लेण्याबीमंदी लेनं अहेव नारीला हिरवा चुडा
कताच्या जिवावरी आल्यागेल्यांनी भरला वाडा ।
माहेरच्या वाटं सुरुची झाडं लावू
चतुर माझा बंधू गूज बोलत दोघं जाऊ ।
फुलला शेतमळा उभं शिवार डोलत
भरल्या संसारात लक्षुमी बोलत ।
इमाना परमान झालं बंधुच्या अंगणात
हातात दिला हात लाख माणसं मांडवात ।
बंधुचं लगीन मला कळलं बाजारात
मोत्याच्या मंडवळ्या मी गं बांधते पदरात ।
गाडी ग घुंगराची घेऊन बंधु आला
आगळ्या मायेनं जीव बहिणीचा वेडा झाला ।
बंधुजी पावना माझ्या घरी जिन खोगीर दिसे दारी
हावश्या बंधु माझा झाली घाई माझ्या घरी ।
जोडवी झिनकार कोणा नारीची वाजल्यात
माझ्या बाळ्याची बैल खिल्लारी भुजल्यात ।
शिवेच्या शेताईला कोणी पेरीला शाळू गहू
नटव्या माझा भाऊ जोडी बैलांची भाऊ भाऊ ।
पिकलं माझं शेत जन बोलीती चावडीला
चंग लाववावा वडीलाला ।
पिकलं माझं शेत जन बोलीती दिवाणात
लावलं बुचाडं लवणात ।
पिकलं माझं शेत जन बोलीती दिवाणात
नदी वाहीली मंदानात ।
लक्ष्मी आई आली बैलाच्या आडूयीन
माझ्या तू बाळाई धर कासरा वडूयीन ।
लक्ष्मी आई आली सोप्या येईना लाजवंती
माझ्या बैलाचे गळ्यात घुंगूर वाजल्याती ।
दुधणी गावामधी म्हणू दुधोबाची गाणी
लक्ष्मी आई आली बाळासंगट पावयीनी ।
लक्ष्मी आई आली राहिली सोप्याच्या कडयावरी
तिची नदर गोठयावरी ।
लक्ष्मी आई आली माझ्या शेताच्या बांधावरी
हात देऊन येत घरी ।
लक्ष्मी आई आली माझ्या शेताचा बांधा चढ
माझ्या बाळराजा टाक गोफण पाया पड ।
जाल्या ईसवरा तिळा तांदळाचा घास
माझ्या प्रेमयाचा नवरा मोतियाचा घोस ।
मांडवाच्या दारी हळदीबाईचा पाट गेला
माझ्या प्रेमाचा नवर्या मुलीचा बाप न्हाला ।