मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ४

ओवीगीते - संग्रह ४

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


जात्या ईसवरा जड जाशील दाटूयीनी

तुझ्या शिनयीची आनू सौंगड कुठूयीनी ।

मोटयाचा नवयीरा काळ्या वावरी थापयीला

नवर्‍याच लई गोत सांगा नवरीच्या बापायीला ।

मोठयाचा नवयीरा परण्या निघाला दुपायीरा

बाळावरन माझ्या लिंबू नारळ उतरा ।

मोठयाचा नवयीरा परण्या निघाला झाडीतूनी

बाळ माझ्या शिवाजीला सया बघती माडीतूनी ।

नवरीचा बाप बोल तुमचं वराड का वो थोडं

नवर्‍याचा बाप बोल मामा मंडाळ गेलं पुढं ।

मांडवाच्या दारी नवरी कापली दंडाभुजा

माझी तू प्रेमिला तुझ्या पाठीशी मामा उभा ।

मांडवाच्या दारी बामन बोलतो मंगायाळ

आई बाप बोल लेकी जलम वंगायाळ ।

मांडवाच्या दारी बामन बोलतो सावधान

मामा मामींनी केलं भाचीला कन्यादान ।

जावयाला दिली पाच भांडी जेवायाला

माझी ती प्रेमिला साव्वी समई लावायाला ।

मामाच्या पंगती भाचीबाईचं सवयीळ

मामी वाढीती जेवायाला मामा बसतो जवयीळ ।

लेकाच्या लगनात हळदी कुंकवाचं बोट

बंधूच्या लगनात चोळी पातळाची अट ।

अहराचं धनी तुमी बसाना खाली वरी

बंदुचं पातायाळ मी झेलीते वरच्या वरी ।

जोंधळ्याचा पाय नको लावू तू गरतीबाई

देव गेल्याले आले नाही ।

भैनाला मागयीन आम्ही कोणाची कोण द्यावी

भैना माझ्या शामयीच्या चुलत्याची पूस घ्यावी ।

भैनाला मागयीन आम्ही कोनाची देणायार

माझ्या गं शामयाची चुलती किल्ल्याची येणार ।

माडीचा जानवस कोण पुसती हावयीशी

बाळ माझ्याची नवर्‍या मुलाची मावशी ।

माडीचा जानवस कोन पुसती यीयीना

भैना माझ्याच्या नवर्‍या मुलीची बहियीना ।

माडीचा जानवस कोन पुसती घाई घाई

माझ्या ग x x x ची नवर्‍या मुलीची आई ।

मांडवाच्या दारी हंडा शिजतो रंगायाचा

चुडयांना माझ्या व्याही मिळाला ढंगायाचा ।

मांडवाच्या दारी चरवी सांडली तेलायाची

नवरीच्या बापांनी तूळ मांडली मालायाची ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP