मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ४५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल सांगती दक्षाप्रत । ऐसा संकल्प करुन मनांत । सिंदूर गिरिजेस पकडित । खांद्यावरी तिज बैसवी ॥१॥
ती तत्क्षणीं भयविव्हल मूर्च्छित । पर्वतकुमारी अति दुःखित । सिंदूराच्या श्वासवेगें पडत । नंदिप्रमुख गण विद्ध ॥२॥
शिवगण जरी मार्गीं पतित । पुनः पुन्हा ते वरती उठत । हाहाकार करिती समस्त । असुर पळवी उमेसी ॥३॥
ती बंदिस्त असुरहस्तांत । जेव्हा नंतर सावध होत । गणपतीस मनीं स्मरत । दैत्यपाशीं नियंत्रित ॥४॥
गौरी तें प्रार्थना करित । गजानना तूं ज्ञानविहारी ख्यात । मज परपुरुषाचा स्पर्श होत । हें तुज अद्यापि कैसें न कळे? ॥५॥
गणेशा माझें करी रक्षण । अन्यथा त्यजीन मीं प्राण । मीं भक्तियुक्त तुझें स्मरण । संकटीं या करितसें ॥६॥
विघ्नशत्रू असुरसंघाचा हंता । विघ्नेशा हेरंबा रक्षी आतां । महोदरप्रिया लंबोदरा दुःखहर्ता । अच्युत तूं जगतांत ॥७॥
मीं भक्तियुक्त मज रक्षावें । प्रेमविवर्धना आतां त्वरित गावें । सिद्धिबुद्धींच्या मोहभावें । विसरलास का स्वभक्तांसी ॥८॥
कीं अद्यापि अससी निद्रित । अथवा लक्षलाभांचा विचार करित । कां मज विसरुन सांप्रत । आनंदानें बैसलासि? ॥९॥
अथवा अन्य भक्तांच्या संगतींत । नाना उपचार सेवन करित । मोदक आदि मिष्टान्नें सेवित । विहारांत मग्न बहुविध ॥१०॥
वक्रतुंडा स्वानंदभोगांत । झालास का तूं परिप्लुत । हया दासीस विसरुन सांप्रत । महानुभावा कोठें अससीं? ॥११॥
अनंत लीला करण्यास । चित्त तुझें सलालस । भक्तांचे रक्षण करण्यास । धावसी तूं संकटकाळीं ॥१२॥
अहो गणेशामृताचें करिती पान । अमर अथवा असुर प्रसन्न । जे आठविती दक्ष राहून । तुझें स्वरुप सर्वदा ॥१३॥
त्यांच्यास्तव नानाविध प्रयत । अससी तूं रक्षणोद्यत । मज दासीस विसरुन सांप्रत । अनन्यत्व माझें ना स्मरिलें ॥१४॥
मी झालें आता दीनतम । सर्वांच्या चित्तीं संस्थित तूं सर्वोत्तम । परेशा रक्षी मज अनन्यकाम । विलंब आतां लावूं नको ॥१५॥
प्रभू तूं विनायक ब्रह्मेश । देवा नमितें तुज तूं जगदीश । भक्तांचा अभिमानी सर्वेश । वेदांत मुख्यत्वें ख्यात ऐसा ॥१६॥
महात्मा येत येऊन सांप्रत । दितिजास मारावें क्षणांत । पादनिष्ठ मीं दासी विनत । राख माझी लाज आतां ॥१७॥
देवा तुजसी कांही दूर । नसे जगतीं या अशक्य दुर्धर । तरी बुद्धीशा का रे लाविशी उशीर । रक्षण माझें करण्यासी? ॥१८॥
जरी तूं रक्षण न केलें त्वरित । तरी तुझें स्मरण करुन चित्तांत । देहत्याग करुन सांप्रत । यश तुझें मी हरीन ॥१९॥
दयासिंधू तूं रक्षण करी । अपराधांची क्षमा करी । क्षणोक्षणीं तूं उद्धरी । दासी आम्ही सर्व तुमच्या ॥२०॥
ऐसे पार्वती स्तुति करीत । शंकरें ध्यान संपविलें त्या अवधीत । हाहारव गणांचा ऐकत । जागृत होऊन तत्काळ ॥२१॥
गणेशास स्मरुन मनांत । नंदीवरी आरुढ होत । दैत्यराजा सिंदूरा क्षणांत । गाठिलें त्यानें पवनवेगें ॥२२॥
डमरुनें त्यास मारित । तोही शंकरा आलिंगण्या धावत । शिवाचीं त्रिशूळादी शस्त्रास्त्रें होत । कुंठित सारी त्या समयीं ॥२३॥
तें परम आश्चर्य पाहत । महेश्वर तें भयभीत । मनीं गणपासी स्मरत । विघ्ननाशार्थ भक्तीनें ॥२४॥
पार्वतीचें ऐकून स्तवन । त्या स्थळीं पातला गजानन । ब्रह्माणाचें रुप घेऊन । शिवसिंदूरामध्ये उभा ॥२५॥
गणेशें तेथ कौतुक अद्‌भुत । दाखविलें त्या स्थळीं क्षणांत । दैत्य हृदयीं आघात होत । परशूचा तें गुप्तरुपें ॥२६॥
त्या परशूनें विद्ध होत । तेव्हां ब्राह्मणरुपें गणपती म्हणत । अरें दैत्या ऐक तूं हित । शक्तीस सोडी जगन्मातेस ॥२७॥
अन्यथा शिव स्वयं गुप्तरुपांत । वधील तुज हें निश्चित । मीं शंभूस सांगून तुझ्या आज्ञेंत । वागण्यास संमत करीन ॥२८॥
परी त्याची भार्या दे सोडून । करी त्रैलोक्यराज्य महान । तें वचन सिंदूरें संमानून । शिवास म्हटलें त्या समयीं ॥२९॥
हास्यमुख तो बोलत । दैत्याधीन होई शिवा क्षणांत । ब्रह्मदेवाचा वर ज्या प्राप्त । त्या दैत्या जिंकण्या असमर्थ तूं ॥३०॥
महेशा शक्तीस घेऊन । माझें वर्चस्व मान्य करुन । सुखें करी कालक्रमण । ऐसें म्हणोनि दैत्य तेव्हां ॥३१॥
शंकरें दैत्यप्रभुत्व मानितां । परत देई त्याची कान्ता । दैत्य कैलासांत जाऊन तत्त्वतां । विजयोत्सव साजरा करी ॥३२॥
तदनंतर कैलास सोडून । शंकर शरण शोधी अन्य स्थान । दैत्य त्रिभुवन जिंकून । जगदीश जाहला ॥३३॥
द्विजरुपधारा गणेश होत । त्यासमयीं अन्तर्धांन क्षणांत । तें पाहून पार्वती मनांत । शोकयुक्त जाहली तें ॥३४॥
ब्राह्मणरुपें गणनायक । आला होता सुखदायक । सोडवून मज विनायक । रक्षून तुम्हां परत गेला ॥३५॥
नंतर पार्वती शंभू जात । परळीवनीं तपश्चर्या करित । विघ्नेशास हृदयीं ध्यात । उग्र तप त्या दोघांचे ॥३६॥
ऐसीं शंभर वर्षें जात । तेव्हां गजानन प्रकटत । म्हणे महादेवा वर माग इच्छित । देईन मी तो तपें तुष्ट ॥३७॥
हें ऐकून गणेशवचन । शंकर विनत होऊन करी स्तवन । नानाविध स्तोत्रें गाऊन । पार्वतीहस्तें पूजन करवी ॥३८॥
विघ्नेशास प्रणाक करुन । शिव बोले विनीत वचन । गणाधीशा देण्या वरदान । आलास जरी तूं सांप्रत ॥३९॥
तरी होई तूं माझा सुत । यावज्जीवनपर्यंत । राही नाथा आमुच्या घरांत । नमन तुजला मनोभावें ॥४०॥
माझ्या सदनीं नाना अवतार । तुवां घेतले उदार । परी ते स्वल्प काळांत समग्र । गणनायका संपविलेस ॥४१॥
आता स्वामी माझ्या सदनांत । नित्य निवास तुझा घडत । ऐसें करी तेणें जगांत । सेवा तुझी मी करीन ॥४२॥
विघ्नपा माझा तूं पुत्र । कुलदैवत आमुचें पवित्र । हृदयीं मीं योगयुक्त । भजेन तुज गजानना ॥४३॥
तथास्तु म्हणोनि अंतर्धान । गणनाथ पावले तत्क्षण । शंभू कैलासीं परतून । शोकमग्न जीवन जगे ॥४४॥
तदनंतर अल्प काळ जात । एकदां पार्वती स्नान करित । स्वच्छंदे नग्न ती असत । स्नानगृहांत त्या वेळी ॥४५॥
महेश सहसा तेथ प्रवेशत । पार्वती जाहली अति लज्जित । आपुल्या केशसंभारे झाकित । नग्न देह ती आपुला ॥४६॥
शंकर तें अन्यत्र जात । स्वच्छंदे आपुल्या घरांत । एकदा पार्वती बैसली असत । मैत्रिणींसह आनंदे ॥४७॥
जया विजया या सख्या तें म्हणत । नंदीप्रमुख गण आपुले सेवेंत । जरी शंकरा थांबवण्या शक्त । तरीच आपण शिवात्मका ॥४८॥
म्हणोनि आपुला वंश राहील । ऐसा गण एक निर्मावा सबळ । तें एकतां शक्ति अमल । म्हणे सत्वर करीन मीं ॥४९॥
आपुल्या अंगाचा मळ काढून । त्याची पुरुषाकृति निर्मूंन । त्यास देई संजीवन । मग सांगेन त्या मानसपुत्रा ॥५०॥
तूं दारात बैस महाबाहो सतत । माझ्या आज्ञेचें पालन करित । माझ्या आज्ञेविना प्रवेश आंत । कोणा पुरुषा देऊं नको ॥५१॥
मीं जरी गृहीं स्नानगृहांत । असतां माझे पति प्रवेशत । तरी त्यांनाही वत्सा तूं त्वरित । देऊ नको आंत येण्या ॥५२॥
कोणीही कांहीं सांगो तुजप्रत । तूं ऐकू नको माझी आज्ञा असत । स्वामी शंकरही जरी आग्रह धरित । त्यांचाही निषेध तूं करी ॥५३॥
तो पुरुष पार्वतीस प्रणाम करित । मी तैसेंचि करीन म्हणत । दारांत पहारा देत । पार्वती मुदित तें झाली ॥५४॥
आपुल्या दोन सख्यांसहित । विश्वासें ती बैसत । एकदां गणयुक शंकर येत । त्यांस रोधिलें त्या पुरुषानें ॥५५॥
तेव्हां शंकर अति क्रोधयुक्त । त्या द्वारपालासवें भांडत । तें ऐकून मैत्रिणींसहित । गौरी मनीं आनंदली ॥५६॥
अति क्रुद्ध होऊन मनांत । नंदिप्रमुखां गणां आज्ञापित । युद्ध करुन ठार करा त्वरित । या उद्धट द्वारपालासी ॥५७॥
नंतर तो शस्त्रांनी ताडीत । शिवगण पुरुषास क्रोधयुक्त । पार्वती आपुलें तेज ओतित । अति उग्र त्याच्या ठायीं ॥५८॥
तेणें तेजें शस्त्रसंघात । पीठ झालें गणांचे समस्त । मुसळ घेऊन तो द्वारपाल ताडित । सर्वही बळी शिवगणांची ॥५९॥
तेव्हां ते करिती पलायन । भयभीत होऊनी उन्मन । शिवें पाठविलें स्कंदा तत्क्षण । लढावया त्या पुरुषासवें ॥६०॥
परी सेनानी कार्तिकेयही पराजित । अस्त्रें झाली त्यांची कुंठित । तो पुरुष त्यास बहु ताडित । पळाला तो शंभूजवळीं ॥६१॥
शंभू अमर मुख्यांचें स्मरण करित । ब्रह्मा विष्णु इंद्रही येत । प्रणिपात करिती देव समस्त । महेशासी कर जोडुनी ॥६२॥
त्यांस शिव सांगे वृत्तांत । तेव्हां इंद्रादिक गंधर्वादी जात । त्या पुरुषासवें ते लढत । परी अंतीं तेही हरले ॥६३॥
त्यांचीं अस्त्रें होत कुंठित । भयातुर ते पळून जात । मुसळें तो पुरुष ताडित । तेव्हां शंकर क्षुब्ध झाले ॥६४॥
नंतर ते विचार करिती । सुरेंद्र सारे एकत्र जमती । दक्ष प्रजापते मुनिगणही येती । विष्णु शिवासह विचार करण्या ॥६५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते शिवविचारवर्णनप्रसंगी नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP