मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश| सप्तविंशतितम किरण श्री माधवनाथ दीपप्रकाश अनुक्रमणिका आभार प्रथम किरण द्वितीय किरण तृतीय किरण चतुर्थ किरण पंचम किरण षष्टम किरण सप्तम किरण अष्टम किरण नवम किरण दशम किरण एकादश किरण द्वादश किरण त्रयोदश किरण चतुर्दश किरण पंचदश किरण षोडश किरण सप्तदश किरण अष्टादश किरण एकोनविंशति किरण विंशतितम किरणः एकविंशतितमः किरण दीपप्रकाश -द्वाविंशतितम किरण त्रयोविंशतितम किरण चतुर्विंशतितम किरण पंचविंशतितम किरण षड्विंशतितम किरण सप्तविंशतितम किरण अष्टविंशतितम किरण नवविंशतितम किरण त्रिंशत्तम किरण एकत्रिंशत्तम किरण द्वात्रिंशत्तम किरण त्रिस्त्रींशतितम किरण चतुस्त्रिंशतितम किरण पंचत्रिंशतितम किरण दीपप्रकाश - सप्तविंशतितम किरण Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India. Tags : granthamadhavanathmarathiग्रंथमराठीमाधवनाथ चतुर्थाश्रम Translation - भाषांतर श्रीसद्गुरुनाथायनमः -- श्रीसद्गुरु सांगती शिष्याप्रती । मनुष्याचें आश्रम चार असती । ब्रह्मचर्य - गृहस्थ - वानप्रस्थी । चौथा संन्यास ॥१॥या चार आश्रमांचें निरूपण । संक्षिप्तपणें आजी करीन । मग सुलभ मार्ग दाखवीन । तुजसी योग्य जो ॥२॥ब्रह्मचर्याचें वर्णन । मागील किरणीं प्रकाशमान । गुरूगृहीं प्रेमें जाऊन । वेदपठण करावें ॥३॥प्रातः काळी प्रत्यहीं उठावें । प्रभूचें नामस्मरण करावें । मग विधी सारूनी जावें । शीतजल - स्नानासी ॥४॥संध्या त्रिकाल कराची । गायत्री मंत्राची बहू थोरवी । वेदाध्ययनीं नित्य रमवावीं । वृत्ति आपुली ॥५॥शिरीं जटा कटीं सूत्र । लंगोटी नेसावी पवित्र । दंडकमंडलू यज्ञोपवीतें । धारण करावीं ॥६॥पायीं पादुका घालुनी । जावें भिक्षेसी मध्यान्हीं । ‘ ॐ भवति ’ हा मंत्र म्हणोनी । घ्यावीं भिक्षा झोळींत ॥७॥जी जी भिक्षा मिळेल । ती गुरुपदीं समर्पावी सकळ । गुरु आज्ञा घेऊनी एक वेळ । करावें सुखें भोजन ॥८॥आदरें करावी गुरुसेवा । गुरुचा मान राखावा । कंटाळा कधींहि न करावा । गुरुगृहींचा ॥९॥स्त्रियांकडे पाहूं नये ।स्त्रीसवें बोलूं नये । स्त्रियांची सेवा घेऊं नये । ब्रह्मचार्यानें ॥१०॥गुरूपत्नी जरी मातेसमान । तरी न करावें बहू भाषण । ऐसीं द्वादश वर्षें होतां पूर्ण । गृहस्थाश्रम घेईजे ॥११॥प्राचीन कालीं ब्रह्मचारी । ऐसे वर्तती शुद्धाचारी । आजी जाहलें विपरीत आचारी । सर्व मानव ॥१२॥गुरुस न कळे आपुली महैत । शिष्यही मदोन्मत्त होती । नाहीं धर्म नाहीं नीति । बहकति स्वछंदें ॥१३॥हें सुर्यवंशींचे कुमार (!) । उठती सूर्योदयानंतर । मग चहाचा घेति आधार । मुखमार्जनाविणें ॥१४॥तदुपरी वाचती शाळेचे ग्रंथ । जे शिकविती दास्यमंत्र । हें प्रातः स्मरण होता निश्चित । दहा वाजवी घटियंत्रीं ॥१५॥मग शौच मुखमार्जन । नंतर उष्णजलाचें स्नान । कटी धोतर नेसून । येती त्वरित भोजना ॥१६॥संध्येचें घेतां नाव । म्हणती संदेह फिटला सर्व। गिळीती अन्नाचे घांस नव । लगबगीनें ॥१७॥घालोनी बूट पाटलोण । धांवती शालागृहीं आपण । भ्रष्ट विद्येचें आराधन । करिती विद्यामंदिरीं ॥१८॥भोजनोत्तर घ्यावी विश्रांति । या नियमाची होते आहुति । गुरूजींचाही अपमान करिती । कुशब्द वचनें शिष्य हे ॥१९॥चेंडू लगोर्या आट्यापाट्या । ह्या वाटती कपाळकरंट्या । परक्यांचा खेळ चित्ता । आनंदवी बहु ॥२०॥बाल्यदशेचें हें शिक्षण । मग होती विश्वविद्यालयीन । नाही संध्या नाहीं स्नान । राहती मलिन अंतरी ॥२१॥सांगती शाब्दिक ब्रह्मज्ञान । ‘ एकमेवाद्वितीय ’ वचन । न करितां धर्मग्रंथ पठण । करिती वाद शास्त्रांचा ॥२२॥पूर्वजांची निंदा करावी । कल्पित कथानकें वाचावी । विषयीं मति जडवावी । हें ब्रह्मचर्य ॥२३॥ऐसें आंग्लयुगीचें ब्रह्मचर्य । सर्वत्र विपरीत होय । आला बहु बिकट समय । धर्मावरी ॥२४॥ऐशाही परिस्थितींत । साधिती कांहीं नियम यथार्थ । परी ठेविला पाहिजे भाव मात्र । अंतःकरणी ॥२५॥जरी असेल परशिक्षण । कोणी न सांगेल कुवर्तन । त्यांतची कार्य - कारण । पाहूनी नियम साधिजे ॥२६॥बाह्यशुद्धीचें सोवळें । जरी तेथें नच साधलें । अंतः शुद्धीनें राखावें आपुलें । व्रत उत्तम ॥२७॥करावी मानसिक उपासना । आठवावें श्रीनारायणा । साध्य त्या स्वधर्माचरणा । स्विकारावें ॥२८॥ऐसा ब्रह्मचर्याश्रम संपता । मग जावें गृहस्थाश्रमपंथा । त्याचा परिसावा आतां । नियम तुवां ॥२९॥वरूनी कुमारी कुलशीलवान । पहावें तिचे गोत्रगण । केवळ रूप सौंदर्या मोहून । विवाह न करावा ॥३०॥ऐसी गृहस्वामिनी शोधणें । मग मंगल संस्कार घेणें । स्त्रियेसवें सभ्याचरणें । वर्तावें गृहस्थानें ॥३१॥स्त्री नव्हें बा विषयास्तव । ऐसा धरावा पूर्ण भाव । स्त्री आहे अर्धे अवयव । पुरुषांचें ॥३२॥स्त्रियेंवाचुनी सर्व निर्गुण । स्त्री हीच सगुणा कारण । स्वात्माराम श्रीआनंदघन । प्रकृतीसवेंच दृश्य ॥३३॥सेवावें अभ्यागत अतिथी । करावें दान यथाशक्ति । पुत्र कन्येवरी आसक्ती । धरूं नये ॥३४॥नित्य व्यवहारानुसारें । करावें त्यांचे रक्षण सारें । कौतुक करावें बाह्योपचारें । अंतरीं असावें सावधान ॥३५॥हीं मजसी मोक्ष न देती । ऐसी निश्चित ठेवावी मति । न सोडावीं व्यवहार रीती । जनकासम ॥३६॥तात माता बंधुजन वडील । तयां जो न दुखवील । तोच गृहस्थाश्रम सरळ । चालवील गा ॥३७॥असो चांडाल वा ब्राह्मण । सर्वांसी करावें अन्नदान । स्वधर्माचरणीं भाव ठेऊन । वर्तावे आनंदें ॥३८॥करावी अग्नीची उपासना । सदैव जागृत ठेवावें नारायणा । सोडोनिया सर्व कामना । व्हावें अग्निहोत्री ॥३९॥देवपूजा कुलाचार । श्राद्धतर्पण परोपकार । व्रतादिकें प्रसंगानुसार । करीत जावी ॥४०॥ऐसे सर्व विधी करावें । परि त्यांत चित्त न ठेवावें । जैसें जलामाजीं कमल राहे । अलिप्तपणें ॥४१॥आत्मारामीं लावावें अंतर । रामपूजा हेंची सर्व सार । ऐसी भावना दृढतर । असों द्यावीं ॥४२॥लावितां वृत्तीसी यापरी संवय । निश्चयें होईल तियेचा जय । कठिण म्हणोनी सोडितां अपजय । होईल भवरणांगणीं ॥४३॥गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ सर्वात । येथेच सर्व होतसे प्राप्त । सर्व आश्रमांचा राजा सत्य । गृहस्थाश्रम ॥४४॥गृहस्थाश्रम स्वीकारून । जो करील परमार्थ साधन । तोचि मुक्ति हिरकणी मिळवून । राहील अखंड सुखात ॥४५॥या आश्रमातें हिणकस । रूप देती आजी विशेष । मोहुनी स्वार्थ सौख्यात । करिती घात आपुला ॥४६॥स्त्रीपुत्रांवर भारी प्रीती । मातापित्यांते अवमानिती । त्यांची सेवा न करितां राहती । विभक्तपणें ॥४७॥विषय हें भोगाचें सार । ऐसी भावना पूर्णतर । ठेवुनी करितीं स्वेच्छाचार । मत्तपणें ॥४८॥द्वारीं येतां क्कचित् अतीथी । त्यांतें निखंदोनी बोलती । “ तूं धट्टाकट्टा दिससी आम्हांप्रती । करीं मोलमजूरी ” ॥४९॥बरें जरी आला अपंग याचक । दाविती माया शाब्दिक । परी न पुरविती इच्छा सात्विक । दुर्बळांची ॥५०॥गृहीं असोनी सुशील नोवरी । करिती दुराचार परद्वारीं । अभक्ष्य भक्षोनी मदिरा असुरी । सेविती कुलघातकी ॥५१॥मुखीं तमाखूची नळी । ही अग्निहोत्राची खूण जाहली । ऐसी आर्याची सभ्यता सागळी । होई हद्दपार ॥५२॥गृहस्थाश्रम - धर्म साधावया । नसे प्रतिकूल काल राया । परक्याच्या सहवासें वांया । घालविती नरदेह ॥५३॥आतां वानप्रस्थीचा धर्म कठीण । भार्येसी करावें पुत्राचें स्वाधीन । सेवावें आनंदें तपोवन । वल्कलें नेसोनी ॥५४॥जरी तियेचा असेल हट्ट । सांगावा धर्म वानप्रस्थ । पतीपत्नीचें नातें समस्त । सोडिलें पाहिजे ॥५५॥वनीं करावें घोर तपाचरण । उदकवास वा पर्जन्य । किंवा पंचाग्नी साधन । साधावें निश्चयाने ॥५६॥कंदमुळें नित्य खावीं । गताश्रमीची व्रतें पाळावीं । वासना समूळ टाकूनी द्यावीं । वानप्रस्थें ॥५७॥हें साधन सांप्रत कालीं जरीं । अशक्य वाटेल तरी । घरीं राहोनी अलिप्त व्यवहारीं । करावें आत्मचिंतन ॥५८॥आतां संन्यास विधान । ज्यास चतुर्थाश्रम नामाभिधान । अष्टश्राद्धेंयथाविधी करून । प्राजापत्य इष्टी ॥५९॥करावीं नारायण - आराधना । सर्वस्व द्यावें ऋत्विजांना । अग्नीचा समारोप जाणा । करावा आनंदें ॥६०॥असेल जरी पत्नी घरीं । तिची अनुमति घ्यावीं खरी । मग भगवीं वस्त्रें स्वीकारीं । लंगोटीं कोपिन ॥६१॥बाह्यांतरीं असावें पवित्र । मुखीं नारायण हाची मंत्र । दंडकमंडलुविण हातांत । अन्य घेऊं नये ॥६२॥कायिक वाचिक मानसिक । या त्रिपुटिंचा घ्यावा दंडक । केवळ काष्टदंडें ब्रह्मैक्य । वृत्ती होणार नाहीं ॥६३॥काम्य कर्मांचा त्याग । हा कायिक दंड मार्ग । मौन हा वाचिक दंड उमग । प्राणायाम मनोदंड ॥६४॥घेवोनी हा दंड उचित । मधुकरी मागावीं गृहीं सात । न होऊं द्यावें चित्त आसक्त । अन्नवैचित्र्यावरी ॥६५॥करावें विभाग या भिक्षेचे । पांच समसमान साचे । दोन श्रीविष्णुब्रह्मयाचे । तिसरा सूर्यासी ॥६६॥हे विभाग द्यावे जलदेवीला । चवथा अर्पावा अतिथीला । पांचव्यानें शांतवावें क्षुधेला । यतिरायें ॥६७॥सदा देवालयीं वास । न राहावें एकच ग्रामास । परमार्थाविण भाषा विशेष । करूं नये ॥६८॥मुखीं नारायण नारायण । जपोनी व्हावें नारायण । सदां शुचिर्भूत राहून । साधावा आश्रम हा ॥६९॥ऐसें महात्म्य संन्यासाचें । परी आजी जाहलें पोशाखाचें । करोनी परिधान भगव्या वस्त्राचें । फिरती दाही दिशा ॥७०॥देवोनी गृहासी मठाचें नांव । थाटिती त्यांत संसार सर्व । द्रव्यार्जनाची भारी हांव । उपजे तयासी ॥७१॥जेथें मनाचा नसे संन्यास । तेथें काय करील वेष । जैसा रंगभूवरी नटाचा भास । तैसीच ही कृती ॥७२॥वासनेचें उपटलें मूळ । इंद्रियां केलें निर्बल । तोच संन्यासी अतुल । नारायणरूप ॥७३॥असो नसो वेष भगवा । त्रिभुवनीं वंद्य हो तेव्हां । तोच जगाचा जाणावा । अधिराज ॥७४॥स्वार्थाची करोनी आहुति । स्त्रीपुत्राची सोडिली मिठी । होई निवृत्तीचा सेनापति । तोची संन्यासी ॥७५॥जनार्दन ज्याचा नारायण । राहें अहर्निशी त्याचे चितनीं । वेंची आयुष्यभूमी समान । तोचि संन्यासी ॥७६॥कर्मातीत झाला जरी । निष्काम कर्माची शरीरीं । कौपीन घाली तुष्ट अंतरीं । तोचि संन्यासी ॥७७॥निस्पृहपणें सदा राहे । कोठेंहि न अडकला जायें । भवार्तासी मार्गदर्शक होये । तोचि संन्यासी ॥७८॥नाथसुताच्या जन्मदात्याला । श्रीनाथें ऐसा बोध केला । सांगे घ्यावें चतुर्थाश्रमाला । जरी वांछिता परमार्थ ॥७९॥गुरुमाउलीचा अपूर्व प्रभाव । विसरला तात भवाचें भय । शरीरीं संचार अभिनव । वैराग्याचा आहला ॥८०॥ विनवी काकुळतीनें प्रभूला । विटलों गा मायेच्या खेळा । त्वां कृपा मेघ वर्षवीला । उघडले नयन सत्वरी ॥८१॥घालविलीं वर्षे पन्नास । आतां इच्छीना हा पाश । मज द्यावा जी संन्यास । यतिवर्या ॥८२॥राहिली नाहीं वासना । त्वां सर्व दिलें नारायणा । आतां यति - धर्माचें व्रत दयाघना । सिद्धीस नेई ॥८३॥देखोनी भक्ताची पूर्ण चित्तशुद्धी । नाथ म्हणे एकांत सेवीं आधीं । मग देईन पुण्याश्रम निधी । आपणासी ॥८४॥खानदेशीं जलग्रामप्रांतीं । कानलदें ग्राम गिरिजातटीं । तेथें असें एक टेकडी मोठी । त्यांत गुंफा एकची ॥८५॥एकच मार्ग कराया प्रवेश । अंतरीं पसरे थोडा प्रकाश । अनेक दालनें असतीं तीस । ऐसी ख्याती जनीं ॥८६॥त्या गुंफेचे भाग तीन । आक्रमाया समर्थ सारे जन । परी पुढचा मार्ग आक्रमण । होईना साधुविणें ॥८७॥कित्येकी अट्टाहास केले । न जाणतां पुढें गेले । तेथे अडकोनी राहिले । चिरकाल ॥८८॥आहे ऋषींचा आश्रम । करिती अझून तपविराम । योगसामर्थे मृत्यूजन्म । नाही तया ॥८९॥तपोभंग मुनींचा होईल । म्हणोनी द्वारीं रक्षक विकराल । राहिला उभा सर्वकाल । चतुर्थ दालनीं ॥९०॥ऐसी दंतकथा तेथें चाले । कोणी न जाती एकले । बहुत मार्ग बंद केले । लिंपूनिया ॥९१॥ठेविल्या उघड्या खोल्या तीन । प्रथमांत श्रीदेवीचें स्थान । दक्षिण बाजूसी खोल्या दोन । लहानशा ॥९२॥नसे तेथें मनुष्याचा वास । पक्ष्यांचें ऐकूं ये हास्य । करावया एकांतवास । हेंचि स्थळ मनोहर ॥९३॥बाह्यवृत्ती अंतरीं रुजवाया । ऐसेंच स्थल योग्य योगिया । सहजींच पावे विलया । वासनाही ॥९४॥कण्वमहामुनींची जेथें छाया । त्यांचें पावित्र्य वर्णाया । नाहीं शक्ति श्री नाथतनया । श्रोतृवृंदांनों ॥९५॥करो कल्पना कोणी कांहीं । परी या स्थानाची आहे नवाई । येवो कुतर्की अथवा कैसाही । होई वृत्ती तल्लीन ॥९६॥ज्यांची ध्यान धारणा सबळ । त्यांसी भेटे योगींद्र दयाळ । हा अनुभव सांगती प्रेमळ । वाडवडिल ॥९७॥जो भव - मोहाच्या पार गेला । तोच साधक येथें राहिला । अथवा सद्गुरुकृपा तयाला । ठेवील हा निश्चय ॥९८॥येरव्ही जीव साधारण । दिनीही बघाया अशक्त जाण । मग सायंकाळीं कोण । यावया यत्न करील ॥९९॥ही गुंफा लोकदृष्टीनें भयद । परी एकांताची ज्यातें आवड । त्यानें अवश्य घ्यावा छंद । शांतिसुखाचा ॥१००॥ऐशा गुंफेत पितयासी । ठेवी आमुचा हृषिकेशी । साधी प्रेमें नित्यनियमासी । नारायण ॥१॥होता स्वभाव पूर्वीं भ्याड । परी नाथकृपा करी निर्भिड । राहिला नाहीं आशाबद्ध । तात माझा ॥२॥करोनी केवळ दुग्धपान । षण्मास करी अनुष्ठान । पद्मासनीं स्थित होऊन । साधी आसन योग ॥३॥मासद्वयांत कमलासनें । मिळविली सिद्धी नारायणें । चित्तवृत्तीचें तुणतुणें । तुटलें आपोआप ॥४॥एके दिनीं गुरुवासरीं । ध्यानांत रंगला तात भारी । वायूचा उठाव होऊनी सत्वरी । उडालें आसन तयाचें ॥५॥अग्निकुंडाचे निकट । जाहला नानांचा देह स्थित । जनदृष्टीतें वाटला मूर्छित । परी सावध अंतरी ॥६॥पाही नयनीं दृश्य थोर । ऋष्याश्रम होता सुंदर । करिती तपहवनें मुनिवर । आनंदानें ॥७॥गजासमान धेनू पुष्ट । आनंदें मृगही विहरतात । व्याघ्र स्वच्छंदें खेळतात । वैर सोडुनी ॥८॥वाहे तेथेम निर्मल सरिता । जी पावें सुधेशी समता । आत्मारामाचा गजर सर्वथा । दुमदुमलाहो ॥९॥चालली पूजा ऐश्वर्यमुक्त । सामवेद गायन अद्भुत । बघोनी ऐसें दिव्य चित्र । धन्यता वाटें ॥११०॥महदानंदी असतां निमग्न । येती गुंफा बघाया कांहीं जन । जाहलें भयभीत अंतःकरण । सांगती परिजनासी ॥११॥आणिलें गृहीं उचलोनी । येतां वृत्तीवरी तो मुनी । मायेचें भुवन देखोनी । करी दुःख आक्रोश ॥१२॥मग श्रीनाथदेवें तयासी । केलें बाह्य दृष्टीनें संन्यासी । नारायणानंद नामासी । ठेविती आनंदें ॥१३॥स्वामिसी योगिरायें । निवृत्तियात्रेसी नेलें स्वयें । मस्तकीं कर ठेवितां अभय । जाहले निश्चल ॥१४॥केली अवघी तीर्थयात्रा । येती कण्वाश्रमीं तत्वतां । भिक्षा मागोनी पूर्तता । करिती उदराची ॥१५॥असोनी स्त्रीपुत्र भार । सोडिती मोह जे चतुर । तेची त्यागी साधूवर । महिमा अगाध तयांचा ॥१६॥जवळी होतका जितुका पैसा । तो पुत्रांसी दिधला सर्वसा । ठेविली नाहीं आशा । स्वामीरायें ॥१७॥ज्या ग्रामीं गाजविला अधिकार । तेथें भिक्षा मागें त्यागीवीर । केला पूर्वजांचा उद्धार । आपणासवें ॥१८॥ज्यास परान्नाचा येई वीट । आवडती नित्य नवे पदार्थ । तो भिक्षान्नासी स्वादिष्ट म्हणोनि खाई प्रेमानें ॥१९॥ऐसा कांहीं काल जातां । व्याधीनें गांठिलें स्वामी समर्था । चुकला नाहीं भोग तत्वता । सिद्ध वा साधकासी ॥१२०॥विभूतीवांचुनी अन्य उपाय । न करी कधीं स्वामीराय । कळला अंत कालचा समय । पाचारी कृष्ण पुत्रासी ॥२१॥म्हणे ‘ रामनवमीच्या शुभ दिवशीं ’ । आम्हां जाणें श्रीराम दर्शनासी । आतां येणें जाणें या गतीसी । थांबवूं तेथेंची ॥२२॥सोडितां प्राणवायू मम शरीर । ठेवा पद्मासनावर । गुंफेच्या पायथ्याशीं कलेवर । ठेवा भूमीचे उदरीं ॥२३॥मनानें राहीन राम गुंफेत । कलेवरानें स्थानीं पवित्र । ऐसें सांगोनी मौनव्रत । धरिलें यतिरायें ॥२४॥रामजन्माची वेळ झाली । स्वामींची वृत्ती उचंबळली । ब्रह्मरंध्रातुनी निघोनी गेंली । ज्योत विद्युत् समान ॥२५॥श्रीराम हें स्वामींचे दैवत । श्रीराम हाची त्यांचा मूळमंत्र । श्रीराम सांठवी प्रेमें हृदयांत । नाथरूपानें ॥२६॥धन्य नाथाचें अलौकिक कृत्य । तयासी केले सत्त्वस्थ । दाविला आदरें मोक्षपंथ । मुमुक्षूसी ॥२७॥सर्वायुष्याचें सार । दोन मासांत देई गुरुवर । हें सामर्थ्य अगोचर । जगतीं भासे ॥२८॥सोडितां निजकृपेची धार । एक निमिषाचा नसे धीर । मग या अवधीचा विचार । कासया करावा ॥२९॥स्वामींच्या सदिच्छेनुसार । केलें त्या कण्वाश्रमाजवळी स्थीर । बांधिली समाधी वृंदावनाकार । श्रीनाथ देवानें ॥१३०॥श्रीनाथलीला अगणित । कोणी कराव्या त्या संग्रहित । मानव जीवा नाहीं सामर्थ्य । आकळावया ॥३१॥देवग्रामीं उत्सवालागीं । शिष्यांसवें जाती महायोगी । बसतां आत्माराम पूजेलागीं । करी एक नवल ॥३२॥अष्ट वर्षांचीं बालकें चार । पाचारी आपल्यासमोर । आसनयुक्त बसवी स्थीर । म्हणे पहा भृकुटी - स्थानीं ॥३३॥त्या बालांची दृष्टी जातां तेथ । क्षणांत आली शून्यता । तीन घटिका जाहल्या पुरत्या । परी शुद्धी नाहीं ॥३४॥कोणी म्हणती लागली निद्रा । न कळे प्रभु कृति अगाधा । श्रीनाथ शिष्योत्तमें तदा । पाणी सिंचिलें ॥३५॥निद्रेंत टाकिता पाणी । मनुष्य उठे घाबरोनी । हा निसर्गनियम म्हणोनी । त्यानें जल टाकिलें ॥३६॥परी न हालती बालें । श्रीनाथांचें सामर्थ्य कळलें । मग बाळांजवळी प्रभु गेले । ठेविती हस्त मस्तकीं ॥३७॥“ आतां खाली उतरावें । आपुलें स्थान सोडावें । वायो ! त्वां स्थीर व्हावें ” । ऐसें आज्ञापिती ॥३८॥जाहली बालकें सावधान । त्यांना नव्हतें कांहीं स्मरण । बसतां बसतां निद्रा पूर्ण । लागली म्हणती ॥३९॥ऐसी जेथें अतुल शक्ति । तेथें दोन मासांची काय महति । जें चित्तीं आणील कृपामूर्ती । तें करील निमिषांत ॥१४०॥पुढील किरणीं माधवनाथ । सांगेल भक्तीचें महत्त्व । स्वामींचा सुत जो कृष्णभक्त । तया उद्धरील ॥४१॥निजदीपाचीं किरणें सत्तावीस । प्रकाशवी माझा करुणेश । सत्ताधारी या उज्वल कीर्तीस । प्रतिपाळी सद्गुरु ॥४२॥श्रीनाथ कृपारुपी लेखणी । न सुचूं देई कांहीं मनीं । मज बळेंच नेई ओढुनी । किरण - प्रकाशांत ॥४३॥वाटे आधीं आध्यात्म ग्रंथ । पठण करावें यथार्थ । मग लिहावें श्रीनाथ - चरित्र । काव्यरूपें ॥४४॥येतां ऐसा दुर्बल विचार । लेखणी करी जागृत सत्वर । “ तुज पडला काय गा विसर । मत् शक्तीचा ॥४५॥मतामतांचे ग्रंथ वाचून । केविं लिहिशील मननाविण । त्यास लागतील अनेक दिन । तव आयुष्यही पुरेना ॥४६॥तूं नससी रे लेखक ग्रंथाचा । व्यर्थ तोरा मिरविसी ‘ मी ’ पणाचा । सोडीं अभिमान कर्तृत्वाचा । अथवा दुर्बलता ती ॥४७॥तूं नससी शास्त्रवेत्ता । शास्त्राची तुझी वैरता । आतां पढुनी ग्रंथा । केंविं लिहिशील ॥४८॥घालविलीं वर्षे पस्तीस । आतां कई करणार अभ्यास । येईल कालाचा भयद पाश । राहील हेतु ठिकाणीं ॥४९॥भक्ताच्या मनोगतीनें जावें । ऐसें ब्रीद आहे । म्हणोनी लवकरीं यावें । लागे मज ॥१५०॥आतां ऊठ रे सुकुमारा । नको कल्पनेस तूं देऊ थारा । मज हातीं घेई जरा । होईल त्वत्कार्य ” ॥५१॥ऐसी कृपालेखणी मातें । कुरवाळुनी जागृती देते । ठेवुनी शिरावरी तीतें । नाथ - सुतानें वंदिलें ॥५२॥नाथ - सुताच्या करीं बसुनी । नेई त्यातें वाड्मय - वनीं । शब्द सुमनांचे दिसती नयनीं । ताटवे सुंदर ॥५३॥धन्य देणें त्या देवतेचें । जें मज घेतां न ये साचें । वर्णवेना महात्म्य वाचें । जड बुद्धीसी ॥५४॥म्हणोनी गुरुकृपे ! गे भवानी ! । तुज साष्टांग येई लोटांगणीं । नाथसुता न विसंबे जननी ! । एक क्षणही ॥१५५॥इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुतविरचिते चतुर्थावर्णनंनाम सप्तविंशतितमः किरणः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP