मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ३६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दक्ष म्हणे मुद‌गलासी । चतुर्थी माहात्म्य कथिलेंत मजसी । कृतकृत्यता वाटे मजसी । त्यायोगे मुनिसत्तमा ॥१॥
आतां लोभासुराचें शमन । कैसें करी गजानन । ते चरित्र अत्युत्तम । सर्वसिद्धिप्रद मज सांगा ॥२॥
तेव्हां मुद्‌गले सांगती तयाप्रत । पुरातन इतिहासाचें वृत्त । एकदा पर्वत श्रेष्ठावर स्थित । कैलासीं होते शंकर ॥३॥
पार्वतीसहित गणांनी युक्त । तेथ पौलस्त्य कुबेर येत । गिरिजेसहित शंकरासी नमित । नम्र राहिला पुढें उभा ॥४॥
नंतर शंकरासमीप जाऊन । चवरी हातात धरुन । वारा घालून करी विनम्र मन । सेवा शिवशंकराची ॥५॥
त्या वेळीं तो जवळून पाहत । पर्वत नंदिनीचें रुप अद्‍भुत । अप्रतिम सुंदर अवयवयुक्त । साक्षात्‍ शक्ति मायामयी ॥६॥
तिच्या सौंदर्य मोहयुक्त । कामबाणांनी पीडित । जाहला कुबेर विहवल अत्यंत । कामुक नजरेनें पाही तिजला ॥७॥
धनाधिपाची ती नजर पाहत । पार्वती शंकरप्रिया क्रुद्ध होत । त्या रागाच्या आवेशांत । वाकडा नेत्र तो जाळिला ॥८॥
कुबेर जाहला शोकाकुल । गळालें वीर्य तत्क्षणीं सबल । पुत्र जन्मला त्यांतून अमल । लज्जायुक्त कुबेर झाला ॥९॥
तो महेश्वरास प्रणाम करित । स्वतःस निंदी अत्यंत । विविध प्रकारें स्तवन करित । पार्वतीचें त्या वेळीं ॥१०॥
नंतर शंकर तिचें सांत्वन करित । जगदंबिका त्या पुत्रासी पाहत । पिंगाक्ष जो प्रख्यात । पुत्रभाव प्रदर्शून ॥११॥
जगदंबेस लोभविण्यास । कुबेर उद्युत झाला खास । मातृगामि स्वरुपें तयास । पुत्र झाला प्रतापवन्त ॥१२॥
द्विज त्या पुत्राचें नाव ठेविती । लोभ ऐसें ख्यात जगतीं । लोभसुतास घेऊन स्वगृहाप्रती । परतला तें कुबेर ॥१३॥
कुबेरभवनांत लोभ राहत । हें जाणून नारदमुनि जात । वीणागायनपर ते पाताळांत । तार दानवा सन्मित्रा ॥१४॥
दानवांचे हित इच्छित । तार इंद्रहस्तें पराजित । नारद त्यास भेटत । उठून प्रणाक करी आनंदे तो ॥१५॥
पूजन करुन विधियुक्त । नारद कुशल वृत्तान्त । दानवाची कैसी स्थिति असत । तें सर्व सांग म्हणे ॥१६॥
तार तेव्हां सांगत वृत्तान्त । इंद्रानें जिंकिले मज रणांत । मर्दिले दानव अत्यंत । आतां काय करावें? ॥१७॥
मुनिसत्तमा तें मज सांगावें । हें ऐकून नारद दैत्यहितभावें । कथन करी लोभाचें आघवें । चरित्रयुक्त तयासी ॥१८॥
अलका नगरींत कुबेराप्रत । वीर्यपातें पुत्र झाला असत । लोभ नाम त्याचें असत । पळव तूं त्या पुत्रासी ॥१९॥
त्या कुबेरपुत्रास आणून । करी तयाचें पालन । त्यायोगें तुझें वांछित महान । सर्वही सिद्ध होईल ॥२०॥
हयांत संदेहलव नसत । तरी तूम करी आपुलें हित । ऐसें बोलून अंतर्हित । जाहले मुनिश्रेष्ठ नारद ॥२१॥
तार झाला चित्तीं हर्षित । कृतकृत्य स्वतःसी मानित । मायाबळें अलकापुरींत । तार दानव पातला ॥२२॥
निद्रित लोभास घेऊन । परतला स्वगृहीं आनंदून । कुबेरास कळता वर्तमान । शोक अल्पही तो न करी ॥२३॥
दुर्निमित्तें जन्मला होता । म्हणोनि लोभ सुत प्रिय नव्हता । कुबेरासी परी तारदानव कृतकृत्यता । मानी त्या सुतलाभें ॥२४॥
तो त्या पुत्रास आनंदे पाळित । त्याच्या बाललीला पाहून मुदित । बाळांसह लोभ खेळत । उपटी वृक्ष अनायासें ॥२५॥
तळहाताचा प्रहार करित । दारुण शिला सहज फोडित । ऐसी नानाविध कर्में त्याची आश्चर्ये अघटित । दानवोत्तम पाहती ॥२६॥
तीं पाहून ते हर्षित । ऐसी चार वर्षे जात । पाचव्या वर्षीं व्रतबंध करित । वेदाध्ययन त्याचें करवी ॥२७॥
शुक्रशिष्य लोभास शिकविती । वेदांची संथा देती । आसुरी महामायाही पढविती । सर्व देवविमोहिनी जी ॥२८॥
सर्व विद्यांचा अभ्यास करुन । लोभ झाला ज्ञानी महान । नंतर विप्रेंद्रा शुक्रास नमून । सर्वप्रद साधन विचारी ॥२९॥
तेव्हां तो महामुनी तयाप्रत । पंचाक्षरी शैवी विद्या शिकवित । ती स्वीकारुन विधियुक्त । लोभासुर गेला वनांत ॥३०॥
तेथ शिवध्यान परायण । जप करी नित्य प्रसन्न । निराहारही राहून । भस्मांगलेप करोनी ॥३१॥
शैवमार्गातें अनुसरत । शंकरासी तर्पें तोषवित । ऐसें अनेक दिनपर्यंत । आचरिलें तप लोभानें ॥३२॥
त्याच्या शरीरावर वाढलें । वारुळ एक तेव्हां भलें । दिव्यवर्षसहस्त्र केलें । तप त्यानें ऐशापरी ॥३३॥
तेव्हां शंकरप्रभु प्रसन्न । पार्वतीसह आले देण्या वरदान । परी ध्यानस्था त्यास न भान । लोभासुरासी त्याचें तें ॥३४॥
शंभु त्याच्या शरीरावर । जल शिंपडती सत्वर । त्या योगें तो दानवेश्वर । समाधि त्यागून जागृत झाला ॥३५॥
लोभासुर शंकरास पाहत । म्हणे धन्य माझें तप वाटत । धन्य मंत्र मातापिता जगांत । धन्य जन्म ज्ञानादि सर्व ॥३६॥
आज पाहिलें तुज महेश्वरा । तूंच जगाचा निवारा । कैसें स्तवूं मी तुज उदारा । साक्षात्‍ ब्रह्म तूं सनातन ॥३७॥
तथापि तुझ्या दर्शनानें स्फुरत । माझी मति पुनीत । विश्वनाथा तुज मी नमित । सर्वांतर्या मी तुला नमन ॥३८॥
शंकरासी अनंतगुणराशीसी । शिवासी शक्तियुतासी । त्रिनेत्रासी महादेवासी । निर्गुण गुणचालका नमन ॥३९॥
अमेय शक्तीसी गिरीशासी । वृषभध्वजासी स्त्रष्टयासी । पालनकर्त्यासी संहर्त्यासी । त्रिधारुपासी नमन ॥४०॥
अकर्तुं अन्यथाकर्तृं शक्तासी । सदा मोहविहीनासी । मृडासी स्वाधीनासी । परेशासी नमन असो ॥४१॥
सहजासी खेळ करणारासी । शूलहस्तासी खेलकासी । कैलासवासि देवासी । भस्मलेपकरा सतत नमन ॥४२॥
दिगंबरासी सर्वां सर्वदासी । नमन माझे देवा तुजसी । ऐसी सुत्ति करुन महेशासी । तोषविलें दानवोत्तमें ॥४३॥
लोभासुर करांजली जोडून । उभा राहिला साश्रुनयन । महादेव प्रसन्न होऊन । म्हणे हृदयेप्सित माग ॥४४॥
तुझ्या तपानें मी तुष्ट । तुझ्या या स्तोत्रें संतुष्ट । दानवोत्तमा तुझें इष्ट । सर्वही मीं पुरवीन ॥४५॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र उत्तम । मज आवडतें अनुपम । भुक्तिमुक्तिप्रदायक परम । होईल यांत ना संशय ॥४६॥
जो हें स्तोत्र वाचील । दैत्येंद्रा अन्यास ऐकवील । तो माझा प्रिय होईल । लाभेल सर्व इष्ट हेतू ॥४७॥
ऐसें ऐकून शिववचन । महासुर म्हणे हर्षोत्फुल्लनयन । भक्तीनें विनम्र होऊन । वरदा जरी वर देसी ॥४८॥
तरी तुझी दृढ भक्ति । सदैव रहावी माझ्या चित्तीं । ब्रह्मांडाचें राज्य मजप्रति । लाभावें नाना ऐश्वर्ययुक्त ॥४९॥
आरोग्यादींनी मी युक्त । असावें सदा तृप्त । व्हावें पूर्ण माझे मनोरथ त्वरित । अनुग्रहें आपुल्या ॥५०॥
मनोवाणीमय जे असत । त्यापासून मृत्यू नसत । ऐसें वरदान मजप्रत । द्यावें सांप्रत कृपानिधे ॥५१॥
लोभासुर म्हणे सदा आनंदयुक्त । ठेवावें मज अबाधित । ऐसें लोभासुराचें वचन ऐकत । तेव्हां चकित शिव झाला ॥५२॥
परी तपोबळें बद्ध असत । तथास्तु ऐसें उच्चारित । तत्क्षणीं अंतर्धान पावत । कैलासावरी परत गेला ॥५३॥
लोभासुरही प्रसन्नचित्त । आपुल्या गृहासी परत जात । ऐसें हें आख्यान अद्‌भुत । मुद्‍गल सांगती दक्षासी ॥५४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते लोभासुरवरप्राप्तिवर्णन नाम षटत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP