मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ७१

ओवीगीते - संग्रह ७१

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


लावणीचा आंबा ग आंबा निरगुडी फोकामंदी

ताईता बंधु माझा उभा कॉंग्रेस लोकामंदी ।

लावणीचा आंबा ग पाणी घालीते वाटी लोटी

वाणीचा माझा बंधु आंबा मोहरियासाठी ।

लावणीचा आंबा पाणी घालिते कवलानी

वाणीचा ग माझा बंधू आंबा वाढतो डवलानी ।

भाऊ म्हणे भावजयीला बहिणी आल्यात भेटाया

भावजयी म्हणे नणंदा आल्यात लुटाया ।

सुनेला सासुरवास नका करुसा सासूबाई

तुमचा हो सोनचाफा आम्ही परवक्याच्या जाई जुई ।

शितळ ग सावली ती ग बाभळी बाईची

माया ग मध्ये माया, माया वेगळी आईची ।

गुजर ग भावजयी नको उभ्याने कुंकू लावू

तुला मी ग सांगू किती साता नवसाचा माझा भाऊ ।

सूर्य कि हो महाराज लेक तुमची लाडकी

आंदण हो द्यावी मला हळद कुंकवाची पालखी ।

सुनेला ग सासुरवास हा ग कैकयीनं केला

रामाच्या ग शब्दासाठी सिता राणीनं सोसियला ।

बापानं दिल्या लेकी आपण बसेल हो सुखी

मायेला चिंता मोठी वागण्याची ।

सया ग पुसतात माझ्या माहेराची चाल

सयांना सांगू किती भावा आधी भाचा बोलं ।

ही ग लक्ष्मी आई आली, आली तशी तू जाऊ नको

भाई माझ्या राजसाला, अंतर तू देऊ नको ।

हे ग पिकलं पिकलं, जन बोलतं वेशीत

भाई माझे राजसाचे नंदी बुडाले राशीत ।

सांगते ग शेजीबाई, नको करु कला कला

बंधू माझा दारु प्याला, त्याचा उतार बंदी घाला ।

असं उन्हाळ्याचं ऊन, चैताची ग पायपोळ

भाई माझा ग राजस, हा ग सुकला रायघोळ ।

गोठ मी पाटल्याचं ओझं कोणी सोसावं

सयानं सांगू किती लेणं नाजूक कुंकू ल्यावं ।

भाऊ ग बिजे दिवशी माझ्या तबकी चंद्रहार

सयानां सांगू किती, भाऊ माझा सावकार ।

सई सासर्‍याला जाते, आडवा लागतो पानमळा

नेती पतीला वानवळा ।

नवतीच्या नारी तुझी नवती जालीम

पाण्याच्या वाटला माझ्या बंधूची तालीम ।

राग मला भारी माझ्या रागाचा धनी कोण

माझा बंधूराया आडवा झाला पहिलवान ।

दळण दळीते सूप भरुनी बाजरी

माझ्या ग बंधूचा गाडा जायाचा जेजुरी ।

आळंदीच्या वाटे कुणी पिंपरी लावली

माझ्या ग बंधूला वारकर्‍याला सावली ।

सांज सांजळली सांजबाई जरा थांब

माझा बंधूराया शेती दौलतीचा खांब ।

शिंदेशाही ही पगडी कोण्या पेठला हिंडती

माझिया बंधूला पहिलवानाला दंडती ।

हौस मला भारी उभ्या पेठेनी जायची

सांगते बंधू माझ्या, चांदी गोठाला घेयाची ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP