गेला माहा जीव मले भिंतीशी खुटवा
सोन्याचं पिंपळ पान मह्या माहेरी पाठवा ।
गेला माहा जीव लेका तुले घरदार
लेकी मैनाले देईन मह्या गळ्यातला हार ।
गेला माहा जीव लेका तुझे विहीर मळा
लेकी मैनाले देईन दंडातल्या येळ्या ।
गेला माहा जीव लेका तुले शेतपीत
लेकी मैनाले देईन माह्या नाकातली नथ ।
गेला माहा जीव दहन जळतं आईचं
बोलले महे दादा बरं झालं या बाईचं ।
भरल्या बाजारात इनती करते यीहिनीची
धाड एक रात लेक माझ्या बहिनीची ।
यीहीन सवंदर पाया पडे पटापटा
लेकी मैनासाठी हलका उचलला वाटा ।
आई बापा घरी लेक लयंदी नसावी
गौळण बाई सवंदर कामात असावी ।
माह्या माहेराचा बहिरोजी भेटला
सोन्याचा चुडा मह्या मनगटी दाटला ।
लाडाची लेक लाडाकोडाचा जावई
आंदन देली बाई चंदनवेलाची तीवई ।
यिठून दिसती चिंचोलीची इंद्र्गढी
जाऊचं माहेर देराची सासुरवाडी ।
काम करु करु दुखती हातपाय
माहेरी न्यावं राया सुख देईल भावजय ।
सासू हे सासरे नव जन दर
भाग्याची सवंदर लयंदी भोगते माहेर ।
लाडाची लेक राती उपाशी निजली
लाडाक्या बाईची साखर दुधात भिजली ।
लाडाच्या लेकीले हाक मारते जानका
तोडा पैंजणाचा सार्या गल्लीले झणका ।
लाडाच्या लेकीले हिले चौघजण मामा
नागन झुलते लेक मही सत्यभामा ।
लाडाची लेक मही पाटावर उभी राहे
कनयादानासाठी वाट चुलत्याची पाहे ।
लाडाच्या लेकीचं जवळ सासर
तान्हाळु गायचं हात चाटतं वासर ।
अशीलाची लेक कमशील पाइतो कसुनी
सागाच्या लाकडाची ढलपी निघाली तासुनी ।
सासरवास आला भल्याच्या लेकराले
कसा नाही घम सागाच्या लाकडाले ।