मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ७८

ओवीगीते - संग्रह ७८

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


बापाजी समींदर बया माझी ती वाहाती गंगा

माझ्या तू बंधुराया तिर्थ करु या पांडुरंगा ।

बापाजी माझा वड बया माझी ती वडाबाई

दोघांच्या सावलीची काय सांगू मी बढाई ।

बापाजी माझा वड बाई दवन्याची पेंडी

माझा तो बंधुराया नंदी देवळाच्या तोंडी ।

बापाजी माझा वड बया माझी ती त्याच्या शेंगा

माझा तो बंधुराया त्यांच्या सेवेला नंदी उभा ।

आला बंधूजी पावणा शेजी नारीला विचारिती

बंधूच्या भोजनाला घड केळीचा उतरीती ।

आला बंधूजी पावणा शेजी सांगत आली रंभा ।

बंधु माझ्या त्या भोजनाला खडी साखर पिवळा आंबा ।

आला बंधुजी पावणा सांगी निकड जायायाची

बंधु माझ्या त्या भोजनाला दुरडी येळती शेवयाची ।

गुज बोलताना घाली दिव्याला जोडवात

माझी तू भैनीबाई गुज बोलूया सारी रात ।

गूजवी बोलताना त्या का गुजला आली गोडी

वाणीच्या बंधुराया शाळू दिवस रात्र थोडी ।

आंतरीचं गुज तुला सांगते माझ्या सख्या

वाणीच्या बंधुराया चला झाडाखाली एक्या ।

गुजबी बोलताना चंद्र माडीचा आड गेला

बया माझीला किती सांगू बाई गुजचा झाडा झाला ।

बया मी म्हणू बया बया कोणाची होईयीना

बया माझ्या त्या गौळणीला सर कशाची येईना ।

नवस करु गेले माहेराच्या देवा

भाचा मुराळी मला यावा ।

लई बी झाल्या लेकी न्हाई केली हेळसांड

माझी ती बाळाबाई पित्या शेजारी पाट मांड ।

दुरुन ओळखिती काळी निळी या दोन्ही घोडी

ताईत बंधु माझ्या मामा भाच्याची आली जोडी ।

बंधुजी पावना मी का देखिला कुरणात

बयाच्या माझ्या बाळा घाली साखर पुरणात ।

बंधुजी पावना शेजी नारीला पडलं कोडं

बयाच्या बाळायाला मी का वाढीते दूध पेढ ।

दोघी आम्ही भैनी दोन्ही गांवांचे दोन खांब

ताईत बंधुराया मधी नांदतो सूर्या चांद ।

पिवळा पितांबर मला पुशीतो सारा गाव

माज्या बाईची दोनी बाळं म्यां लुटीलं बाजीराव ।

समोरल्या सोप्यां गादी टाकीती गुलमुसाची

तानी माजीबाई आली पावनी ईल्लासाची ।

समोरल्या सोप्यां हाईती चांदीच ताट पेल

माज्या बाळायाचं त्येचं मैतर पानी पेल ।

सकाळच्या पारी तांब्या येतूया अमृताचा

माज्या पित्यायाचा वाडा पुशीत समृताचा ।

बंदुजी पावईना म्या का देकीला अंगनात

झारी बुडवीली रांजनांत दिली बंदूच्या तळातांत

जिरसाळीचा रांदी भात ।

माज्या बंदुला कालवन घरच्या गाईचं दुधायात

भजी तळीते तुपायात ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP