मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ८७

ओवीगीते - संग्रह ८७

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


नवरी घास देते केशरी भाताचा

व्याह्यांच्या पंक्तीचा थाट केला ।

भोजना बैसले आतां वीहीणी व्याही

जिलबीचा घास देई दादाराया ।

विहीणीला दिली साडी, बुट्‌टे शोभती सुरेख

पहा सूनमूख सासुबाई ।

घातले दागिने बींदी, पट्‌टा आणि वाकी

पोत, पेठया खाली झाकी चंद्रहार ।

सासुबाई, घालावेणी मूद राखडी, केतक

गोंडे, फुलें ती सुरेख शोभताती ।

गोठ, पाटल्या घातल्या पुढे शोभतात तोडे

अंगठीला खडे चकाकती ।

ठुशी, पेटयाखाली शेराची ती सरी

कपाळाला चीरी कुंकवाची ।

माहेराचे दिवे सासरच्या वाती

दिवे प्रकाशती झाली मध्ये ।

झाले सूनमुख नवरी कांपते दंडांत

घाला साखर तोंडात विहीणबाई ।

लेक सासरी निघाली मालत्यानी ओटी भारा

शेल्याची गांठ मारा वन्सबाई ।

केशरी पाण्याने आंबा शिंपियेला

आता दही घाला हातावरी ।

वाजत गाजत, पातली वरात

माप भरुनी दारात ठेवियेले ।

माप लोटियेले उजव्या पायाने

थोरल्या जावेने, भरीयेले ।

दार अडवूनि, मान मागते विहीण

तुझी लेक माझी सून दादाराया ।

झाले लक्ष्मीपुजन नाव ठेविले कमल

वंशाचा वृक्षवेल वाढवील ।

उठले देवक, सोडीलीं कंकणें

मांडव परतणे, झाले आता ।

भाऊबीजेच्या दिवशी का रे सख्या रुसलासी

तुझा शेला माझ्यापाशी दादाराया ।

जोडव्याचा पाय हळू टाका वैनीबाई

सवे बैसले माझे भाई दादाराया ।

माझ्या माहेराला केळी पोफळी नारळी

छाया त्याची ग दाटली अंगणात ।

माऊलीची माया न ये आणिकाला

कोवळ्या माणिकाल रंग बहू ।

माता पित्यांच्या राज्यात शिंक्यावरचं दही

भाईराजाच्या राज्यात ताकाला सत्ता नाही ।

काळी चंद्रकळा धुवूधुवूनी नेसावी

आपल्या जन्माला असावी मायबाई ।

काळी चंद्रकळा धुवुधुवूनी झाला बोळा

रुपये दिले साडे सोळा बापजींनी ।

काळी चंद्रकळा नको नेसू अंगणात

पति तुजा बंगल्यात मायबाई ।

काळी चंद्रकळा पदरी राम सीता

नेसली पतिव्रता मायबाई ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP