मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश| सप्तम किरण श्री माधवनाथ दीपप्रकाश अनुक्रमणिका आभार प्रथम किरण द्वितीय किरण तृतीय किरण चतुर्थ किरण पंचम किरण षष्टम किरण सप्तम किरण अष्टम किरण नवम किरण दशम किरण एकादश किरण द्वादश किरण त्रयोदश किरण चतुर्दश किरण पंचदश किरण षोडश किरण सप्तदश किरण अष्टादश किरण एकोनविंशति किरण विंशतितम किरणः एकविंशतितमः किरण दीपप्रकाश -द्वाविंशतितम किरण त्रयोविंशतितम किरण चतुर्विंशतितम किरण पंचविंशतितम किरण षड्विंशतितम किरण सप्तविंशतितम किरण अष्टविंशतितम किरण नवविंशतितम किरण त्रिंशत्तम किरण एकत्रिंशत्तम किरण द्वात्रिंशत्तम किरण त्रिस्त्रींशतितम किरण चतुस्त्रिंशतितम किरण पंचत्रिंशतितम किरण दीपप्रकाश - सप्तम किरण Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India. Tags : granthamadhavanathmarathiग्रंथमराठीमाधवनाथ अज्ञातवास Translation - भाषांतर श्रीसद्गुरुनाथाय नमः -- जय जयाजी सद्गुरुरामा । अनंतरूपा पुरुषोत्तमा । तुझा न कळे बां महिमा । अगमा निगमा ही ॥१॥कोणीं म्हणती तुज काळा राम । कोणीं म्हणती गोरा राम । कोणीं म्हणती नयनाभिराम । ऐसें तुझे रूप ॥२॥क्षणांत अससी श्रीमंतापरी । क्षणांत होसी क्षुद्र भिकारी । गृहस्थाश्रमाची मूर्ती साजिरी । नटसी स्वयें ॥३॥कधीं होसी त्रिगुणरूपधारी । उत्पत्तिस्थितिलयाआ अधिकारी । जटाजूट चढविशी शिरीं । कंठीं रुद्राक्षमाळा ॥४॥सहा करीं आयुधांची आवडी । शंख चक्र त्रिशूलादि । भोंवती वेद - श्वानांची गर्दी । कामधेनू पाठीशीं ॥५॥कधीं वसती गाणगापुरीं । स्नान करीसी गंगातीरीं । कधीं भिक्षा करवीरीं । निद्रा माहूरक्षेत्रीं ॥६॥कईं नाम श्रीनरसिंह सरस्वती । कईं होसी श्रीपाद मूर्ति । कईं वासुदेवानंद ख्याति । नर्मदातिरीं ॥७॥तुझ्या करुण - रस - गंगेत । मज ओढोनि घेई अवचित । त्यांत बुडवी अहोरात्र । कृपानिधे ! ॥८॥मग मी कांहीं न बोलेन । तुजपाशीं न मागेन । मी - तूंपण ही विसरेन । लोळेन सुख - शयनीं ॥९॥तूं गंगाधर - नंदन करी । सकल शास्त्रांची माधुरी । ऐसी लिहविली पोथी निर्धारी । गुरुचरित्राची ॥१०॥गंगाधरसुत तुझा भक्त थोर । पंडित तेवीं कवीश्वर । नाथसुत तयाचा किंकर । शोभेना हो ॥११॥मज नको तयाची थोरी । नाथसुता ठेवी आपुल्या द्वारीं । झाडीन तुझी ओसरी । हाची वर देई ॥१२॥ऐकोनी दासाची विनवणी । तूं घेसी अवतार झणीं । माधवनाथरूपें भक्तालागुनी । तारिसी गा ॥१३॥त्वां मजसी दिला आधार । केला तव दरबारीचा चोपदार । माझ्या इच्छेहूनी थोर । दिधलें स्थान ॥१४॥नित्य पाहीन नाथ देव । श्रीनाथ भक्तांचा समुदाय । नेत्रांची पुरवी हाय । बहू दिवसांची ॥१५॥गत प्रकाश किरणांत । नाथे त्यजिलें चित्रकूट । मग घेई विश्वनाथ भेट । काशीक्षेत्रीं ॥१६॥केला मानसीं विचार । आतां अज्ञातवास संचार । करूं सर्व भूमिवर । निरीक्षणार्थ ॥१७॥वाढला फार जोजार । आतां पटल घेणें सोईस्कार । म्हणोनी घेई गुरुवर । विविधरूपें ॥१८॥वर्ष होतें तेहतीसावें परी दिसे जणूं विसावें । वंदोनी विश्वनाथभावें । जाई अमरकंटकीं ॥१९॥अमरकंटक हा अमर । करी वस्ती कंटकीं अमर । त्यास तुडवितां अमर । मनुज होय ॥२०॥अमरकंटक ही इंद्रपुरी । जिची न येई कोणा सरी । जी सृष्टीची भंडारी । उघडुनी दावी ॥२१॥निसर्गाचें उपवन । भासे केवळ नंदनवन । वृक्षराजी हे सुरगण । शोभती हो ॥२२॥दिव्य वनस्पती या देवांगना । सेविती आदरें पांथस्थांना । मयूर - किन्नरांचें जाणा । ऐकावें गायन ॥२३॥कोकिला अप्सरा ही सुंदर । पंचमालापें करिती विहार । ठायीं ठायीं गुंफा मनोहर । जणूं इंद्रभुवन ॥२४॥बालरूपी निर्मल झरे । उडविती कारंजाचे फवारे । सुरनदी - नर्मदा पसरे । या इंद्रपुरींत ॥२५॥परी या अमराचा मार्ग कठीण । द्वैत - सर्प वसती दारुण । तामस - पशूंचें निवासस्थान । मार्गीं असें ॥२६॥ते मारितां निश्चय - शरानें । भेटे अमर संतोषानें । दाखवीं निजभूषणें । भक्तजनां ॥२७॥ऐशा अमरकंटकीं अमरेश । करावया एकांत वास । घेऊनी चित्कला सुंदरीस । त्वरित जाई ॥२८॥सतरा वर्षांची ती नारी । चंद्रप्रभा सुकुमारी । करावया विलास ब्रह्मचारी । नाथ नेई आदरें ॥२९॥हें कोणा नवल वाटेल । परी या तत्त्वाचें शोधितां मूळ । मग अनुभव येईल । बोलाचा हो ॥३०॥तेथें केला एक वर्ष वास । घेई पिशाच्च वृत्तीस । समीप न येऊं देई कोणास । योगेश्वर ॥३१॥सदा सोहम् जपाचा घोष । आभासाचा घेई वेष । शरत्कालीं प्रभू विशेष । दावी लीला मनोहर ॥३२॥अमराहुनी जाई इंदुरीं । तेथील नृपाच्या दरबारीं । देव मामलेदार साधू विहरी । जाई तया भेटावया ॥३३॥देखोनी ही नाथमूर्ति । आनंद झाला यशवंताप्रति । कडकडोनी भेटती । उभयतांहि ॥३४॥नाथें कथिलें सकलवृत्त । म्हणे आतां कासया मागशीं वर शिरीं । परी तव इच्छेकारणें करी । मनोरथ पूर्ण ॥३५॥यशवंत म्हणे तूं सर्वकारी । कासया मगशीं वर शिरीं । परी तव इच्छेकारणें करी । मनोरथ पूर्ण ॥३६॥करोनी भावें वंदन । येई महू ग्रामीं हंसून । झाला वैद्य गुणसंपन्न । नामें माधवराव ॥३७॥माधवराव नगरांत फिरती । नरहरी नामक शिंप्यास भेटती । म्हणे मी वैद्यकी क्रियेचि गति । जाणत आहे ॥३८॥मज असें नाडी ज्ञान । वायूचें सांगेन सहज ठिकाण । नेत्ररोगावरी अंजन । रामबाण असे ॥३९॥जो पांगुळा त्यास येतील पाय । मुकाही वाचाळ होय । जन्माची मूळव्याधि जाय । माझ्या औषधानें ॥४०॥जाहलें कर्ण बहिर । त्यासही उपाय थोर । कोणी वेडा वा माथेफिरू । त्यास करीन सावध ॥४१॥सर्पविंचू विखार । पळवीन त्यांचें दुःख दूर । इंगा फिरवीन इंगळेवर । श्वान विषाचा पाड काय ॥४२॥डाकिणीनें घातले फेरे । पिशाच्च अंतरी संचरे । मुंजा म्हसोबाचे वारें । चुकवीन ॥४३॥ब्रह्मसमंधें जरी झडपिलें । कोणी चेटकें ही केलें । मूठमारीनें दुःखी असलें । तया सुखी करीन ॥४४॥जरी जाहला त्रिदोष ज्वर । वाताचाही जोर फार । मम मात्रा करील पार । दुःखांतुनी ॥४५॥मम मात्रेचा अगाध माहिमा । काय सांगावा तुम्हा । त्रिविधतापही विरामा । पावतील ॥४६॥जैसे वैदू लोक ग्रामीं फिरती । निज औषधींचा महिमा सांगती । एकदा अनुभव घ्यावा म्हणती । लांब स्वर काढुनी ॥४७॥तैसे संत हे महानुभाव । संचार करिती जगी सर्व । कंठरवानें संगती भव - । रोगांचे घ्या औषध ॥४८॥न लागेल एक पैसा । केवळ पथ्यावरी भरवंसा । परी अज्ञ जीवाची आशा । धांवेना तिकडे ॥४९॥ऐसे नाथें शिंप्यास कथिलें । असें एकच औषध भलें । तें काढील सर्व रोगांचीं मुळें । निःसंशय ॥५०॥नवल वाटलें नरहरीस । म्हणे हा वैद्य किंवा योगी पुरुष । याचा प्रत्यय घ्यावयास । बोलवी स्वबंधू ॥५१॥जो कफविकारें पीडिला । उपायाचा मार्ग खुंटला । आंग्लमहावैद्यही थकला । त्या रोग्यास पाचारी ॥५२॥सांगे माधववैद्यास । दुःखमुक्त करावेंयांस । प्रभूनें दिलें विभूतीस । ओढी म्हणे श्वासानें ॥५३॥झाला तत्क्षणीं रोगमुक्त । नरहरि म्हणे हा योगी खचित । करी प्रेमें प्रणिपात । तों आवरी नाथ ॥५४॥नाथदेव सांगे हा जडींचा महिमा । एका सिद्धे दिधली आम्हां । पूजाया उदर - आत्मारामा । उपेगा आणिली ॥५५॥नरहरि देई द्रव्यभार । परी शिवला नाहीं गुरुवर । म्हणे अल्प दुग्ध द्यावें सत्वर । प्राशनार्थ ॥५६॥नाथकीर्तीचा चंद्रमा । कधीं वाढे कधीं होई विरामा । कधीं अभ्राची घेई उत्तमा । नील शाला ॥५७॥डॉक्टर कीगन पाश्चिमात्य । त्यास कळली ही अतुल मात । प्रत्यय घ्यावया येत । धारा नरगरीसी ॥५८॥धारानगरेश झाला जर्जर । थकला तो भिषग्वर । नाथें औषध - विभूति चार । दिवस दिधले ॥५९॥झाला नृप रोगमुक्त । तुष्टला केगन मनांत । म्हणे हा मानव नव्हें खचित । करी अतुल कृति ॥६०॥विनवी नाथासी कर जोडून । मज कांहीं द्यावें ज्ञान । तयाच्या तलहस्तीं योगभूषण । ठेवी अंगुष्ठ ॥६१॥‘ पहावें साहेब त्यांत ’ । तों दिसली प्रकाश ज्योत । हेंचि देतों व्रत । आचरावें नेमस्तें ॥६२॥श्रीनाथ प्रभूचे पितृव्य । धारानगरीस करिती वास्तव्य । येती मग माधवराव । तयांच्या गृहीं ॥६३॥ठेविल्या भरून शिशा चार । रंग घालुनी केले प्रकार । विभूति हेंच सर्व सार । त्यांत मिळविलें ॥६४॥सुटतां कीर्तिवायूचे वारें । नाथें सोडिलें स्थान त्वरें । खांडवा ग्रामी संचरे । आंग्लरथमार्गे ॥६५॥येतां खांडव्यास नाथमूर्ति । आपुल्या मनीं विचार करिती । कोठें करावी उदरपूर्तिं । अपरिग्रहें ॥६६॥तों भेटले एक तारमास्तर । दृश्य करी त्यांचें अंतर । भावे करोनी नमस्कार । नेई नाथा स्वगृहीं ॥६७॥नाथ मागे कांहीं कामा । त्यावीण न जाई आश्रमा । प्रभु आग्रहें तयाची रामा । देई पाळणा गुंफावया ॥६८॥ज्यानें पंचतत्वांचा पाळणा करूनी । गुंफिलें ओंकार तंतूंनीं । खेळविला सोहम् बाळ हंसुनी । तो काष्ठपाळणा गुंफी ॥६९॥तार मातरांची पत्नी । अपस्माराची सांगे कहाणी । विभूती औषध तियेसी देऊनी । करी रोगमुक्त ॥७०॥मग संचार केला चाळीसगांवीं । दूसरा वेष नाथ घेई । शिरीं जीर्ण रुमाल पाही । कटीं पंचा जुनाच ॥७१॥पोहरेगांवीं तेथून येती । ग्रामाबाहेर घेती विश्रांती । तों पाहिला एक बाग नेत्रीं । जीत कवठें गहूं ॥७२॥मनीं नाथ विचार करी । आतां येथेच करूं चाकरी । दुग्धपानाची भाकरी । मिळवूं येथेंच ॥७३॥नाथ जाई त्या मळ्यांत । क्षेत्रपाळातें विनवीत । मज चाकरी द्यावी उचित । धोंड्या हें नाम माझें ॥७४॥माझा रोजमुरा केवळ दुग्ध । नको मला द्रव्याचा संबंध । दिनरात्री राहीन सावध । सेवेविषयीं ॥७५॥तन्नाम रंभा पाटील । मनीं झाला विस्मित केवळ । न घेतां एक छदाम करील । कैसी सेवा ॥७६॥हा न दिसे सेवक खरा । परी जो चालून आला घरा । ठेऊन घ्यावा बरा । कवठें राखाया ॥७७॥म्हणे तूं करशील कां वृक्ष - रक्षण । येरू वदे हें माझें कर्तव्य जाण । सर्व राखणें हें संधान । मज आवडे जीवाहुनीं ॥७८॥बांधिला एक माळा । त्यावरी श्रीनाथ बसला । मुखी भजनाचा चाळा । सदोदित चालला ॥७९॥ऐसे क्रमिले कांही दिवस । चाखीत होता स्वानंदरस । आमुचा धोंड्या मळ्यास । शोभवीत होता ॥८०॥नाथा ! तूं झालासी धोंडा । आम्हासही तैसें करी गड्या । सोडवूं सार्या मनाच्या उड्या । सहजींच ॥८१॥ऐसी चाकरी करिता नाथ । राहिलें द्वार उघडें अवचित । आला एक पोळ मदोन्मत्त । खाई कोमल गोधूम ॥८२॥नाथें देखिला पोळ नयनीं । म्हणे पाहुणा आला हो भोजनीं । यातें तृप्त करावें या क्षणीं । निवारू नये ॥८३॥वृषभें खादलें पीक बहुत । बैसला विश्रांतिस्तव तेथ । आला पाटील मळ्यांत । गांवातुनी ॥८४॥देखिली नाथप्रभूची लीला । चित्तीं बहुत क्षोभला । परी न बोली वचनाला । म्हने भजनरंगीं दंग असे ॥८५॥पाटील होता वारकरी । तयानें चाखिली भजन माधुरी । म्हणोनी सत्ववृत्ति धरी । आपुल्या मनीं ॥८६॥परी पाटलीण बाईचा तोरा । मज न वर्णवे सारा । जिचा होता दरारा । पाटलावरी ॥८७॥म्हणे धोंड्या तूं दगड । तुज नाहीं रे ज्ञान मूढा । आमचें पिउनी गटगटा दुग्ध । चाकरी न करीसी ॥८८॥बुडविलें माझें शेत । वरी करिसी हास्य उलट । तुज लज्जा न वाटे चित्तांत । तिळभरी ॥८९॥तूं दिससी दुसरा पोळ । आमुचें खाउनी अन्न विमल । जाहलासी लंबोदर केवळ । दवडिला घांस आमुचा ॥९०॥जाई जाई रे येथून । मज न दावी हें वदन । ऐसें नाना गालिप्रदान । करी पाटलीण बाई ॥९१॥परी नाथजी धोंड्या जाहला । न देई प्रत्युत्तर तियेला । देखोनी विशेष चिडली अबला । जाहली प्रबला ॥९२॥नाथ म्हणे केलें रक्षण । रक्षणाचें हें महिमान । रक्षणीं ऐसें गालिप्रदान । ऐकणें लागे आम्हां ॥९३॥आम्ही सत्वा रक्षाया जातों । तों तामस तया आड येतो । हा झगडा नित्य चालतो । उभयतांत ॥९४॥घेतली आपुली बोचरी लोटी । निघे तेथूनी जगजेठी । नमन करी बाईप्रती । म्हणे उपकार तुझे ॥९५॥बाई ! गहूं तुज बावन्न मण । पिकतील हा निश्चय जाण । वेडावूनी म्हणे पाटलीण । गगनांतुनी येतील काय ॥९६॥बाई गगन हेंच तुझें धान्य । गगन हें तुझें जीवन । या गगना ऐसें मन । करी वो माऊली ॥९७॥परी ती वासनेची नारी । नुमजे नाथांची वैखरी । कुशब्दानें ताडन करी । प्रभुलागीं ॥९८॥जो जाहला योगेश्वर । सर्व सत्तेचा आधार । ऋद्धि सिद्धिचा दातार । तो साही कटु वचन ॥९९॥ज्यानें बालपणींच मुक्तिका । केली दिव्यौषधी गुटिका । सोडवीं सहजी पंचराशिका । तो साही कटु वचनें ॥१००॥सहज समाधीचा योग । जो स्वयेंच साधी चांग । देई वाक् सिद्धि अभंग । तो साही कटु वचन ॥१॥निघाला सत्वर तेथोनी । तों भेटला गांवचा कुलकर्णी । नेई आपुल्या भुवनीं । नाथ देवासी ॥२॥केशवराव तयाचें नाम । नाथासी म्हणे तूं ब्राह्मण उत्तम । राही मम गृहीं पूजाकर्म । करावयासी ॥३॥नाथ बोले न जाणे अनंत देव । मज एकच ठावें शीव । कैसे पूजूं हे यादव । यादवीचे ॥४॥हा दिसतो बैरागी देव्हारा । मज याचा वीट आला खरा । दाखवावा मार्ग दुसरा । आपुल्या सेवेचा ॥५॥हे तत्वबोल ऐकोनी । केशव दचकला मनीं । हा धोंड्या नसे भासे मुनी । ठसलें चित्तीं तयाच्या ॥६॥विनवी आपण स्वस्थ असावें । मम गृहीचें दुग्ध घ्यावे । नाथराया हें न साहवें । म्हणे व्रतभंग होईल ॥७॥राहिला स्तब्ध क्षणभर । देखिलें तयाचें घर । तों मृत्तिकेचा पाहिला गारा । जाहला आनंद योगीशा ॥८॥केशव जाई पूजाया शंकर । नाथें काय केला चमत्कार । कर्दम ठेविला करणीवर । केला गिलावा भिंतीसी ॥९॥कारागीर जाती घरीं । खावया दुपारची शिदोरी । सर्वांचे काम एकुटा करी । घटकेमाजीं ॥११०॥राखिलें अयाचित व्रत बरवें । हें देखितां केशवें । ठायींच वृत्ति विरझून जाये । तयाची गा ॥११॥म्हणे मनीं केशवराव । हा नाहीं हो नाहीं मानव । अवरतला वाटे देव । या रूपानें ॥१२॥केशवाची बघोनी ऐशी स्थिती । नाथ चिंतीती आपुलें चित्तीं । आता येथे राहतां निश्चिती । प्रगट होणें लागे ॥१३॥तेथून निघती लगबगा । ‘ मज घाटावरी जाणे गा । तुमचे इच्छित कार्य सुभगा । होईल सप्तदश - दिनांत ’ ॥१४॥जाहली वृत्ति अफाट । घेतली पश्चिमेची वाट । चाले जैसा वायूचा लोट । जाई मार्गातुनी ॥१५॥पुढील कथारस अभिनव । नाथ होईल कोंड्या गुरव । करील माया अपूर्व । नाटकी हा ॥१६॥श्रीनाथदीपप्रकाश । जाहला सात किरणांचा प्रकाश । वाढवी स्वयं कीर्तीस । आपुला आपण ॥११७॥इति श्रीमाधवनाथदीपप्रकाशे नाथसुतविरचिते अज्ञातवासनिरूपणंनाम सप्तम किरण समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP