आधी गाईल बाप्पा बया मग गाईल देवा तुला
बाबा माझ्या बयानीं उदरी जागा दिला ।
सांगुनी धाडीते दूर देशीच्या जांवायाला
किड लागली शेवायाला ।
जांवयाची जात कुंपावरील दोडका
पोटीचं देऊनी झुंजतो रेडका ।
नको म्हणूं नारी जांवई माझा माझा
पोटीचं पुत्रराज लावी पिठाला बगा धजा ।
दुबळा भरितार भाजीपाल्याची आणी मोट
आतां ग माझे बाई सोड अबूला बोल नीट ।
भरताराचं सुख काय सांगती गोतांत
सोडी कंबरचा शेला करी सावली शेतांत ।
भरताराचं सुख काय सांगती जील्लट
पेटरीचा नाग घडोघडीनं उलट ।
सासू आल्याबाई बारव चित्र्याची
करीते राजी तुझ्या मी हिर्याची ।
सांगुनी धाडीते मुंबईपासुनी कलकत्त्याला
सोन्याची घुगरं बंधु माझ्याच्या अडकित्त्याला ।
सासू नि सासयीरा दोन्ही देवाच्या मूरती
दीर दाजीबा गणपती नंदा माझ्या धुरपती ।
कुंकाचा करंडा सासू पुसती सुनेला
सून सावित्रीसारखं असं दैव कुणाला ।
काय बघतो भीरी भीरी घरी चालली मारामारी
आतांच्या राज्यामध्ये नवी निघाली केसरी ।
वाटेचा वाटसरू करीतो पाणी पाणी
भाऊच्या मळ्यामधी चावर्या मोटा दोनी ।
वाटवरलं शेत माझं चिमणाबाईचं माह्यार
बंधवानी माझ्या केल्या गोफणी तय्यार ।
भाऊची कमाई बघाया गेलें काल
होती काळी माती वर उगवले मोती लाल लाल ।
भाऊची कमाई बघाया गेलें शेती
होती खाली काळी माती वर उगवले मोती ।
भाऊच्या मळ्यामधीं पिकला लसूण
उंच गेला ऊंस पाणी भरते बसून ।
पट्टीचा शेतकरी जन बोलती गावात
बंधवाच्या माझ्या राशी बुडाल्या पेवांत ।
वाटवरलं शेत आल्या गेल्याचा लिंबूर
बंधवाच्या माझ्या भाग्यवंताचा नंबर ।
सासूरवासिनी माझ्या बंधूच्या बहिणी
खांद्यावरी माळ आला वैराळ होऊनी ।
झाली सईसांज जात्या तुझी काय घीरघीर
दादाचं माझ्या आहे सई खटल्याचं घर ।
दुबळा पावळा बंधू बहिणीला असावा
भुरकी चोळी एक रात्रींचा विसावा ।
भावजयीबाई भर ओसरीचा केर
पाटील तुझे दीर सभा आली जोत्यावर ।
दिवाळी बाई तुझं बिगी बिगी येणं
भाऊ भाचीयाचं कूळ उजवाया जाणं ।
दिवाळीच्या दिवशी थाळी माझी जड जड
बाळपटी चोळीवर दंडोळीचा जोड ।