मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
एकविंशतितमः किरण

दीपप्रकाश - एकविंशतितमः किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनथायनमः --
येईं येईं सद्गुरुनाथा । सभा दाटली समस्त । तव बोधसुधा प्राशनार्थ । उत्सुक हे श्रोतृवृंद ॥१॥
ते म्हणती मिळतां पीयूषधार । कां सेवावा अन्नभार । म्हणोन तैसेच येती सत्वर । श्रवणार्थी ॥२॥
संत जाहले भारी भुकेले । त्वरित धांवे गे प्रेमळे । योगपीयूषाचें प्याले । देई तयां प्यावया ॥३॥
तूं देई मज भरून । मी सर्वांस अर्पीन । पहावी मम सेवा जाण । आसनीं बसुनियां ॥४॥
पाचारिता नाथसुतें या परी । आली नाथप्रभूची स्वारी । खडी ताजीम देती सारीं । श्रोतृवृंदें ॥५॥
राजाधिराज सद्गुरुराय । योगाभ्यानंद योगीराय । माधवनाथ महाराज की जय । केला पुकार नाथसुतें ॥६॥
जहाली सभा शांत । जणूं हालतीं चित्रें । मग सांगे योगीनाथ । योगांगांसी ॥७॥
करोनि विनायका निमित्तमात्र । नाथ सांगे योगार्थ । जैसा भगवद्गीतेस पार्थ । कारणभूत जाहला ॥८॥
नात म्हणे विनायका । ऐसे ते गुरुशिष्य देखा । योगांगाच्या कौतुका । सांगती ऐकती ॥९॥
आतां योगाचें तृतीयांग । जो हटयोगाचा भाग । त्या आसनाचा यथासांग । विधि सांगेन ॥१०॥
बाह्यासन आधीं करणें । दर्भासन मृगासनें । धूतवस्त्राची घडी ठेवणें । अथवा कंबलासन ॥११॥
आसन घालावें धरणीवर । जी गोमयें केली सुंदर । काष्ठ किंवा प्रस्तरावर । बसूं नये ॥१२॥
विद्युत्तेज असे धरणींत । तें आसना साह्यकारी होत । नसो कठिण वा शीत । धरणी ही ॥१३॥
घालोनि मृत्तिकेचा ओटा । यावरी आसन उपरोक्त । टाकोनि बैस स्वस्थ । सरळ रेषेंत ॥१४॥
आसने चौर्‍यांशी असतीं । त्यांत प्रमुख दोन दिसती । सिद्धासन पद्मासन निश्चितीं । तुवां घालावीं ॥१५॥
घ्यावीं टांच वाम पायाची । गुदलिंगीं जागा शिवणीची । तयाच्या मध्यभागीं साची । रेटून लावावी ॥१६॥
मग उजवा पाय उपस्थावरी । दृष्टि ठेवावी त्रिकुट शिखरीं । कंठकूपीं हनुवटी धरीं । यास सिद्धासन नाम ॥१७॥
यातें कोणी म्हणती वज्रासन । कोणी वदती गुप्तासन । हें मोक्षाचें आसन । सिद्ध असे ॥१८॥
शरीर राहे सरळ । श्वास न होती उच्छृंखल । विषय - वासनाही प्रबळ । होत नाहीं ॥१९॥
पद्मासन हें द्वितीयासन । दक्षिण मांडीवरी वाम पाउल जाण । वामीं दक्षिण पाउल स्थापन । करावें गा ॥२०॥
दृष्टि हनुवटी सिद्धासनीं । तैसीच ठेवी तूं मनीं । ऐसी पद्मासनाची करणी । बद्धपद्मासन दुसरें ॥२१॥
घालावें पद्मासन । न्यावा दक्षिण कर पाठीमागून । दक्षिण पायाचा अंगुष्ठ जाण । धरीं कारांगुष्ठें तर्जनीनें ॥२२॥
तैसाचि वामकरें वामांगुष्ठ । तुवां धरावा उचित । या आसनें वांकुडी पृष्ठ । होत नाहीं ॥२३॥
पद्मासन हें उत्तम आसन । करी व्याधीचें हरण । चित्ताचें करी नियमन । पूर्णपूणें ॥२४॥
श्रीगुरुमाउली जें दाखवील । तेंचि आसन होईल सफल । आतां प्राणायाम हें चतुर्दल । योगपुष्पाचें ॥२५॥
प्राणवायूसी करावें वश । हाचि प्राणायामाचा उद्देश । तयाचा दोन प्रकारें प्रकाश । सबीज आणि अबीज ॥२६॥
ज्यांत असे मूर्तीचें ध्यान । आणि गुरूपदिष्ठ मंत्रानुष्ठान । त्यास सबीज हें नामाभिधान । अथवा सगर्भक ॥२७॥
जेथें नसे जप ध्यान । तो अबीज प्राणायाम जाण । प्राणापानाचें करणें निरोधन । यांही म्हणती प्राणायाम ॥२८॥
प्राणानें अपानाची गती । निरोध करणें त्या रेचक म्हणती । अपानें प्राणास कुंठिती । तया पूरक ॥२९॥
जेथें द्वय प्राणांचा निरोध । तयास कुंभक हा बोध । आतां तयाच्या कृतीचा बोध । करून दावीन ॥३०॥
दक्षिण नाकपुडीवरी अंगुष्ठ । ठेवावा आधीं बळकट । मग वाम नासापुटी निश्चित । ओढावा श्वास ॥३१॥
करांगुली अनामिकेनें । तीहीं नासापुटी दाबणें । वायूतें स्थिर करणें । हृदयीं आपुल्या ॥३२॥
मग वामनासापुटी तैसीच ठेवुनी । दक्षिणे वायु द्यावा सोडुनी । मग पुनरपि तियेनेंच श्वान घेउनी । द्वारें बंद करावी ॥३३॥
वायु स्थिर करोनी सोडणें । हा एक प्राणायाम जाणे । ऐसा चार कालीं करणें । प्राणायाम ॥३४॥
श्वास घेणें यातें पूरक । स्थिर करणें या कुंभक । श्वास सोडणें यातें रेचक । म्हणती साधु ॥३५॥
यांत रेचकाचे महत्व फार । तो शनैः सोडीं कुमरा । न थांबतां करावा फार । पूरका भय नाहीं ॥३६॥
आतां या श्वासोच्छ्वासाचें प्रमाण । चार मात्रांचा पूरक जाण । षोडश मात्रीं कुंभक करून । अष्टमात्रेनें रेचक ॥३७॥
ॐ या अक्षरातें एक मात्रा । म्हणती योगीजन सुता । ऐसा करावा न चुकतां । प्राणायाम ॥३८॥
पांच प्राणायामांपासून । तूं करी प्रारंभ पूर्ण । सप्ताहीं दोन वाढवून । न्यावा चाळीसपर्यंत ॥३९॥
या प्राणायामाचे प्रकार । आठ मुख्य असती साचार । सूर्य भेदन उज्जायी सीतकार । भस्त्रिका भ्रामरी ॥४०॥
सातवा मूर्च्छा आठवा प्लाविनी । सूर्यभेदाची पूर्व कथिनी ।जी सांगितली प्राणायाम किरणीं । तीच जाणिजे ॥४१॥
उज्जायी प्राणायाम करणें । प्रथम नासापुटी न दाबणें । दोन नासिकें श्वास घेणें । मग करणें कुंभक ॥४२॥
मग दक्षिण बाजू दाबुनी । सोडावा वामपुटीनें । पुनरपि तैसीच कृती करणें । सव्यापसव्य ॥४३॥
आतां सीत्कारी लक्षण । जीव्हेची करावी पन्हाळ जाण । निज ओष्ठीं ती ठेवून । श्वास आंत घ्यावा ॥४४॥
मग करावा कुंभक । द्वय नासापुटीनें करावा रेचक । मुखानें करिता रेचक । बलहानि होय ॥४५॥
जैसी पक्ष्यांची चंचू असे । करावे ओष्ठ आपण तैसें । किंवा बाल वाजवी शिट्टी जैसी । तैसी नलिका करावी मुखाची ॥४६॥
जिव्हा दंतीं धरोनी । श्वास घेणें पूरक विधीनें । सीतकारीसम करावी करणी । या नांव शीतली ॥४७॥
भस्त्रिकेचे बहुत प्रकार । जो सांगेल गुरुवर । दावितों येथें एक थोर । जो नित्याचा ॥४८॥
निजमुख बंद ठेवून । करावें प्राणाचें चालन । जैसा लोहार भाता चाले वेगानें । तैसे श्वासप्रश्वास करावे ॥४९॥
श्रमतां करावा कुंभक । पुनरपी रेचक । मग प्राणाचें चालन नियामक । करावें गा ॥५०॥
भ्रमर करी जैसा शद्व । तैसाच पूरकी रेचकीं अनुवाद । सावध राहोनि मंद मंद । मग सूर्य भेदनापरी ॥५१॥
या नांव भ्रामरी प्राणायाम । आतां मूर्च्छा प्राणायाम । जया शांभवी षण्मुखी नाम । योगीजन ठेविती ॥५२॥
कर्णीं अंगुष्ठाचा बंध । मध्यमें नयन सबंध । अनामिकें नाकपूड बंद । करावी गा ॥५३॥
मग एकेक नाकपुडी सोडुनी । पूरक रेचक करावे पूर्व कथनीं । आतां शेवटचा प्लाविनी । प्राणायाम सांगेन ॥५४॥
घालोनिया मच्छासन । करावे पूरक रेचक जाण । भृकुटीस्थानीं दृष्टी ठेवून । व्हावें निश्चल ॥५५॥
सूर्यभेदन करी कृमीरोग नाश । उज्जायी घालवी कफास । सीत्कारी शीतली नाशिती आळस । तृषा घालवी ती ॥५६॥
भस्त्रिकेनें गुल्फ जाई । कुंडलिनी ही जागृत होई । परी सद्गुरु सन्निध राही । तरी करणें ॥५७॥
भ्रामरी देई आनंद । मूर्च्छा ऐकवी अनाहत नाद । सहजसमाधीचा छंद । पूर्ण करी हा ॥५८॥
प्लाविनीपूर्ण जो नर । जलदेवाचा प्रियकर । कमळापरी अधर । राहे जलाशयीं ॥५९॥
प्राणायामाचे शुभाशुभ काल । आतां सांगतों वेल्हाळा । जेव्हां होई मन विशेष चंचल । तेव्हां वर्ज्य करावा ॥६०॥
बहु क्षुधा बहुत तहान । किंवा विशेष भोजन । निद्रेनें वेष्टितां पूर्ण । प्राणायाम न करिजे ॥६१॥
नासापुटिका बंद असती । किंवा देहास कष्ट बहुत होती । ज्वरादिक पीडा करिती । तैं प्राणायाम वर्ज्य ॥६२॥
स्त्रीपुत्रांची गर्दी भवती । अशौचकालीं बद्धकोष्ठीं । दुर्गंधीच्या स्थलीं निश्चितीं । प्राणायाम वर्ज्य ॥६३॥
गुरुपदिष्ट कोणी असेल । त्या सन्मुखीं विशेष फल । असावी जागा निर्मल । या क्रियेसी ॥६४॥
प्रातःकाळ मध्यानकाल । सायं मध्यरात्रीचा काल । मन सुप्रसन्न राहील । तेव्हां क्रिया करावी ॥६५॥
जैसीं गृहींची इतर कार्यें । तैसा प्राणायाम नोहे । स्वयंस्फूर्तीनें करावें । कार्य ऐसें ॥६६॥
प्राणायामाचे मदतनीस । बंध मुद्रा असती विशेष । मूल जालंदर उड्डीयान खास । महाबंध महावेध ॥६७॥
तेंवी मुद्रा सहा असती । खेचरी भूचरी अगोचरी सती । महामुद्रा विपरीत करणी ती । वज्रोली सहावी ॥६८॥
अपान वायू ओढणें वरती । यास मूलबंध म्हणती । तों प्राणासवें उर्ध्वगती । करून जाई सुषुम्नेंत ॥६९॥
कंठकूप हनुवटी ठेवणें । दृष्टी उफराटी करणें । भ्रूमध्य प्रदेशीं पाहणें । यांस जालंदर । म्हणती ॥७०॥
उदर मेरूदंडाकडे नेणें । हे उड्डीयानाचें लक्षण । महाबंध महावेध सांगणं । प्रत्यक्ष ठीक ॥७१॥
मूलबंधें अपान उर्ध्व होई । जालंदरें ईडा पिंगळा स्थिर राही । भृकुटी स्थानीं विश्रांती घेई । उड्डीयान जाई सुषुम्नेंत ॥७२॥
प्रानयामासि हे त्रिबंध । अवश्य करावे सिद्ध । पूरककालीं मूलबंध । कुंभकी जालंदर ॥७३॥
रेचककालीं उड्डीयान । करितां होई मल हरण । सद्गुरुची ठेउनी आठवण । करावे गा ॥७४॥
आतां सहा मुद्रा कथिल्या । परि त्यांत खेचरी आगळा । तियेचा महिमा अनुभवाला । अनुभवितां येई ॥७५॥
आपुली जिव्हा वळवुनी । पडजिभेच्या छिद्रांतुनी । नेउनी ठेवणें भृकुटिस्थानीं । या नांव खेचरी ॥७६॥
जिव्हेच्या खालची शीर । या कृत्या आडवी फार । श्रीसद्गुरुहस्तें छेदन करी । तीक्ष्ण शस्त्रानें ॥७७॥
मग हिरडा आणि सैंधव । तयाचें चूर्ण करी राया । पडजिभेवरी घासुनिया । करी जिव्हा लांब ॥७८॥
मग सप्ताहानंतर । पुनरपि लावावें शस्त्र । चूर्ण घर्षण नित्य । करावें गा ॥७९॥
ऐशा कृतीनें पडजिभेचा । मार्ग होईल मोकळा साचा । मग चालन दोहनाचा करावा प्रकार ॥८०॥
अंगुष्ठें तेंवीं तर्जनीं । आपुली जिव्हा धरूनी सव्यापसव्यीं फिरविणें । या नांव चालन ॥८१॥
अंगुष्ठ द्वयें आणि तर्जनीनें । आपुली जीभ ओढणे । जैसें गोस्तनांतुनी दुग्ध काढणें । या नांव दोहन ॥८२॥
ऐसा क्रम करितां सहा मास । न ठेवितां संशयास । अथवा विपरीत कृतीस । ही क्रिया सिद्ध होई ॥८३॥
जिव्हा इतुकीं लांबेल । ती हृदयावरीही खेळेल । भृकुटी मध्यावरी रमेल । एकचित्तें ॥८४॥
भृमध्याची बाजू वाम । ज्यास चंद्रस्वर म्हणती पुरूषोत्तम । तेथून रस वाहे अमृतोपम । तो चाखी सूर्यस्वर ॥८५॥
त्यायोगें मानवी जीव । भोगी दुःखें सर्व । जर्जर होई तयाचा देह । सूर्यस्वरें रस चाखितां ॥८६॥
म्हणोनि नित्य योगीवर्या । त्या स्थानीं ठेवुनी जिव्हा । अमृताचे घोट अपूर्व । प्राशन करीं ॥८७॥
करितां या अमृताचें पान । योगी विसरे भूक तहान । इच्छामरणी होई जाण । भीष्मासम ॥८८॥
त्या न बाधिती सर्प विखार । व्याघ्र सिंहही होती स्थिर । शस्त्राचाही उपाय थोर । न चाले तया पुढें ॥८९॥
तयाचें न होई वीर्यस्खलन । तो ऊर्ध्वरेता जाण । कोणी करूं शकेना छळण । योगींद्राचें ॥९०॥
या क्रियेनें कुंभक प्राणायाम । सहज सिद्ध होई उत्तम । नसे सायासाचें काम । दाबणें वा सोडणें ॥९१॥
जैसा नक्षत्रामाजीं चंद्र । सागरामाजीं क्षीरसमुद्र । किंवा देवामाजीं विष्णु सिद्ध । तैसी खेचरी ॥९२॥
सर्व मंत्र बीजांत ॐकार । काम अवस्थेंत उन्मनी सुखकर । खेचरी सर्वांहुने थोर । आहे पुत्रा ॥९३॥
महामुद्रेनें क्षयाचा नाश । विपरीत करणी दे यौवनास । वज्रोलीनें बिंदु नाश । होत नाही कदापी ॥९४॥
भूचरीं अगोचरीनें दिव्य दृष्टी । प्राप्त होई साधकाप्रती । ऐशा मुद्रांचे फळ निश्चितीं तुज सांगितलें ॥९५॥
तुज खेचरी वाटेल कठीण । सर्व क्रियांची ती जननी । एक निश्चय ठेवितां मनीं । साध्य होय ॥९६॥
विनायका तूं निश्चयीं भक्त । गत जन्मींचा योगभ्रष्ट । खेचरीस्तव जन्म प्राप्त । तुज जाहला ॥९७॥
सोडुनी देईं सर्व भीती । या क्रियेंतचि तव उन्नति । तुझ्या तळमळीची होईल शांती । खेचरीनें ॥९८॥
कष्ट भोगल्यावांचून । कांहीं न मिळे धन । मग कष्टावीण गुप्त धन । कैसें मिळावें ॥९९॥
तुम्ही स्त्रीपुत्रास्तव । किती सोशितां दुःखें सर्व । तितुकें कष्ट करितां हें कार्य । नाहीं दुष्कर बाळा ॥१००॥
जन म्हणती अति परिचय । हा नाशासी कारण होय । परि संसृति पाशाचा वीट । नये कदा काळी ॥१॥
मज असती पुत्र बहुत । परि या क्रियेसी तूंच सत्पात्र । सोडूनि देई बारा पंथ । करी एक खेचरी ॥२॥
आतां कोणी प्राणायामास । म्हणती श्वासोछ्वासाचा अभ्यास । परि तयांचा संबंध बहूतांशी । थोडा असे ॥३॥
प्राणायामाचीं जी साधनें । तयाचे श्वासोछ्वास जाणे । प्राणायाम म्हणे नियमन । प्राणतत्वाचें ॥४॥
या विश्वाच्या मुळाशीं दोन । एक आकाश आणि प्राण । तयांच्या संयोगेकरून । विश्व उदया येई ॥५॥
आकाश हें तत्व सर्व स्थलीं । स्थिरचरांतरीं वस्ती केली । परि प्राणशक्तीनें पातली । दृश्यता तया ॥६॥
सर्व सामर्थ्याचें अधिष्ठान । ही प्राणशक्ती असे जाण । ती साध्य होतां सकल संपन्न । होई साधक ॥७॥
ज्यांनी प्राणतत्व जिंकिले । तेचि ईश्वर झाले । तयांच्या पुढें उभे सगळे । हात जोडोनी ॥८॥
तो होईल सर्व सत्ताधारी । सृष्टीचा पाळणा करी । चंद्र सूर्य हे चेंडू करीं । घेवोनी खेळेल ॥९॥
देईल मृतांते जीवित । पितरांतें आणील मूर्तिमंत । रिद्धि सिद्धि पाणी भरीत । राहतील तया घरीं ॥११०॥
तो घेईळ रूपे अनंत । किंवा होईल रूपातीत । तो केवळ विश्वनाथ । जाण बाळा ॥११॥
प्राणायाम अभ्यास करितां । प्राणापान होती आकुंचित । तयांच्या जोरानें निश्चित । जगदंबा जागी होय ॥१२॥
ती कुंडलिनी जागृत होय । मग जगाचें पटल दूर होय । सृष्टीही आपुलें हृदय । प्रगट करील ॥१३॥
ती कुंडलिनी जागृत होऊन । सुषुम्नेवाटें करील षट्चक्रभेदन । सर्व देवता प्रत्यक्ष बघून । जाईल्ल ब्रह्मरंध्री ॥१४॥
कुंडलिनी करावी जागृत । हेंच योग्याचें उद्दिष्ट । भजानानंदीं होता सदोदित । ती देवी होई चंचल ॥१५॥
परि ते कार्य बिकट। म्हणोनी धरी योगपंथ । कुंडलिनीचा प्रभाव । वर्णू न शके ॥१६॥
कुंडलिनी होता अस्थिर । करील अतर्क्य प्रकार । त्यास जन म्हणती चमत्कार । परि ते चमत्कार नव्हती ॥१७॥
तो योगींद्र घेईल दुजाचा आजार । विभूतीनें करील दुःख दूर । पाहील सर्वांचे अंतर । परि तो चमत्कार नव्हें ॥१८॥
तो पृथ्वीमाजी संचार । होईल अंतरीचा सूत्रधार । पाळील भक्तांचा भार । तो चमत्कार नव्हे ॥१९॥
विजेची ज्योत शहरांत । पाही एक खेडवळ खचित । तेलबत्तीवीण दिसतां प्रदीप्त । म्हणे त्या चमत्कार ॥२०॥
तैसा अनभस्ता वाटेल चमत्कार । परि तो योग्याचा विहार । तूं मोहूं नको चमत्कार । म्हणोनिया ॥२१॥
आतां प्राणाच्या सूक्ष्म आधारीं । कोणी वशीकरणाची करिती चोरी । परि ती अधोगतीची वारी । जाण बाळ ॥२२॥
ते केवळ भोंदूजन । करिती दुसर्‍याचें दुर्बल मन । आपणही उलथे पडून । दुसर्‍यास पाडिती ॥२३॥
जो स्वयेंच निर्बल । तो दुसर्‍या कैसा करील सबल । ऐशा भोंदूच्या जवळ । राहूं नये ॥२४॥
हे परमार्थ मार्गी वीस पाय । तव पायां करितील अपाय । तिकडे दृष्टीहि न जाय । ऐसा राहे बालका ॥२५॥
विषयेंद्रियें करूनि निवृत्त । आत्मारामी करावी स्थित । यासी प्रत्याहार म्हणती संत । पांचवे अंग ॥२६॥
जैसा कूर्म आपुले हस्तपाय । संकोचित करूनी आंत घेई । तेंवि निवृत्त इंद्रियें करणें पाही । तोचि प्रत्याहार ॥२७॥
जें काहीं आहे दृश्य । त्याचा होईल नाश । ऐशी भावना ठेवितां विशेष । प्रत्याहार साधेल ॥२८॥
प्राणायामें वायू वश करावा । प्रत्याहारे जिंकावें इंद्रिया । ती ईशचिंतनी ठेवणें या । नाम धारणा असे ॥२९॥
जैसा अग्नि जाळी तृणास । तेवी प्रभू करी पातकांचा नाश । म्हणोनि चित्त जडवावें तत्पदास । या नाव धारणा ॥१३०॥
जैसा ओळखितां तस्कर । अनर्थ न होऊं देई नर । तेंवी ओळखून मनाचा बाजार । जडवावें धारणी ॥३१॥
ज्यास ज्ञानीजन संत वंदिती । तीच परमात्मयाची मूर्ती । त्याच ठिकाणी सर्व शक्ती । वास करी ॥३२॥
तीच श्रीविष्णूची मूर्ती । ऐसी दृढ भावना धरूनि चित्तीं । गुंगवावी आपुली वृत्ति । धारणा तीस म्हणती ॥३३॥
आता धारणेचें लक्षण । पुढें कोणते घ्यावें सगुण । येथे श्रीविष्णूचें ध्यान । तुज सांगतों ॥३४॥
नाभिस्थानींचें कमल । करावें प्राणायामें प्रफुल्ल । त्यावरी विश्वमूर्ति ठेवी अचल । श्रीविष्णूची ॥३५॥
कमलावरी उभा राहे । नेत्ररत्ने झळकती पाहें । भृकुटी चापासम गोलाकार आहे । विशाल भालही शोभतें ॥३६॥
ओष्ठ असती गुलाबासम । नासीक चंपककलिकेसमान । कर्णी कर्णभूषणें सगुण ब्रह्म । शिरी मुकुत साजरा ॥३७॥
हृदयी श्रीवत्सलांछन । उदर जयाचें लाटेसमान । चतुर्बाहू शंख चक्र गदा जाण । पद्म चवथे ॥३८॥
नेसला पीत पीतांबर । नील नभाअम शरीर । स्फटिकापरी प्रभा सुंदर । फांकली जयाच्या भंवती ॥३९॥
तोचि मी भगवान । ऐसे करावे अभेद चिंतन ही सिद्ध होता धारणा । मग भूषणाविणें चिंती ॥१४०॥
तदुपरी एक अवयवीं जाणा । करावी दृढ धारणा । मग साक्षात् प्रभु देईल दर्शना । तेंच तुझें ध्यान ॥४१॥
ऐसी पूर्ण होतां ध्यानावस्था । मग ध्यान ध्येय विसरे ध्याता । तीच समाधी तत्वतां । जाण बाळा ॥४२॥
या समाधीचे प्रकार दोन । संप्रज्ञात असंप्रज्ञात जाण । प्रथम संप्रज्ञात समाधि लक्षण । तुज सांगेन ॥४३॥
संप्रज्ञात समाधीतें सविकल्प म्हणती । जेथें ‘ मी ’ ‘ तूं ’ ची जाणीव नुसती । सात्विक अहंकाराची ज्योती । जेथें थोडी तरी असे ॥४४॥
या समाधीचा भक्त । न होई गा पूर्ण मुक्त । तो होई अष्टसिद्धींचा पति । म्हणोनिच भीति ॥४५॥
अणिमा लघिमा गरिमा । महिमा प्राकाम्या । ईशित्व सप्तमा । आठवी कामवसायित्व ॥४६॥
अणिमेनें होतें सूक्ष्मरूप । लघिमेनें होई कार्यास रूप । गरिमा पर्वतासम जडरूप । होऊनि राहे ॥४७॥
महिमा चंद्रमंडलाही स्पर्श करी । प्राकाम्या संकल्पसिद्धी करी । ईशित्वा सर्व शरीर अंतरीं । स्वामिनी होय ॥४८॥
वशित्व सिद्धी वरचढ मोठी । जिच्या आज्ञेनें प्राणिमात्र वागती । करी योगियाची सर्व इच्छापूर्ती । कामावयायित्व सिद्धि ॥४९॥
ऐशा सिद्धी हात जोडती । स्वामी आज्ञा करावी असें विनविती । त्यातें वश होतां निश्चिती । अधोमर्ग मिळे साधका ॥१५०॥
म्हणोनी सविकल्प समाधींत । साधक न होती मुक्त । मुक्तीस्तव निर्विकल्प उचित । जिला असंप्रज्ञात म्हणती ॥५१॥
हीच समाधी सर्वश्रेष्ठ । करी विनायका तूं प्राप्त । आतां सहज समाधीची वाट । तुज दावितों ॥५२॥
अखंड नाम संकीर्तन । अंतर्बाह्य करी मन । जागृती स्वप्न सुषुप्ती तीन । अवस्थांत नामघोष ॥५३॥
त्या समाधीची गोडी । न सांगतां येई शब्दीं । जैसी मुक्यानें भक्षितां रेवडी । गोडी तयासीच कळे ॥५४॥
हीच योगींद्राची निद्रा । भोगिती दिव्यशा आनंदा । तूर्यावस्थेची शय्या सदा । येथेंच करी योगींद्र ॥५५॥
याच आनंदाचा रस । तुकोबानें चाखिला विशेष । पार नसे सहज समाधी सुखास । परि ती कठिण गा ॥५६॥
ऐसीं योगाचीं अंगें आठ । सांगितली यथार्थ । त्या शिष्यानें गुरुपदिष्ट । साधिला योग ॥५७॥
तैसा तूंही विनायका । साधीं योगकौतुका । तुज देतों खेचरी देखा । आवडीनें ॥५८॥
विनायक विनवी सद्गुरुला । किती कठिण द्या क्रियेला । मी करीन गा भक्तवत्सला । निश्चयानें ॥५९॥
मज सांगा पंचाग्नीनें । देहाचें चर्म जाळणें । मी जाळीन ध्येयाकारणें । सद्गुरुराया ॥१६०॥
कैसेही सांगा कठिण व्रत । सोडोनि आशा जीवित । तें करीन होऊन निर्भ्रांत । योगीराया ॥६१॥
नाथ प्रसन्न जाहला । तूं यमनियम गड उल्लंघिला । आतां तुज वेल्हाळा । देईन खेचरी ॥६२॥
खेचरी क्रिया घेई विनायक । तों आला वली बालक । नाथ म्हणे हा तुझें सख्य । करील गा ॥६३॥
तुम्हां दोघांचे मार्ग भिन्न । परि एक्याच स्थलीं नेईन । तुम्हीच माझ्या हृदयाचें स्थान । भक्तरायांनो ॥६४॥
मग कांहीं दिवसांनंतर । विनायका दिधला बस्ति प्रकार । ती कथा ऐका साचार । श्रोतृजनहो ॥६५॥
नाथ म्हणे शौचद्वारांत । प्रत्यक्ष वसे गणेशमूर्त । तिचें दर्शन घेतां नित्य । कार्यसिद्धि त्वरित ॥६६॥
तुज दावीन मी पुत्रराया । तुज दावीन मी पुत्रराया । म्हणोनि विनायका घेऊनिया । जाती गांवाबाहेर उभय । गुरुशिष्य ॥६७॥
नाथ म्हणे मी विधी सारून । तुम्हां करीन पाचारण । तों देखिले भुजंग दोन । नाथाजवळून गेले ॥६८॥
पाहिलीं दोन तीन स्थलें । तों तेथेंही दुसरे सर्प देखिलें । मग गांवामाजीं देखिलें । जुनेसें गृह ॥६९॥
तेथें सारिला विधि गोविंदें । पाचारिलें वाजवुनी भांडें । जातां विनायक सद्गुरुकडे । देखिला महाभुजंग ॥१७०॥
नाथ वदे त्या भुजंगासी । जाऊं देई मम बाळासी । तों त्वरित गतीनें मार्गासी । मोकळें करी भुजंग ॥७१॥
नाथ म्हणे भुजंगा वाटे । मज कोणी येईल छळायातें । म्हणोनि धांवले येथें । पुनरपि गा ॥७२॥
दाखविली गणेश क्रिया । तैसी करी विनायकराय । साधिलें बस्ती कार्य । अपूर्व या भक्तोत्तमें ॥७३॥
नाथसुताचें भाग्य मोठें । विनायकाच्या गणेशमूर्तीतें । दाखविलें मज सद्गुरूनाथें । कळकळीनें ॥७४॥
विनायक भक्त थोर । तयाचा निश्चयही थोर । मग तो केंवी न मिळविणार । श्रेष्ठपद ॥७५॥
विनायक स्वयेच शुद्ध । तयाची वृत्ति विशेष शुद्ध । आचारही महाशुद्द । सर्व कालीं ॥७६॥
विनायक नसे कपटी । जशी बाहेर तशी अंतर्वृत्ति । किती सांगावी तयाची महती । वारंवार ॥७७॥
विनायकाची सद्गुरुभक्ती । अचल तेंवी अनन्यगति । सद्गुरुवांचुनि त्रिदेवही चित्ती । कधीं आणीना ॥७८॥
सद्गुरु त्याची माउली । सद्गुरु त्याची साउली । सद्गुरुवीण कदाकाळीं । अन्य भजेना ॥७९॥
सद्गुरुनें दाखविली क्रिया । तयावरीच दृढ निश्चया । होवो अनेक क्लेश देहा । परि सोशी आदरें ॥१८०॥
आला होता महायोगी एक । त्यानें पाचारिलें विनायका । म्हणें तूं करिसी खेचरी देख । परि त्यां चूक असे ॥८१॥
येरू म्हणे मज गुरु - आज्ञा प्रमाण । न कळे युक्तायुक्त खूण । नको आपली शिकवण । माझा गुरु समर्थ असे ॥८२॥
जरी आला प्रत्यक्ष परमेश्वर । तरी मज नको कांहीं वर । माझा सद्गुरु योगेश्वर। सर्व मज देई ॥८३॥
एकदा विनायक मंदिरीं । येई नथ प्रभूची स्वारी । गुरूरायासी दुग्धाची आवड भारी । म्हणोनि आणी एक महिषी ॥८४॥
परि ती अवचित दुग्धहीन झाली । विनायक सांपडे चिंतानलीं । जाई भक्तिणीकडे मूर्ती बावळी । जिच्या संचार क्षुद्र देवाचा ॥८५॥
विनवी देवी मरीआई । माझी म्हैस आटली पाही । ती म्हणे सिंदूर लिंबू लवलाही । आण बाळा ॥८६॥
साहित्य घेउनी आला तिचे घरीं । समर्थे जाणीलें अंतरीं । आपणही जाती सत्वरी । तया ठायीं ॥८७॥
विनायका हें काय करिसी । आणि गा तुझी महिषी । पाही दिव्य दृष्टीसी । तो दुग्ध पायले ॥८८॥
विनायक बहु अहिंवहला । तुम्ही कष्ट न ह्यावे दयाळा । म्हणोनि गोंधळ सगळा । केला नाथजी ॥८९॥
परि तूं माझी आई । कष्ट हेच सुख तुज पाही । आलीस येथे लवलाही । क्षुद्रही कार्या ॥१९०॥
म्यां अनेक प्रत्यत्न केले । र्ते सर्वही विफल झाले । तव दृष्टेनें दयाळे । कान न होई ॥९१॥
विनायकाचा इंद्रियनिग्रह । ऐकतां होईल शून्य हॄदय । भार्या केवळ जिजाई माय । त्रस्त करी ॥९२॥
भजनीं बैसला असतां पति । म्हणे चलावें गृहाप्रति । नाहीं धान्य चिमटी । आधी आणावें ॥९३॥
हंसुनि म्हणती हे तुकाराम । आजी एकादशी उत्त । तों तों सचीचा त्वेश परम । वाढत जाय ॥९४॥
स्त्रीसंग करी स्त्रियेस्तव } परि न होऊं दे बिंदुक्षय । कामासवें झुंजनि जय । म्हणवी हा संकर ॥९५॥
विनायक क्रिया न करितां । झाला केवळ ऊर्ध्वरेता । धन्य तयाची सद्गुरु देवता । जी करी निर्विकारी ॥९६॥
करोनि अट्टाहास पूर्णपणें । खेचरी साधिली तयानें । अम्रुतरसाचे घोट घेणें । रुचे तयातें नित्य ॥९७॥
झाला इतुका सिद्ध । परि गुरुभक्ति राहे अखंड। जेथें ऐंसी गुरुशिष्य जोड । तेथें फल्कां न यावें ॥९८॥
विनायकाची पत्नी सती । सोडूनि जातां इहलोका प्रती । वाटला हर्ष चित्तीं । म्हणे आतां मुक्त झालों ॥९९॥
विनायका न स्पर्शे खेद । सदा सेवी आनंद । तयाचे लिहिता सर्व छंद । ग्रंथ विस्तारेल ॥२००॥
पुढील किरणीं श्रीनाथ । जाईल नंदिग्रामांत । गेथेंही करील पुनीत । भक्त वासुदेव ॥१॥
या किरणाचें करितां चितन । भेटेल सद्गुरु भगवान । पाजील योगामृत हर्षून । निश्चयें सांगे नाथसुत ॥२०२॥
इति श्रीमाधवनाथदीपप्रकाशेनाथसुतविरचिते अष्टांगयोगवर्णनं नाम एकविंशतितमः किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP