मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ६९

ओवीगीते - संग्रह ६९

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


माझ्या ग अंगणात निशीगंध हे बांधणीला

दृष्ट झाली का चांदणीला ।

माहेराला जाते ऊंच पाऊल माझं पडे

मायबाप माझे गंगासागर येती पुढे ।

कोल्हापूर ग शहर दोन्ही बाजूला पानमळा

राजस अंबाबाई पूजा घेते तिन्ही वेळा ।

कोल्हापूर ग शहर दोन्ही बाजूंनीं तांबट

अंबाबाईच्या पूजेला नित्य चांदीचे ताट ।

दसरा दिवाळी वरषाचे दोन सण

नको करु माझ्याविण वयनीबाई ।

सासूचा सासूरवास रडवितो पदोपदी

लेक थोराची बोलेना कोणाशी परि कधी ।

चंदनासारखी देह मी झिजवीन

लेक तुमची म्हणवीन बाप्पाजी हो ।

मामाच्या रे घरा नको जाऊ कामावीण

येऊ दे बोलावणं गोपूबाळ ।

भरताच्या पाठीवर राम फिरवितो हात

बारा वरसांचे कष्ट केले दूर भाऊराया ।

भूक लागली पोटाला भूकबाई दम धर

पाण्याच्या वाटेला माझ्या माऊलीचे घर ।

जावई माझा सौदागर गुणाचे जायफळ

माझी बाई आहे लवंग आगजळ ।

सासू सासर्‍याला मैना माझी आवडली

धण्याची कोथिंबीर गुणाला निवडली ।

वाटेवरचं शेत काटया लावूनी केले बंद

अगचूर नार काय करतील भाऊबंद ।

नवतीचे नारी तुझा नवतीचा बोभाटा

पुढे चाले गाडा, मागे उडतो फुपाटा ।

माळी हाकी मोटा, माळीण देई बारं

दोहींच्या विचारांनी मळा झाला हिरवागार ।

औत्यापरीस मोटकार्‍याची आरोळी

चपळ तुझे बैल पाणी मावेना थारोळी ।

बापाने दिल्या लेकी, कणगी पाहिल्या दाणीयाच्या

भावाने दिल्या बहिणी, विहीरी पाहिल्या पाणीयाच्या ।

पाऊस नाही पाणी, गंगा कुणीकडून आली

माऊलीची माझ्या अवचित भेट झाली ।

पाऊस पाण्याची आली अगूठ रेटून

चाल माझे बाई येऊ आईला भेटून ।

पाटलाच्या मुला पाटलकी गाजवावी

तान्हया बाळासारखी रयत वागवावी ।

माझिया मळ्या नको जाऊ कळवंतणी

पुरूषावाचुनी केळी झाल्या बाळंतणी ।

अहेव मरण मला सोमवारी यावं

आता बाळा माझ्या वाजंत्री लाव ।

लावणीचा गळा नको लावू मोटवरी

डोई भाकरीच्या पाटया उभ्या नारी वाटेवरी ।

उभी राहून बांधावरी काय घेते खडाखडी

बहीण नाही भावा पाठीचा तुझ्या गडी ।

पहिल्या कामाची लेखणी माझ्या हाती

मला शिकवाया बया पंतोजी झाली होती ।

बहिण भावंडाचा कोणी झगडा सोडीना

अंतरींची माया चिखल पाण्यास सोडीना ।

जावई आपला जाऊन बसला लोकात

पोटींचा पुत्र पाणी घालतो मुखात ।

काळी चंद्रकळा चापून चोपून नेसावी

दुबळ्या आईला लेक चंचल नसावी ।

माझ्या माहेरीचा बागवान आला बाई

सातपुडी आंबा त्याची लवंगीवानी कोई ।

पाया पडल्यानं नाही कपाळ झिजत

जात्या कुळींच्या नारीला नाही सांगावं लागत ।

तुझा माझा देव एकच आहे बळी

आता माझे बाई समाईक भरु तळी ।

नागपंचमीच्या दिशी नाग निघाला खेळाया

कोण्या पापिणीनं गहू काढीले दळाया ।

जात ओढू ओढू पोटाला पडे पिळा

सासुरवाशीणीला जामीन झाला विळा ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP