मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
सप्तदश किरण

दीपप्रकाश - सप्तदश किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः --
सकलतीर्थ सद्गुरु भगवान । तयाच्या पदीं करी नमन । तोच शारदा गजानन तेवी सर्व देव ॥१॥
नाथा ! तूं खरा कर्मयोगी । कर्म हीच तुझी कृती अवघी । राहोनी स्वयें निष्काम जगीं । भक्ता मार्गी लाविशी ॥२॥
भक्तावा नसे तुज कंटाळा । येवो कैसाहि भक्त दुबळा । नाना प्रकारें तया दयाळा । नेसी सत्पंथीं ॥३॥
करावया भक्तांसी बोध । तुज वाटें उत्साह अखंड । काढोनी भक्ताच्या विषय छंद । घालिसी मोह आपुला ॥४॥
विषयसर्पाचें विष । करी सर्व जीवांचा नाश । परी करूणलोचनें परेशा । तूं निवारिसी ॥५॥
तुजपाशीं इच्छितो मायाधन । देसी गा स्वरूप धन । तुझा मोह अनिवार जाण । मायेहुनी ॥६॥
जैसी बालें मृत्तिका खातां । त्यांना शर्करा देई माता । तैसी तुझी कृती अनंता । वात्सल्याची ॥७॥
कां घेऊनीया घुटी । पाजी बाळासी उठाउठी । कैं प्रेमें रागाउनी ओती । मुखामाजीं ॥८॥
तैसा तूं माझा योगेश्वर । शरण येई जेव्हां कुमर । घेउनी निज छायेंत चतुर । करी लडिवाळ ॥९॥
मग हळूच सन्मार्गाची घुटी । पाजुनी आपुल्या भक्ताप्रती । पळवीसी त्याची बुद्धी खोटी । प्रेमभावें ॥१०॥
ऐसें करिसी नित्य कर्म । परी राहसी अलिप्तराम । हेंचि तुझे गूढवर्म । कोणा नाकळे ॥११॥
त्वां कित्येका कर्मी केलं । नाना मार्गी लाविलें । पाखांडाचें बंड मोडलें । बलवंता ॥१२॥
कित्येका केलें संन्यासी । त्यांनाहि लाविलें कर्मासी । करोनी सर्व त्यागासी । वीतरागी होसी तूं ॥१३॥
झाला कर्महीन भारतदेश । शब्दांचा भरला प्रकाश । वितंडवादाची हौस । जगालागीं ॥१४॥
ऐशा काळीं तुझा अवतार । कृतीवरी ठेवूनी भार । अनेक तत्वांचें सार । ऐसे पुत्र निपजविसी ॥१५॥
तुझ्या पुत्रास नाहीं गणति । विविध प्रकृतिच्या मूर्ती । प्रकाशवोनी कष्टी । न होसी दयाळा ॥१६॥
तुझें उदर विशाळ । प्रसवुनी अनंत वेळ । तें पूर्ण दिसें गोल । तैसेंची गा ॥१७॥
म्हणोनी तुझें नाम अपार । ठेविती महा - कविवर । नाथसुत म्हणे तूं चोर । दयाघना ॥१८॥
नाथा मी कौतुकें । तुम्हां बोलिलों इतुकें । परी अंतरी विचारितां देखें । मम बोलची सत्य ॥१९॥
आमुची सारी संपत्ती । तूं कपटें हारिसी जगजेठी । आम्हां करिसी दिगंबर कृती । ही चोरी कां पा नव्हे ॥२०॥
देवा ! त्वां रूष्ट न व्हावें । मी एकची सांगेन भावें । काशीनाथासम निर्मळ जीवें । नाडिली फसवुनी ॥२१॥
तारूण्य जयाच्या अंगी भरलें । करी सुखें संसार सगळें । परी जेव्हां त्वां झडपिलें । मावळलें सर्वही ॥२२॥
केलें तयाचें मातेरें । अन्न ! अन्न ! करिती बायकापोरें । इतुकेंही करोनी प्रभू रे । तूं स्वस्थ न राहसी ॥२३॥
त्यातें निजपदीं ओढून । ठेविसी चिरकाल लपवुन । पुनरपि बांधवालागुन । नाहीं भेटविला ॥२४॥
सदाशिवाची प्रिय भार्या । शोभे जैसी सति अनुसया । तिला पळविलें सोडुनी दया । पंढरपुरासी ॥२५॥
केला त्याचा संसारनाश । हरविलें स्वाभिमान वृत्तीस । केले शेळीसम गरीब त्यास । म्हणविसी सर्वदाता ॥२६॥
बरी नोहे गा ही तुझी करणी । आवरीं आपुली माया पत्नी । ऐक येवढी विनवणी । सर्वेश्वरा ॥२७॥
मज ठाऊक असोनी तव कृति । मम सूत्र दिलें तुझें हातीं । ऐसी विचित्र माया नटी । मज ही मोही क्षणांत ॥२८॥
म्हणोनी वंदावें कां निंदावें । याचाहि भ्रम मज पाहे । तरी भ्रमातीत लवलाहें । करी रे गोविंदा ॥२९॥
गत किरणीं सदाशिवाची । निर्भय केली गती क्रियेची । दृष्टि निरसितां तमाची । मग प्रकाश सहजींच ॥३०॥
तात्याची जाहली उन्नत गती । सदा आवडे शून्यस्थिती । प्रश्नोत्तरीं मेळ न बसती । शिष्योत्तमाच्या ॥३१॥
जैसा कमलपुष्पाचा रेणू । तैसा नाथ सांभाळी आपणू । भवाचा ताप नारायणू । न होऊं देई तया ॥३२॥
बघोनि सदाशिवाची वृत्ति । नाथास येई प्रेमभरती । परि बाह्यात्कारीं छळिती । सदाशिवा ॥३३॥
न बोले कधीं सरळ । म्हणे हा भ्रमिष्ट केवळ । तूं मम सन्मुख अबोल । बोल बोलावें ॥३४॥
दर्शना येता भक्त । म्हणे कासया येसी व्यर्थ । बसून राहतां गृहांत । आमची नसे जरूरी ॥३५॥
क्षणांत मारी दंडा । क्षणांत देई प्रेमाचा पुडा । क्षणांत बोलुनी कुशब्दा । करी निंदा तयाची ॥३६॥
ऐसें नाना खेळ खेळला । परि तात्या नाहीं ढळला । तो धीरोदत्त राहिला । सर्वकाळ ॥३७॥
नाथ वरी कठिण अंतरीं मृदुल । जैसें नारिकेल फल । देखोनि स्थितप्रज्ञ बाळ । कौतुक करी मनांत ॥३८॥
एकदा हा नाथ बालक । नाथपदीं ठेवी मस्तक । तों खवळला गुरूनानक । करी वाक्ताडण ॥३९॥
तुम्ही दिसतां अज्ञान । न कळे तुम्हां नमन । ज्या नमनें होय निर्मन । ऐसें वंदन पाहिजे ॥४०॥
त्यावीण जो नमस्कार । तो केवळ दृश्य बाजार । प्रस्तरावरी प्रस्तर । घांसावा जैसा ॥४१॥
न कळतां वर्म । उगीच करिता श्रम । विनवी मग भक्तोत्तम । वंदन कैसें करावें ॥४२॥
विचारिला सरल प्रश्न । परि नाथाची उलट खूण । तुम्ही तर्कटी विचक्षण । कैसे विचारितां ॥४३॥
ऐसें बोलोनि नानापरी । मग झालें दयामय अंतरी । म्हणती मीही भ्रमाचे घरीं । आज गेलों ॥४४॥
उगीच ताडिले पुत्रराया । मज न राही भान समया । या वाणीला सखया । नाही अंत ॥४५॥
कळवळुनी म्हणे नाथ । तुज सांगेन नमन रीत । मम सन्मुख येथ । बैस भक्तराया ॥४६॥
तव पदजोडी पुढे करीं । मी मस्तक ठेवितों त्यावरी । मग तुज कळेल माधुरी । नमनाची ॥४७॥
ऐकोनि ही नाथवाणी । तात्या लाजले अंतःकरणीं । क्षमा करी गे जननी । मी न करी पाय पुढें ॥४८॥
सद्गुरूचें शिर पायावरी । हें घोर पातक मी न स्वीकारीं । नको ती जाणीव हरी । नमनाची ॥४९॥
तूंचि माझें नमन । तंव मूर्ति हें निधान । या सगुणाचेंच करीन । पूजन मी ॥५०॥
माझा भाव दृढ असतां । मी घेईण पूर्णावस्था । मत्पदीं शिर सर्वथा । ठेवूं नेदी ॥५१॥
तुझे मस्तक कामिनी सुमन । मम पद असती पाषाण । तूं सुवर्ण मी मृत्तिकेसमान । सद्गुरूराया ॥५२॥
तूं निर्मल मी मलिन । तूं मंगल मी अमंगल जाण । तूं पुण्य मी पातकी दारुण । देवराया ॥५३॥
नाथ सांगे गा कोमला । मीं देव तूं भक्त झाला । येथें अन्य विचाराला । ठावचि नाहीं ॥५४॥
तूं देव्हारा मी देव । तूं भृंग मी राजीव । सोडून देई माव । या बोलांची ॥५५॥
होते श्रीकृष्ण भगवान । ते पूजिती उध्दव जाण । पंढरीचें अतुल भूषण । सदा सेवी भक्तासेसे ॥५६॥
अरे तुमच्या सेवेलागीं । आम्हास यावें लागे जगीं । ठेवीं ठेवीं पाय लगबगी । मज नमूं देई ॥५७॥
परी तात्या नाहीं धजले । मग नाथचि पुढें सरसावलें । प्रिय भक्ताचें चरण ओढिले । ठेविलें मस्तक त्यावरी ॥५८॥
दाखविली नमस्काराची युक्ती । तैसीच भक्तें वंदिली पदमूर्ती । तों दिसल्या नक्षत्र ज्योती । दोहों पादांवरी ॥५९॥
धन्य धन्य हे दयाधन । तूं वर्षविलें मेघजीवन । भक्त - मयूराचें वांछन । पुरविलें कीं ॥६०॥
तात्या मीपणा विसरलें । आनंदें नाचू लागले । नेत्रीं प्रेमाश्रू गळाले । मोत्यांपरी ॥६१॥
पुढे त्राटकाचें प्रकार । शिकवी नाथईश्वर । भृकुटीवरी स्थिर । होती नित्य ॥६२॥
सदा दृष्टी उफराटी । होई खालीं वरती । त्या योगें हले हनुवटी । योगियाची ॥६३॥
कोणी म्हणती झाला वृद्ध । कोणी बोलती हा सिद्ध । कोणी वाटे पाचारित । इकडे ये म्हणोनि ॥६४॥
श्रीनाथ मग देवगांवीं । तात्यासही सवें नेई । पादुकावरी मस्तक ठेवी । सच्छिष्याचें ॥६५॥
ब्रह्मरंध्रास गंध लाविलें । तोंच तात्यांचें श्वास बदलले । आनंदरस चाखू लागले । स्वानंदानें ॥६६॥
पश्चिमेच्या सोपानावरी । जाती फिरती माघारी । आनंदाच्या येती लहरी । अवर्णनीय ॥६७॥
पुण्यपत्तनीं असतां नाथ । नित्य येती दर्शनार्थ । प्रभु देती त्यासी तीर्थ । नित्य नवी रुची ॥६८॥
कधीं वाटे गंगाजल । कधीं फल्गू निर्मल । कधीं यमुना नील आलीशी गमे ॥६९॥
वागविती तात्यास कडक । परी प्रेमही अमोलिक । आपण माता तो बालक । ऐसें वर्तती ॥७०॥
एकदां सदाशिवतात्या । परग्रामीं जाती तत्वतां । कुक्कामाहुनी परततां । उशीर जाहला ॥७१॥
ते राहती शनिवारांत । नाथ करी रवी पवित्र । परि अंतःसाक्षी भगवंत । त्यांत वृत्त कळले ॥७२॥
जाहले दोन प्रहर । स्नानही न झालें सत्वर । अन्हिकासी तीन प्रहर । लागतील ॥७३॥
तावत्काल सदाशिवें । भोजनाविण रहावें । हें न रूचतां देवें । पाठविलें एकासी ॥७४॥
दिल्या विभूतीच्या गोळ्या । द्याव्या नेऊन तात्याला । त्या खाऊनी आन्हिकाला । बसावें गा ॥७५॥
तात्या जाहले होते क्लांत । राहिलें नाही सामर्थ्य । परि आहिन्हकाच्या नियमार्थ । जाती संध्येसी ॥७६॥
तों गुटिका मिळाल्या । चाखितां थकवा गेला । मातेवीण कोणाला । कळवळा यावा ॥७७॥
या अंतःक्रियेनें तात्यास । आली कृशता बहुवस । बाह्य शक्तीचा र्‍हास । होत गेला ॥७८॥
ऐसी जाहलीं वर्षे दोन । दिसती सुदाम्या समान । शरीर कृश परि तेजःकण । दिसे मुखावर ॥७९॥
पुनरपि जाहले बळकट । योगसामर्थ्य दिसे अद्भुत । वायुची लीला अवलोकित । राहती स्वस्थपणें ॥८०॥
राहतां दोन मास अवधी । नाथ म्हणे झाली कार्यसिद्धी । आतां कलेवराची घडी । ठेवूं नये ॥८१॥
येतां श्रीगुरु पौर्णिमा । भक्त करिती उत्सवसीमा । पूजिती श्रीयोगाभिरामा । शिष्यवृंद ॥८२॥
आषाढी पौर्णीमेसी । व्यासपूजा म्हणती तयासी । ऐशा पुण्य दिवशीं । करावी गुरुपूजा ॥८३॥
अभिषेकावें श्रीगुरुराया । षोडशोपचारें पूजोनियां । मग सुवासिनी द्विजसंग्रहा । भोजन द्यावें ॥८४॥
करावी सद्गुरुची आरती । दक्षिणा द्यावी यथाशक्ती । परीक्षा द्यावी गुरुप्रती । निज कृत्याची ॥८५॥
जें जें कृत्य केलें असेल । त्याचा करावा विचार सबळ । सद्गुरुसी कथावें श्रद्धाबळें । सर्व कांहीं ॥८६॥
कांहीं पोटीं ठेवूं नये । क्षमेस्तव याचावें । मग स्वप्नींही आणितां नये । दुष्कृती ॥८७॥
तुम्हा शुद्ध अनुताप होतां । क्षमा करील भगवंत । कृपादृष्टीनें पाहतां नाथ । पाप भस्म होय ॥८८॥
त्या दिनीं सायंकाळीं । करावी पूर्णारती सगळी । गावी श्रीनाथ गीतांजली । प्रेमभावें ॥८९॥
मग जयाचा जो विधि असेल । तो करावा उज्वल । करी अमंगलाचें मंगल । श्रीनाथ देव ॥९०॥
श्रीगुरु नसतां प्रत्यक्ष । पादुकांचा धरावा हव्यास । नातरी श्रीगुरुचित्रास । भावें पुजावें ॥९१॥
ऐशा मंगलदिनीं । नाथ होते पुण्यपत्तनीं । लक्ष्मणराव नामें सुगुणी । भक्त असे ॥९२॥
तयांचा प्रतिवार्षिक नियम । गुरुपूजेचा चालवी क्रम । तेथेंपाचरी पुरूषोत्तम । पुरूषोत्तमासी ॥९३॥
सर्वास दिधला महाप्रसाद । राहिला तो करी एकविध । तात्यास म्हणती सावध । घेई अखेरचा ॥९४॥
ही तुज अखेरची देणगी । घेई रे सखया योगी । मेळविलीस त्वां पोटगी । पोटभरी ॥९५॥
न व्हावें गां उदास । तूं अससी स्वयंप्रकाश । तुजमाजीं मी वायूस । खेळविलें ॥९६॥
एकांती नेती तयास । सांगती गुज गोष्टीस । आतां सोडीं जीर्ण वस्त्रास । सत्वरी गा ॥९७॥
तूं केवळ परमेश्वर । तुज दिधलें सर्व भांडार । आतां करीं संसार । योग तत्वाचा ॥९८॥
हे बोल नव्हे अमृत । प्याला सदाशिव घटाघट । मज केलेंसी गा कृतार्थ । सद्गुरुराया ॥९९॥
पायीं डोई ठेविली । तेथेंच निश्चल वृत्ती झाली । नाथेंही समाधी लाविली । केवल कुंभक ॥१००॥
दोन घटिका होतां । उतरविती वायू स्वतः । मग शब्दाची सरली वार्ता । सर्व दृष्टीचे खेळ ॥१॥
आला बालक आपुलें घरीं । त्रिवेणीचें स्नानही करी । सर्व काळीं स्नानावरी । सदाशिव ॥२॥
नसे रात्र वा दिवस । भोजन वा उपवास । पाण्यावांचूनी स्नानास । आदरें करी ॥३॥
गंगा यमुना सरस्वती । त्याच्या शरीरीं प्रत्यक्ष वर्तती । तयांचे मीलन त्रिकुटी । नित्य करीतसे ॥४॥
तेथेंच दृष्टी शरीर । हाच स्नानाचा प्रकार । श्रोते हो तुम्ही चतुर । म्यां विशद काय करावें ॥५॥
सोडिलें अन्न एक मास । करी धेनु - दुग्ध पानास । ऐसें पूर्ण होता दिवस । निर्णाणकाल पातला ॥६॥
तत्पूर्वी माधवनाथें । बोलाविलें दुहितेतें । सांगती कडकडूनी भेटे । कन्यकेला ॥७॥
येरू म्हणे मज नाही कन्यापुत्र । मी आहे माझा स्वतंत्र । माझे पुत्र कलत्र । श्रीनाथ हाची ॥८॥
आषाढ वद्य सप्तमीचा । उगवला दिवस सोन्याचा । केला नेम प्रातः काळचा । सदाशिवानें ॥९॥
चढविला वायू वरती । तों तेथेंच घेतली विश्रांती । धन्य धन्य सुमति । भक्त तात्या ॥११०॥
त्याच वेळीं नाथ आले । प्रभूनें शिरीं हस्त ठेविलें । हिमासम शीत सोडिले । दोन श्वास ॥११॥
नाथा झाला थोर आनंद । म्हणती सांठविला उदंड । आतां त्रिकालींचा छंद । येथिचा घेईल ॥१२॥
वाजवी आनंदाची टाळी । नाथदेवी बाहेर आली । कन्येनें आरोळी फोडली । पितृविरहाची ॥१३॥
तो देखोनि आक्रोश । नाथ दिसे मायावश । स्फुंदस्फुंदोनि रडे ईश । बालकापरी ॥१४॥
म्हणे माझें हरपलें मोतीं । ज्याची अखंड असे वसती । तें न दिसे संप्रति । काय करावें ॥१५॥
तात्या तूं कां बससि । सोडी निश्चल स्थितीसी । मी जवळी येतां मौन धरिसी । काय निमित्त ॥१६॥
मी तुज छळिलें गा फार । परि तूं अससी शिष्यवर । सर्व साहुनी अखेर । केली ऐसी ॥१७॥
मी आतां तुझ्या सवें । मधु भाषा करीन स्नेहें । नको रूष्ट होऊं निर्दय । बालका रे ॥१८॥
प्रसवलों रत्नें अनेक । परि होता कोहिनूर एक । मज सोडुनी परलोक । गांठिला स्वयें ॥१९॥
मी जवळ येतां बसणें । हें स्वप्नींही नेणें ।  मज आज ही कृति योजणें । तुज केंवि रुचें ॥१२०॥
ऊठ ऊठ रे सुकुमारा । सोडीं मौनव्रत जरा । तुझ्या बोलाची मधुरा । मज चाखों देईं ॥२१॥
ऐसा आक्रोश ऐकूनी । सर्वत्र दुःखाची सरणी । येई एक सुत झणी । नाथासी सांगे ॥२२॥
तात्याची वस्ती आपूले पदीं । तया मृत्यु नसे कधीं । पहावा आपण प्रभु आधीं । निजरूपीं ॥२३॥
नाथें सोडिलें मायापटल । हांसित केलें वदनकमल । म्हणे रडतां हें जन सकल । म्यां हि वरिला शोक ॥२४॥
सदाशिवतात्या पार्वती । हे शंकर गिरिजा मूर्ती । कैलासीं सुखानें चालविती । आपुला प्रपंच ॥२५॥
यांचा प्रपंच नसे चंचल । तोकल्पांतींही राहील अचल । ऐशा प्रपंचाची माळ । आम्हां देई योगींद्रा ॥२६॥
ऐसी करितां गुरुभक्ती । मुक्ती वरील तयाप्रति । न सांगतां कंठीं । घालील माळ ॥२७॥
ही नव्हे गा कादंबरी । अथवा दंतकथेची सरी । अनुभवाची गोष्ट सारी । सांगतसे ॥२८॥
मग पुण्याहुनी निघे नाथ । करी नामसप्ताहाचें व्रत । राही निशिदिनीं महोत्सवांत । जैसा पळस ग्रामीं ॥२९॥
खानदेशीं आसतां नाथ । आला एक कामिक भक्त म्हणे आमुच्या गृहीं बहुत । धन सांगती ॥१३०॥
आपण दिसतां अंतर्ज्ञानी । तरी सांगावें कोणत्या स्थानीं । लाभ होतां अर्धी वाटणी । देऊं आपणां ॥३१॥
नाथ सांगे त्या दासासी । तव गृहीं असे राशी । ती काढितां सुखी होशी । निश्चयेंसी ॥३२॥
मज नको अर्धा भाग । मी न इच्छी तयाचा संग । त्वांही करावा असंग । या वस्तूशीं ॥३३॥
परि तंव दृढ इच्छेस्तव । सांगतो वस्तूंचा ठाव । खोदूनि पाहीं हात नव । पूर्व बाजू ॥३४॥
कामुका वाटलें मज धन मिळेल । मनीं हर्षला तो सबळ । मनोराज्याचे वाडे सकळ । उभारिले ॥३५॥
गेला आपुल्या घरीं । नाथ वचनासम कृती करी । सांपडला मृत्तिका घट अंतरीं । म्हणे धन मिळालें ॥३६॥
काढिला तो माठ । सोडिला तयाचा पट । तों अस्थींच संग्रह त्यांत । ना धन ना धान्य ॥३७॥
जाहला रूष्ट सद्गुरूवरी । फसविलें आम्हा कां तरी । नसतें धन सांगोनि करी । घात आमुचा ॥३८॥
यातें कोण म्हणेल अंतःसाक्षी । जो आमुचें धन भक्षी । हा कैसा भक्तांते रक्षी । नाकळे ॥३९॥
ज्या ग्रामीं होते नाथ । तेथें धांवला लोभयुक्त । कथिली सर्वही मात । तुवां फसविलें ॥१४०॥
ऐक गा भक्तराया । मी न दे आश्वासना या । मी दिधली नाहीं राया । ध्वनी तुज ॥४१॥
परीं तूं आतां करी एक । या अस्थि गंगेत टाक । तुझे गृह अशुद्ध देख । म्यां शुद्ध करविलें ॥४२॥
आतां होईल द्रव्य संचय । मनीं नको ठेवूं भय । फुकांचें घेवोनी द्रव्य । काय करिसी ॥४३॥
भजोनि नित्य प्रभूसी । करावा प्रपंच उदासी । न करावें अपहारासी । मग लक्ष्मी लाभेल सहज ॥४४॥
हें वाक्य तूं मनी धरीं । सोड सोड आशा दुरी । होई आपुला हितकारी । आधी तूं ॥४५॥
ऐसा बोधुनी तो याचक । तृप्त करी योगनायक । पवित्र करिती शहर नासीक । पुनरपिक ॥४६॥
तेथें भेटेल शिष्य एक । नाम तयाचें भिकू बालक । तोही भोगील सर्व सुख । अनुपम ॥४७॥
अष्टांग योगांचें वर्णन । श्रीनाथ करील आपण । ते हे सर्व श्रोतेजन । ठेवोत हृदयीं ॥४८॥
इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुत विरचिते सदाशिवनिर्याण कथनांनाम सप्तदश किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP