दीपप्रकाश - षड्विंशतितम किरण
Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.
श्रीसद्गुरुनाथायनमः ।
नमो संसार - हरणा । नमो मायाकंदना । अविद्या - तम निवारणा । सद्गुरुराया ॥१॥
जेव्हां वसत होतों गर्भात । तैं पाजिसी सोहम् - पीयूष नित्य । परी येतां या जड जगतांत । जाहलों हीन देवा ॥२॥
बालपण गेले खेळांत । यौवन करी मदोन्मत्त । विषयाची हौस चित्तांत । सर्वकाल ही ॥३॥
कांहीं होतें पुण्य - माप । म्हणोनी भेटला मायबाप । करी जागृत आपोआप । दीन बालकासी ॥४॥
माझा पिता कर्मांगशील । सदा पूजनीं राहे अचल । बाह्य स्नानसंध्या हेंचि फल । समजे तो जीवाचे ॥५॥
नानाविध केल्या मूर्ती । सजविला देव्हारा अति प्रीतीं । अनुष्ठानावरी पूर्ण भक्ती । करी पूजा उपचारें ॥६॥
श्राद्धसंकल्प कुलाचार । अन्नदानहि करी थोडें फार । हरिभक्तीचा जिव्हाळा फार । मम पितयासी ॥७॥
पंढरीच्या वार्या तीन । पायीं करी श्रीनारायण । भेटे विठ्ठलासी कडकडून । प्रेमभावें ॥८॥
केला नाहीं कुणाचा द्वेष । सदा पोथ्यांचा हव्यास । ऐसीं घालवी वर्षे पन्नास । कर्मांग क्रियेमाजी ॥९॥
परी वृत्ती तापट भारी । शांतता नाहीं तिळभरी । म्हणोनी पस्तावला अंतरीं । आला नाथपायीं ॥१०॥
पाहतां माझ्या पितयाला । म्हणे सोडा हो बाह्य वृत्तीला । त्याविणे कर्मांग क्रियेला । शोभा न येई ॥११॥
कर्मांगक्रिया ही अवश्य । सर्व कार्यांचा येथुनी । प्रवेश । परी तें ध्येय नव्हे खास । हें तत्व उमजावें ॥१२॥
शरीरें केली मूर्तिपूजा । मनानें घेतला तमाचा बोजा । मग कैसी मिळे शांति - भाजा । सांगा मज ॥१३॥
कर्मक्रियेचा हांचि हेतु । मुरजवावें चित्त त्यांत । परी तुम्ही जाहला भ्रांत । सोडिले चित्तासी मोकळे ॥१४॥
बाह्यवृत्तीनें कर्म केलें । तें बाहेरची राहिलें । जैसें पाषाणावरी ओतिलें । जल वायां जाय ॥१५॥
किंवा तनूवरी क्षतें पडलीं । जरी बहुमोल वस्त्रें झांकिली । तरी त्यांची व्यथा कदाकाळीं । शमन होईना ॥१६॥
तैसें न करिता शुद्ध अंतर । अथवा वृत्तीचाही लय थोर । व्यर्थ त्याचा सर्व आचार । केवळ शोभेचा ॥१७॥
मुखीं नामाचा गजर । अंतरी वसलें द्वैत घोर । अनीतीचा केला पुरस्कार । कैसी उन्नति होईल ॥१८॥
या बाह्यपूजेचेही प्रकार । सत्व रज तम साचार । सत्वगुणें चित्तशुद्धी सत्वर । रज - तमानें अधोगति ॥१९॥
तुम्ही सत्वगुणाचा आचार केला । म्हणोनी चित्तशुद्धीचा लाभ जाहला । त्या योगेंच ध्यास लागला । शांति देवीचा ॥२०॥
परमार्थासी पाहिजे वैराग्य । तोच साधकाचा साधना मार्ग । वैराग्यविणें तमाचा भंग । होणार नाहीं ॥२१॥
नरदेहाचे आयुष्य ऐसें । या युगीं केवळ साठ वर्षे । तुम्हीं घालविली पन्नास वर्षे । आतां अनुताप उपजला ॥२२॥
जरी राहिला थोडा काल । तरीहि त्याग - धेनू आळवाल । तिचें दुग्धप्राशन कराल । मिळेल मोक्षपुष्टी मग ॥२३॥
पूर्व जन्म कर्मानुसारें । प्राणी घेती आपुलीं शरीरें । धान्य - कणाच्या आधारें । जीव शिरे पुरुषांत ॥२४॥
त्या कणाचे रेत - रूपानें । स्त्री गर्भाशयीं होई जैं येणें । तैं बिंदूचा आकार पांच दिवसानें । तया रेतासीं प्राप्त ॥२५॥
दशदिनीं रूप बोरासम । मासांत मासपिंड नाम । हस्तपास मस्तकासम । अवयव दोन मासी ॥२६॥
तिसर्या मासीं नखादिं अस्थी । चतुर्मासीं सप्त धातूंची भरती । पाचव्यांत क्षुधा तृषेची दीप्ति । सहाव्यात चलन वलन ॥२७॥
माता जें करील अशन । तयाचा रस करी भक्षण । तळमळे जीव रात्रंदिन । जननीचे उदरीं ॥२८॥
माता खाई तिखट खारट । तैसाचि रस पडे त्यांत । स्वयें असें कोमल अत्यंत । म्हणोनी सोसवेना ॥२९॥
तळमळ करी इकडे तिकडे । परी हलवेना भलतीकडे । आंतड्यांच्या पिशवींत सांपडे । बाळ तान्हें ॥३०॥
उदर हें विष्ठा मूत्रांचे कोठार । तेथें राही जीवकुमर । लागतां सातवा मास थोर । ज्ञान तया होई ॥३१॥
प्रसूतिवायूची सदा धडपड । मारी बालकासी झांपड । सर्वांगीं लागती कळा अवघड । होई व्याकुल अंतरीं ॥३२॥
श्वासोच्छावासाची असे शक्ति । परी आंतड्यांची पिशवी मोठी । जींत वायुसही मिळेना गति । विहराया ॥३३॥
सहजीं बाळाचा कुंभक साधला । म्हणोनि ज्ञानाचा लाभ जाहला । प्रार्थी जगदीशासी वेळोवेळां । मुक्त व्हावया ॥३४॥
जगन्नाथा ! झालो विषयासक्त । म्हणोनी यावें लागलें या नरकांत । कृति तैसीं फलें निश्चित । भोगावीं लागती ॥३५॥
मज काढी ! काढी ! रे यांतुनी । सोसवेना दुःख चक्रपाणी । नाहीं कोणी तुजवांचुनी । सोडविता ॥३६॥
तव कृपेनेंच झालें ज्ञान । करी गा दुःखाचें हरण । न दावी पुनरपि भव - भुवन । योगेंद्रा रे ॥३७॥
येतां ऐशा संसार - बाजारी । मज गांजतील षडरी । जनन मरणाची तापद फेरी । चुकणार नाहीं ॥३८॥
तरी येथेंच करी मज मुक्त । नातरी चिरकाल ठेवीं आंतड्यांत । बाहेर येतां मोहील भ्रांति खचित । विसरेन तव रूप ॥३९॥
येथे करितां तुझें सुंदर ध्यान । होईल दुर्गधीचें विस्मरण । नको नको तें कष्टद जनन । मरण मला ॥४०॥
ऐसी सदैव करी ईशप्रार्थना । तों भरती होई नऊ मासांना । प्रसूतिवायु न करी करुणा । आणी जीवा भूमीवरी ॥४१॥
येतां गर्भाशयाबाहेरी । मोह टाकी छाया बालावरी । आत्मज्ञानाची थोर वैखरी । तेणें नष्ट जाहली ॥४२॥
जाणिवेचें सोहम् स्मरण बुडालें । ‘ कोहम् ’ करूनी बाळ रडूं लागलें । मग ‘ नाळही ’ तयाचें चिरिलें । मायामोहें ॥४३॥
जैसी मादक पदार्थाची छाया । हळु हळु करी मूर्छित राया । तैसी निज रूपाची विस्मृति तान्हया । होई दैनंदिनीं ॥४४॥
भव बाजारी जन्म जाहला । म्हणोनी बाळ करी रूदनाला । मातेसी वाटे कांहीं आजार झाला । म्हणोनी तान्हुला आक्रंदे ॥४५॥
ओंती उष्ण औषधें घशांत । तेणें अधिक दुःखी बाळ होत । पोटीं भोगिला नरक सतत । येथेंही तीच अवस्था ॥४६॥
मोहाचा बसतां पूर्ण पगडा । जीव होतसे भारी वेडा । माता हीच वाटे मुक्तिप्रदा । सुकुमारासी ॥४७॥
बाळपणीं खेळे खेळा । नाहे अध्ययनाचा चाळा । गुरूजी अथवा पिता तयाला । करिती ताडण ॥४८॥
त्या अवस्थेमाजीही कष्ट होती । मनीं म्हणे मातापिता छळती । मज खेळूं फिरूंही न देती । पाठविती शाळेत ॥४९॥
म्हणे खावें प्यावें खेळावें । बागडावें झाडावरी चढावें । सदा स्वेच्छाचारें हिंडावें । ऐसी आवड जीवासी ॥५०॥
परी माता पिता छळिती । म्हणोनी लागली चिंता चित्तीं । ऐशा चिंतनीं बाल्यावस्था पुरती । निघोनी जाई ॥५१॥
नंतर यौवनकलिका फुलली । कामिनी - वदनीं दृष्टी रमली । नीति अनीति सारी सोडिली । जहाला मदोन्मत्त ॥५२॥
कनक कांतेचा उपभोग । हेंचि ठेविलें ध्येय मग । साधुसंत स्वधर्मावरीहि राग । आवडे आलस्य भारी ॥५३॥
घेई दोन आचमनें । हीच संध्या तो जाणे । देवावरी पाणी टाकणें । ऐसी पूजा आचरी ॥५४॥
कोणी तेंहि न आचरिती । ब्राह्मणद्वारा पूर्ती करिती । विषयवल्गनेंत घालिती । आपुला काळ ।५५॥
न सुटे स्त्रियेचा पाश । जैसी कुलुपकडी कवाडास । आवळून धरी विशेष । उघडॊ नेदी ॥५६॥
करे धन्याची खुशामत । त्यातें म्हणे तुम्हींच दैवत । मेळवुनी द्रव्य उन्मत्त । देई निज प्रियेसी ॥५७॥
न पाही आपुल्या देहाकडे । सुखें ओढी प्रपंचाचें गाडें । मग येई वृद्धावस्था पुढें । ऐका पवादे तिचेही ॥५८॥
झालें बहु जीर्ण शरीर । हस्तपाद होती स्थीर । मान कांपे हो थरथर । नाहीं म्हणोनी सर्वांसी ॥५९॥
कर्णही होती बधीर । नेत्रींच्या बाहुल्या शुभ्र फार । वाटे दृष्टी जाई त्रिकुट । शिखर शोधावया ॥६०॥
मुखी लाळेची वाहे धार । नाकीं कफांचा येई पूर । न जाववें दिशेसी दूर । करी विधीसी स्वस्थानीं ॥६१॥
परिजन सारे कंटाळती । म्हणती ही घरांत ब्याद मोठी । नानापरी धिःकार करति । प्राणियाचा ॥६२॥
जैसें तुच्छतेनें भिक्षेकर्यासी । देतीं भाकरी भात शिळिसी । तैसें लेखिती पोशकासी । पुत्र दारा ॥६३॥
वृद्धावस्था हें दुजें बालपण । नातूही शिकवी तया ज्ञान । करिती क्रोधें वाक् - ताडण । म्हातार्यासी ॥६४॥
न पाहतां नीति अनीति । जयांची केली सर्वभरती । त्या कांतापुत्रांची ही रीती । इतरां वर्णवेना ॥६५॥
चोहोकडुनी दुःखाचा मारा । येता दुःख करी बिचारा । मग आठवूं लागे परमेश्वरा । देवा ! धांव म्हणे ॥६६॥
ऐशाहि कठिण अवस्थेंत । न होई पूर्ण वैराग्य प्राप्त । उधळितां पुत्र सारें वित्त । वृत्ति भडके तयाची ॥६७॥
नायकतीं बायका पोरें । परी वृद्ध करी अपशब्दांचें मारे । जैसा निर्जन अरण्यीं घोर । घाक्रोश दुःखिताचा ॥६८॥
ऐसेंही आयुष्य कांहीं काल । कंठिटां येई अंतकाळ । नेत्री वाहे अश्रू घळघळ । आठवितां निज कृति ॥६९॥
नाड्यामध्यें कफ दाटे । उर्ध्वश्वास लागे नाकावाटे । कंठ पुत्र म्हणे बाबा एकदां पहाना । आमुच्याकडे ॥७१॥
हा तुमचा नातू बबन । गोरेंमोरें करी वदन । यांचें एकदां घ्यावें चुंबन । वात्सल्यानें ॥७२॥
स्नुषा म्हणे अहो मामंजी ! आजी कां जाहली नाराजी । करोनी या कुमाराची मौंजी । जावे सुखें देवद्वारीं ॥७३॥
सेजेची कामिनी स्फुंदफुंदून । म्हणे मज कोणाचें स्वाधीन । करितां प्राणसख्या आपण । सांगा एवढेंच ॥७४॥
पतीचें राज्य ते रामराज्य । पुत्रांची सत्ता तें परराज्य । आतां कैसे मिळेल सुखसाज । मजलागीं ॥७५॥
शेजारी पाजारी धांवती । महा बोधाचा आवेश आणिती । म्हणती ही जगाची रहाटी । व्यर्थ दुःख करितसा ॥७६॥
लाभ मृत्यु आणिक हानि । यांचा कोणी नाहीं धनी । परमेशाची आहे अगाध करणी । अजुनही उठतील ॥७७॥
प्रेतकळा आली मुखावर । तरीही दाविती आशेचा अंकुर । ऐसा भव - बाजाराचा प्रकार । नवलयुक्त ॥७८॥
असो ऐसा प्राणी होता जर्जर । प्राणवायो सोडी देहाचें घर । धांवे यमदूतांचा संभार । महापाश घेउनी ॥७९॥
यमपुरीच्या मोठ्या यातना । वर्णिता उठती रोमांच जाणा । नाहीं सुटका भोगिल्याविना । पातकीया ॥८०॥
शस्त्रानें तोडिती अवयव । कांडिती शरीर ते निर्दय । भाजुनी काढिती सर्व देह । तोडिती मांसपिंडहि ॥८१॥
तें मांस त्याच देहाकडून । खावविती दूत दारूण । तप्त तैलें कढई भरून । बुडविती राक्षस ॥८२॥
मग रौरव कुंभीपाकादी । नरकीं लोटिती करिती गर्दी । त्यांत राहे मारूनी बुडी । जीव बापुडा ॥८३॥
होवो राव अथवा रंक । त्यासी न सुटे यमलोक । ऐसी एकवीस असती मुख्य । निरय कुंडें यमाचीं ॥८४॥
महादुःख हे भोगुनी । पुनर्जन्माला येई प्राणी । निजकर्मापरी फळ घेवोनी । जाई विविध योनींत ॥८५॥
कराया महादुःखाचें निरसन । आहे एकचि उपाय जाण । साधीं वैराग्ययुक्त भजन । भगवंताचें ॥८६॥
यमनियमांचा आधार । सर्व क्रियेसी आहे साचार । तयांचा करावा स्वीकार । निश्चयानें ॥८७॥
जेथें यमनियमांचें साधन नाहीं । तेथें कार्यासी फलही नाहीं । पायावांचुनी गृह कदाहि । जेवीं बांधू नये ॥८८॥
यमनियमांचें घेऊनी आसन । करावें नित्य स्वधर्मचरण । मग इंद्रियांसहित मन पवन । आकळितां येई ॥८९॥
स्विकारावा एकांतवास । नको विषयी जनांचा सहवास । गुरूशास्त्रवचनीं विश्वास । निश्चल असावा ॥९०॥
मानापमानाचीं लोढणीं । द्यावीं सर्वस्वी टाकुनी । न ठेवावा किंतु मनीं । व्यवहारिक ॥९१॥
ऐसी होतां शुद्धता । भेटेल श्रीगुरू मोक्षदाता । देखोनिया निरासक्तता । देईल अभिष्टतें ॥९२॥
हातीं येतां वैराग्यदंड । मोडेल षडरीचें बंड । मग देहाचें सर्व थोतांड । अनुभवें कळेल ॥९३॥
विषयबंध नाहीं तोडिला । वासनांचा समूह ठेविला । तमोवृत्तीचा केला गलबला । लोभ कांहीं सुटेना ॥९४॥
ऐशा विपरीत स्थितींत । राहती सारे कर्मठ । जैसे बोल बोले पोपट । तेवीं कृति तयांची ॥९५॥
म्हणती आम्ही पंडित । निंदिती जे भगवद्भक्त । वृथाभिमानाचा घेतात । शिरीं महाभार ते ॥९६॥
स्नान संध्या माला करीं । परी मन जाई चर्मकारद्वारीं । तें न आकळितां बकापरी । होईल कर्म तयांचें ॥९७॥
तरी ऐकावें हे बोल । सोडा संसार हव्यास सकल । तेव्हांच शांतिसुंदरी वरील । संतोषुनी ॥९८॥
नाथप्रभूचा बोल मधुर । ठसला पित्याच्या वृत्तीवर । विनवी दावावा मार्ग सत्वर । सद्गुरुराया ॥९९॥
केली चार तपें पूजा । ती जाहली सफल महाराजा । तूं भेटला तारक माझा । आतां उद्धरावें ॥१००॥
त्वां जे कथिलें वैराग्य ज्ञान । तें आचरावया मी बलहीन । तरी दावी पथ जेणें उल्लंघेन । सहज भवसरिता ॥१॥
श्रीनाथदेव नारायणास । दाखवील मार्ग सोपा विशेष । पहावें किरण सत्तावीस । विनवी नाथसुत तुम्हां ॥१०२॥
इति श्रीमाधवनाथ दीप प्रकाशे नाथसुतविरचिते वैराग्य वर्णनं नाम षड्विंशतितमः किरणः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP