मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
त्रयोदश किरण

दीपप्रकाश - त्रयोदश किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्री सद्गुरुनाथायनमः --
जयजय श्रीमाधवनाथा । तुज किती गावे समर्था । तुझी स्वरूपही वर्णितां । मुकें मन होई ॥१॥
सर्व कार्ये हीं मना आधीन । मन हेंचि देहाचें चालन । मन हें तोडि बंधन । संसाराचें ॥२॥
तें मन धरितां मूकवृत्ति । तुज स्तवावें कोण्यारीती । मज सांगे बा जगपती । कृपाळूपणें ॥३॥
या मनातें म्यां विनविलें । की सोडावी मुग्धता बळें । परी ते चावटी झालें । राहे निवांत ॥४॥
आतां तुझे चरित्र कैसें गावें । म्यां तुज हृदयीं कैसें आणावें । तुझ्यांतचि म्यां मुरजवावें । कैसें सांगपां ॥५॥
तूं माझें मन - सुमन । जरी ठेविसी मुकुलित वदन । प्रकाश किरणांचे चिन्ह । मग प्रगट केवीं होय ॥६॥
तरि ऊठ रे ज्ञानभास्करा । हृदयाकाशीचा घेई थारा । प्रकाश किरणाचा वारा । वाहूं देई सत्वर ॥७॥
त्यायोगें मन - कमल । मुग्धता आपुली सोडेल । तव किरणांमाजी खेळेल  । आत्मरूपें ॥८॥
ऐसें न करिसी जरी । प्रकाशाची होईल अंधारी । मग किरणांची सरी । येईल वेडी वांकुडी ॥९॥
मी नव्हे बा लेखक । नव्हे शास्त्रांची पारख । पाहिलें नाहीं काव्यादिक । आजवरी ॥१०॥
उदरभरणाचीहि विद्या । मज नसे योगाभ्यानंदा । मग परमार्थाच्या विवादा । कैसे करूं ॥११॥
मिळविलें धन पूर्वजांनी । ते खाई केवळ बैसोनी । भटकतो विषयविपिनीं । सर्वकाळ ॥१२॥
म्हणोनि त्वां हातीं धरिलें । द्वाद्वश किरण प्रकाशविलें । आतां मनाचे चाळे । ठेविशी मुग्ध ॥१३॥
ऐशी जरी तूं करिशील कृती । मग प्रकाशवूं कैशा किरण पंक्ती । सोडी अढी जगजेठी । करी मन बोलकें ॥१४॥
नातरी तुझा प्रकाश । घेईल दिवटिच्या रूपास । तुझें होईल हासें । भूतलावरी ॥१५॥
करतील लोक टवाळी । तें दूषण तुलाच गे माउली । तूं होशील नामानिराळी । परि येथें हें अशक्य ॥१६॥
प्रभु तुला येथुनी पळतां नये । हें तुझेंचि रूप पाहे । तूं सुटता लवलाहे । होईल अंधःकार ॥१७॥
तुम्ही मज सोडून जाणें । आतां होईल अश्लाघ्यवाणें । तुझें वायुसमान पळणें । येथें न चाले ॥१८॥
तुज हृदयकपाटीं म्यां ठेविलें । कैसी पळशील दयाळे । परि तेथें निद्रेचे रूप घेतलें । म्हणोनि विनवणी केली ॥१९॥
तूं निद्रित तों मनही निद्रित । तूं जागृत तों मनही प्रफुल्ल होत । म्हणोनि तुज अनाथनाथा । करितो जागृत ॥२०॥
तों हंसला माझा नाथ । म्हणती झालासी चावट । तुझी जिभली चालली बहुत । पुरे ही वटवट ॥२१॥
आनंदलें मन्मन । किरणास्तव येई स्फुरण । पुण्यप्रांतीं सद्गुरु जाण । राहिले होते आनंदें ॥२२॥
आला एक बालक । विश्वविद्यालयाचा पोषक । त्यास सांगती योगीनायक । तव परीक्षा जाहली ॥२३॥
परि आंग्ल भोषेचें पुस्तक । पंचाण्णव पानांचा अंक । त्यांतील प्रश्न निःशंक । त्वां सोडविले नाहीं ॥२४॥
चिंता न करी तिळभर । तुझें कार्य होईल सुखकर । चिंती मानसीं मोरेश्वर । सिद्धी तुज मिळेल ॥२५॥
श्रीनाथ आज्ञा पालन । करिता झाला नाथनंदन । विजय मिळवी आपण । परीक्षेंत ॥२६॥
लक्ष्मीबाई हलवाई नाम । श्रीनाथकन्या भाविक परम तीस आज्ञापिती श्रीराम । बांधी श्रीदत्त मंदिर ॥२७॥
होता जवळीं बहुत पैका । कासया घेसी दत्तका । करी अर्पण परमार्थ विवेका । ऐसे वो बालिके ॥२८॥
कोणी कुणाचा जगतीं नाहीं । कासया फिरसी व्यर्थ बाई । करी धर्माची कृती ही । इह - परीं धन्य होशील ॥२९॥
नको गुंतूं मायाजाळीं । तुज अनायासें संधी आली । तूं दवडितां कालाची जाळी । अडकवील क्षणांत ॥३०॥
बुधवार हें प्रमुख स्थान । जाती येती अनेकजन । त्यास घडवी गे दर्शन । श्रीगुरूचें निरंतर ॥३१॥
सद्गुरूचें वचन मान्य । करिती शिष्य जाण । खर्चिलें सहस्रावधी धन । मंदिरा कारणें ॥३२॥
श्रीनाथा विनवी ती चतुरी । आपण घ्यावें कार्य शिरीं । प्रभूनें भक्ताची इच्छा पुरी । केली स्वयें कष्टुनी ॥३३॥
हें पुण्य नगरीचें भूषण । शोभवी तिचें चिरस्मरण । श्रीदत्ताचे सुंदर स्थान । भाव उत्पन्न करी ॥३४॥
मंदिराची होई प्राणप्रतिष्ठा । लक्ष्मी झाली स्वर्गस्था । धन्य तूंते समर्था । परमार्थ घडविला ॥३५॥
जाणोनियां पुढील भाव । भक्तांकरवीं करी कार्य । पाजी अमृताचे घोट सदय । बळेंची ॥३६॥
तेथून जाई दक्षिण महाराष्टीं । हालवी जनतेच्या वृत्ती । धर्मश्रद्धेच्या अमृतताटीं । जेववी सकळांशीं ॥३७॥
तेथेंही करी नवल सहज । आला एक कुष्ठी मनुज । वंदी चरणरज । रोगमुक्त व्हावया ॥३८॥
झाडीत होती एक बाळी । केरसुणी तियेची घेतली । म्हणे जाळुन रक्षा भली । लावी घृतांत ॥३९॥
प्रभुवचनीं विश्वास । ठेउनी करी त्या रीतीस । न होतां एकही मास । झाला रोगमुक्त ॥४०॥
होते यवन कोतवाल । ऐकोनी नाथ चरित्र विमल । वंदिती जोडोनी करकमल । मज करावे पावन ॥४१॥
देखोनी भक्ती तयाची । नाथें घेतली भूमिका काजीची । पिंवळें वस्त्र उटि चंदनाची । पंचे ठोकी तयावर ॥४२॥
सांगितला प्रेमें निमाज । पंधराव्या सैफीचा गुज । मग ध्यान धारणेचा पुंज । उभा केला दृष्टीपुढे ॥४३॥
कृतार्थ झाला तो फौजदार । म्हणे तूं रामरहीम थोर । तूंचि अल्ला । अकबर मज वाटे ॥४४॥
ही मात कळली सकळ यवना । क्रृद्ध होती आप आपणां । येती काठ्या घेवोनि जाणा । शिक्षा कराया प्रभूसी ॥४५॥
आमुच्या धर्माचा अपमान । हा कोण करी ब्राह्मण । त्याचा घेऊं आजि प्राण । क्षणांतची ॥४६॥
चलो भाई करो गर्दी । सूड घेऊं त्याचा आधीं । राखूं लाज महंमदी । धर्माची गा ॥४७॥
ऐकोनी ही मात । नाथ प्रभू मनी हांसत । म्हणे तयार व्हावें आतां । घ्यावया मार ॥४८॥
रंभा पाटलाचा आहे अनुभव । परी हा खेळ अभिनव । येथें अपशब्दांसह । मिळेल बक्षिस पाठीवरी ॥४९॥
मग पृष्ठभागा सांगती नाथ । आतां सिद्ध असावें त्वरित । पडेल यष्टीची गांठ । भेटावें तिजला आदरें ॥५०॥
शिष्य गण भ्याला भारी विनविती नाथां ते सत्वरीं । आपण लपावें अंतरीं । ना तरी पळावें येथुनी ॥५१॥
अथवा बसावें देवघरांत । किंवा धरावा योगपंथ । व्हावें येथेच गुप्त । गुप्तेश्वरा ॥५२॥
आश्वासिलें शिष्यवरा । नका देऊं चिंतेस थारा । श्रीनाथाचा दरारा । अजुनी न पाहिला ॥५३॥
तों आला अविंधभार । कोठें कोठें तों साधुवर । आम्ही आज फोडणार । मस्तक तयाचें ॥५४॥
येती नाथदेवा समोर । तो त्यांस दिसला फकीर । काजीचा घेतला अवतार । लांब दाढी मिशा ॥५५॥
गुडघे टेकून भूमीवर । गाई कल्मा सुंदर । ऐकून तयाचा स्वर । पीर मुर्शिद म्हणती ॥५६॥
करिती सलाम लवून । क्षमा करावी वली भगवान । नेणता केले अपराध पूर्ण । अभय द्यावें तरी ॥५७॥
ऐसा सजोनी नवल परी । येई नाथ कांदेग्रामा भीतरीं । आला एक मोक्षाधिकारी । बाळा नाइक उपनामक ॥५८॥
विनवी शिष्य महाभाव । मज सांगावा मनोजय । ध्यानाचाही उपाय । सुचवी दयाळा ॥५९॥
कराया बैसावें ध्यान । तों मन जाई पळोन । कदापि स्थिर नोहे जाण । कोठेंही ॥६०॥
पुधें आणावा सद्गुरुनाथ । तों मन जाई चर्मकारगृहांत । क्षणांत जाई घाणींत । सांगतां नये ॥६१॥
ज्या समयीं नसतों ध्यानांत । त्या कालीं न होई इतुका भ्रांत । परी होतां आसनस्थिर । मन उडे पहिल्या परी ॥६२॥
प्रथम सांगावे मनोजयास । मग ध्यान धारणेस । तुम्हावांचुनी माझी आस । कोण पुरवील ॥६३॥
देखोनी शिष्याचा भाव । प्रसन्न झाला सद्गुरुराव । म्हणे मज ऐसा प्रश्नसंग्रह । कोणी केला नाहीं ॥६४॥
तूं माझा खरा पुत्र । तुज ध्यानींच रमवीन सत्य । फेडीन तुला संशय निश्चित । पुत्रराया ॥६५॥
या मनाचा कोठें वास । करी कैसें कृत्य उदास । कराया लयरूप त्यास । उपाय सांगेन ॥६६॥
पंच ज्ञानेंद्रियांचें नामानिधान । कर्ण नयन त्वचा नासेक जाण । रसनाही पांचवी खूण । आतां कर्मेंद्रियें पांच ऐका ॥६७॥
वाचा हात तेंवि पाय । गुद शिश्न हीं कर्मेंद्रियें । ही इंद्रियें आणिक बुद्धितत्व । यांत राही मनराजा ॥६८॥
तो वायुरूप केवळ । अरूपानेंच करी खेळ । जसें भासें मृगजळ । परी तें नसें मूर्तिमान ॥६९॥
किंवा गगन दिसें नीलवर्ण । परि तें असें भासमान । तैसें वायूचें जें चमकणें । त्यास मन म्हणती ॥७०॥
होतां शुक्रशोणितांचे ऐक्य । पंचतत्वांचा पिंड होई एक । त्यांत वायुतत्वाचें द्वय पंचक । स्थानभेदानें राहे ॥७१॥
तया म्हणती प्राण उपप्राण । त्याचे प्रकार सांगेन । प्राण अपान व्यान उदान । समान हे पंच प्राण ॥७२॥
आतां सांगतों उपप्राण । नाग कूर्म कृकल जाण । देवदत्त धनंजयाची खूण । हीं उपप्राणनामें ॥७३॥
या दश प्राणांचीं स्थानें । तीं ही सांगेन विस्तारेन । त्याविणें मनाचें ठिकाण । केवीं सांगावें ॥७४॥
हृदयीं प्राण गुदीं अपान । नाभिस्थानीं समान । कंठी राहे उदान । व्यान सर्व शरीरीं ॥७५॥
नागवायू देई ढेकर जाण । कूरं करी नेत्र उन्मीलन । शिंका आणि उपप्राण । जांभाई देई देवदत्त ॥७६॥
आतां राहिला धनंजय । जो सर्व शरीरीं करी वास्तव्य । ऐसे उपप्राण बरवे । करिती स्थानीं विहार ॥७७॥
या सकल प्राणांत असें चांचल्य । त्यायोगें होई रजोगुण बळ । त्यांतच मन वेल्हाळ । कल्पनारूप असे ॥७८॥
मन हा इंद्रियांचा चेतविता । मन हा इंद्रियां खेळविता । मन हा इंद्रियांचा नेता । जाण बापा ॥७९॥
देह हा जाणावा तरू । इंद्रियें तयाच्या शाखा रूचिरू । मनवायू हालवितां थोरू । शाखा पल्लवा गति मिळे ॥८०॥
मनास विषयाची बहु आवडी । तें इंद्रियां नित्यही ओढी । विवेक जागवी घडी घडी । परि नायके मनराजा ॥८१॥
जैसे मुंगळा पाही गुळाचे कण । तेथें बैसे चिकटोन । तोडीतांहि विचक्षण । न सोडी मूढ ॥८२॥
मन हा प्रपंचाचा आधारू । यातें जिंकील जो जरू । तोचि साक्षात ईश्वरू । जाण बाळा ॥८३॥
मन हें केवळ मर्कट । नित्य करी चेष्टा बहुत । मारी उड्या भलभलत्या । झाडावरी ॥८४॥
मन हेंचि पापपुण्या कारण । मन करी भेदाचें सैतान । मनाचें योगेंच निर्गुण । सगुणा आले ॥८५॥
मन हें मोठें बलवत्तर । बहुतांशीं करी झुंजार । जयपत्रें मेळवी अनेकतर । मत्तपणें ॥८६॥
या मनासी जो जिंकील । तोचि निवृत्तिपथ घेईल । मोक्ष लक्ष्मीचा होईल । प्राणेश्वर ॥८७॥
तुम्हीच मनाचे लाड केले । त्यातें स्वैर संचरूं दिलें । आत्महित - शिक्षण नाही दिलें । बहकलें त्यामुळें ॥८८॥
तें मन पाहीना अनन्वित कृत्य । सदा राही गा अतृप्त । न कळे त्या हिताहित । जाहले उच्छृंखल ॥८९॥
सदा प्रकृति - वेश्येचें घरीं । लोळे प्रपंच - खाटेवरी । तिच्या पुत्रें नागविलें जरी । परी हा तेथेंच ॥९०॥
कामें हरिली भजन - तिजोरी । क्रोध - दमन मुद्रिका हरी । ऐक्य - कंठा मदमत्सरी । हरोनी नेला ॥९१॥
लोभें सद्वृत्तीचें नेलें पक्कान्न । दंभें वैराग्य - वस्त्र जाण । ऐसें केलें रिपूंनीं छळण । परी राहे तेथें निलाजरा ॥९२॥
चंचलपुरी ती नारी । विषय मंदिरीं वास करी । कोणाची न चाले मातबरी । तिच्यापुढें ॥९३॥
असो ऐसा मनराजा बहकला । कायापुराचा चुरा झाला । करावा थोटा पांगळा तयालागीं ॥९४॥
मनाच्या पांच वृत्ति । ह्या अवयवरूप दिसती । हातपायादि चार असती । पांचवें उपस्थेंद्रिय ॥९५॥
या पांच वृत्तींचीं नावें । तुज कथितों तें ऐकावें । प्रमाण विपर्यय विकल्प पाहे । निद्रा - स्मृती पांचवी ॥९६॥
प्रमाण वृत्तीचे सहा भेद । प्रत्यक्ष अनुमान शाब्द । अर्थोत्पत्ति अभाव सिद्ध । ऐकावेंयाचें विवेचन ॥९७॥
ज्याची इंद्रिया येई प्रचीती । ती प्रमाणाची प्रथमवृत्ति । जेथें धूम्र तेथें अग्नि निश्चिती । यांस अनुभव ॥९८॥
परस्पर सादृश्यांचें जें ज्ञान । त्या म्हणती उपमान । जैसें वदनास कमलासमान । अथवा धरणीस शांतीची ॥९९॥
शाब्द म्हणजे शब्दांचें कथन । गुरुमुखें महावाक्याचें ज्ञान । अर्थोत्पत्ती ही भावनेची खूण । दाखवूं सिद्ध करूनी ॥१००॥
कोणी एक पुरुष । दिवसां न घेई अन्नाचा वास । परि दिसे धष्टपुष्ट बलवान ॥१॥
ऐसा प्रश्न कोणी करितां । वाटे हा रात्रीं भोजना घेतां । या कल्पनेच्या मूर्ता । म्हणती अर्थोत्पत्ती ॥२॥
आतां प्रमाणाचा शेवटचा भेद । अभाव म्हणती सिद्ध । जेथें दृश्यवस्तु नसे सिद्ध । अभाव त्यातें वदती ॥३॥
आतां दुसरी वृत्ती विपर्यय । जेंवी रज्जुठायें सर्पाचा भाव । जेथें वस्तूचा संदेह । विकल्प त्यातें जाणिजे ॥४॥
जाहली आत्मस्वरूप विस्मृति । नेई भवसागराप्रती । निद्रा ही चवथी । मनोवृत्ति ॥५॥
पूर्वीं झालेला अनुभव । तेवढाच राही भाव । आणिकची ओळख ना होय । स्मृति वृत्ती शेवटची ॥६॥
ऐशा मन वृत्तींचें निरोधन । आधीं करावें निश्चयपूर्ण । मग होईल कर्तव्यशून्य । मनराय ॥७॥
सकल कर्में सोडुनी । मनाचा करावा जय जनीं । पापपुण्याचें झणीं । करी सीमोल्लंघन ॥८॥
जो ऐशा मनातें आकळी । तो सृष्टीचा गोल उधळी । त्रैलोक्य त्याची साउली । होईल निश्चयें ॥९॥
आतां या वृत्तींचा लय । कराया सांगेन उपाय । अवलंबितां मनराय । लयांत लय लय पावे ॥११०॥
संतसंग वासना - त्याग । आत्मज्ञान विचारयोग । प्राण निरोधन उपांग । ध्यानयोग ॥११॥
हीं शास्त्रें प्रखरतर । मनातें करीतील बेजार । मनातें करीतील बेजार । मज होईल ताबेदार । यायोगें ॥१२॥
मन होता स्वरूपमय । त्यास नसे दोषांचे भय । तो सर्वातीत होय । सद्गुरूराजा ॥१३॥
आतांसंत - संगाचें वर्णन । तुज सांगेन असाधारण । हें अस्त्र केवळ रामबाण । मनोजयास ॥१४॥
संतसंगें दुष्ट वृत्ति । आपोआप दुरी पळती । देहबुद्धीची मती । नष्ट होई ॥१५॥
सत्कर्माची घडे आवड । जपतपाचें मिळे घबाड । वैराग्या अखंड दंड । मिळे हातीं ॥१६॥
संतांची घेतां चरणधूली । मनाची होईल धुळीं । संतसंग ही उटी लागली । तरी काया दिव्य होय ॥१७॥
संत हे परमामृत । विषातें करिती अमृत । संत हे शांतिसागर खचित । सर्वसंग्रही ॥१८॥
संत हे ज्ञानाचें घर । तत्सेवा हा उमरठा थोर । ऐसे वदती ज्ञानेश्वर । महाराज ॥१९॥
संत हे संसारास । बांधिती पुण्याचे पाश । मोक्षरूप करिती त्यास । धन्य ते संत ॥१२०॥
ऐसा संता जावें शरण । त्यास त्रिपुटी करावी अर्पण । मग तो आपण होऊन । करील मनोजय ॥२१॥
संतसंगें वासनात्याग । संतसंगें परमार्थ योग । संतसंगें मिळेल योगे । हा सिद्धांत ॥२२॥
वासनेची संगत खोटी । हिची न धरावी संगती । अभ्यासानें राहील पोटीं । वासना ही ॥२३॥
मग करावा आत्मविचार । त्यायोगें जातील विकार । साधनचतुष्टयद्वार । उघडें करावें ॥२४॥
श्रवण मनन निदिध्यास । मग होईल साक्षात्कारास । त्याचें निरोधन करितां विशेष । फलप्राप्ति होय ॥२५॥
आतां प्राण - निरोधन । हेंही मनोजय - साधन । तदंतभूत धारणा ध्यान । साधनें अपार ॥२६॥
परियास पाहिजे अभ्यास । त्यावीण विफलता सर्वांस । सोडिली पाहिजे आस । सर्वत्रांची ॥२७॥
प्राणाचें निरोधन । सांगेन पुढतीं विस्तारोन । येईल योगानंदीं पूर्णं । शिष्य जेव्हां ॥२८॥
शिष्यें लोटांगण घातलें । स्वामीचे बोल मनी ठसले । परि एका शंकेनें घेरिलें । निवृत्त करी तियेला ॥२९॥
मनोजयाचें उपाय सांगितले । परि ते कठिण भासलें । संतसंग न मिळे । तरी काय करावें ॥१३०॥
संतसेवा हें असिधारा - व्रत । वरिवरि सोपे भासत । परी आचरावया सतत । सोडावा लागे आश्रम ॥३१॥
संतसेवेचा मेरू । आम्हां अनुल्लंघनीय सद्गुरू । तरी दावावा मार्ग रूचिरू । जेणें प्रपंच परमार्थ साधे ॥३२॥
प्रभु म्हणती हांसोन । संत सेवेंत सकल धाम जाण । तव निश्चयचि अपूर्ण । म्हणून कठिण वाटे ।३३॥
परि तुझा पुरवीन हेतू । प्राणनिरोधाचा एक तंतु । जेणें मन पावेल शांतू । भक्तराया ॥३४॥
घालोनि सहजासन । तूं बैस स्थिर होऊन । चालू देई मनाचें विंदाण । स्वैरपणें ॥३५॥
तें करील विषयांतरा । देशांतराचाहि घेईल वारा । त्यास जाऊं दे सुकुमारा । निर्बंध ॥३६॥
जैसे अग्निवरी जल ठेवितां । त्यास उकळ्या फुटती अनंता । तैशा मनाच्या उकळया सुता ! चालू देई ॥३७॥
तूं होउनी त्रयस्थ । पाही तयाचें कौतुक नित्य । येतील लहरी त्या स्मृतींत । ठेवी निर्धारे ॥३८॥
ऐसी ठेवी दृढ भावना । मग कळेल तुजला जाणा । आल्या किती कल्पना । किती येतील ॥३९॥
कल्पनांचे ओझें होता । तव मन श्रमेल सर्वथा । मग सहजीं होईल शून्यता । मन - पिशाच्चाची ॥१४०॥
ऐसा अभ्यास दृढ करून । पाहतां होईल तुज ज्ञान । कल्पना मुळाचें निरसन । तूंचि करिशील ॥४१॥
तूं मनास करितां स्वच्छंदी । ते नेईल तुज घाणींत आधीं । परि स्मृतीची घालितां बेडी । पाय तयाचे अडखती ॥४२॥
तरी हें हळुहळू मन । घेईल दुसरा तरंग जाण । परि स्मृतीचें ठेवी दडपण । तेणें होईल निर्बळ ॥४३॥
हीं सर्व अभ्यासाचीं कामें । चालवी नित्य - नेमें । नको फिरूं केवळ भ्रमें । दाही दिशा ॥४४॥
सायंकाळीं आणि प्रभातीं । करी दोन घटिका ऐसी कृति । तव चित्ताची शांती । होईल सत्य वचन ॥४५॥
न धरी मनी शंका । अनुभवाचा घेई गुटका । या मनापासून तुझी सुटका । करी ऐशा मार्गानें ॥४६॥
नको पाहूं कालाची मर्यादा । निज कार्यावरी ठेवी श्रद्धा । तुझी दृढ भावना तुला फलदा । जाहली पाहिजे ॥४७॥
धरी एक मार्ग जो सानुकूल । नको शोधूं अनेक पटल । तुज भ्रांती निश्चयें पडेल । कोणतें घ्यावें म्हणोनि ॥४८॥
ऐसें बोधिलें श्रीगुरूरायें । पुत्राचें शांतविलें हृदय । मग ध्यानाचें शास्त्र लवलाहें । कथिलें तयासी ॥४९॥
ध्यानयोगाचें विवरण । जें सलोकतेचें साधन । पुढील किरणीं तें निरूपण । करील नाथदेव ॥१५०॥
त्यातें हृदयीं ठेवितां । तोचि ध्यान ध्येय ध्याता । मग सहजचि शांतता । मनाची होय ॥५१॥
जाहली त्रयोदश किरणें । ऐकिलीं सकल श्रोतृवृंदानें । उपकृत केलें बाळ तान्हें । नाथसुत ॥५२॥
तांबूल त्रयोदश किरणांचा । त्रयोदशगुणी केला साचा । घ्यावा आदरें सेवकाचा । सकल संतांनीं ॥५३॥
श्रीनाथें आणिलें सकल द्रव्य । टाकिलें तेंचि सर्व । मज नाहीं संवय । तांबूलाची ॥५४॥
नाथा तांबूल बहु आवडे । तन्मुखीं राहती संतत विडे । मुखा सदोदित रंग जडे । प्रेमाचा ॥५५॥
नाथांची तनू सुकुमार । विडा रंगवी बाह्यांतर । तो रंग माझा शारंगधर । ओती भक्तांचे अंतरीं ॥५६॥
नाथ स्वयें तांबूलविहारी । मज कळे त्याची माधुरी । बसुनि माझ्या समोरीं । शिकवी आदरें ॥५७॥
तैसाचि हा तांबूल केला । तुम्हां संतांसि अर्पिला । जरी रंग भारी चढला । तरी ती नाथकृती ॥५८॥
लागतां तांबूल तिखट । मी दोषास पात्र । क्षमा करा सर्व संत । नाथसुतासी ॥१५९॥
इति श्रीमाधवनाथदीपप्रकाशे नाथसुतविरचिते मनोजयवर्णनं नाम त्रयोदशकिरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP