मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह २५

ओवीगीते - संग्रह २५

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


अंगडया टोपडयानं पेठ करिती झगा झगा

माझा ग बाळ तान माझा चिल्लाळ टोपीजोगा ।

कावळा कुरु कुरु त्येचा प्रचीव तुमी ऐका

बंदूजी पावईना दारी बोलल्या बाईयीका ।

हातात गोट तोडे जव्या दोव्याला नाही जागा

माझी तू बाळाबाई थोरा घरी दिली सांगा ।

हातात गोट तोडे जेवेदावे शोभा देती

लेनं तुझं गुजराती ।

माहेर मला झालं एका महिन्यात दोन

बोलल्या सया नारी अशा श्रीमंत ह्या कोन ।

सुतार कारागिरी गवंडी बसती भिंतीवरी

माझीया बंधुजीची कंठी लोळती छातीवरी ।

सुतार कारागिरी लाव तुळई तासाला

माझीया बंधुजीला करा ढिलाजी बसायला ।

माझ्या अंगणात कुणी सांडीला चुना कात

माझ्या बंधुजीचं गेलं मैतर पान खात ।

कुस्तीच्या फडावरी भल्या भल्यांच्या खाली माना

तुला बंधुजी सांगू किती विडा उचल पैलवाना ।

देवाच्या देवळात तिथ कशाची गर्दी झाली

माझीया बंधुजींनी गुंड छातीच्या वर नेली ।

लाडक्या लेकीचं नांव ठेवीलं हिरा तारा

तिला सोसना ऊनवारा ।

लाडकी म्हणूं लेक दिली सातार्‍या धरतीला

हत्ती राधाच्या वरातीला ।

लाडकी म्हणूं लेक बिजवराला ग देवूं नका

पैसा लेकीचा घेवूं नका धनी दोशाला होवूं नका ।

माया बहिणीला मागणं सारं दागीन जडावाचं

बंधुनी केली बोली गावजेवाण लाडवाचं ।

लोकाच्या लगनांत माझं धुरानं भरलं डोळं

बंधुच्या लगनांत जरी पाताळ पायघोळ ।

माहेरीच्या मळ्यात ग पुंडया ऊंसानं केली मात

माझीया बंधुजीच्या आली दौलत हातात ।

ईनाम म्हणूं गाव नाही येवढया जवाराला

आडव्या पाटाचं पाणी माझ्या माहेरच्या शिवाराला ।

सांगूनी धाडती बंधु माझ्या ग थोरल्याला

साज मागीती डोरल्याला ।

बंधु व्याही करु गेली तको भिऊंस करणीला

वीस पुतळ्या अन्‌ सरी तुझ्या घालीन हरणीला ।

पाच दुरडया रुकवत सहावी तुपाची केळी दिली

बहिण भावाची विहीण झाली ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP