोलून दानव थांबती । लोभासुर विचार करी चित्तीं । नंतर कैलासावरी शंकराप्रती । गजासुरासी पाठवी तो ॥१४॥
तो महादैत्य कैलासे जात । शंभूसी प्रणाम करुन म्हणत । लोभदैत्याचा संदेश सांगत । सामपूर्वक त्या समयीं ॥१५॥
गजासुर म्हणे महादेवासी । प्रणाम मीं करितों तुजसी । ऐक हितकर माझ्या वचनासी । लोभासुरें मज पाठविलें ॥१६॥
त्याचा संकल्प सुखप्रद । आतां ऐक तूं विशद । तूं साक्षात्‍ ईश्वर पूर्णप्रद । आम्हांसी पूज्य निरंतर ॥१७॥
देववर विष्णु तुज संन्निध सांप्रत । आला असे शरणार्थी विनीत । तो आमुचा शत्रू असत । त्याग त्यासी सदाशिवा ॥१८॥
आम्हीं तुमचे परम भक्त । आमुचा प्रिय तो तुमचा अनुगृहीत । आमुचा शत्रु तो तुम्हांप्रत । शत्रूसमची असावा ॥१९॥
हें परमादरें मानावें । अन्यथा संग्रामार्थ सज्ज राहावें । तुज जिंकू लीलया हें जाणावें । निःसंशय भविष्यवचन ॥२०॥
जर स्वकर्मानें समर्थ अससी । तरी स्वर्गाचें राज्य भोगिसी । आम्हां भक्तियुक्तासी रक्षसी । तरी भोगशील ऐश्वर्य ॥२१॥
त्या गजासुराचें ऐकून वचन । शंकर भोले निःश्वास सोडून । सामवचन हितकर क्रोध गिळून । गजासुरा ऐक आतां ॥२२॥
त्या लोभासुरा सांग जाऊन । मी कैलास सोडून अन्यत्र जाईन । परी जनार्दन विष्णूस न सोडीन । यांत संशय कांही नसे ॥२३॥
कर्मयोगें जर तूं समर्थ अससी । स्वर्गाचें राज्य तरी भोगिसी । सर्व चराचर स्वाधीन तुजसी । महिमा अपार असे तुझा ॥२४॥
ऐसें सांगून त्या दूताप्रत । कैलास सोडून अन्यत्र जात । सुरगणासह विष्णुसमवेत । महावनांत पर्वतप्रांती ॥२५॥
महेशान पर्वत गुहेंत राहत । पशुसम काळ घालवित । तिकडे गजासुर लोभासुर सभेंत । सांगे सकल वर्तमान ॥२६॥
तो वृत्तान्त ऐकून मुदित । जाहला लोभासुर अत्यंत । सत्यलोकीं वैकुठांत । कैलासीं स्थापिले असुर त्यानें ॥२७॥
नाना देवपदें असुरेंद्राप्रत । तो परमानंदे देत । इंद्रासन सोडून भूमीवरी जात । नंतर स्वपुरांत तो दानवेंद्र ॥२८॥
असत्‍ भोगपरायण वर्तत । स्त्रीमांसमदिरासक्त । धन्य आपणासी मानित । कृतकृत्य संपूर्ण ॥२९॥
ब्रह्मांड माझ्या वश असत । माझ्यासम श्रेष्ठ कोण जगांत । मीच एक बळवंत बुद्धिमंत । परमश्रेष्ठ मी एकला ॥३०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि । श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाजनचरिते लोभासुर ब्रह्माण्डजयो नामैकोनचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP