बंधूजी घेतो चोळी दंड भरुनी रेशमाची
शेजी विचारती भैन कुण्या या वकिलाची ।
जतन करी देवा डोंगराची झाडी
माझ्या पित्याची वस्ती वाडी ।
सासू नि सासरा हैती दैवाच्या जांवायाला
नेनंता बंधुराज जातो दिवाळी जेवायाला ।
नेनंता मुराळ्याची नको करूं तूं हार हेट
बाळ माझ्या राजसाचा कंताशेजारी मांड पाट ।
पाहुणे आले म्हणूं नंद कामिनीचे पति
सासूबाईंना विचारती सोप्या समया लाऊ किती ।
जिरेसाळीच्या तांदळाची फुलं आधणी ती झाली
चुडया माझ्यांच्या पंगतीला नंद कामिनी ती आली ।
बंधु यीवाई करुं गेली नको भीऊ तू करणीला
राम अवतारी डोरलं घालीन तुमच्या हरणीला ।
थोरलं माझं जातं नाव त्याचं हत्तीरथी
पित्या माझ्या दौलतांच्या सूना दळीती भागिरथी ।
सरलं दळान सूप झाडूनी एकीकडं
सासरी माहेरी राज्य मागती दुईकडं ।
धाकटे माझे दीर सासूबाईंचं शेंडफळ
चुडया माझ्याचं पाठबळ ।
शेवग्याच्या शेंगा ह्या का वाडयाच्या गेल्या ऊंच
सासू माझ्या त्या मालनीचा पतिव्रताचा वाडा ह्योच ।
माझ्या त्या दारामधी हाळदीकुंकवाचा सडा
पतिव्रतेचा हाच वाडा ।
आयुष्य मी मागीयीते सासूबाईच्या ग नीरी
जन्मभरी जावी माझ्या कुंकवाची चिरी ।
पोटाच्या परास ती का पाठीची मला गोडी
आक्का माझी ती बहिणाबाई बाळपणाची माझ्या जोडी ।
माहेराल जाती सर्वासहित झोळण्यात
पुत्र बंधूचा पाळण्यात ।
किती मी हाका मारु मी का मारील्या परसदारी
माझी ती बहिणाबाई राधा हसते सुंदरी ।
हात्तीच्या सोंडेवरी कुणी लावील्या ऊदकाडया
बंधु माझ्या त्या राजसाची स्वारी जातीया राजवाडया ।
सकाळच्या पारी तांब्या येतो आमरुताच्या ।
पित्या माझ्या त्या राजसाचा वाडा पुसितो समृताचा
महादेवाच्या पिंडीवर तीळ तांदूळ सगईळं
पारु माझ्या त्या गवळणीचा जोडा पिरतीमी आगळं ।
महादेवाच्या पिंडीवर तिळ तांदूळ निवडीत
माजी ती बहिणाबाई जोडी पुत्राची मागत ।