मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ७५

ओवीगीते - संग्रह ७५

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


नको मला दळू लागू तुझी मनगटं मऊ

कोर्‍या अंबारीला देऊ इंदूबाई ।

 

बारा सणाला येऊ नको दिवाळीला राहू नको

सांगते मी बंधु तुला वाट पहायला लाऊ नको ।

बंधु मला चोळी घेतो रुपयावरी आणा

चोळी येईना माझ्या मना दादा लेतील तुमच्या सुना ।

बंधु मला साडी घेतो पदराचा झाला बोळा

रुपये दिले साडे सोळा ।

बंधु मला साडी घेतो तिला पदर झुरमुळ्याचा

चाटी विनकर करमळ्याचा ।

सासू तू आल्याबाई तुमचं रुसणं कशापायी

बसा चौरंगी धुते पायी ।

सासू सासर्‍यांचे आशीर्वाद माज्य घेती सुना

दारी कारल्याचा वेल घरी काय उणा ।

बहिणीचा सासूरवास बंधु ऐकतो पाण्यावाटं

दोन्ही डोळ्यांनी गंगा लोटं ।

बंधु मला ग साडी घेतो चाटी म्हणतो कशाला

बंधु म्हणतो आहेराला बहिणी आल्यात माहेराला ।

बंधु मला घेतो साडी किती सांगू मी तिची गोडी

पर भावजय डोळे मोडी ।

माळ्याच्या मळ्यामंदी कवठीला कवठं दाट

मेला मुद्‌दली चावट काय तो लावतो शेवट ।

माळ्याच्या मळ्यामंदी कांदा हिरव्या पातीचा

राखन्या शिव्या देतो मेला उगरीट जातीचा ।

आंबा तू आंबराई एकच राहीली कैरी

सवतीवर दिली लेक, बाप जन्माचा वैरी ।

हौस मला मोठी जावा नंदात नांदायाची

नाव बापाचं करायाची ।

बाई भरल्या बाजारात छ्त्रीवाल्याची झाली दाटी

बंधु राहिला माझ्यासाठी ।

नदीच्या पलीकडं हिरव्या शालूची कोण जाती

माझी नणंद आक्काबाई संगं मुराळी माझे पती ।

माळीन सादविती घ्या ग बायांनो जाई-जुई

हौवशा माझा दीर वास घेणारा घरी नाही ।

भ्रताबीराचं सुख किती सांगू मी गोतामंदी

घडीच्या धोतराची केली सावली शेतामंदी ।

गण नी गोतावळ कडकडनी पोहणार

हौशा भ्रतार माझा पल्ला शेवट लावणार ।

हौस मला मोठी पतीसंगं बाजाराची

लुगडं घेतलं त्यांनी लाल लवंग घडी त्याची ।

सरकार वाडयापुढं पेटी फुटली खजिन्याची

राजस बाळायानं राणी जिंकली बडोद्याची ।

जाई मोगरा झाडाखाली कुणी निजले तालीवार

काय हवशा भरतार झोप लागली मनोहर ।

सरलं माझं दळण माझ्या मनीचं सरलं नाही

शंभर साठ ओवी गुरु दत्ताला पुरली नाही ।

सरलं माझं दळण माझ्या सुपात पानविडा

दळण संपविते नऊ लाखाचा माझा चुडा ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP