माहेरपणाची हौस पिता केल्याविना राहिना
राम अवतारी डोरल्याचा साज खिशात मावना ।
सासू सासर्याची सेवा करावी आदरानं
माझी तू बाळाबाई पाय पुसावं पदरानं ।
सासू नी सासयिरा माझ्या सोन्याच्या आडभिंती
सयाला सांगू किती त्यांचा आधार मला अती ।
सासू नी सासरा दोन्ही देवाच्या मूरती
दीर दाजीबा गणपति जाऊ गुजरी पारबती
नंद कामिनी भागिरथी रामचंदर माझा पति ।
बुंदी परायास मला बेसन लाग ग्वाड
सासर्या परायास मला माहेराच भारी याड ।
बाळ सासर्याला जाती तिच्या वटीला पिवळी पानं
हवशा बंधुजी संग मुरळी पैलवान ।
ज्या गावात आईबाप, त्या गावाच मला याड
सयानू किती सांगू तिथं गारव्याचं झाड ।
लगीनचिठ्ठी लिवा, माझ्या त्या माहेराला
बया मालनीची मुंगी पैठण आहेराला ।
लगीनचिठ्ठी लिवा सासूबाई कागदात
बया मालन बोलयीती लेक जावई मांडवात ।
जीवाला भारी जड कोर्या कागदावरी लिवा
बया माझ्या मालनीला आधी जेऊद्या मग दावा ।
जीवाला भारी जड बया मालनी कसं कळ
दारी लिंबूनी रस गळ ।
माहेराचं गावात ईसरली सया
पोटीच्या पुतराला म्हणीती बाबा बया ।
जोडव्याची चांदी झिजली झरा झरा
दीर दाजीबा किती सांगू अंगणी भुई करा ।
माहेरची पिकं शेतसरी जन बोलता राहीना
माझ्या त्या बंधूजीचा गूळ वाफ्यात माईना ।
जुंधळ्याची रास रास तिवडया बसविली
सासर मामंजींनी तिला पासुडी नेसविली ।
जुंधळ्याचा गाडा गाडा येशीत दाटला
दीर दाजीबा कंतानी दंडा भुजांनी रेटीला ।
काळ्या ग वावरात मेंढयाबायांची दावन
सासर मामंजींची नव्या ऊसाची लावण ।
बंधु सासर्याला गेलं मेहुणी म्हणती र्हावा र्हावा
बंधूजी बोलत्याती जातो बहिण्याच्या गावा ।
ऊंच ऊंच चोळ्या माझ्या वलनी झाल्या जुन्या
बयाच्या माझ्या बाळा दोन दिवाळ्या गेल्या सुन्या ।
डाळी डोरलं मधी सरी मला हावस सरायाची
मामंजीची सून हायी मीच ग तालीवाराची ।
अंगणात उभी कोण जरीच्या पातळाची
पित्या माझ्या दौलताची सून लाडकी सासर्याची ।