खंड ४ - अध्याय ५
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । दशरथ म्हणे वसिष्ठासी । चतुर्थी व्रत माहात्म्य मजसी । सांगावें जें हितकारक जगासी । गणनाथप्रिय सविस्तारें ॥१॥
ब्रह्मादींनी केलें व्रत । त्याचा सांगावा वृत्तांत । दक्षही मुद्गलासी प्रार्थित । सांगावें माहात्म्य चतुर्थीचें ॥२॥
महारम्य कथा ऐकिली । परी माझी तृप्ति न झाली । आपण पाहिजे कृपा केली । कथा आणखी सांगूनी ॥३॥
दक्षाचें भक्ति संयुक्त वचन । ऐकून सांगती मुद्गल प्रसन्न । सूत सांगती तें आठवून । शौनकासी तदनंतर ॥४॥
दशरथाचें वचन ऐकून । वसिष्ठ सांगती पुरातन । वृत्तान्त पडला जो महान । प्रलयकाळीं एकदा ॥५॥
त्या वेळीं स्थावर जंगम नष्ट होत । पंचभूतमय जें जें जगांत । तीन अवस्थांनी युक्त । शून्यवत् झाले सर्व कांहीं ॥६॥
सर्व ब्रह्ममय होत । तीच योगनिद्रा गणेशाची ख्यात । वेदांतांत वर्णिली असे साद्यंत । ऐसा कांही काळ गेला ॥७॥
नंतर गणेशासी जागविती वेदपारंगत । तेव्हां पुन्हां तो सर्व निर्मित । तत्त्वधारक क्रीडा करीत । सृष्टिरचनेची त्या वेळीं ॥८॥
सत्त्व, रज,तम या त्रिगुणांपासून । पांच देव झाले उत्पन्न । ब्रह्मा विष्णु शिव शक्ति संपन्न । सर्वधारक सूर्यदेवही ॥९॥
त्यांनी तप आचरिलें घोर । एकाक्षर विधानें अति उग्र । तेव्हां गणनाथ चेतोहर । प्रसन्न जाहला तयांवरी ॥१०॥
त्यांना आत्मरुप दाखवित । सर्वप्रद परमश्रेष्ठ जें जगांत । त्या योगें जाहलें हृदयांत । ज्ञानयुक्त पंच देव ॥११॥
नरेश्वरा, दशरथा ते प्रार्थिती । सर्व देव, योगी भृशृंडीप्रती । त्यांच्या आज्ञेनुसार जाती । आपापल्या नगरांत ॥१२॥
नंतर कर्मभूमींत स्थापित । गणेशाचें क्षेत्र पुनीत । स्वानंद नामक विख्यात । जैसें वेदांत कथिलें असे ॥१३॥
तेथ विघ्नपाची मूर्ति । जेव्हां सर्व देव तें आदरें स्थापिती । भाद्रपद शुक्ल चतुर्थी ती होती । माध्याह्रीचा समय होता ॥१४॥
नंतर ते सर्व देव आराधिती । गणराजासी अति प्रीती । माघ शुक्ल चतुर्थीस प्रकटती । वरद गजानन त्यांच्यापुढे ॥१५॥
त्याच्या वरप्रसादें जग निर्मित । म्हणोनि या तिथीस वरदायिनी म्हणत । ब्रह्मादिक सर्वांसी उपदेशित । चतुर्थीचें व्रत तदा ॥१६॥
ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी ही असत । गणेशव्रतार्थ प्रख्यात । ज्येष्ठी माघी, भाद्रिका, लाभत । शुक्ल चतुर्थी मुख्यत्वें ॥१७॥
तथापि भाद्रपद मासांत । महामते शुक्लपक्षीं जी येत । ती मुखत्व पावत । या तीन चतुर्थ्यांमध्यें ॥१८॥
चतुर्थीसम अन्य नसत । व्रत महत्त्वपूर्ण जगांत । काय वर्णन करावें समुचित । त्यासम तीच असे ॥१९॥
भाद्रपद शुक्ल चतुर्थीव्रत । जो नर भक्तिभावें आचरित । त्यास बारा चतुर्थींचे पुण्य लाभत । ऐसें गणेशयोगी सांगती ॥२०॥
जरी अंगारकी चतुर्थी करित । तरी सोळा चतुर्थ्यांचे पुण्य लाभत । ती चतुर्थी चंद्रयुक्त । तर चोवीस चतुर्थ्यांचे फल लाभे ॥२१॥
स्वाती नक्षत्र युक्त । चतुर्थी असेल सोमवारयुत । चोवीस चतुर्थ्यांचे फळ लाभत । पुण्यकारक गणेशभक्त ॥२२॥
माघ शुक्ल चतुर्थीव्रत । जो कोणी भक्तिभावें आचरित । त्यास आठ चतुर्थ्यांचें फल लाभत । ऐसें ग्रंथीं सांगितलें ॥२३॥
जरी अंगारक चतुर्थी व्रत साधित । तरी बारा चतुर्थ्यांचें पुण्य लाभत । ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी जो करित । त्यास चार चतुर्थ्यां पुण्य लाभे ॥२४॥
अंगारक युक्त चतुर्थी करित । तरी द्वादश चतुर्थ्यांचे फळ लाभत । म्हणोनि प्रयत्नपूर्वक जगांत । सर्वदायिका ती आचरावी ॥२५॥
श्रावणादि अन्य मासांत । वरदा चतुर्थी शास्त्रसंमत । धर्म, अर्थ, काम, मोक्ष देत । ऐसा महिमा वर्णिला असे ॥२६॥
श्रावणासीं जी चतुर्थी येत । ती दोन चतुर्थ्यांचे पुण्य देत । चतुर्थीआ महिमा अनंत । कोण वर्णूं शकेल? ॥२७॥
आता राजेंद्रा तुज सांगतो । जो नर कृष्ण चतुर्थी करितो । तो जें जें इच्छि ते प्राप्त करितो । पुण्य बहुविध शुभप्रद ॥२८॥
सर्व प्राणिमात्रांवर येत । चतुर्विध संकटे जगांत । जन्म मृत्यु तीन अवस्था योगें युक्त । कर्मज फळानें चवथें तें ॥२९॥
ऐसे बहुध भेद असत । त्यांचें वर्णन अशक्य असत । चतुर्विध जग समस्त । पांचवें ब्रह्म ख्यात असे ॥३०॥
कृष्ण चतुर्थी विनाश करीत । चार चतुर्विध संकष्टयांचे जगांत । म्हणोनि तिज संकष्टी म्हणत । कृष्ण पक्षांतील जी चतुर्थी ॥३१॥
तिचाही महिमा अनुपम । वर्णन करण्या कोण क्षम । सर्व सिद्धिप्रद क्षेम । उपासकांचे जी करी ॥३२॥
माघ कृष्ण चतुर्थीचें व्रत । ब्रह्मदेव पूर्वीं आचरित । आठ चतुर्थ्यांचे पुण्य लाभत । विश्वयोनीस जैसें लाभलें ॥३३॥
जरी माघी अंगारकी असत । कृष्ण चतुर्थी विशेषयुक्त । वीस चतुर्थ्यांचें फल लाभत । मंगळवारी व्रत आचरितां ॥३४॥
श्रावण कृष्ण चतुर्थी करितां । चार चतुर्थ्यांची सांगता । लाभते यांत चित्ता । संशय अल्पही नरें न धरावा ॥३५॥
देव मुनींद्रासी उपदेशिली । ऐसी सर्व संकटहारिणीं जी शोभली । भाद्रपद कृष्ण चतुर्थीही भली । चार चतुर्थ्यां सम असे ॥३६॥
ही चतुर्थी करुन देवांप्रत । गणनाथ वरप्रद होत । म्हणोनि ती मुख्यत्व लाभत । यांत संशय कांहीं नसें ॥३७॥
जरी ती मंगळवारी येत । तरी बारा चतुर्थ्यांचें पुण्य देत । शुक्ल कृष्णा चतुर्थ्यां सतत । भक्तिभावें कराव्या ॥३८॥
चार पुरुषार्थ सिद्ध होती । चतुर्थी व्रत करिता जगतीं । अन्यथा सर्व व्रतें सिद्धिहीन होती । ऐसें माहात्म्य चतुर्थी व्रताचें ॥३९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते चतुर्थविवेकवर्णनं नाम पंचमोऽध्यायः समाप्तः श्रीगजननार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP