नागपंचमी नैवेद्य (नाग-भाऊ)
नागपंचमीच्या ग दिवशी मी ग नेसले हिरवी साडी
नाग भाऊराया मला पाठवितो ग गाडी ।
नागपंचमीच्या दिवशी मी ग भरीला हिरवा चुडा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा ।
तूच रे रक्षण करी माझ्या आईच्या गोताचा
नागा भाऊराय तुला नैवेद्य कढीचा ।
नाग भाऊराया तुला वाहिल्या मी लाह्या
तुज्या दर्शनाला आल्या शेजारच्या आया बाया ।
नागा भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा
आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा ।
देवी (कुलदैवत)
आई आंबाबाई पाव माझ्या ग नवसाला
सोनीयाचं लिंबू वाहिन तुझ्या मी कळसाला ।
आई आंबाबाई गडावरचे रतन
शोभा एवढी देती अठरा भुजाला कांकणं ।
आई आंबाबाई गडावरची पुतळी
शोभा एवढी देती अठरा भुजाला कांचोळी ।
आई आंबाबाई पाव माझ्या ग नवसाला
सर्पाचे कासरे वाघ जुंपीन गाडयाला ।
आई आंबाबाई पाव माझ्या ग नवसाला
पानांनी फुलांनी घट तुझा सावरीला ।
आई आंबाबाई तू ग तळ्याच्या पाण्या न्हाली
केस वाळवाया नारळी बना गेली ।