दीपप्रकाश - द्वात्रिंशत्तम किरण
Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.
श्रीसद्गुरुनाथायमः --
सद्गुरुनाथा श्री अनंता । तुझी अपूर्व वत्सलता । कोणी नाहीं समर्थ ताता । गावयासी ॥१॥
असो निंदक वा स्तुतिपाठक । तुजसी वाटती दोघे एक । करिसी त्यांचें कौतुक । आनंदानें ॥२॥
सत्यासत्याचें विवरण । करिसी आश्चर्यपूर्ण । दोन्ही ही रूपें आपण । घेसी गोविंदा ॥३॥
तूं नाकळसी योगपंथें । अथवा विहित - कर्मपंथें । ज्ञानीही “ नेति नेति ” वचनातें । तुज म्हणती ॥४॥
परि तुज आकळाया । भक्ति वेसण असे राया । मग न पळसी घेउनी माया । योगीराजया ॥५॥
ज्ञानेश्वर माउली समर्थ । तिनें काढिला हा वेदांत । गाजविला महाराष्ट्रांत । पंथराय ॥६॥
जो शरण येई पदासी । तयाचा महिमा । वाढविसी । करोनी अकर्ता म्हणवीसी । परब्रह्मा ॥७॥
कैसाहि असो त्वद्भक्त । परि प्राणाहुनि प्रिय वाटत । करिसी निर्हेतुक प्रीत । तयावरी ॥८॥
नंदिग्रामीं असतां सद्गुरू । आला एक भिक्षुक नरू । पाहोनि महादेव आश्रम रूचिरू । मति तयाची गुंगली ॥९॥
आले भेटाया वासुदेवा । तो हवन करीत होता त्या समया । मूकवृत्ती म्हणोनिया । करी धारण भक्तश्रेष्ठ ॥१०॥
मूक्यानेंच केलें आदरातिथ्य । दिला बसायासि पाट । ब्राह्मण पाहतां कुंड उचित । चित्तीं सुखावला ॥११॥
तों एक झालें नवल । कुंडांत दिसे त्यासि गंगाजल । मध्ये शाळिग्राम श्यामल । तरंगत असे ॥१२॥
शाळीग्राम सतेज होता । नील रत्नासम त्याची दैदीप्यता । ब्राह्मण झाला लोभी तत्वतां । म्हणे घेऊ पूजेसी ॥१३॥
वासुदेव ध्यानीं रंगला । बघोनि तो द्विज उठला । घ्यावया मूर्ती सरसावला । कुंडा निकटीं ॥१४॥
तों मावळला भास त्वरित । दिसे अग्नि लखलखित । भाजला ब्राह्मणाचा हात । जहाला घाबरा ॥१५॥
करोनी हवन विसर्जन । सेविला वासुदेवें ब्राह्मण । विभूति उपचार करून । शांतविला ॥१६॥
भिक्षुक झाला लज्जायमान । सांगितलें लोभी मनलक्षण । विनवी आपुला गुरु कोण । मज सांगिजे ॥१७॥
गुरुच्या अंगीं इतुकें सामर्थ्य । हें मी आजीच बघत । जिकडे तिकडे पसरले खचित । ढोंगी गुरु ॥१८॥
शिष्याची संपत्ति लुबाडावी । आपुली पूर्ती करावी । राजयोगाची मिरवावी । वृत्ति भारी ॥१९॥
दाखवावा साधूचा डौल । घालावी कफनी शाल । देहही करावा विशाल । यथा रस खाउनी ॥२०॥
वाढवाव्या शिरीं जटा । भालीं लावावा मळवट मोठा । नेसावें कटीं लंगोटा । पायीं पादुका चटपट ॥२१॥
कांहीं चेटके तोटके शिकावे । सवे धूर्त शिष्य घ्यावे । त्यांना अर्धे धन द्यावें । मग माजविती स्तोम ॥२२॥
आमचा गुरु अयोनिसंभव । आकाशांतुनि उतरला नव । धरी रूप जगदुद्धारास्तव । घ्या घ्या अनुग्रहा ॥२३॥
पुत्रकन्या होतील । धन्याचें डबोले मिळतील । जें जें भक्त वांच्छील । लाभेल आमुच्या गुरुकृपें ॥२४॥
अनुग्रहाची दक्षिणा । गरीबासी पंचदश जाणा । एकशेंएक धनवाना । वरी शाल पांघरवावी ॥२५॥
आशाळभूत जन सकळ । भुलती ऐकुनी ऐसें धूर्त बोल । फुंकोनी घेती कर्ण आपुले । म्हणती झालों पावन ॥२६॥
जैसा जाई कानांतुनी वारा । तैसा गुरुहि करितों पोबारा । ऐसा अनुभव मज सार्या । आला ढोंगी गुरुंचा ॥२७॥
ऐसाचि म्यां गुरु केला । मंत्रोपदेश घेतला । सर्व वेंचुनी तयाला । सेवेलागीं निघालों ॥२८॥
होतें जोवरी जवळी धन । तोवरी केली स्तुति जाण । बघता केवळ निर्धन । करी छळ नानापरी ॥२९॥
सेविलें त्यातें अहर्निशीं । परी न मिळे पोटासी । न दाखवी परमार्थासी । सदा धन - चिंतनीं रत ॥३०॥
जयास न कळे परमार्थ । तो शिष्यासि केंवी दे पूर्णत्व । ऐसे भोगिले नाना कष्ट । मग निघालों तेथूनियां ॥३१॥
जवळी होतें तें गुरुपायीं । वेचिलें म्यां मूढानें सर्वही । आतां उलटी अंबारी घेई । कामधेनूची ॥३२॥
ऐकोनि द्विजाची वाणी । वासुदेव मनीं म्हणे हा भ्रमिष्ट प्राणी । आपुले अवगुण ठेवी झांकोनी । दोष लावी गुरुसी ॥३३॥
यासि न्यावें समर्थचरणीं । लावितील प्रभु गुरुभजनीं । न काढावा सद्गुरुसुकीर्ति ध्वनी । या निंदकापुढें ॥३४॥
अहो गुरुजी माझा सद्गुरुराव । येथेंच आहें स्वयमेव । चलावें दर्शनास्तव । योगेश्वराच्या ॥३५॥
आधीं दर्शन घ्यावें प्रभूचें । मग सांगेन इच्छित तुमचें । प्रेमें हस्त धरोनि द्विजाचे । आले सद्गुरुसन्निध ॥३६॥
बघोनि सद्गुरुची मूर्ती । मावळली द्विजाची वृत्ती । हळुच प्रभु त्यातें वदती । गुरु कां निंदावा ॥३७॥
गुरुनिंदका रौरव नरक । गुरुद्वेष्ट्यासी कुंभीपाक । जोडिलेंस तूं महापातक । द्विजवरा ॥३८॥
न विचारितां अंतर । उघडी तयाचें योगेंश्वर । विप्र झाला चित्तीं गार । म्हणे हा दिसे थोर साधू ॥३९॥
विनयानें विनवी नाथा ! । मज पावन करावें आतां । शिष्यत्व स्वीकारीन सर्वथा । देहांतापर्यंत ॥४०॥
म्यां सद्गुरु एक केला । परि तो गुरूंच दिसला । सोडुनि अशा असाधूला । फिरतो गुरु शोधीत ॥४१॥
तों भेटला तूं जगद्गुरु । झालासि मम विश्रांति तरू । आता नको अव्हेरूं । परम पुरुषा ॥४२॥
नाथ म्हणे रे द्विजा भ्रांता । सोडिला आपुला श्रेष्ठ पिता । देखिल्या देवासी दंडवता । घालिसी येथ ॥४३॥
तुज असतां एक पिता । दुसर्यासि म्हणसी कैसा ताता । हा अधर्म करिसी मोठा । तूं महापातकी ॥४४॥
जैसा पतिव्रतेचा धर्म थोर । तैसाचि शिष्याचा आचार । न कळे तुज याचा विचार । सूज्ञ असुनी ॥४५॥
पतिवांचुनी पतिव्रता । न पाही परपुरुष सर्वथा । पति असला जरी थोटा । तरि तो मान्य तियेसी ॥४६॥
न पाही पतीचे गुणावगुण । सेववीं अर्पी तनमन । तैसेंच सच्छिष्यें जाण । वर्तावें गा ॥४७॥
धौम्य महामुनी होते । जाहली त्यांचीं गलित गात्रें । किती सेविलें शिष्य नाथे । पाही गुरुचरित्र ॥४८॥
त्रिदेवही जरि येती । तुच्छ मानी उपमन्युयति । मिळविली सायुज्य मुक्ति । अंतकाळीं ॥४९॥
द्विज प्रश्न करी नाथासी । धौम्य होता महाऋषि । आधीं दाविली प्रचीती शिष्यासी । मग कसा लाविलें ॥५०॥
परि माझा गुरु दुराचारी । करी चोर्या नानापरी । कान फुंकोन होई दुरी । पाही केवळ धनवान ॥५१॥
ऐशा गुरुची करोनी साथी । काय मिळवूं गा जगजेठी । मज सोडवील कैसा अंतीं । दुर्मति ऐसा ॥५२॥
नाथ म्हणे हे द्विजराय ! । पाहिजे मानसी भाव । शिष्यधर्माचें सार जें होय । तें पूर्वींच कथियेलें ॥५३॥
कांहीं न करी सद्गुरु । केवळ भावाचा आधारू । भाव नसतां प्रत्यक्ष ईश्वरू । कांहीं न देई ॥५४॥
ठेवितां गुरुवरी एकनिष्ठता । तीच सुफलदायी होते तत्वतां । सद्गुरु केवळ मार्ग दाखविता । कार्यकर्ता तूंचि ॥५५॥
भावना सर्वांत प्रधान । भावनेनेंच नारायण । भावनेनें कला संपन्न । होई साधक ॥५६॥
निषादाचा पुत्र एकलवा । विनवी भावें द्रोणाचार्या । मज धनुर्विद्याही शिकवी । महाराजा ॥५७॥
परि धनुर्विद्या त्या समया । शिकविती केवळ द्विज - क्षत्रियां । अनधिकारि म्हणोनि तया । नाकारी द्रोणगुरु ॥५८॥
परि तो होता एकनिष्ठ । केली मृत्तिकेची सद्गुरु मूर्त । जाहला शास्त्र पारंगत । केवळ भावनेनें ॥५९॥
आतां तुजला गुरुशिष्याचें । एक आख्यान सांगेन वाचे । गोदावरी तिरीं पैठणाचे । सन्निध ग्राम असे ॥६०॥
तेथें एक साधुवेषी । मिळवी शिष्य बहुवसी । लावी राख अंगासी । धुनी दिसे समोर ॥६१॥
कोणी शिष्य होती गानास्तव । कुणा भांगेचा नित्य भाव । कोणी पोट भरायास्तव । शिष्यत्व स्वीकारिती ॥६२॥
ऐसा शिष्यांचा घोळका जमला । त्यांत एक शिष्य होता भला । तो भजे नित्य सद्गुरुला । मनोभावें ॥६३॥
गुरुनें दिधला “ डूं डूं ” मंत्र । त्याचा जप करी अहोरात्र । सोडिले धन कन्या पुत्र । लागला भजनीं गुरुच्या ॥६४॥
सांगती सारे जन त्यासी । हा गुरु नव्हे बकसंन्यासी । व्यर्थ आयुष्य वेंचितोसी । ऐशा नादीं लागुली ॥६५॥
तुज परमार्थाची असेल गोडी । तरी आधीं उत्तम गुरु शोधी । मिळेल बापा सिद्धी । त्यानंतर ॥६६॥
न ऐके तो भक्त कोणाचें । म्हणे मीं धरिले पाय या सद्गुरुचें । कोणी भांडार दिले ब्रह्मांडाचें । तरी मज नको गा ॥६७॥
केवळ “ डूं डूं ” च्या मंत्रानें । समाधियोग साधिला त्यानें । इकडे गुरुचें ऐकणें । कथानक ॥६८॥
गुरुजवळी झाले कनक । मग वरिली कांता एक । करी व्यभिचार अनेक । ढोंगीबुवा ॥६९॥
अंतीं पंचत्व पावला । यमदूतीं ओढूनि नेला । नानापरी छळ मांडिला । कर्मांनुसार ॥७०॥
शिष्य झाला पूर्णाधिकारी । आला वर द्याया मुरारी । तुष्टलों आपण अंतरीं । बघूनि तव भक्ती ॥७१॥
तुझा उद्धार कराया । मी आलों भक्तराया । काय इच्छिसी सांग सखया । पुरवीन ती ॥७२॥
भक्त विनवी देवाधिदेवा । माझा “ डूं डूं ” देईल सर्व । न घ्यावे कष्ट सदया । जावे परतोनी ॥७३॥
आश्चर्य करी श्रीहरी । ऐक वत्सा बोल अंतरीं । वर दिल्यावांचुनी माघारी । जातां नये ॥७४॥
मी तुज बसवोनी विमानीं । नेईन वैकुंठींच्या भुवनीं । सांगावें जें वसेल मनीं । पुरवीन तें ॥७५॥
हंसला तो भक्ताग्रणी । जरी मज नेसी विमानीं । तरी “ डूं डूं ” चा धनी । माझा सद्गुरुराज ॥७६॥
त्यातेंही त्वां न्यावे । मज समान उद्धरावें । यमपाशांतुनी सोडवावें । परमेशा ॥७७॥
धरिले त्या सद्गुरुचे चरण । म्हणोनीच भेटला तूं नारायणा । मी न येई तयांवाचून । हा निर्धार ॥७८॥
देव आज्ञापी भक्तासी । तव गुरु महादोषी । कैसा उद्धरूं तयासी । सांग पां ॥७९॥
कृत कर्माचें प्रायश्चित्त । घेतसे तो यम - सदनांत । त्यास उद्धरितां रविसुत । कोपेल गा ॥८०॥
म्यांचि जे नियम केले । ते तोडिता असंतुष्ट सगळे । कैसा कारभार सरळ चाले । मग आमुचा ॥८१॥
असला जरी सार्वभौमराजा । असंतुष्ट होता त्याची प्रजा । विनाशकाल समजा । जवळ तयाचा पातला ॥८२॥
प्रजेची शक्ति अनिवार । तो राजासही करिते दूर । न करी आग्रह कठिणतर । भलतैसा ॥८३॥
शिष्य म्हणे गा वैकुंठपती । भक्तांस्तव तुझे नियम नसती । कराया आमुची इच्छापूर्ती । तूं नियमातीत ॥८४॥
ऋक्मांगद नरेश भला । तयाचा देश उद्धरिला । त्याकालीं भक्तवत्सला । कोठें तुझा नियम ॥८५॥
सुदामाची सर्व नगरी । सुवर्णाची केलीस नरहरी ! । भक्तां अभक्तांही तारी । तूं श्रीकृष्ण ॥८६॥
कंस चाणूर महादैत्य । धर्माचा ज्यांनीं केला निःपात । त्यांस दाविसी भूवैकुंठ । पुरुषोत्तम ॥८७॥
नक्र तुझ्या भ्क्ताचा द्वेष्टा । त्यासही उद्धरसी श्रीकांता । मंथरा करूं पाहे तव घाता । देसी मुक्ती तियेला ॥८८॥
या पातकांहुनी मम सद्गुरुनाथ । नोहे श्रेष्ठ वदतों सत्य । तयातें न नेतां मजसहित । नको वैकुंठ आपुलें ॥८९॥
बघोनि शिष्याची उत्कट इच्छा । उद्धरिला ढोंगी गुरु साचा । हा महिमा भावनेचा । ऐक द्विजराया ॥९०॥
ऐसी मनोहर कथा । सांगे सद्गुरु शरणागता । कां भटकसी व्यर्थ भक्ता । भ्रांत होउनी ॥९१॥
ठरवितां सद्गुरुची मूर्ती । आधींच विचार करावा चित्तीं । मग न होते फजीती । अंतर्बाह्म ॥९२॥
ज्यातें एकदां सद्गुरु मानिला । न पहावें गुणावगुणाला । तो ईश या भावनेला ठसवावें बळकट ॥९३॥
गुरुचे गुणदोष जो पाही । त्या कोठेंही आश्रय नाहीं । अनेक तपें केलीं तरीही । तीं व्यर्थ जाणिजे ॥९४॥
सद्गुरु आणि ईश्वर । यांत जयाचा भेदविचार । तो पातकांचा भार । घेई शिरावरी ॥९५॥
सर्व देवांची जेथें वस्ती । सर्व साध्यांची कोठी । सर्व मुक्तींची विश्रांती । सद्गुरुनाथ ॥९६॥
क्षेत्रांमाजीं काशिक्षेत्र । सरितांमाजी गंगा पवित्र । गिरिमाजीं हिमालय श्रेष्ठ । तैसा सद्गुरु ॥९७॥
सद्गुरु सर्वांचें अधिष्ठान । सद्गुरुविणें नाहीं कोण । सर्व भाग्याचा कल्पद्रुम जाण । गुरुराणा ॥९८॥
त्रिदेवाची ज्यापासून उत्पत्ती । सोडोनि तो जगपती । जे इतरां मोठेपण देती । ते करंटे प्राणी ॥९९॥
जो असे केवळ अनादि । ज्याची मिराशी शून्यावधी । तो सद्गुरु जो निंदी । त्यास कोण तारील ॥१००॥
इतरें उपेक्षितां भक्तासी । तारील सद्गुरु तयासी । सद्गुरु मोकलितां साधकासी । रक्षाया असमर्थ सारे ॥१॥
सद्गुरुचें सुदर्शन चक्र । आहे जगतीं अजिंक्य । सदैव रक्षी भक्तनायक । संकटापासुनी ॥२॥
ऐसा सद्गुरुमहिमा गाउनी । नाथ सांगे विप्रालागुनी । होई लीन त्या गुरुचरणीं । तारील तव भाव ॥३॥
एकदां ज्यातें अनुग्रह झाला । त्यास उपदेशाया आम्हाला । अधिकार नाहीं बाळा । जाई आपुलें स्थानीं ॥४॥
अनुग्रहिता सांगे मंत्र आपण । तो गुरु महा दोषी जाण । मी न स्वीकारी अशास्त्र विधान । विप्रराया ॥५॥
सार्थक आपुलें जरी इच्छिसी । तरि शरण त्या सद्गुरुसी । प्रत्यक्ष अथवा मानसीं । करी सेवा ॥६॥
तयानें दिधला जो मंत्र । तो चिंती अहोरात्र । मग पाहशील मूर्तिमंत । वैकुंठपुरी ॥७॥
विप्र चरणीं लोटांगण घाली । मज कृतार्थ केले माउली । गुरु - निंदेनें व्यर्थ म्यां मळविली । आपुली काया ॥८॥
श्रीनाथ मेघ गजबजला । उपदेशाचा वर्षाव केला । मळ सारा धुवोनि काढिला । देवराया ॥९॥
जातो आपुल्या सद्गुरुपाशीं । मज द्यावे आशिर्वचनासी । व्हावी कार्यसिद्धी ऐंसी । याचना करी ॥११०॥
घेवोनि प्रभुचा वरदहस्त । विप्र जाहला मार्गस्थ । आपुल्या ध्येयासी शरण येत । मिळवी फल सेवेचें ॥११॥
नंदिग्रामाहुनी नाथ । श्रीगोंदें मुक्कामीं जात । करी कौतुक तेथ । सहजींच ॥१२॥
जाहला होता सायंकाल । तो समाधी लागली अचल । विसर्जन करितां चिन्मय खेळ । वदे सर्वांसी ॥१३॥
आमचा भाई महंमद वली । आला होता या कालीं । ती बघा मूर्ती बसली । अश्वावर ॥१४॥
बघती भक्त प्रेमयुक्त । तों जाई एक स्वारी खचित । नेई सर्वांसी त्वरित । वलीचें स्थानीं ॥१५॥
वली होते परमहंसनाथ । अविंधें केलें फकीर मूर्त । परि राखिती हिंदुत्व । वलीराज ॥१६॥
जाऊन नाथ मशिदींत । गाई कल्मा अद्भुत । ठेवीं दक्षणा रुपये सात । वलीपुढें ॥१७॥
काजीस आनंद झाला । दक्षणा घ्यावया सरसावला । तों काय चमत्कार झाला । रुपये न दिसती ॥१८॥
नाथ म्हणे मीं दिली साथ । ती घेई श्रीवली नाथ । पुनरपि कांहीं देत । काजी लागीं ॥१९॥
भक्तपालका श्रीमाधवा । किती नटसी तूं केशवा । क्षणक्षणांत खेळविसी राया । आपुली माया ॥१२०॥
इतुक्या भूमिका घ्यावया । तुज कैसा वेळ मिळे सखया । निमिषांत हमाल मथुरी गोजरिया । होसी तूं ॥२१॥
आम्हांस करावया वस्त्र परिधान । लागते एक घटिका जाण । परि एक निमिषांत संकर्षण । होसी सूक्ष्म मोठा ॥२२॥
म्हणोनीच तुला अतर्क्य । म्हणती प्रेमें कविनायक । होती सर्वही दीन रंक । तुजपुढें ॥२३॥
कोणाचा न ठेविसी गर्व । स्वयेंही स्वीकारिसी लघुत्व । तुज सेवकत्वाची भारी हाव । राजेश्वरा ॥२४॥
भक्तांची सोत्रें गासी । त्यातें श्रेष्ठत्व पूर्ण देसी । भक्तांचे पायीं राहसी । सच्चिदानंदा ॥२५॥
भक्तानें मारिता लाथ । तें भूषण मानिसी नाथा । भक्तांचे अपशद्व खचित । वाटे सुमनांजली ॥२६॥
मग ऐशा देवभक्तांत । कोण श्रेष्ठ ही पडे भ्रांत । जैसें दुग्धीं नवनीत । ओळखितां न ये ॥२७॥
म्हणोनि या एक मूर्ती ! करी त्यांना अनंत प्रणती । नाथसुताच्या हृदय ज्योती । देवभक्त ॥२८॥
पुढील किरणीं ज्ञाननाथ । उद्धरील एक भक्त । रांजणगावीं हवन कृत्य । नाथसुत म्हणे ॥२९॥
इतिश्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुतविरचितेसद्गुरुस्ववनंनाम द्वात्रिंशतितमः किरणः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP