कंत बोलताती का ग राणी तू गोरी मोरी
माहेराचं सुख माझ्या वीसर जीवावरी ।
रानी बी भर्ताराचा असला उबा दावा
लक्ष्मीबाई बोल इथं उगीच आल्ये देवा ।
लेकाचं भरतार माझ्या अंगणीचा केर
आपला भरतार सिरीकिस्नाचा अवतार ।
शेजीचा भरतार दारातल्या केरावानी
आपला भरतार चाफा फुलला शेजवरी ।
माझ्या माहेरी ग किस्नदेवाची द्वारका
माझ्या त्या भावजया मेळा गौळणीसारखा ।
सासरी जाते लेक हाती भरलाया चुडा
जावई बापू माझा खडीसाखरचा खडा ।
लेकीच्या आईला नका म्हणू नाचारीण
मोत्यापवळ्यांची जवारीण ।
शेजी ती घाली पानी नाही भिजली माझी वेणी
बया ती घाली पानी न्हाणी वाजती वडयावाणी ।
काशी म्हणू काशीम काशी कुण्या खंडामंदी
बया अखंड तोंडामंदी ।
जोवर आईबाप लेकी तंवर तुझी उडी
झाली पुनव पाठमोरी मग चांदाला लागं घडी ।
पाची पक्वान्नांचं ताट आत सोजिची पाखरं
यीन यीवायी झाली ऐका मातेची लेकरं ।
उन्हाळ्याचं ऊन ऊन लागतं माझ्या जीवा
माझ्या वाणिच्या बाळा छत्री उघड सदाशिवा ।
उन्हाळ्याचं ऊन भाजी मिळेना घोलण्याला
माझ्या बंधूच्या मळ्यामंदी आला हरभरा सोलाण्याला ।
आला बंधूजी पावणा दुरडी येळते शेवायाची
माझ्या बंधुजीला वड माघारी जायाची ।
माऊलीची माया जसं तकलाचं पाणी
घाली मंडळ घारीवाणी ।
माऊली परास पिता मोठा उपकारी
दुनिया दावली त्यांनी सारी ।
बंधुजी पावणा न्हाई वरण भाकरीचा
करीते पुलाव साखरेचा ।
सागली पेठेमधी कोण बोलत किनी किनी
माझ्या हावशा बंधूजींनी दिली कचेरी हलवूनी ।
गावाला गेले म्हणू माझ्या गळ्याचा गळमणी
हावशा भ्रतार बाई माज्या कुंकवाचा धनी ।
सासर हो ग कसं नको सांगूस दारोदारी
कपाळीचं कुंकू नाही मिळत वारोवारी ।