जाईन माहेरी बसेन बाजेवरी
विसावा आपुल्या घरी मायेबाई ।
बीजेचा ग चांद घाली पहातो ग साद
ओवाळी गुण गात भाऊरायाचे ।
आम्ही तिघी बहिणी नांदू तिन्ही गावी
धाडावी खुशाली भाऊराया ।
माहेरींचा देव तुझा माझा एक
लावूं नंदादीप ताईमाई ।
घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसांत
माहेरी जा सुवासाची कर बरसात ।
सुखी आहे पोर सांगा आईच्या कानांत
आई भाऊसाठी परी मन खंतावतं ।
विसरली का ग ? भादव्यांत वर्स झालं
माहेरींच्या सुखाला ग मन माझं आंचवलं ।
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय ।
आले भरुन डोळे पुन्हा गळा दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ।
सोळा वर्षे झाली पूर्ण धाक पडतो आईला
नवरा शोधायाला लागतसे ।
हुशार जांवई मला हवासा वाटतो
पैसा मिळवतो लाखावरी ।
मुलगा पाहू जाती काय पहाता घरदार
आहे नवरत्नांचा हार दादाराया ।
मुलगा पाहू जाती काय सांगू त्याचा झोंक
लाखामध्यें एक दादाराया ।
माझी बाळी ग नाजूक जशी चमेलीची कळी
पण आहे ग सावळी मनुताई ।
नवरी पसंत हुंडयाचा काय बेत
कुजबूज ती घरात चालतसे ।
हुंडयाची अडचण तुम्ही घालावे दागिने
करणी करणे सोपें वाटे ।
मुहूर्त ठरला व्याही भोजनाला चला
मान मिळतो आईला एकदांच ।
जनांत आनंद हुरहूर मनांत
कशी दाखवूं लोकांत संकोचाने ।
मनुताई माझी बावरी कां झाली
डोळ्यांत करुणा आली वाटतसे ।
सीमांत पूजन सीमेवरी चला
आणूं जांवयाला मांडवांत ।
सासरा पाय धुवी सासुबाई पाणी घाला
पोशाख जांवयाला देऊं केला ।
विहीणीचा मान काय सांगू देणें घेणें
शालू शेले सोनें नाणें देऊं केलें ।
करवली ग रुसली तिला हवा मोठा मान
लाडकी बहीण दादारायाची ।
गुळाची गोड ढेप ठेविली पुढती
हलवा देऊनी भेटती बहिणी बहिणी ।
वाड्`निश्चय करायला व्याही आले मांडवांत
अश्रु आले नयनांत माऊलीच्या ।