मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ३८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल कथा पुढे सांगती । इंद्र भेटे बृहस्पतीप्रती । नंतर त्यास पुढे करुन जाती । वैकुंठलोकीं सर्व देव ॥१॥
विष्णूस नमन करुन स्तविती । उचित स्थानीं बैसती । संतुष्ट होऊन हरि विचारिती । अमरावती सोडून कां आलात? ॥२॥
आज तुमच्या अर्धांगी न दिसत । तुमच्यासह या भेटींत । देवांनो दुःख कोणतें अद्‌भुत । ओढवले तुमच्यावरी? ॥३॥
इंद्र तेव्हां विष्णूसं सांगत । जगत्पाला काय सांगावी हकीगत । सर्वज्ञ आपण महामती जाणत । तथापि ऐका वृत्तान्त ॥४॥
दैवें ओढवला शोकद प्रसंग । लोभासुर शैववरानें सुभग । बल दर्पित होऊन दुःखभोग । देवांसी तो देत असे ॥५॥
दानवेंद्र देवांसी पीडित । महाबाहू तूं जगांत । गुरुपदेशें तुजप्रत । आलों सांप्रत जनार्दना ॥६॥
राज्य सोडून तुज शरणांगत । आलो देवगण समस्त । अमरावतींतील देवस्थानें देत । लोभासुर तो असुरांशी ॥७॥
स्वर्गाचें राज्य तो करित । तूं आमुचा पालक प्रख्यात । श्रुतिस्मृति ऐसें सांगत । म्हणौनि शरण तुज आलों ॥८॥
तूं देवांचा ईश्वर । ठार करुनियां लोभासुर । रक्षण करी तूम सत्वर । आम्हां समस्त देवादिकांचें ॥९॥
त्यांचे वचन ऐकून । विष्णु झाला कोपायमान । देवराजास देई आश्वासन । महाबाहू विचक्षण तो ॥१०॥
महादैत्यास मीं ठार करीन । दानवांसहित लोभासुरास कुमन । वृथा चिंता करु नका मन । प्रसन्न आपुलें ठेंवावें ॥११॥
तुमचें राज्य परत देईन । ऐसें महेंद्रासी देऊन वचन । गरुडावरीं बैसोन । गेला तत्क्षणीं अमरावतीसी ॥१२॥
महासैन्यासमवेत । विष्णु येतो ऐसें ऐकत । जेव्हां दूतमुखें तें होत । दानव सज्ज युद्ध करणा ॥१३॥
लोभासुर क्रोध संतप्त । युद्ध करण्या रणीं येत । रथारुढ होऊन साक्षात । मृत्युरुपची वाटे तो ॥१४॥
लोभासुर तो महाकाय असत । महावीर काल काळ अद्‌भुत । त्यास पाहून सुरसैन्य पळत । विष्णु आश्वासन देत त्यासी ॥१५॥
तेव्हां महेंद्रादि सुरगण जात । विष्णुसमवेत रणांगणांत । रमानाथास पाहून लोभप्रेरित । असुरांसी तें लढण्यासी ॥१६॥
नंतर देवदानवांचे युद्ध चालत । तुमुल शस्त्रसंघातसहित । परस्परांसी ते मारित । जयकामुद उभयपक्ष ॥१७॥
परी सुरनायक अथवा दानव । कोणासीच न मिळे जय सर्वथैव । रक्ताची नदी भयावह । वाहू लागली रणांगणीं ॥१८॥
रात्रींही विश्राम न घेती । क्रोधावेशें उभयपक्ष लढती । तीन दिवस ते झुंजती । महाघोर दारुण युद्ध ॥१९॥
विष्णूचें गण तैसे अन्य सुर । देवेंद्र मुख्य लढती घोर । नाना शस्त्रांनी दानवां सर्व । सर्व बाजूंनी मारिती ॥२०॥
तेव्हां हाहाकार उडत । दानववीर भयें पळत । देव झाले हर्षयुक्त । दारुण विजयनाद तें करिती ॥२१॥
जय जय विष्णु भगवान । ऐसें ओरडती आनंदून । परस्परांसी अभिनंदून । विजयानंद व्यक्त करिती ॥२२॥
तदनंतर अति क्रोधयुक्त । विप्रचित्ति मुख्य दानव परत येत । बाणांची वृष्टी ते करित । देवांवरी ते अकल्पित ॥२३॥
छिन्नांग देव पडत । जेव्हां तेथें रणभूमीवरी समस्त । देवेंद्र क्रोधें धावत । द्वंद्वयुद्ध करुं लागले ॥२४॥
रोमहर्षक तो वृत्तान्त । कांहीं तुज कथितों अद्‍भुत । इंद्रासह द्वंद्वयुद्ध करित । गजासुर प्रतापशाली ॥२५॥
अग्निसह स्वयं तारासुर । वायूसवें विप्र चित्तिक उग्र । वरुणासंगे बलि शूर । कुबेरासह प्रहेति लढे ॥२६॥
मदनासह हेतिक लढत । सूर्यासवें नरांतक युद्ध करित । देवांतक विष्णूस आव्हान देत । जृंभ लढे सोमासंगें ॥२७॥
दैत्येश बळवंत वृत्र लढत । यमासवें अतित्वेषांत । ऐसीं नाना द्वंद्वयुद्धें चालत । देवदानवांची सदा ॥२८॥
दैत्येंद्र ते बळ गर्वेयुत । वर्णन त्यांचें अशक्य असत । अहोरात्र युद्ध चालत । नाना शस्त्रास्त्रें टाकिती ॥२९॥
ऐसें युद्ध पाच दिनपर्यत । महाभयंकर तें चालत । परी कोणासही जय न लाभत । देव अथवा दैत्यांसी ॥३०॥
तदनंतर तो अतिक्रुद्ध गजासुर । इंद्रासी पकडून सत्वर । महापर्वताच्या शिखरावर । फेकून देई तयासी ॥३१॥
देवराज पडला मूर्च्छित । तें पाहून देव पळत । ऐशापरी त्या युद्धांत । दैत्ये देव पीडिले ॥३२॥
हा हा करुन देव सैन्य धावत । भयभीत दशदिशांत । तें महा आश्चर्य पाहून होत । मानसीं क्रुद्ध विष्णु देव ॥३३॥
आपुलें चक्र हातीं घेऊन । महाबाहू तो फेकी महान । दैत्य वधिले अनेक तत्क्षण । सुदर्शनें त्या स्वप्रभावें ॥३४॥
कोणाच्या डोक्यावर तें पडलें । कोणाचे हातपाय त्यानें तोडिले । ऐसे अमित दानव वधिले । दैत्येंद्र सारे तें एकवटती ॥३५॥
ते सर्व जनार्दनाप्रत धावत । परी शस्त्रास्त्रांनी दुष्टां मारी त्वरित । नारायण अति कोपयुक्त । गजासुरावर बाण सोडी ॥३६॥
दहा बाणांनी त्यास वेधित । गजासुर पडला मूर्च्छित । तें देवांतकासी मारित । सात बाण सोडून ॥३७॥
ऐसे दानवेंद्र दारुण वेधिले । कांहीं मूर्च्छित काही मेले । शरवर्षानें त्रस्त केले । दानवगण भूतलावरी ॥३८॥
दानवांचे सैन्य पळत । हाहाकार करित दशदिशांत । नंतर लोभासुर स्वयं येत । जनार्दनावर चालुनी ॥३९॥
मोहयुक्त तो महाअसुर । बोले वचन मदपर । उत्तम केलेस कृत सुंदर । माझ्या समोर विष्णु तूं ॥४०॥
आलास माझ्या दृष्टिपथांत । आता तुज मी न सोडित । जिवंत जाण्या परत । कदापिही विष्णुदेवा ॥४१॥
नामरुपात्मक जो असत । तो माझा वधकर्ता नसत । हें जाणूसही या स्थळाप्रत । कां आलास तूं मूढा ॥४२॥
ज्ञानहीन तूं वाटसी । शासन करीन मी तुजसी । ऐसें म्हणोनि गदाप्रहारें वेगें त्यासीं । ताडिलें लोभासुरें झणीं ॥४३॥
केशव मूर्च्छित पडत । नंतर लोभासुर देव सैन्या मारित । मुहूर्तानंतर सावध होत । विष्णु तेव्हां पळ काढी ॥४४॥
देवराजासहित त्यागित । संग्राममंडळ केशव त्वरित । प्रचंड हास्यें नागवित । समस्त दानवां लोभासुर ॥४५॥
ते असुर सावध होत । तेव्हां लोभासुर प्रसन्नचित्त । त्यांच्यासवें स्वपुरास जात । बंदिजन स्तुति करिती ॥४६॥
स्तुतिपाठका त्या देऊन दान । विजयोत्सव करुन । इंद्रासनावरीं विराजमान । जाहला दानवसत्तम लोभासुर ॥४७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते विष्णुपराजयी नामाष्टत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP