मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश| पंचविंशतितम किरण श्री माधवनाथ दीपप्रकाश अनुक्रमणिका आभार प्रथम किरण द्वितीय किरण तृतीय किरण चतुर्थ किरण पंचम किरण षष्टम किरण सप्तम किरण अष्टम किरण नवम किरण दशम किरण एकादश किरण द्वादश किरण त्रयोदश किरण चतुर्दश किरण पंचदश किरण षोडश किरण सप्तदश किरण अष्टादश किरण एकोनविंशति किरण विंशतितम किरणः एकविंशतितमः किरण दीपप्रकाश -द्वाविंशतितम किरण त्रयोविंशतितम किरण चतुर्विंशतितम किरण पंचविंशतितम किरण षड्विंशतितम किरण सप्तविंशतितम किरण अष्टविंशतितम किरण नवविंशतितम किरण त्रिंशत्तम किरण एकत्रिंशत्तम किरण द्वात्रिंशत्तम किरण त्रिस्त्रींशतितम किरण चतुस्त्रिंशतितम किरण पंचत्रिंशतितम किरण दीपप्रकाश - पंचविंशतितम किरण Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India. Tags : granthamadhavanathmarathiग्रंथमराठीमाधवनाथ जयपुर स्वागत कथन Translation - भाषांतर श्रीसद्गुरुनाथायनमः -- सद्गुरुनाथें दिलें अभिवचन । परी येईना प्रभु अजून । रूचेना चित्ता त्यावीण । कोठें कांही ॥१॥घालोनी आंगरखा रूमाल । गळा अंगवस्त्र फिरविलें । कर्णींची हालतीं कुंडलें । ऐसा कैं देखेन ॥२॥चालण्याची घाई मोठी । सदा आनंदीं तल्लीन वृत्ती । कुणा वाटे चक्कर येती । प्रभूराया ॥३॥मुखावरीं शोभें मंदहास्य । ऐकुनी बोल चित्तीं उल्हास । भक्तांतरीं अतुल प्रकाश । करी गुरु भास्कर ॥४॥पायीं नच पादुका वा उपानह । असो भूमि उष्ण तेवीं कंटकमय । परी तैसाची चालून जाय । भक्तरक्षणीं ॥५॥आतां न येतां श्रीनाथ । करीन नंद्रिग्रामासम दृढ व्रत । ऐसें चिंतीत असता नरसिंग पुत्र । आले नाथराय ॥६॥जाहला मध्यान्हींचा काल । सर्वांनी पुरविला उदरकाल । परी नरसिंगपत्नी विमल । राहिली उपवासी ॥७॥श्रीनाथें भविष्य वर्तविलें । तेंचि दृश्यत्वा आलें । मग उद्योगासी लागले । भक्तजन ॥८॥पूर्वीच सजविलें होते घर । नानापरी हंड्याझुंबर । मध्यें सिंहासन त्यावर । जरतारी बिछाईत ॥९॥कळतां नाथांचें आगमन । येती धांवुनी नगरजन । जरी तळपला भगवान । सहस्त्ररश्मी ॥१०॥सोडोनी पडदा अथवा घुंगट । धांवती ग्रामदेवता त्वरित । कटीं घेती कोमल अपत्य । प्रभुदर्शना लवलाहीं ॥११॥ज्यांची तनू जैसी कोमल वल्ली । जयां न सोसवे उन्हाची झळी । त्या पादचारी होउनी वेल्हाळी । हेती प्रभुपायी दर्शनास्तव ॥१२॥जरी आर्यस्त्रिया असती सुकुमार । तरी प्रसंगी होती कठिणतर । हा अनुभव येई साचार । पुराणकालापासुनी ॥१३॥स्त्रीदेवी ही धर्मज्योति । स्त्री ही गृहस्थाश्रमाची शक्ती । स्त्रीवांचूनी नाहीं गति । प्रपंचीं या ॥१४॥जेथें स्त्री नसें तें गेह । स्मशानासम शून्य होय । जैसें मूर्तीविण देवालय । ओस दिसे ॥१५॥स्त्रीसारिखा प्रेमभाव । न सांपडे हा निश्चय । स्त्री ही केवळ पूजनीय । भारतियां ॥१६॥नसतां स्त्रियांचा अवतार । तरी शून्यता सर्वत्र । उदयही पावतें ना विश्व थोर । कदापीहि ॥१७॥सृष्टी ही केवळ स्त्री जाति । सर्व स्थिरचर तिचें पोटीं । ब्रह्मही न येई रूपाप्रती । मायेवांचूनी ॥१८॥आहिल्या द्रौपदी सीता । तारा मंदोदरी पतिव्रता । यांच्या स्मरणानेंच तत्वतां । महा पातकें नाशतीं ॥१९॥आर्य धर्माचें पावित्र्य । राखी एकच स्त्री दैवत । केला स्वाभिमान जागृत । वारंवार तियेनें ॥२०॥व्रतें उपवास पारणें । हें स्त्रियांचें असें लेणें । सहन करिती तितिक्षासाधनें । सर्व आघात ॥२१॥स्त्रिया मृत्युला जिंकती । स्त्रिया वीरा प्रसवती । नका करूं हो अवनती । स्त्री रत्नाची ॥२२॥स्त्रिया भक्तीची मूर्ति । सदा नम्रता स्वीकारीति । सेवा धर्माची महति । जाणती एकची अबला ॥२३॥प्रेमरसानें जिचें अंतर । सदा असें आर्द्र फार । प्रेम हेंच तिचें सुखसार । धन्य अशा सतीला ॥२४॥येतां पति उन्हांतुनी कष्टुनी । येई सन्मुख ती शीत चांदणी । “ आणू कां थोडे थंड पाणी ” । ऐसें विचारी मधुवचें ॥२५॥ऐकोनी हें प्रेम बोल । जरी कठिण हृदयी नर असेल । तरी हृदय तयाचें द्रवेल । होईल श्रम परिहार ॥२६॥प्रिय बालांचें संगोपन । करिती प्रेमें रात्रंदीन । जरी कष्टविती बालें रडुन । तरी खेद न मानिती ॥२७॥काढोनी नित्य विष्ठा मुत्र । राखी तान्हुला पवित्र । पुरूष न घेई इतुके कष्ट । काळांतरीं ॥२८॥स्त्री ही परमार्थ मार्गाची । आहे सहचारिणी साची । जैसी शिकवण पतीची । तैसी होईल स्त्री देवी ॥२९॥ऐशा स्त्रीरत्नाचा छल । जो पुरूष व्यर्थ करील । तो रौरव नरकीं जाईल । हें शास्त्र वचन ॥३०॥ऐशा सद्गुण संपन्न बाला । श्रीनाथदर्शना पातल्या । करिती वंदन सद्गुरुला । प्रेमभावें ॥३१॥गाती निजभाषेची गोड गाणी । करिती । स्तुति नाना शब्दांनी । प्रभुपायांवरी बालकें तान्हीं । ठेविती आनंदें ॥३२॥विनविती प्रेमें गुरूराया । सुखी राखावें बालां या । मागती चुडेदान । कळवळूंनिया । कर जोडोनी ॥३३॥पुरवी भक्तांची आवडी । परी घडवी परमार्थ आधीं । कोणा पुजा कोणा व्रतांची उपाधी । देई कळवळूनी ॥३४॥सहज बोलुनी उपदेश । करी नित्य श्रीयोगीश । स्वार्थ परमार्थाची विशेष । एक वाक्यता करी ॥३५॥लावोनी द्वारासी अर्गला । श्रीनाथ बसले पुजेला । इतुक्यामाजी एक अबला । विनवी द्वार उघडावें ॥३६॥प्रभूची जाहली आभासवृत्ती । बालिकेसी प्रेमें वदती । कां गे दूषण देसी मजप्रती । कासया लावूं द्वार तुझें ॥३७॥तूंच होवोनी मायासक्त । लाविलें आपुलें कपाट । करोनिया कष्ट सतत । तूंच उघडी सत्वरी ॥३८॥जिचें संसार हेंचि जीवन । तिला कैसें कळालें द्वयर्थी वचन । परी नाथ शिष्य दत्त म्हणोन । होता प्रभुसन्मुख ॥३९॥दत्त हा संतांचा भक्त । संत हेंच तयाचें सर्वस्व । तो उमजला प्रभुबोलाचा अर्थ । बोले मग विनयानें ॥४०॥देवा तिच्या द्वारातें । लाविली कडी आपुल्या हस्तें । ती उघडिता सद्गुरूनाथें । मोकळे कपाट ॥४१॥तुझ्यावांचुनी ब्रह्मद्वार । कोण उघडील योगेश्वर ! । जरी यत्न केले अपार । तरी ते विफळ होती ॥४२॥ऐकतां दत्ताचें अनुभव वचन । नाथ झाला प्रसन्नवदन । करी कौतुक कुरवाळून । मातेपरी ॥४३॥मग काष्ठद्वार उघडिले । बालिकेचे हेतु पुर्ण केलें । आपुलें पूजाकर्म संपविलें । गुरूराजें ॥४४॥नाथ बसतां सिंहासनी । येती भक्त अनेक पूजनी । तेथेही करी अघटित करणी । नित्य नवी ॥४५॥प्रभुदर्शना आला एक भक्त । तयाचा होता थोटा हात । म्हणे त्वां व्याघ्र बळकट । मारिला रे ॥४६॥मृगयेस्तव जातां वनासी । भयानक व्याघ्र भेटला तुजसी । वार करितां तरवार खाशी । तुटली अवचित ॥४७॥ही संधी व्याघ्रें साधुनि । तोडिला तुझा हस्त झणी । मग एक्याच करें झुंझुनी । मारिलें क्रूर पशूसी ॥४८॥ऐकोनी प्रभूची वाणी । तो वीर गहिंवरला मनीं । तू धन्य रे त्रिकालज्ञानी । जगदीश्वरा ॥४९॥दहा संवत्सरें जाहली । कोणाही न स्मृति राहिली । परी बापजी ! त्वां कथिली । जैसी घडली आजची ॥५०॥नाथें करीं सुपारी घेतली । तों सहजीं समाधी लागली । वायूची लहरी उतरविली । अल्पकाळांत ॥५१॥म्हणे गडावरी आजी गेलों । श्री जगदंबेसी भेटलों । तियेच्या दर्शने झालों । आनंदीत ॥५२॥कोणा न कळली ही ध्वनी । परी दत्त उमजला तत्क्षणीं । कीं प्रभु आजी सूक्ष्मरूपानीं । गेला असे गडावरी ॥५३॥जयपूर शहरी एक गड । तेथें देवीचें स्थान प्रचंड । आला होता नाथ योगिवंद्य । तेथुनिया ॥५४॥कांहीं काळ लोटल्यावर । सहजीं आला किल्लेदार । जो देवीच्या गडावरी अधिकार । गाजवीतसे ॥५५॥नाथ हंसला त्यासी पाहूनी । प्रतिकृति केली तयानें हंसुनी । भक्तवृंद होती अंतःकरणीं । विस्मित तेधवां ॥५६॥किल्लेदार विनवी दयाळा ! । अघटित वाटे तुझी लीला । तुझ्या समान पुरूष देखिला । इतुक्यांत गडावरी ॥५७॥भवानीच्या सन्मुख जाउनि । समर्पिलीं पुष्पें दोन्हीं । मी जाहलों नयन असूनी । आंधळा आजी ॥५८॥श्रीनाथ समाधीचें कारण । उमजलें सर्व भक्त जन । म्हणती गुरूरायाचें महिमान । कोणाही ना कळे ॥५९॥प्रभूसी दृष्ट होईल म्हणून । करिती युवती लिंबलोण । कोणी मीठमिरीं ओवाळून । अग्नींत टाकिती ॥६०॥होते एक ज्योतिषशास्रविशारद । जयांचे नाम पंडित शिवनंद । सांगे फलित ज्योतिष अगाध । सहदेवापरी ॥६१॥सायन निरयन हे ग्रंथ । असती नित्य मुखोद्गत । राजाश्रय मिळे निश्चित । वंशपरंपरा तया ॥६२॥तें जयपूर शहराचें भूषण । सर्वही देती त्यांना मान । राजाही करी अभिवंदन । उत्थापन देऊनी ॥६३॥ऐकोनी योगीराजाची कीर्ती । प्रेमें येती दर्शनाप्रति । जाहला नाथ ज्योतिषशास्त्री । करी वादविवाद ॥६४॥घेऊनी ग्रंथांचीं वचनें । केले निरूपण प्रभूने । शिवनंदजी मनीं म्हणे । हा नव्हे पढिक जोशी ॥६५॥केवळ साक्षात्कारी देव । सांगें अंतरीचें हृदय । आजी धन्य भाग्य होय । भेटें मोक्षसुख दाता ॥६६॥भावें नाथचरणीं लागला । त्यातें देवें अनुग्रह दिधला । मग देवें विचार केला । प्रयाणाचा ॥६७॥नाहीं झाले दिवस दोन । तोंच निघाला आनंदघन । हें ऐकतां विनविती जन । न जावें योगीश ॥६८॥रहावें एक सप्ताह तरी । ऐकावी इतुकी विनंति हरी ! । परी नाथ म्हणे आम्हा जाणें सत्वरी । भक्तांस्तव ॥६९॥देखोनी श्रीगुरूची घाई । दत्तें केली चतुराई । आवरी वस्तु लवलाही । जन क्रुद्ध त्यावरी ॥७०॥आली एक प्रेमी बाळ । विनवी आदरें दत्ताला । तुम्ही नांवरी आम्हाला । दिसती नाहीं ॥७१॥जैसें श्रीकृष्णभगवंतासी । नेई अक्रूर द्वारकेसी । नायके भक्तांच्या विनवणीसी । कठोर हृदयी ॥७२॥तैसें न करावें दत्तराया । राहूं द्यावें देवाधिदेवा । आता अंत न पहावा । जयपूरचा ॥७३॥तुम्ही येथें आजी राहता । न जाईल सद्गुरु सर्वथा । येवढीं मागणी द्यावी संता । कळवळोनी ॥७४॥नाथ सदाच तुम्हांजवळी । येथें आला क्कचित काळीं । कां टाकितां दुःखानलीं । बंधूभगिनीसी ॥७५॥आम्हां दुःखसागरीं लोटून । न्याल जरी करुणाघन । भोगाल तयांचे फल दारूण । ऐका वचन आमुचें ॥७६॥नका ठेवूं स्वार्थ बुद्धी । स्वार्थानें न येई यश सिद्धी । लावा परमार्थीं मति येवढी । आजीच्या दिनीं ॥७७॥तुम्ही भक्त तो भगवान । राखील तुमचा सारा मान । तुम्हां आमुच्या गळ्याची आण ठेवूनि घ्या देवासी ॥७८॥दत्त म्हणे नाथांच्या नियमा । आड न येऊं शके ब्रह्मा । तेथें इतरांच्या पराक्रमा । मोल नाहीं ॥७९॥पोरी त्या कामिनी चतूर । बोलती बहुत मधुर । ब्रह्मा हें प्रभुचें पोर । त्याची कथा काय ॥८०॥भक्तांचा ऐसा विक्रम । तो देवासीही करील गुलाम । उठा बंधुराया दुःखतम । निवारा एवढें ॥८१॥भगिनीचें शुद्ध प्रेम पाहुनी । आला दत्त श्रीचरणीं । सांगितली प्रेमाची कहाणी । गुरुरायासी ॥८२॥भक्तांचा ठेवावया मान । नाथ म्हणे पूजाविधी करून । होऊं मार्गस्थ आपण । इष्टस्थलीं ॥८३॥बोलती भक्त परस्परांत । आतां स्तब्ध राहणें उचित । पूजाकर्मासी घटिका सात । अवधि लागे ॥८४॥इतुकिया अवसरांत । जाईळ निघोनी अग्निरथ । मग राहील सद्गुरु दैवत । अनायासें ॥८५॥जो जाणे गुपितांतील गुपित । तो कैसा न ओळखेल भक्तचित्त । सारूनी सर्व विधी घटिकेंत । जाहला सिद्ध निघाया ॥८६॥जैसे दुःक चित्रकुटाहुनी जाता नाथ । तैसेंच जयपूर होई दुःखग्रस्त । आडवे येती जन समस्त । रहावें म्हणती एक दिन ॥८७॥परी नायके जगन्मोहन । करी रथावरी आरोहण । माझें चिरकाल येथें अवतरण । पहावें एकलक्ष्यें ॥८८॥कलेवराची करिता माया । तुम्हांस नेईल ती विलया । नित्य ध्यासानें खेंचूनिया । आणावें सन्निध मजलागी ॥८९॥ऐसा मधुर बोल करोनी । येती ग्वाल्हेरीस निघोनी । तेथेंहि अनेकांसी उद्धरोनी । पुण्यपत्तनीं पातलें ॥९०॥आला तेथे एक कुमर । ज्याचे नाम असे दिनकर । विनवी देवासी सिंहगडावर । जावे वाटें ॥९१॥बाळा ! षट्चक्र गडावरी । तूं जाय जाय रे झडकरी । मग तेथें दिसेल सिंहपुरी । दैदीप्यमान ॥९२॥त्या गडावरी तानाजी केसरी । तुम्ही प्रत्यक्ष बघाल शस्त्रधारी । तेथें शिवरायाचीही स्वारी । प्रगटेल रे ॥९३॥त्या गडावरी देवटांकें । सदा भरलेलें नेटकें । तें जलपान करावें सुखें । होईल तृप्ती निरंतर ॥९४॥तो गड आहे केवळ गड । जाहला आजी बेगड । बघोनी तुम्हीही बेगड । होणार काय ? ॥९५॥ज्या सिंहें तो गड मिळविला । तो चिरकाल तेथेंच राहिला । तो न दिसतां दगडाला । पाहूनि काय मिळे ॥९६॥आधीं आपण सिंह व्हावें । मग सिंहासी भेटावें । शेळीपरी राहतां जावें । भक्ष्यस्थानीं ॥९७॥तुम्ही पूर्वी होतां सिंह । परि आज जाहला अजामय । हा संगतीचा परिणाम होय । भक्तराया ॥९८॥तूं सर्वांचा अससी भूपति । परी वाढला मेंढरांच्या संगती । विसरलासी स्वाभिमान वृत्ती । जाहला मेंढरासम ॥९९॥तरी सोडुनिया निर्बलता । पाहीं आपुल्या स्वरूपासी सुता ! । मग भोगशील चिन्मयता । सिंहगडाची ॥१००॥सोडुनी दुबळ्या जीवांचा संघ । घे परमार्थ नंदनवनाचा संग । करितां योग गुंफेचा संयोग । त्यांस सिंह दिसेल ॥१॥ते तुझ्या स्वरूपाची ओळख । तुज करोनी देखील देख । हें सिंहगडाचें दृश्य मायिक । नव्हे उपेगा खरें ॥२॥मग बालवृत्ती धरोनी । वदे दिनक्रा गोंजारूनी । तुज सिंहगड भवानी । येथेंच दाखवीन ॥३॥आपण घातलें सहजासन । बसविला सन्मुख नंदन । म्हणे लावीं आपुले नयन । पाहीं त्रिकूट शिखरीं ॥४॥मस्तकीं आपुला कर ठेविला । शिष्य तेव्हांच शून्यवत झाला । देहावरी येतां तयाला । विचारी काय देखिलें ॥५॥प्रभू पायीं डोई ठेवून । सांगे मी देखियलें स्वप्न । गेलों सिंहगडीं आपण । पाहिला गट विशाल ॥६॥तानाजी वीराची समाधि । वंदिली सतीची मूर्ति साधी । देवटांक्याच्या जलाची गोडी । अपूर्व मज वाटली ॥७॥तेथें श्रीशिव - देवालय । तैसा उघडा गणेश देव । राजाराम नृप विजय । राही सांबरूपें ॥८॥घालोनी नयनी ज्ञानांजन । नाथें दाखविला सिंहगड छान । किती वर्णावें यश भगवान ! आपुलें म्यां ॥९॥करोनी बालकाची इच्छापूर्ति । दाखविली आत्मप्रचीती । तुझ्या लीलेची गती । कोणी जाणती ना ॥११०॥पुण्यस्थलीं चातुर्मास राहुनी । करिती वास विविध भुवनीं । भक्तमनोरथांच्या श्रेणी । पुरविती देव ॥११॥नाशिकास येतां दीनानाथ । करी पावन भोसेकर सुत । नानासाहेब नामें वसत । प्रेमळ भारी ॥१२॥होता महा यंत्रशास्त्रज्ञ अधिकार । परी साधी रहाणी त्यासी प्रियकर । करीं नाना काव्यें सुंदर । परमार्थाचीं ॥१३॥तयाची कन्या गोदूमाई । जणूं मूर्तिमान् भक्तिदेवी । दुर्दैवाने केली नवाई । विषयपंकी लोटिली ॥१४॥देखोनी कन्येची दुःस्थिती । नाना अंतरी दुःखी होती । ठेवुनी भार दैवावरती । कंठिती काळ आपुला ॥१५॥दुःखाच्या विस्मृतीसाठीं । कन्येसी नानापरी बोधिती । गीता - भागवत दासबोध पोथी । देती प्रेमे वाचावया ॥१६॥माई भगिनी त्यातची रंगली । सुख - दुःखातें विस्मरली । करी मधुतरशी काव्यावली । भक्तिप्रेमयुक्त ॥१७॥परी फलावीण जैसा तरुवर । किंवा जलावांचुनी विहीर । अथवा पायावीण मंदिर थोर । उपेगा नये ॥१८॥सूर्य - प्रकाशावीण कमळ । किंवा चंद्राविणे निशाकाल । कर्णधाराविणें नौका दुर्बळ । जाई भलतीकडे ॥१९॥तैसें सद्गुरुनाथावांचून । कदापि नोहे शिष्यासी ज्ञान । लागली तळमळ म्हणोन । माई भगिनीसी ॥१२०॥ऐकतां सिद्ध पुरूषाचें आगमन । आली पित्यासवें आपण । ती कथा माईच्या वचनें जाण । रेखाटीन ॥२१॥अभंग गोदावरि तीरीं नाशिक तें क्षेत्र । तेथें श्रीसमर्थ पाहियेलें ॥२२॥तात्यासाहेबांची बहीण धाकुटी । बोलियेली गोष्टी साहजिक ॥२३॥येथें एक सिद्ध जैसा चंद्रमौळी । जाऊं संध्याकाळीं दर्शनासी ॥२४॥ऐकुनी ही मात चित्त खळबळें । ध्यान तें लागलें गुप्त रीती ॥२५॥दिवस सरेना मनही स्थिरेना । सांगवेना कोणा ऐसें झालें ॥२६॥नावडेची कांहीं श्रीमूर्तीवांचोनी । हुरहुर मनीं वाटतसे ॥२७॥जैसी कामधेनू चिंतीता धांवली । तैसी स्वारी आली अकस्मात् ॥२८॥तेजःपुंज मूर्ती पाहोनि वंदिली । परि वाचा गेली बोलवेना ॥२९॥सर्वहि शरीरीं कंपचि सुटला । नेत्रीं पूर आला आवरेना ॥३०॥श्रीगुरुदयाळें सर्वही जाणिलें । प्रेमें अवलोकिलें बालिकेसी ॥३१॥राम राम अक्षरें धरणी पाहिलीं । तीच कानीं मनीं भरियेली ॥३२॥सांगू नये परी सर्व सांगितलें । स्मरोनी पाउलें तारकाचीं ॥३३॥पाषाण हा गोटा समर्थे फोडिला । मार्ग तो दाविला उन्नतीचा ॥३४॥प्राणायामयोग नाहीं शिकविला । नाहीं कथियेला ज्ञानमार्ग ॥३५॥रामनाम रस ओतिला अंतरीं । तेणें देह चारी वितळती ॥३६॥दृढ हा विश्वास ठेविला मानसीं । त्याचिया पदांसी नमन माझें ॥३७॥समर्थ चरणीं देहाच्या पादुका । करूनिया देखां वावरावें ॥३८॥श्रीसद्गुरुमाउली रामाचें स्वरूप । ठेवूं सुखरूप हृदयांत ॥३९॥प्रत्यक्ष श्रीराम अवतरूनी आले । दयासिंधु झाले जडजीवा ॥४०॥पतित मी पापी काय वानूं गूण । निष्काम भजन घेऊं एक ॥४१॥ऐसे पुनीत करोनी शिष्येसी । येती तियेच्या पितृगृहासी । खेळविती आपुल्या लीलेसी । नित्य नूतन ॥४२॥एकदां आंग्लवैद्य - विद्यानिपुण । आला प्रभुसी शरण । जयाची कन्या रूपसंपन्न । मिळेना वर तियेसी ॥४३॥विनवी श्रीनाथ चरणासी । सांगावा कांहीं उपाय यासी । नाथ म्हणे न होय या वर्षीं । आपुलें हस्तानें ॥४४॥घाबरला मनीं तो ‘ डॉक्टर ’ । देवां ! कांहीं करावा उपचार । जयानें अनिष्ट ग्रह दूर । पळतील गा ॥४५॥देती नारिकेल फल कन्येजवळी । ठेवीं उशासी निद्रेवेळीं । उठोनी नियमें प्रातः काळीं । करावा जप ग्रहांचा ॥४६॥त्यायोगें पीडा जाईल । सद्गुणी वरही मिळेल । पित्याच्या मनाचा कल्लोळ । शांतवी दयाघन ॥४७॥“ तुमचे हस्तें लग्न होईना ” । या ध्वनीचा मतितार्थ कोणा । त्या कालीं कांहीं समजेना । अनुभवेच तो जाणिला ॥४८॥ नवज्वरें पीडिलें वैद्यास । लागले यमदूतांचे पाश । सोडुनी या मृत्युलोकास । जाई परलोकी ॥४९॥तयाचे हस्तें कन्यादान । नाहीं घडले हें सत्य वचन । मिळाला रूपयौवनसंपन्न । वरही वैद्य - कन्येसी ॥१५०॥एके दिनीं गोदुमाई । असतां श्वशुरगृहीं पाही । पितृगृहीं आली नाथ आई । ऐसें वृत्त कळलें ॥५१॥बघाया सद्गुरु आनंदमूर्ति । आली सत्वरीं भोसेग्रामाप्रती । राहिली उपवासी सती । दर्शनास्तव ॥५२॥ दिसतां नथ सुखाचा कंद । पायीं डोई ठेवी अखंड । दत्त वचनें देउनी आर्शिवाद । सांगे वात्सल्ययुक्त ॥५३॥वत्से ! राहुनी उपवासी । व्यर्थ दंडिसी देहासी । देह हा प्रपंच परमार्थासी । आधार गे ! ॥५४॥“ ऊठ ऊठ तूं प्रिय बाले । घेई प्रसादाचीं फुलें ” । मुखीं गुलाबपुष्पें घातलें । भक्तवत्सलें ॥५५॥बघोनी प्रभूचें वात्सल्य । माईचें गहिंवरलें चित्त । विमल । नयनांतून वाहती घळघळ । प्रेमाश्रूधारा ॥५६॥जन्मदात्या जननीहुनी । जिचे प्रेम अलोट त्रिभूवनीं । ती एकच सद्गुरु - जगज्जननी । हें अनुभविलें तियेनें ॥५७॥माईचे पितृदेव भोसेकर । सोडिती आपुले कलेवर । अंतीं प्रभुनामें अंतर । रंगवुनी ॥५८॥तयांचे सुरस पद्य एक । किरणीं ठेवी नाथ - बालक । चाखावा काव्यरस चित्तैक्य । करोनी श्रोतृवृंदानें ॥५९॥पद ( एडका मदन केवळ पंचानन ) थोर आणि सान । स्मरूं घडिभर नारायण ॥धृ.॥जो करी सृष्टि निर्माण । तृण काष्ठ तरू पाषाण । रविचंद्र तारका गगन । गाऊं तत् गुण ॥१६०॥कर्मानुरूप परिवारा । दे नरा, घाली संसारा ।रक्षी हा सर्व पसारा । देउं त्या मान ॥ स्मरूं घडिभर० ॥६१॥सुखदुःखें तीं जीवींचीं । ही जोड पूर्वकर्माची ।नको त्यांत भरती पापांची । उमज हें ज्ञान ॥स्मरूं०॥६२॥कोण वानिल त्याची लीला । दे जीव शक्ति प्राण्याला । करि मातृस्तनिं बाळाला । दुग्ध उत्पन्न ॥स्मरूं०॥६३॥जें घडतें ईशेच्छेनें । अनुसरूं त्या संतोषानें ।त्याची इच्छा तें कल्याण । समजूं ही खूण ॥स्मरूं०॥६४॥भक्तांसी पाहि जो कुणी वक्र । त्यासाठीं सुदर्शन चक्र ।उद्धरीं संकटीं नक्र । दयेची खाण ॥स्मरूं०॥६५॥कनवाळू भक्तकैवारी । भाव धरितां भवभय वारी ।स्तवितात वेद ज्या चारी । सेवुं पद जाण ॥स्मरूं०॥६६॥जो जनक वस्तुमात्राचा । चिच्चालक जड देहाचा ।संरक्षक या जगताचा । जाऊं त्या शरण ॥स्मरूं० ॥६७॥नाथसुताचा जन्मदाता । होईल संन्यासी तत्वता । ऐकावी आदरें ती कथा । श्रोतृवृंदें ॥६८॥सर्व योगांचा स्वामी नाथ । योगी करील आपुले पुत्र । सर्वांसी दावी उच्वल ज्योत । सर्वेश्वर ॥६९॥जैसी भक्त करील भावना । तैसे देई नाथराणा । किती करावें त्याच्या स्तवना । नाथसुत - वाणी स्थिरावली ॥१७०॥इति श्रीमाथवनाथ दीपप्रकाशे नाथसुत विरचिते जयपुर प्रवास वर्णनं नाम पंचविंशतितमः किरणः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP