दीपप्रकाश - प्रथम किरण
Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.
श्रीगणेशायनमः । श्रीसरस्वत्यैनमः । श्रीमातापितृभ्योनमः । श्रीकण्वमहामुनयेनमः । श्रीमातुश्री *देवबाई चरणायनमः । श्रीजगदंब चरणायनमः ॥
जयजयाजी योगेश्वरा । सकल सिद्धींच्यां माहेरा । अज्ञान - तिमिर - भास्करा - नमन तूं ते सांष्टांगी ॥१॥
नाथा ! तूंची अनंत । तुज आदी ना अंत । तूं त्रिकालाबाधीत । अससी परमेश ॥२॥
तुझें रूप आठवूं जातां । आठवही विसरे तत्वतां । तुज वर्णूं जातां नाथा । वाणी मूक होई ॥३॥
विश्वाची करोनी गुंफा । राहसी त्यांत अमूपा । मग सवेंचि घेउनी विश्वरूपा । खेळसी कौतुकें ॥४॥
तूं दिससी सर्वांसी लिप्त । परि राहसी अलिप्त । घेसी जरी रूपें अनंत । परी तूं मूल अरूप ॥५॥
तूं निर्गुण निराकार । तूं निरामय निर्विकार । तूं निःसंदेह निरंतर । निराधार परमेश्वरा ॥६॥
ऐसा जरी तूं नकारी । परी भक्तांकारणें आकारी । होऊनी जगद्रंगभूवरी । नाचसी कौतुकें ॥७॥
जैसी आवडी भक्तजना । तैसा नटसी स्वानंदघना । घेवोनी माया - अंगना । सगुण रूपीं भाससी ॥८॥
नाथ झाला गजानन । मंगलमूर्ती मंगलध्यान । शोभे शुंडा दंडायमान । नेत्रीं हिरे चमकती ॥९॥
कांसे कसिला पीतांबर । पायीं ब्रीदाचा तोडर । गळां रत्नमाला सुंदर । माथा मुकुट शोभला ॥१०॥
चतुर्भुजी चतुरायुधें । फरशांकुश मोदक सिद्ध । एक्या करी कमलशुद्ध । आशिर्वाद चतुर्थे ॥११॥
कर्णी भीकबाळी कुंडलें । घेती विलोल दोले । ऐसें रूप घेऊनी आले । गणनाथ सन्मुख ॥१२॥
फांकली प्रभा मनोहर । नासला भीतीचा अंधार । आनंदाचे सार । नयनीं देखिलें ॥१३॥
जयजयाजी मंगलमूर्ती । मंगल कीर्ति मंगलपूर्ती । करितों तूज मंगलारती । कृपानिधी दातारा ॥१४॥
मी केवळ बुद्धिहीन । नाहीं केलें परिशीलन । मज न कळे रेखाटन । कैसें करावें गा ॥१५॥
गणनाथा ! मी जड पतित । परी आवडी चित्तांत । गावें श्रीगुरुचेंचरित्र । प्रेमभावें ॥१६॥
मी आहे स्वयें पंगू । कैसा गड हा उल्लंघू । तूं कृपा करितां चंगू । बांधेन गा ॥१७॥
तूं सर्व कार्यांचा आदि । म्हणोनि तुज वंदन आधीं । देई वर कृपानिधी । कार्यसिद्धी कराया ॥१८॥
प्रसन्न झाला मंगल देव । तथास्तु वचनें देई अभय । निवारिली चिंता सर्व । दुर्बळाची ॥१९॥
तुज नमूं आदि माते । श्री शारदे वेदस्तुते ! । योगेश्वरी वाग्देवते । धांवें सत्वरी जननी गे ॥२०॥
करीं वीणा घेउनी । होई हंसारूढ जननी । धांवत येई या क्षणीं । रक्षावया बालक ॥२१॥
हृदयमंदिरीं जरतारी । चित्त - गालिचा मी पसरीं । तेथें प्रेमें नृत्य करी । धांव घेई सत्वर ॥२२॥
घेई घेई मधुर वीणा । काढी हंसस्वराच्या ताना । जागवीं हा तव तान्हा । स्नेहलते ! दयाळे ॥२३॥
काढी काढी नाद मधुर । जेणें होतील इंद्रिये स्थीर । नाद - ब्रह्मरस साचार । चाखितील ऐक्यत्वें ॥२४॥
तूं भक्तांची जीवनतरणीं । तूं ज्ञानाची सौदामिनी । तूंच साक्षात् कुंडलिनी । करिसी भेट शिवाची ॥२५॥
तूं हंसता जगही हंसलें । तूं उदास तो जग दुःखी झालें । जग हें तुझ्यांतची संचलें । जगद्रूपिणे दयाळे ॥२६॥
तूं करूणेची छाया शीतल । भक्तांचे पुरविसी कोड सकळ । तूं कल्पलताच केवळ । द्यावया वर भक्तांतें ॥२७॥
धांव धांवगे जगन्मोहिनी । रक्षी माते अभय वचनीं । घाली वाक्सुधा वदनीं । गुरुगुण गावया आदरें ॥२८॥
हंसली माझी नाथमाया । कुरवाळी प्रेमें हृदया । म्हणे तुझें हेतु सखया । पुरवीन मी निश्चयें ॥२९॥
आतां नमूं सद्गुरुनाथ । जो अनाथांचा नाथ । जयाचेनि योगें उदित । होई भाग्य आमुचें ॥३०॥
जयाची पडतां ज्ञानछाया । अज्ञानताप जाय विलया । घालितां बोधगंगा मुखींया ॥३१॥
जय जयाजी सद्गुरुनाथा । विश्वंभरा विश्वसूत्रा । विश्वरूपा विश्वनाथा । विश्वाधार तूं होसी ॥३२॥
तूं वंद्य तेवीं निंद्य । तूं गुणावगुणांचा कंद । सकल तत्त्वांचा छंद । निजानंद तूंची ॥३३॥
तूज द्यावया उपमा । आणू कोठोनि साहित्य रामा ! । तुज वांचुनी मंगलधामा ! । उपमा दुजी मिळेना ॥३४॥
ऐसा तूं माझा दातार । घेसी बहुविध अवतार । राखिसी परंपरा थोर । स्वस्वरूप दानाची ॥३५॥
नाथ झाला सांबनाथ । भवानीस देई बीज तत्त्व । भवानीनें मच्छेंद्रनाथा । प्रेमभावें अर्पिलें ॥३६॥
मच्छापोटीं अवतरून । ज्यानें तारिले भवजन । सकल भोगही भोगून । राहिला ब्रह्मचारी ॥३७॥
अतुल कृती करोनी नाथें । ज्ञान अर्पिले गोरक्षातें । जन्म दिशला अकस्मात । विभूतियोगें तयासी ॥३८॥
गोरक्ष झाला सवाईनाथ । करी दुसरी सृष्टी नित्य । पाषाणावरी करोनी मूत्र । सुवर्णरूप त्या केलें ॥३९॥
चौरंगीनाथ हें चतुर्दल । जणूं आधारीचें कमल । सकल तत्त्वांचें मूळ । शोधोनी दाखवी ॥४०॥
मग आले गहिनीनाथ । जे सुलभ करिती गहन पंथ । वाढविती संत महंत । अतुल प्रभावें ॥४१॥
गहिनीनें पंथ सुलभ केला । मग निवृत्तीचा अवतार झाला । प्रवृत्तीवरी घातला घाला । निवृत्तीनाथें सत्वर ॥४२॥
निवृत्तीची प्राप्ती होतां । आलें ज्ञान धांवोनी तत्त्वतां । ज्ञानेश्वर रूपें जगतां । दाविला मार्ग उज्ज्वल ॥४३॥
भक्तीचें रचिलें सुंदर । श्रीज्ञाननाथें मंदिर । अमित जीवांचा उद्धार । केला भजन योगानें ॥४४॥
चालवोनी निर्जीव भिंत । चांगदेवा देती भेट । सकल सिद्धींचा थयथयाट । तोडून टाकी ज्ञानेश्वर ॥४५॥
सत्यामलनाथ पुरुषोत्तम । प्रज्वलीत करी सत्यधर्म । भक्ति मंदिरा रंग उत्तम । लावी सहज लीलेनें ॥४६॥
गुप्तेशानें गुप्तधनाचें । सिंहासन स्थापिलें साचें । नाना क्रिया रूपीं रसाचें । कौशल्य करी त्यावरी ॥४७॥
परमहंस हा परमगुरु । अनाथ जीवांचा आधारू । ॐकार मूर्तीचा आकारू । करी मंदिरीं स्थापन ॥४८॥
या ॐकार मूर्तीची पूजा । करी ब्रह्मानंद राजा । घाली स्नान निर्मलबीजा । ब्रह्मानंदी होऊनी ॥४९॥
मग परमानंद अवतरून । लाविलें प्रभूस चंदन । काशिनाथें समर्पिलें जाण । कमलपुष्प प्रभूला ॥५०॥
विठ्ठलनाथ माझा विठ्ठल । धूप दीप दाखवी विमल । विश्वनाथें विश्वगोल । नैवेद्य प्रेमें समर्पिला ॥५१॥
श्री आदिदेवाची आरती । करावया आदरें येती । श्री माधवनाथ जगतीं । मानव रूपें ॥५२॥
धन्य धन्य हे माधवनाथ । तव चरणीं साष्टांग प्रणिपात । देखोनी तुझा पुरुषार्थ । ठायींच मी निवालों ॥५३॥
भव - वनीं होतो निद्रित । तूं धांवलासी जगन्नाथ । केलें हालवोनि जागृत । बालकासी ॥५४॥
तूं माझी प्रेमळ माउली । तूं माझी शीत साउली । तूंच माझी हृदयकळी आत्मारामहि तूंची ॥५५॥
मी नेणें ब्रह्म - माया । अथवा न जाणे जिव - शीवा । कळेना योगयाग कांहीं । तुज वांचुनी ॥५६॥
तूं माझा योग जाण । तूंच माझें ब्रह्म सगुण । तुझे चरणीं अभिवंदन । हेंच शास्त्र मज ठावें ॥५७॥
तुझें ध्यान ही माझी मुक्ती । तुझें नाम ही माझी शक्ति । तव स्वरूपसुधेची प्राप्ति । हाचि चिद्रस आमुचा ॥५८॥
धांव धांव रे माधवनाथा । कडकडुनी भेट समर्था । तुजवांचोनी अनाथ । जाहलों मी ॥५९॥
तव मूर्ति कोमल सुंदर । जणूं कर्दली सुकुमार । पाहतां वाटे दिनकर । आज दुजा उगवला ॥६०॥
कांसे कसिला लंगोट । कंठीं तुलसीमाला शोभत । मध्यें मेरू नीलरत्न । निलकंठी विराजतो ॥६१॥
करीं नवग्रहनवनाथ । चक्र शोभे लखलखीत । जयाचें तेज चमत्कृत सर्वदा भासतें ॥६२॥
कानीं सुवर्णाचीं कुंडलें । जयां मौक्तिकांनी वेष्टिलें । डोलोनी सांगती मुक्ति मिळे । येथेंच साधका ॥६३॥
घालोनी सिद्धासन - बंध । बैसला माझा आनंद । पाहतां प्रेमें नयनारविंद । चित्तभृंग म्लान होई ॥६४॥
बघोनीं नाभीचें स्थल । नाभिचक्र उमललें । स्रुष्टीचें गूजही सांठविलें । ‘ नाभी ’ म्हणोनी भक्तासी ॥६५॥
ही स्वरूप शोभा पाहून । दाटला आनंद पूर्ण । वाटे भेटलें निधान । कैवल्याचें ॥६६॥
जैसी माझी आवडी होती । तैसी धावत आली गुरुमूर्ती । मम सन्मुख येउनि बसती । हास्यवदनें ॥६७॥
साष्टांग केला नमस्कार । नेत्रीं वाहिला प्रेम - पूर । रोमांचित झालें शरीर । देखतां प्रभूसी ॥६८॥
धन्य धन्य माझा देह । धन्य धन्य माझें गेह । झाला भाग्याचा उदय । सद्गुरुनाथ भेटला ॥६९॥
आमुचें तातें नाथा सेविलें । बंधूनें प्राणा वाहिलें । तत्पुण्य वाटे फळा आले । नाथसुतासी ॥७०॥
नाथा ! त्वां दिलेंसी दर्शन । केलें पतीतां पावन । आतां एकची वांछिते मन । तव चरित्र रेखाटीन ॥७१॥
नाथसुत हा दुर्बल । तया क्षराक्षरांचें जाळे नकळे । धरिली इच्छा अघटित बळें । तुज वाटेल गा ॥७२॥
मुंगळा म्हणे मी उचलीन । शर्करेची गोणी पूर्ण । किंवा चढावा पांगुळ्यानें । दुर्घट डोंगर ॥७३॥
मर्कटें म्हणती बांधू घर । पानें आडवू पाहती नदी थोर । किंवा बक म्हणें मी योगीवर ॥७४॥
ऐसी माझी दुर्घट मागणी । तुज जड वाटेल चक्रपाणी । परी तुझी ही अघटित करणी । असाध्या करिसी साध्य तूं ॥७५॥
नाथसुत जैसा अघटित । तैसा तूंहीं नाथा अघटित । समसमान झाल्या उचित । देण्या उशीर कायसा ॥७६॥
त्वां अनेक अवतार घेऊन । पुरविले भक्तांचे कोड जाण । भक्त - काम - कल्पद्रुम म्हणोन । नामाभिधान तुज मिळालें ॥७७॥
मी तुझें तान्हें बाळ । चरित्र - चंद्राचा हट्ट केवळ । धरिला तो पुरवील । कोण तुझ्या वांचुनी ॥७८॥
तूं सृष्टीचा करिसी पाळणा । चंद्र सूर्य हीं तुझीं खेळणीं । देईं देईं गे जननी । मज खेळावय ॥७९॥
जरी क्षुधा ही न शांतवीसी । तरी राहीन मी उपवासी । सोडीन सुखें देहासी । ब्रीद तुझें जाईल ॥८०॥
राखी राखी आपुलें ब्रीद । पुरवी माझें हेंची कोड । न करी आव्हेर दयानंद । योगीनाथा ॥८१॥
ऐकोनी ऐसे करुणावचन । केलें नाथें हास्यवदन । म्हणे तुझें तुज देईन । माझ्यासंगें येई रे ॥८२॥
ऐकोनी प्रभूची वाणी । नाथसुत आनंदला मनीं । जाई एका भव्य भुवनीं । नाथदेवा सहित ॥८३॥
मंचकीं बसले गोपालनाथ । तन्निकटीं माझा तात । होवोनी आसनस्थित । पाचारी मज सन्निध ॥८४॥
ठेविली डोई पोयांवरी । उचलोनी घेतली नाथें करीं । ठेवी मधुबिंदू जिव्हेवरी । गोडी त्याची अपूर्व ॥८५॥
नाथ म्हणे तुज दीधलें । आतां कवित्व करी रसाळ । बाह्यांतरीं तूं रसाळ । होउनी राही ॥८६॥
धन्य सद्गुरुची करणी । आणि शुष्क झर्याला पाणी । देई भक्तजनां संजीवनी । आपुला आपण ॥८७॥
नमूं सकल कविराज । व्यास वाल्मिकादि महाराज । यत्कृपेनेंच वाड्मयसृष्टीबीज । दृश्य जाहलें ॥८८॥
त्या देवीला मुकुंदराजा । प्राकृत - पातळ नेसवी वोजा । अलंकार घाली ज्ञानराजा । अमूल्यसे ॥८९॥
महाराष्ट्रवेदाग्रणी । श्रीएकनाथ - तुमारामांनीं । शुद्ध भक्ति - कंचुकी घालुनी । नाम - शाल पांघरविली ॥९०॥
समर्थें केली देवी समर्थ । मंथोनी सारा वेदान्त । हातीं त्रिशूलादि देत । आयुधें ही ॥९१॥
ज्यांनी सजविलें आपुल्या परी । त्या आधुनिक कवीस निर्धारी । साष्टांग वंदन करी । नाथसुत ॥९२॥
आतां नमूं मातापिता । ज्यांनीं मज दावुनि परमार्था । नाथप्रभूच्या ओटींत ममता । सोडोनियां टाकिलें ॥९३॥
स्वामी नारायणानंद । नामें मम पिता प्रसिद्ध । पूर्वी होता आशाबद्ध । परी नाथें केलें संन्यासी ॥९४॥
खानदेशीं गिरिजा तटीं । कानळदें ग्रामा निकटीं । कण्वाश्रम गुंफा मोठी । तेथ राहिला तात माझा ॥९५॥
दिनरात्रीं तेथे राहून । केलें परमार्थ साधन । रामरूप झाला पूर्ण । रामनवमीस ॥९६॥
माझी साध्वी माता गोपिका । जिनें सेवुनी पतीस देखा । पाळिलें आम्हा बालकां । पक्ष्यापरी ॥९७॥
माझा ज्येष्ठ बंधु कृष्णराव । होता जो महानुभाव । ज्यानें स्मरोनी नाथनांव । देह सुखें सोडिला ॥९८॥
वंदू सकल संत सज्जन । जे परमार्थ मंदिराचे सोपान । ज्यांच्या सहवासें विरक्ती पूर्ण । येई साधकासी ॥९९॥
संत आनंदाचें सार । संत विद्येचें भांडार । संत हें शांतीचें माहेर । संत उदार आश्रयदाते ॥१००॥
संत हे जगाचे आधार । संतांचा थोर बडिवार । संत हे संसार - कारागार । तोडविती तत्क्षणीं ॥१॥
संत हे विधि रेषा उल्लंघिती । संत सृष्टीलाही चकविती । संतांची न कळे महति । सेविल्या वांचोनी ॥२॥
ज्या संतांसी येई शरण । प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान । तेथें मी मूढ महिमान । केसें गाऊं ॥३॥
नमूं सकल श्रोतेजन । जें वक्त्यांचें केवळ चैतन्य । जयांच्या कृपेनें ग्रंथ वदेन । नाथ लीलेचा ॥४॥
मी अज्ञ बलहीन । तुम्ही ज्ञानी । बलवान । तुम्हां पुढें मी मशक जाण । केवीं गाऊं नाथगुण ॥५॥
ही अनाधिकारी चर्चा होय । म्हणोनी मज क्षमेंत घ्यावें । मी तुमचे बाल स्नेहें बोल बोबडे बोलेन ॥६॥
जैसें पांच वर्षाचें बाल । घाली पितयाची पगडी विशाल । हातीं धरोनी यष्टी सबळ । जाई तुरु तुरु फिराया ॥७॥
किंवा कानीं ठेवी लेखणी । लेखनाचा डौल आणीं । उपनेत्र लावी लोचनीं । जणूं फर्डा लेखक ॥८॥
देखोनी तयाची लीला । कौतुक वाटेल सकलां । तैसे मम बोबड्या बोला । आदरें श्रवण करावें गा ॥९॥
तुम्हीच मज केला बोलका । विनविला नाथसखा । आतां अंतर देऊं नका । विनवितों साष्टांगे ॥१०॥
ऐकोनी नाथसुताची विनवणी । श्रोतेजन म्हणती हंसुनी । पुरे पुरे ही तुझी वाणी । कार्यारंभ करी आतां ॥११॥
श्रोतयांची आज्ञा प्रमाण । केलें ग्रंथारंभी मंगलचरण । आता कथेचें अनुसंधान । द्वितीय किरणीं करीन गा ॥१२॥
घेवोनी नाथांचे बळ । गातों लीला अमोल । गंगेसी जैसे गंगाजलें । पूजिजें आदरें ॥१३॥
माधवनाथदीपप्रकाश । नाम ठेविलें या ग्रंथास । कर्ता करविता जगदीश । करील स्वयें प्रकाश ॥११४॥
इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुत विरचिते मंगलाचरण नाम प्रथम किरण समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP