मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
पंचत्रिंशतितम किरण

दीपप्रकाश - पंचत्रिंशतितम किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनथायनमः --
नाथ माझें परब्रह्म । नाथ माझें शब्दब्रह्म । नाथ माझें नामब्रह्म सर्व ब्रह्म श्रीनाथ ॥१॥
नाथ माझी मूळ माया । नाथ माझी सगुण काया । नाथ माझी कार्यानुमेया । अष्टधा प्रकृति ॥२॥
नाथ माझीं पंचतत्वें । नाथ माझीं स्थूलतत्वें । नाथ माझीं सूक्ष्मतत्वें । नाथ तत्वेश्वर ॥३॥
नाथ माझा सगुणराम । नाथ मम विश्रामधाम । नाथ माझें पुर्णकाम । करी सर्वदा ॥४॥
नाथ माझें सुंदर ध्यान । ध्येयही नाथ पूर्ण । ध्याताही नाथ दयाघन । सर्वची नाथ ॥५॥
नाथ स्वयेंचि लीलारूप । खेळवी आपण आपाप । देवही नाथभक्त निष्पाप । नाथ राय ॥६॥
नाथ माझें पापपुण्य । नाथ माझें मन निर्मन । नाथ माझा वंद्य निंद्य जाण । सर्वस्वीही ॥७॥
विकारी विचारी श्रीनाथ । श्रीनाथ निर्मल मलयुक्त । सत्यासत्यही श्रीनाथ । सुखदुःखमूर्ती ॥८॥
श्रीनाथ गुणी गुणातीत । श्रीनाथ सर्वांत सर्वातीत । श्रीनाथ दृश्य दृश्यातींत । नाथ स्थिरचर ॥९॥
श्रीनाथ माझी मातापिता । श्रीनाथ मम भगिनी भ्राता । पुत्र कलत्रादि आतां । नाथ माझा ॥१०॥
नाथ माझा संसार । नाथ माझा मित्र थोर । नाथ माझें सुंदर मंदिर । नाथ सर्व ठायीं ॥११॥
नाथ माझें भोजन शयन । नाथ माझें पूजन ध्यान । नाथ सर्वांघटीं परिपूर्ण । भरला असे ॥१२॥
ऐसी बंधुभगिनींची पूर्ण भावना । करी रे सर्व भूषणा । नाथसुताची प्रार्थना । सदैव ही ॥१३॥
नाथसुता ठेवीं द्वारीं । परि सर्वां स्वरूपदान करीं । तुजवांचुनि कैवारी । कोण असे दूसरा ॥१४॥
नाथा ! तूं मनीं धरितां । सर्व करशील समर्था । तुज भक्तीचीहि सर्वथा । चाड नाहीं ॥१५॥
नाथसुत केवळ हीन । कधीं न आठवी तुझें चरण । परि त्वां घेतला ओढून । निजपदीं ॥१६॥
हीच तव कृपेची खूण । तुज कांहीं नको प्रिय जननी । घेई पदीं ओढोनी । सकलासी ॥१७॥
तूं केवळ चंद्रप्रकाश । न पाहतां राव रंकांस । अमृत किरणें सर्वांस । पावन करिसी ॥१८॥
तूं अनंत सागर । सर्वांस करिसी पैलपार । तूं सरिता शीतकर । शांतविसी ॥१९॥
हेंचि मागणें तव पायीं । देई देई माझे आई । नाथपुत्राचा हट्ट पुरवीं । प्रेमळ गे ॥२०॥
चरित्र - चंद्राचा हट्ट । त्वां पुरविला माते खचित । आतां एवढाच पुरवी हेत । म्हणजे पावलें ॥२१॥
हें शेंबडें लेंबडें पोर । तूं घेतलेंसी अंकावर । काव्य - बालामृत मधुर । चाखविलें ॥२२॥
लाड सारें पुरविलें । आतां एकच राहिलें । जें उपरी विनविलें । तें पुरवावें ॥२३॥
मी केवळ अज्ञान । जरी करिसी मज ताडण । कदापि न ऐकेन । जगज्जननी ॥२४॥
बालहट्ट स्त्रीहट्ट । तेवीं राजाचा हट्ट । आहे जगतीं बिकट । हें तूं जाणसी ॥२५॥
तरी आता अंत न पाहीं । इतुकें वरदान देईं । मग नाथें लवलाही । आज्ञा केली ॥२६॥
सर्वांसी करीन मी मुक्त । न करीं चिंता व्यर्थ । राहतां नाथ दीपप्रकाशांत । भक्तवृंद ॥२७॥
श्रीनाथदीपाचे किरण । पंच त्रिंशत्योत्तम जाण । सर्व असते समसमान । प्रकाशमय ॥२८॥
जैशा समुद्रावरील लाटा । दिसती नेत्री लहान मोठ्या । परि तयाची व्युत्पन्नता । एक असे ॥२९॥
तैसा श्रीचरित्र प्रकाश । दाखवी विविध किरण - भास । परि एकाच दीपाचा समास । जाणावा तो ॥३०॥
या दीपाचा एकच किरण । प्रकाशवील हृदयभुवन । पहावा अंतरीं उजळून । भक्तवृंदें ॥३१॥
या दीपा नको तेलबत्ती । अथवा बाह्यात्कारी पणती । ही कधीं न बुजे ज्योती । चिरंजीव ॥३२॥
ही ज्योति पहावया । केवळ मन न्यावें विलया । मग तिचा प्रकाश पहावा । अंतरींच ॥३३॥
आतां प्रत्येक किरणाचा । प्रकाश प्रकाशवी साचा । तोही अवश्य वाचा । श्रोतृवृंदांनो ! ॥३४॥
प्रथम किरणीं अज्ञान पंचक । निरीक्षाया केले पंचक । नाथ जाहला पाठीराखा । मग मंगलाचरण ॥३५॥
गणेश शारदा स्तवन । सद्गुरु मातापितया नमन । कवि श्रोते सज्जन । अभिवंदिलें ॥३६॥
द्वितीय किरणीं श्रीनाथ । चित्रकुटीं जन्म घेई पवित्र । वर्षप्रतिपदा सुमुहूर्त । साजरा करी ॥३७॥
श्रीनाथ पूर्वजांचा । प्रकाश करी किरण साचा । द्वितीय किरण बाललीलेचा । उजेड करी ॥३८॥
कपिलागाईचें दुग्ध प्राशन । केलें विद्येचें परिशीलन । मृण्मय गोळ्या देऊन । गुरूजींचा ज्वर निवारी ॥३९॥
राणोजीस केलें सनाथ । सांगे शुभाशुभ प्रश्न त्वरित । शिक्षकाही चकवीत । नाथ माझा ॥४०॥
चतुर्थ किरणीं केलें भजन । जाहला मच्छेंद्र नंदन । मातेचें पतिदुःख शांतवन । करी दिव्य बोधें ॥४१॥
पांचव्यांत श्रीनाथ । चित्रकुटीं होई स्थित । आरोहणाचा विधी अद्भूत । कथियेला ॥४२॥
सहाव्यांत दत्तक मातेस्तव । चित्रकुट त्याग करी देव । चारी धाम यात्रा सर्व । करी योगेश्वर ॥४३॥
अज्ञातवास सातवा किरण । तेंवी अष्टम नवम जाण । अमरकंटकीं संवत्सर पूर्ण । वास करी ॥४४॥
नरहरी शिंप्यास दावी प्रभाव । मग खांडव्यास जाय । पाळणा गुंफोनि सदय । घेई दुग्ध ॥४५॥
रंभा पाटील पत्नीचा । आघात सहन करी साचा । केला दुग्धास्तव भिंतीचा । गिलावा हो ॥४६॥
कोंड्या गुरव झाला नाथ । भेटे भिकनशहाप्रत । गुरुजीची दीक्षा घेत । गुरुराय ॥४७॥
सप्तश्रृंग गड मोठा । तेथें स्वैर संचारता । देई दर्शन आर्त भक्ता । विविध काळीं ॥४८॥
दहाव्यांत सोडला अज्ञातवास । भक्तजनास्तव स्वरूप - प्रकाश । दिनचर्याहि नियमास । स्वीकारी प्रभू ॥४९॥
गोपालदास संतभेटी । श्रीविठ्ठल द्विजरूपें येती । आम्ररस श्वासानें चाखिती । योगीनाथ ॥५०॥
पळशे गांवी नाम - सप्ताह । हालविला लोकसमुदाय । एकादश किरणीं अभिनव । लीलाही केली ॥५१॥
द्वादशीं काशिनाथ निर्याण । श्रीव्यंकटेश मंदिर - स्थापन । विष्णुतें पंख लावून उडविलें ॥५२॥
स्थापी दत्तमंदिराला । कुष्ठरोग निवारण केला । मनोजयाचा उपाय कथिला । तेराव्यांत ॥५३॥
ध्यान निरूपण चवदाव्यांत । बाळा नाईकाच्या हृदयीं प्रगट । होती जन विस्मित । पाहुनियां ॥५४॥
पंचदशीं श्रीपंढरपुरीं । काढिल्या तुळशी मंजरी । निपुत्रिकातें पुत्र कुमरी । नाथें दिधलीं ॥५५॥
महासाधु धुंडीराज भेटती । सदाशिवें वरप्रसाद देती । षोडशीं गुरुसेवेची रीती । कथिली सारी ॥५६॥
सतराव्यांत सदाशिव निर्याण । करी कौतुक भगवान । अठराव्यांत वली - विनायक नंदन । चरित्र कथिलें ॥५७॥
एकोणिसाव्यांत विनायकानुग्रह । करी चमत्कार समूह । विसावा एकविसावा किरण होय । अष्टांगयोगी ॥५८॥
यमनियमा पासून समाशीपर्यंत विवेचन । कांहीं हटयोग क्रिया जाण । विशद केल्या ॥५९॥
बाविसावा किरण उज्वल । खेळवी नाथ रतनबाळ । वासुदेव शिष्य केला उज्वल । जाहला मथुरी ॥६०॥
ज्ञानाचें संक्षिप्त निरूपण । तेविसाव्यांत करी आपण । वासुदेवाचें अंतरी ज्ञानरस । ओतिला हो ॥६१॥
चोविसाव्या किरणांत । पागनिसा करी मुक्त । बैराग्यास्वें मार्गस्थ । होई राजयोगी ॥६२॥
तेथून जयपुरागमन । मुखांतुनी कलश भरून । काढी जल योगभूण । देई सकलांसी ॥६३॥
पंचविसाव्यांत जयपूर नागरिकां । दाखवी अनेक कौतुका । लावोनि त्यांना ध्यास चटका । निघाला तेथुनी ॥६४॥
सिंहगड दाखवी आभासांत । गोदुमाईस करी पूनित । वैराग्य योग सव्विसाव्यांत । कथियेला ॥६५॥
आश्रम वर्णिले सव्विसाव्यांत । मग सप्तविंशतितमांत । नारायणातें दीक्षा देत । संन्यासाची ॥६६॥
अष्टवर्षांच्या कुमारा । दावी समाधी योग बरा । पाहती सर्वचमत्कारा । देवगांवीं ॥६७॥
अठ्ठाविसाव्या किरणांत । वलि केला सर्पदंश मुक्त । भक्तियोगाचें महत्व । सांगे कृष्ण भक्तासी ॥६८॥
एकुणतिसाव्या किरणीं । कृष्णचरित्र प्रकाशवुनी । कृष्णमृत्युनंतरही चक्रपाणी । उघडवी डोळे भक्ताचे ॥६९॥
तिसाव्यांत कुंभार पत्नीनें । लावूनि समाधी नाथें । सूक्ष्म देहें नेलें मंदिरातें । श्रीअंबेच्या ॥७०॥
रणछोढ पत्नीसाठीं हमाल । वृद्धेचें राखी गृह दयाळ । तिला पंढरी पाठवूनि निश्चल । केलें कलेवर ॥७१॥
एकतिसाव्यांत विभूति - पूडी । श्रीमाधवनाथ काढी । थोर गव्हाणीं श्रीपादुका जोडी । स्थापी श्रीदत्त ॥७२॥
अप्पाचें घर बांधिलें । जें अग्नीनें नाहीं जळालें । नंदिग्रामीं कर्मयोगा कथिलें । वासुदेवासी ॥७३॥
बत्तीसाव्यांत गुरुनिंदका । दाविला मार्ग निका । श्रीगोंद्याच्या वली नायका । भेटे वलीश्वर ॥७४॥
तेहेतिसाव्यांत नाथ भक्त । होऊं पाहे मार्गभ्रष्ट । त्यातें वांचवी दीनानाथ । करी स्वाहाकार ॥७५॥
चौतीसाव्यांत प्रापंचिकास । सांगे नित्यनियमास । प्राकृतीं गुरुगीतेस । प्रकटवी ॥७६॥
पस्तीसावा शेवटचा किरण । जो सर्व ग्रंथाचें सार पूर्ण । अवतरणिकारूपें प्रगटवून । दाविलें गा ॥७७॥
श्रीनाथ दीनप्रकाशाचें स्तवन । करावयाचें नाहीं प्रयोजन । जें आहे प्रत्यक्ष प्रमाण । त्याचे वर्नन काय करावें ॥७८॥
करितां या ग्रंथाचें पठण । होईल परमार्थाचें ज्ञान । तयांच्या हृदयीं आनंदघन । नित्य वसेल ॥७९॥
या ग्रंथाचा लेखक । नव्हे नाथांचा बालक । प्रत्यक्ष श्री योगीनायक । लिहवून घेई ॥८०॥
हें पूर्व किरणींच कथिलें । जेथें नाथ कृपाघन वळले । त्या ग्रंथाचा नकळें । महिमा इतरांसी ॥८१॥
जयास असेल गुरुभक्ती । तयानें प्रत्यही वाचावी पोथी । त्याचे दोष सारे पळती रानोरान ॥८२॥
या ग्रंथाचे मनन । ही नाथांचीच सेवा जाण । जो करीन भावना धरून । त्यास फळ मिळेल ॥८३॥
ऐसें नाथें या ग्रंथांसी । दिधलें आशिर्वचनासी । पहावें भावें प्रचीतीसी । भक्तवृंदें ॥८४॥
या ग्रंथाचे शब्दाशब्दांत । ओती आपुला रस श्रीनाथ । जो करील पाठ नित्य । होईल रसमय ॥८५॥
श्रीदीपप्रकाश हें रत्न । जो ठेवील हृदयीं भूषण । त्याचा प्रभाव चमकून । राहील त्रिभुवनीं ॥८६॥
श्रीनाथ दीपप्रकाश नव्हे सामान्य । नका करूं विचक्षणा । आपले कृतींत उतरवून । अनुभव पहा ॥८७॥
या उज्वल दीपाची ज्योति । सर्व तमाची घेउनी आहुती । विमल प्रकाश चित्तीं । करील गा ॥८८॥
श्रीनाथ दीप हा चंद्र विमल । तयाच्या प्रकाशांत जो राहील । तया शांति सुख मिळेल । नाथ वचन ॥८९॥
श्रीनाथ दीप हा प्रज्वलित पोत । हातीं होतां धरोनि मार्गस्थ । मंदिराची वाट । स्पष्ट दावील ॥९०॥
श्रीनाथ हा महासागर । तयाचें चरित्र घन - शीतकर । चंचल चित्त वायु स्थिर । करोनि घ्यावें आपणावरी ॥९१॥
होईल सर्व ताप हरण । मळ सगळा जाईल धुवून । किति सांगावें महिमान । श्री - कृतीचें ॥९२॥
श्रीनाथ ज्योतीची शाई । जो नयनीं घालीन पाही । त्याची दृष्टी निर्मल होई । हा अनुभव ॥९३॥
हा दीप जेथें वास्तव्य करील । तेथें पिशाच्चें होती निर्बल । मुंजोबा म्हसोबाचे बळ । तेथें न चाले ॥९४॥
ज्यास समंधबाधा असेल । तीही विलया जाईल । ठेवितां किरण अचल । निदिध्यासीं ॥९५॥
या ग्रंथाच्या पठणें । चितशुद्धीचीं भूषणें । भक्त घालील ही वचनें । समर्थाचीं ॥९६॥
श्रीनाथ सांप्रदायिकांतें । ही दिली संजीवनीच नाथें । बंधु भगिनींनो सोडा सोडा द्वैतातें । या या घ्यावयासी ॥९७॥
हें पस्तीस प्रकारचें पक्वान्न । करी नाथ स्वयें आपण । घ्याहों आपुले क्षुधा शांतवून । यावेळीं ॥९८॥
या पक्कान्नांचे उच्छिष्ट । खाता नाथसुत तृप्त । ही अनुभवाची गोष्ट । सांगतां नये ॥९९॥
अनुभव कैसा दाखवावा । तो अनुभवेंच पहावा । मग येईल प्रत्यया । माझें वचन ॥१००॥
निद्रेंत जिवाचें घोरणें । जीवालागीं कैसे दाखविणें । तैसें हें सत्य असे परि अनुभवाविणें । कळणार नाहीं ॥१॥
या ग्रंथाचें पारायण । करिता होईल कामना पूर्ण । सांगे श्रीभगवान । माधवनाथ ॥२॥
पारायणासी दिवस सात । करावें आधीं नेमस्त । वाचावी नित्य शुचिर्भुत । प्रत्यहीं पाच ॥३॥
रहावें आपण एकभुक्त । न व्हावें विषयलंपट । कंबलासनीं निश्चित । शय्या करावी ॥४॥
सीमोल्लंघन करूं नये । बाह्यवर्ती असूं नये । प्रसंग पडतां जावें परि । स्नान करावें नंतर ॥५॥
स्त्री पुरुषासी पारायण । कराया नाहीं अडचण । जाति गोत्राचाही प्रश्न । येथें नाहीं ॥६॥
शुचिर्भूतपणानें । सर्व भक्तांनी राहणें । मग अनुभव घेणें । या ग्रंथाचा ॥७॥
सातवे दिवशीं श्रीनाथ । देईल प्रत्यक्ष दृष्टांत । पुरवील भक्तांचें इच्छित । कृपाळूपणें ॥८॥
अनुष्ठान होतां हें पूर्ण । यथाशक्ति ब्राह्मण भोजन । द्यावें क्षुधितां अन्नदान । संतोषानें ॥९॥
हा ग्रंथ श्रीनाथ प्रसाद । जो चाखील चवी गोड । तो प्रसादाम्त राहील अखंड । नाथ वचन हें ॥११०॥
हा नव्हे तार्किक ग्रंथ । केवळ भावनेची ज्योत । भावनेनेंच होईल प्रदीप्त । अंतर्यामीं ॥११॥
भाविका सारे अमृत वाटे । अभाविका अमृतही विष गमतें । श्रद्धेवांचुनी कार्य नासतें । हें प्रत्यंतर ॥१२॥
श्रद्धा ही सद्गुरु - आत्मयाची । आहे पत्नी ऐसी वाणी श्रुतीची । ती वश होतां आत्मयाची । साक्षी होतसे ॥१३॥
जाहले जे थोर संत । ते श्रद्धेनेच होती मुक्त । श्रद्धेवीण धर्म वा राष्ट्र । उन्नतीस येईना ॥१४॥
श्रीनाथांचा सांप्रदाय । स्वधर्मास अनुलक्षुनीच होय । सर्वांचा होई समाव । प्रभु प्रासादीं ॥१५॥
जो जो जयाचा नियम जाण । त्यासीच करी प्रज्वलित आपण । कुलधर्म कुलाचारें वर्तवून । लावी मार्गी शिष्यास ॥१६॥
श्रीनाथदीपप्रकाश । करील उज्वल स्वधर्मास । नका ठेवूं द्वैत बुद्धीस । बंधू - जनांनो ॥१७॥
श्रीनाथ माझा समर्थ । नाथसुताचा पुरवी आर्त । करी उज्वल दीप प्रगट । नाथसूत - निमित्तें ॥१८॥
नाथसुताचे नयन । जाहले अगदीं लहान । न दिसे तयाते पूर्ण । अक्षरही ॥१९॥
खुपर्‍या तैसी भुरी । आली नाथसुते नयनांवरी । या कार्यातें प्रभूनें परी । दृष्टि दिधली ॥१२०॥
श्रीकण्वाश्रम गुंफा पवित्र । तेथें बसवी नाथसुता । करी बाह्यांतरी पवित्र । नाथ माझा ॥२१॥
ऐसा जरी होतो अंध । परि अल्प प्रकाशांत ग्रंथ सिद्ध । करी योगाभ्यानंद । माधवनाथ ॥२२॥
जे नयन एक घटिका । न पाहूं शकती अक्षरादिका । ते आठ प्रहर प्रत्यहीं देखा । वाचूं शकले ॥२३॥
कापे कर थरथरां । नसे जरी मी म्हातारा । परि या समयीं तोही स्थिर । करी प्रभुराणा ॥२४॥
अनेक देऊनी दृष्टांत । मज कार्यासी केलें उद्युक्त । भासाभासाची मात । न सांगवे ॥२५॥
मज आवडे आलस्य । परि नाथें घेतला तो दोष । सदा स्फूर्तीचा प्रवेश । जाहला हो ॥२६॥
पाहतां दीपप्रकाश ग्रंथ । माझा मीच होतो विस्मित । मी - तूं - पण अंशमात्र । राहत नाहीं ॥२७॥
केली नाहीं एक ओंवी । तों पंचसहस्त्र सुमनें गोवीं । ही श्री नाथांचीच लाघवी । पूर्णपणें ॥२८॥
अठराशें चव्वेचाळीस शक । त्यावेळीं विषमज्वराचें दुःख । भोगी हा नाथ बालक । कर्मभोगें ॥२९॥
या ज्वरानें अवचित । तीन मास केलें त्रस्त । तीन स्वार्‍यानें नाथसुत । झाला जर्जर ॥१३०॥
नव्हता जीवाचा भरंवसा । नव्हती दुसरी आशा । नाथदीपप्रकाशाचा वांच्छा । राहिली होती ॥३१॥
म्हणोनि आळविले देवाधिदेवा । घ्यावी इतुकी दीनाची सेवा । मग माझें गृह मज दावा । चिर सुखाचें ॥३२॥
सत्य संकल्पाचा दाता । पुरवी नाथसुत मनोरथा । कल्पनेचाही मार्ग नव्हता । ऐसें कार्य करवी ॥३३॥
कण्वाश्रम गुंफेचें । मज स्वप्नही नव्हतें साचें । हें उपकार माझ्या सद्गुरुचे । ठेवी तेथें मजलागीं ॥३४॥
ऐकोनि गुंफेची वंदता । वाटत होते भय चित्ता । हा भ्रमनिरास करोनि तत्वतां । एकांतवास लाभला ॥३५॥
या पवित्र स्थलाचा आनंद । सांगावया मी मतिमंद । प्रत्यक्ष राहोनि सुख अखंड । अनुभवावें ॥३६॥
ही गुंफा मम हृदय - गुंफेत । ठेवीं श्रीमाधवा ! संतत । जनांत राहोनि एकांत । मज देईं ॥३७॥
असतां नाथसुत गुंफेत । जे बंधु करिती साह्य उचित । त्यांना करितों प्रणिपात । भक्तिभावें ॥३८॥
मी केवळ निर्धन । काय देऊं नमस्कारावांचून । त्यांची उपकृतीं शिरीं धारण । करीन नित्य ॥३९॥
वंदू श्रीकण्व महामुनीश्वर । तुम्हीं सांभाळिलें नाथकुमारा । नाना रूपें रूपसागरा । दाविलें दृष्टांता ॥१४०॥
पशुपक्ष्यांनी गायन । करोनि रंजविलें माझें मन । त्यांचे उपकार नसती सान । धन्य धन्य तुम्ही पक्षिगण हो ॥४१॥
सूर्य असो कितीही तापला । परी तेथें सदैव शीत जाहला । सायंकाळीं येती पाकोळ्या । घालिती वारा ॥४२॥
भ्रमर मधुर गुंजारव करी । एकच नाद कर्णद्वारीं । नादानुसंधानें नाथसुत भारी । संतोष पावला ॥४३॥
या गुंफेची देवता जागृत । श्रीजगदंबा झाली प्रगट । नाथसुताचा वास । तिच्या निकट जाहला ॥४४॥
जगदंबे ! त्वां त्रिशूल घेऊन । रक्षिला नाथसुत रात्रंदिन । तुझे पायीं लोटांगण । साष्टांग हें ॥४५॥
माझा भाऊ ‘ विवेक ’ राय । तयाचा प्रताप हा सर्व । नाथपदाच्या जोडीस्तव । मज सदैव शिक्षण देई ॥४६॥
वाक् - ताडण कटुनिंबपाला । ‘ विवकानें ’ बळेंच खाऊं घातला । परि तो पचतां आला - । अमृतानुभव ॥४७॥
विवेका तुझी धन्यता मी । कैसा गाऊरे स्वामी । ठेवी तुझ्या पदकमलीं । मस्तक हें ॥४८॥
संतांनीं काव्य पक्कन्नें वाढिलीं । नाथसुत मक्षिका त्यावर बैसली । सांचवोनी कणावली । अर्पिली श्रोतृवृंदां ॥४९॥
न होईल आपुला एक घांस । हें नाथसुत जाणें विशेष । परि या उच्छिष्टाचा एक अंश । तृप्ती देईल ही खात्री ॥१५०॥
मुनीच्या गृहीं होता पोपट । प्रत्यहीं खाई उच्छिष्ट । दिव्यवाणी होई प्राप्त । शुक्ररायासी ॥५१॥
इतुका महिमा उच्छिष्टाचा । घ्यावा अनुभव नाथसुताचा । नसे बोल दर्पोक्तीचा । परि उच्छिष्ट महिमा हा ॥५२॥
या सर्वासी कारण श्रीनाथ । नसतां प्रभुचें आज्ञापत्र । नाथसुत केवळ कस्पट । कोण विचारी ॥५३॥
घालतां शिपायाचा डगला । जनता मान देई तयाला । न करिती प्रतिबंध तत्कार्याला । राव रंक ॥५४॥
तैसा नाथसुत चोपदार । नाथसेवेच आंगरखा झोंकदार । नाथाज्ञेचा पट्टा रुचिर । चढवुनी आला ॥५५॥
त्यायोगेंच सर्व संत । करिती नाथसुताचें स्वागत । त्या मूळरुपासी साष्टांग प्रणिपात । वारंवार ॥५६॥
नाथा तूं जैसा गुंफेत । राहसी माझ्या रोमारोमांत । तैसा प्रपंच परमार्थांत । राही xxxxxxxxxxxxxx ॥५७॥
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx॥५८॥
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx॥५९॥
वैशास्त्र शुद्ध प्रतिपदेला । पस्तीस किरणांचा पुंज संपला । एकेचाळीस दिनांचा लागला । कालावधी ॥१६०॥
घालोनि नियम रेषेस । संपवी दीपप्रकाशास । सर्व जाणे भविष्य । नाथ माझा ॥६१॥
अखंड एकांतवास सेविला । ग्रंथाचा साक्षात्कार झाला । तो नाथांच्या पदीं वाहिला । नाथसुतानें ॥६२॥
पूर्वार्ध श्री नाथचरित्राचा । येथेंच स्थित जाहला साचा । आतां उत्तरार्धाचा काल । केव्हांही येवो ॥६३॥
ज्यानें प्रकाशविला पूर्वखंड । तोचि दावील उत्तरखंड । नाथसुता नसे त्याची चाड । तिळभरी ॥६४॥
सकळ करणें श्रीमाधवनाथाचें । तेथें पाड काय मज पामराचें । कासया घेऊं ‘ मी ’ पणाचें । ओझें शिरावरी ॥६५॥
माझ्या कनवाळू समर्था ! । श्रीसद्गुरु माधवनाथा ! । तुझी अद्भुत लीला पाहतां । नयनीं वाहती अश्रुधारा ॥६६॥
तुझें प्रेम निरुपम । तुझी मूर्ति अनुपम । नाथासुताचा पूर्ण काम । करिसी न कळतां ॥६७॥
तुझें गातां स्तुतीस्तोत्र । होतों मानसीं निवांत । माझें विसरे सारें द्वैत । योगीनाथा ॥६८॥
म्हणोनी चरणीं साष्टांग माथा । ठेवुनी सद्भावें ताता । घेतो सुखानें निरोप आतां । नाथसुत ॥६९॥
इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुत विरचिते अवतरणिकंनाम पंचस्त्रिंशतितमः किरणः समाप्तः ॥

॥ इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाश ग्रंथ समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP