सून भागेरथा टाक पलंग झाडुनी
बाळ परबत माजा उभा मंदिल काढूनी ।
वाकीच्या वाटनं कोण दिसतं एकलं
नाही धाडले मैनाले तोंड राघूचं सुकलं ।
सासरा पाटील सासू सुखाची चांदणी
याहीच्या पोटचा चांद डोलतो आंगनी ।
सासू पारबती सासरा थोया राजा
याहीच्या पोटचा गिन्यानी चुडा माजा ।
सासू आत्याबाई तुमचा पदर भिंगाचा
तुमच्या पदराखाली जोडा बाहिंगी रंगाचा ।
सासू आत्याबाई तुमचा पदर सोन्याचा
तुमच्या मिरीखाली जलमले क्रिष्ण हरी ।
सासू आत्याबाई तुम्ही तुळशीचं पान
तुमच्या हाताखाली सून नांदते मी न्हान ।
सासू आत्याबाई तुमच्या पदराले गाठी
पंढरीचं कुंकू पैदा केलं मह्यासाठी ।
सासू आत्याबाई तुमचं नेसनं फुलाचं
तुमच्या मांडीवरी राघू मैनाले बशाचं ।
सासू आत्याबाई पाया पडणं चांगलं
कपाळाचं कुंकू तुमचं पाऊल रंगलं ।
सासू आत्याबाई तुम्ही बाजवर बसा
मी भरते चुडा दाम वैराळाले पुसा ।
सासू आत्याबाई तुमचे सोनियाचे घोळ
तुमच्या घोळाखाली आमी परायाचं बाळ ।
सासु आत्याबाई नका बोलू सणासुदी
शेतामधी गेली मही सोनियाची मुदी ।
सासू आत्याबाई सारा संसार तुमचा
कपाळीचं कुंकू एवढा दागिना आमचा ।
.
लगीन पतरीका धाडिते लिहून
भाऊ भाचे माझे आले कळवातीन घेऊन ।
बाशिंगाला तुरा कोन खविती हावशी
माझ्या आनवाळ हरीची नवरदेवाची मावशी ।
बाशिंगाला तुरा कोन खविती गवळण
माझ्या आनवाळ हरीची नवर्या राघूची मावळण ।
नवर्याच्या बापा काय पहातू करनीला
सोन्याची मोहनमाळ घालू तुझ्या हरनीला ।
यीव्हाई ग्रहस्ता हुंडा मोजावा रोकड
बाळाच्या नवरीला घालू पैठणी कापड ।
यीव्हाई ग्रहस्ता हुंडा मोजिता चुकला
बाळराजसाचं माझ्या रुप पाहून दंग झाला ।