भावजयीच्या बोला भावू बहिणीवरी राग
अरुण्या वनात वधली राग राग ।
भाव आपुला धाकुला भावजयी लोकाची
दोन दिडक्यात नार आणली फुकाची ।
भावजयी बाई बोलणं हंकाराचं
माज्या बंधुजीचं मन धर शंकराचं ।
भावजयीबाई नको बोलू असं उणं
भाव शंकराच्या कसं सांगू तुला गुण ।
भावजई बाई कशाची नाई आस
माया परीस भावाची मोती पवळ्यांची रास ।
भावजयी नगं करू तू असा हेवा
भाव माजा भोळा सांब सुखी ठेव त्येला देवा ।
पिता माजा वड, माता माजी वड फांदी
येवढा पिंड झाला, दोहिंच्या कड-खांदी ।
येवढा माजा पिंड माज्या बाजीच्या मासाचा
शिरी झुंबडा केसाचा माज्या मायच्या सायसाचा ।
माजी माय बाई कशी म्हणू मी वंगाळ
जल्मले तुज्या पोटी चिखलातूनी कंबळ ।
माजी मायबाई पेली तुज थान
तुज्या कुशीत जल्मले पाडस मी ल्हान ।
माजी मायबाई उपकारी काशी
नव महिने ग वजं वागवीलं डाव्या कुशी ।
तुजी निदरा मोडली माज्या जल्मल्या दिशी
दुखा सुखात झाली ग लई लई येडी पिशी ।
मायचा उपकार फेडीशी येडया जिवा
मांडीचा चवरंग नेतराचा केला दिवा ।
मायची येडी माया तुज्या सर हाय देवा
मायच्या नशिबाचा तुला वाटतोया हेवा ।
माजी मायबाई माजी साकराची पुडी
पुडीत जलमली येवळी माजी कुडी ।
सरगीच्या देवा उघड सरगीचा झोपाटा
माय गंधारी काशीचा पाहू दे मुखवटा ।
अंबारीचा हत्ती हा लुटला जाईना
भावाची सर माझ्या कोणाला येईना ।
माझं दळण ग कोण्या वाडयात रांधतं
गोकुळी सखा ग माझं माहेर नांदतं ।
ल्योक पाजे पाणी सून गंगा मधी उभी
अजून ग नाही आली लेक संसाराची लोभी ।
बापाचे उपकार फेडिते काडोकाडी
आईचे उपकार भिनले हाडोहाडी ।
दिवाळीच्या दिवशी भाऊ केला मुसलमान
हातामधी खण पत्री लिहतो सलाम ।
बाप म्हणे लेकी माझी हरबर्याची डाळ
जाशील परघरां येथे होईल तुझी राळ ।
गावाच्या खालती टांगा कोणाचा पळतो
आक्का या बाईचा पदर शालूचा लोळतो ।
आली ग लक्ष्मी आल्या वाटेनं जाऊ द्या
बाळाचं माझ्या देवघर पाहू द्या ।
येथून दिसते माझ्या माहेराची वाट
निर्मळ ग पाणी हा गंगाबाईचा घाट ।